Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

शिर्डी ‘व्हिजन सिटी’ करणार - मुख्यमंत्री
राहाता, ५ ऑगस्ट/वार्ताहर

साईबाबांच्या समाधीला सन २०१८मध्ये १०० वर्षे पूर्ण होत असल्याने या तीर्थक्षेत्राला चालना देण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करून सन २०१८पर्यंत शिर्डीच्या विकासासाठी दरवर्षी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शिर्डी शहराचा समावेश केंद्राच्या ‘व्हिजन सिटी’मध्ये करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली. शिर्डीचे विमानतळ दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बिबटय़ा नगर शहराच्या हद्दीवर इमामपूर परिसरात हल्ल्यात दोघे जखमी
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

नगरपासून अवघ्या २० कि.मी. अंतरावर इमामपूर घाट परिसरात बिबटय़ाच्या हल्ल्यात दोघेजण जखमी झाले. गावकऱ्यांनी बिबटय़ाला पिटाळून लावल्यामुळे सुदैवाने जखमींचे प्राण वाचले. रात्री उशिरापर्यंत बिबटय़ाला पकडण्याचे प्रयत्न वनविभागातर्फे सुरू होते. या प्रकाराने गावकऱ्यांची भीतीने गाळण उडाली आहे.आज सकाळी दहाच्या सुमारास मिनीनाथ आवारे (वय ३५, रा. इमामपूर) रस्त्याने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने त्यांच्यावर हल्ला केला. बिबटय़ाने त्यांच्या हाताला चावा घेतला. सुदैवाने परिसरातील लोक मदतीला धावून आल्याने मिनीनाथ बचावले.

नियोजनबद्ध विकासासाठी राहात्याची निवड - चव्हाण
राहाता, ५ ऑगस्ट/वार्ताहर

नियोजनबद्ध विकासासाठी भरीव निधी देण्यात येणार असून त्यात राहाता शहराचा समावेश करण्यात आला असून, विशेष अनुदानातून पालिकेला निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज केली. राहाता पालिकेने दोन कोटी खर्चून उभारलेल्या व्यापारी संकुल, तहसील कार्यालय, पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते.

गोदडमहाराज मंदिराच्या कळसाची चोरी;
आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी
कर्जत, ५ ऑगस्ट/वार्ताहर
येथील ग्रामदैवत सद्गुरू गोदडमहाराज मंदिरावरील अडीच लाखांच्या कळस चोरीप्रकरणी आरोपी काळू ऊर्फ रामदास उल्हारे यास येथील प्रथम न्यायदंडाधिकारी संतोष देशमुख यांनी तीन वर्षे सक्तमजुरी व चार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.गेल्या १७ ऑगस्ट रोजी ग्रामदैवत सद्गुरू गोदडमहाराज मंदिरावरील कळसाची चोरी झाली. हा प्रकार पुजारी अनिल कृष्णाजी काकडे यांच्या पहाटे ५ वाजता लक्षात आला.

ब्रेल लिपीतील पुस्तकांबद्दल शासन ‘आंधळे’च!
शेखर जोशी

काही महिन्यांच्या मंत्रीपदासाठी मिळालेल्या शासकीय निवासस्थानाच्या नूतनीकरणावर लाखो कोटी रुपये उधळणारे मंत्री आणि कोकण व नाशिक महसूल विभागासाठी कोटय़वधी रुपयांचे पॅकेज जाहीर करणारे राज्यकर्ते ब्रेल लिपीतील पुस्तकांच्या छपाईसाठी नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड (नॅब) या संस्थेच्या अनुदान शिफारसींबाबत मात्र ‘आंधळे’ झाले आहे. हे अनुदान केंद्र शासनाकडून मिळत असले तरी त्यासाठी राज्य शासनाची शिफारस असणे गरजेचे असते.

कपाळकरंटे होऊ नका..
रावते यांचा भाजपला टोला
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
मतदारसंघ आपलाच असला तरी लोकसभेतील मतदानाची घटलेली टक्केवारी चिंताजनक आहे. त्यामुळे काळजी घ्या व टक्केवारी वाढवा, असा सल्ला शिवसेनानेते दिवाकर रावते यांनी आज शिवसेनेच्या नगर शहर मेळाव्यात दिला.तुषार गार्डनमध्ये झालेल्या या मेळाव्यात रावते यांनी भाजपने हा मतदारसंघ मागितल्याची संभावना ‘कपाळकरंटे होऊ नका,’ अशी केली. मुंडे यांचा मतदारसंघ सेनेने मागण्यासारखाच हा प्रकार आहे, असे ते म्हणाले.

लोकन्यायालयात १७ प्रकरणांत तडजोड, ९० हजारांची वसुली
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

जिल्हा विधीसेवा प्राधिकरण, शहर वकील संघ व युनियन बँकेतर्फे आयोजित ११९व्या लोकन्यायालयात १७ प्रकरणांत तडजोड होऊन बँकेची ९० हजार ३५५ रुपयांची वसुली झाली. या शिवाय २ लाख ९३ हजार रुपयांच्या वसुलीबाबत तडजोड झाली.जिल्हा न्यायालयाच्या आवारात झालेल्या या लोकन्यायालयाचे उद्घाटन प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. बी. पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश एन. व्ही. न्हावकर, ए. के. महाडिक, मुख्य न्यायदंडाधिकारी गजानन जोगी, सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) के. के. गौर, श्रीमती ए. एस. खडसे, बँकेचे उपमहाप्रबंधक एस. के. भार्गव, मुख्य प्रबंधक एन. के. कुलकर्णी, प्रबंधक पडशीकर, नगरच्या मुख्य शाखेचे अधिकारी पी. एम. सोनकुसरे आदी उपस्थित होते. लोकन्यायालय यशस्वी होण्यासाठी प्राधिकरणाचे सदस्य सचिव पंकज शाह, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक सुधाकर घावटे, प्राधिकरणाचे अधीक्षक एस. एन. चिटमील आदींनी परिश्रम घेतले. आभार नानासाहेब पादीर यांनी मानले.

दगडवाडीत १५जणांना गॅस्ट्रोची बाधा
पाथर्डी, ५ ऑगस्ट/वार्ताहर
तालुक्यातील दगडवाडी येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून, आतापर्यंत पंधराजणांना गॅस्ट्रोची बाधा झाली आहे. यातील काहींवर नगरच्या खासगी रुग्णालयात, तर काहींवर गावातच उपचार सुरू आहेत. एका अत्यवस्थ महिलेवर नगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दगडवाडीला सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हे पाणी पुरेसे नसल्याने गावकरी आसपासच्या विहिरींचे पाणी पितात. गेल्या दोन दिवसांपासून गावातील काहींना जुलाब, उलटय़ांचा त्रास सुरू झाला. यातील ठकूबाई शिंदे, कुंडलिक शिंदे, बन्सी गायकवाड यांना नगरच्या रुग्णालयात हलविण्यात आले. हिराबाई शिंदे या महिलेची प्रकृती खालावल्याने तिला नगरच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. निर्मला तनपुरे, अशोक शिंदे, संदीप गायकवाड, जयश्री उमाप यांच्यावर गावातच उपचार सुरू आहेत. तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने दगडवाडीच्या प्राथमिक शाळेतच रुग्णांवर उपचार सुरू केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. शिंदे, वैद्यकीय अधिकारी महेश बारगजे, प्रभारी गटविकास अधिकारी एस. एस. मुंडे हे दगडवाडीत रुग्णांवर उपचार करीत आहेत. पंचायत समितीचे सभापती काकासाहेब शिंदे यांनी दगडवाडीला भेट देऊन टँकरच्या खेपा वाढविण्याचा आदेश दिला. पाणी उकळून पिण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले आहे.

भंडारदरा पाणलोटात पाऊस पुन्हा थंडावला
राजूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
भंडारदरा धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस पुन्हा थंडावला असून, आज १२ तासांत केवळ १ मिमी पाऊस पडला. धरणातील पाणीसाठा आता ७ हजार ८८६ दशलक्ष घनफूट झाला आहे. गतवर्षी याच दिवशी धरणात ७ हजार ९६९ दशलक्ष घनफूट पाणी होते. पाणलोटक्षेत्रात काल पडलेला, तसेच आतापर्यंत झालेला पाऊस मिमीमध्ये पुढीलप्रमाणे - भंडारदरा १ (१ हजार २९३), घाटघर ८ (२ हजार ४६४), पांजरे १३ (२ हजार ५७४), रतनवाडी १२ (२ हजार १०६), वाकी १३ (१ हजार ४५). पावसाने उघडिप दिल्याने या भागातील आदिवासी शेतकरी शेतीच्या कामात गर्क आहेत. धरणात कमी कालावधीत पाण्याची बऱ्यापैकी आवक झाल्याने भंडारदरा धरण परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दि. १५ ऑगस्टपर्यंत येथील सर्व हॉटेल्स, सदनिकांचे बुकिंग झाले आहे. तसेच मंत्रालयातून सरकारी विश्रामगृहाचे (कृष्णवंती, पारिजात) आरक्षण झाले आहे.

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा आज व उद्या देशव्यापी संप
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
वेतनवृद्धी करार, निवृत्तिवेतन पर्याय पुन्हा उपलब्ध करून देणे, अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका या प्रमुख तीन मागण्यांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या कर्मचारी युनायटेड फोरमच्या वतीने उद्या (गुरुवार) परवाच्या देशव्यापी संपात शहर जिल्ह्य़ातील सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती फोरमचे सचिव एम.बी. काळे यांनी दिली. फोरमचे नेते प्रभाकर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली माणिक चौकात बडोदा बँकेच्या शाखेसमोर आज बँक कर्मचाऱ्यांची द्वारसभा झाली. संपाबाबतच्या घडामोडींची माहिती यावेळी देण्यात आली. माणिक आडाणे, यू. डी. कुलकर्णी, उमेश मोडक, प्रकाश जोशी, सी.एम. देशपांडे आदी नेते या वेळी उपस्थित होते. संपात स्टेट बँक, बडोदा बँक, पंजाब नॅशनल, युको, महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, युनियन आदी बँक व इतर व्यापारी बँकांचे कर्मचारी सहभागी होतील, असा दावा फोरमतर्फे करण्यात आला.

कृषी विद्यापीठांतील १७ हजार शिक्षक-शिक्षकेतरांचे आंदोलन
राहुरी, ५ ऑगस्ट/वार्ताहर
सहावा वेतन आयोग लागू करावा, नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना आदी मागण्यांबाबत राज्यातील कृषी विद्यापीठांमधील १७ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दि. ४पासून काळ्या फिती लावून कामावर येत आहेत. सर्व कृषी महाविद्यालये, विद्यालये, संशोधन केंद्रांतील कर्मचाऱ्यांमध्ये सहावा वेतन आयोग अजूनही लागू न झाल्याने असंतोष पसरला आहे.आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात मंगळवारी कर्मचाऱ्यांनी आपापल्या मुख्यालयांसमोर मोर्चा काढून विद्यापीठ एकजुटीच्या, तसेच सहावा वेतन आयोग लागू झालाच पाहिजे, अशा घोषणा देत काळ्या फिती लावून कुलसचिवांना मागण्यांचे निवेदन दिले. दुसऱ्या टप्प्यात दि. ११ला सर्व ठिकाणी कर्मचारी एक दिवसाचे लाक्षणिक काम बंद आंदोलन करतील. त्यानंतरही सरकारने दखल न घेतल्यास सर्वानुमते निर्णय घेऊन योग्य वेळी केव्हाही बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशारा महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचारी समन्वय संघाने पत्रकान्वये दिला आहे.

मागण्या मान्य झाल्याने जि.प. परिचारिकांचा संप मागे
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील परिचारिकांनी आजपासून सुरू केलेला संप मागण्या मान्य झाल्याने सायंकाळी मागे घेतल्याची माहिती संघटनेच्या जिल्हाध्यक्षा संगीता कदम यांनी दिली. परिचारिकांनी उद्या (गुरुवार)पासून कामावर हजर व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.ग्रामीण भागात काम करणाऱ्या परिचारिकांना जोखीम भत्ता, धुलाई भत्ता, सुश्रुषा भत्ता, केंद्र सरकारप्रमाणे वेतन मिळावे आदी मागण्यासाठी संप होता. संप यशस्वी करण्यासाठी सचिव सोनवणे, उषा काळभोर, कचरे यांनी प्रयत्न केले.

नांदूर शिकारी येथील अंगणवाडी इमारतीचे बांधकाम निकृष्ट
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
नांदूर शिकारी (ता. नेवासे) येथील अंगणवाडीच्या इमारतीचे बांधकाम निकृष्ट झाल्याने ते केव्हाही कोसळून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे लहान मुलांच्या जीविताला धोका आहे. या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जनकल्याण समाजोन्नती भ्रष्टाचार निवारण समितीने जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन केली. नांदूर शिकारी येथील अंगणवाडीचा पीसीसी दर्जा चांगला नाही. कॉलम साईजमध्ये नाहीत. बांधकामासाठी सिमेंटऐवजी माती मिसळलेली वाळू वापरण्यात आली. साहित्य अंदाजपत्रकानुसार नाही इ. तक्रारी ग्रामस्थांनी पूर्वीच गटविकास अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या परंतु त्यांची दखल घेतली गेली नाही.त्यानंतर दोनच दिवसात स्लॅबला तडे गेले. लिंटल सज्जा गळून पडला. गावकऱ्यांनी तक्रार केल्यावर ठेकेदाराने घाईने सिमेंटचे पाणी ओतून तडे बुजविण्याचा प्रयत्न केला. बांधकाम कधीही कोसळून मुलांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.दरम्यान कार्यकारी अभियंत्यांनी नेवाश्याच्या उपअभियंत्यांना अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.

आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांची बांधकामे निकृष्ट; ठेकेदाराची देयके रोखण्याचे आदेश
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
जिल्हा परिषदेची आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची बांधकामे निकृष्ट होत असल्याच्या तक्रारी आज आरोग्य समितीच्या सभेत करण्यात आल्या. सदस्यांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली.
नेवासे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पावसाळ्यात गळत असल्याने तिची दुरुस्ती करण्यात आली. परंतु वर्ष होण्यापूर्वीच ती यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा गळायला लागली. खिरविरे (ता. अकोले) येथील केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाचे बांधकाम नुकतेच करण्यात आले. तेही गळायला लागले. सभापती सुजित झावरे यांनी संबंधित ठेकेदाराची देयके अदा न करण्याची सूचना केली. केंद्राची बांधकामे, दुरुस्तीसाठी सुमारे ९ कोटींचे अनुदान मिळाले. त्याचे नियोजन करताना कान्हूर पठार (पारनेर), मांडवगण (श्रीगोंदे), अस्तगाव (राहाता), उंदीरगाव (श्रीरामपूर) येथील कामांना प्राधान्य देण्याचे ठरले. चास (ता. नगर) येथील मंजूर उपकेंद्र भोयरे पठार येथे स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रांची अनेक कामे अपूर्ण असल्याने ती पूर्ण करण्याच्या सूचना बांधकाम विभागास देण्यात आल्या. स्वाइन फ्लूबाबत खबरदारी घेण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आली. सदस्य नामदेवराव घोरपडे, अरुण होळकर, रावसाहेब शेळके, जईबाई ढोकळ, बाळासाहेब नाईक आदी सभेस उपस्थित होते.

‘अध्यात्म व शेतीची सांगड घातल्यास समृद्धी’
नगर, ३ ऑगस्ट/प्रतिनिधी
समृद्धी आली की, माणूस अध्यात्मापासून बाजूला जातो. म्हणून शेतीशी संबंधित प्रश्नांची जोड अध्यात्माला दिली पाहिजे, असे प्रतिपादन हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी केले.हिवरेबाजार येथे कृषी विभाग, ‘आत्मा’ व ग्रामस्थांतर्फे हरिनाम व कृ षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पवार बोलत होते. भारत हा कृषिप्रधान व प्राचीन संस्कृती लाभलेला देश आहे. त्यामुळे अध्यात्म व शेतीची सांगड घातली गेल्यास सर्व प्रकारची संपन्नता वाढेल, असे ते म्हणाले.कृषी उपसंचालक संभाजी गायकवाड म्हणाले की, आपली संस्कृती कृषी व ऋषींची आहे. त्यामुळे अध्यात्माइतकेच कृषीला महत्त्व आले. विभागीय कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, गोरक्षनाथ सरोदे, जि.प. कृषी अधिकारी पी. एन. देशमुख या वेळी उपस्थित होते. दि. ८ रोजी समारोपानिमित्त दीप वंदना दिंडी प्रदक्षिणा, कृषी व अध्यात्मिक ग्रंथ मिरवणूक, काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रम होतील.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार
शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत
औरंगाबाद, ५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत स्थानिक पातळीवर होत असलेल्या गटबाजीला वरिष्ठांनी अभय दिले. वरिष्ठांना वारंवार तक्रारी करूनही गटबाजी आणि पक्षातंर्गत कलह थांबत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील औरंगाबाद शहर कार्यकारिणीतील प्रमुख पदावर काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री हडको टी. व्ही. सेंटरच्या सभेत मनसेचे कार्यालयप्रमुख अविनाश सुरडकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला.रेणुका गायकवाड, हौसा कांबळे, सतीश पवार, सचिन वाडे पाटील, अमरसिंग परदेशी, राजेश गाडेकर, भरत गायकवाड, सचिन सोमाणी, बाळू घोलप, नितीन पाथरुड, नटराज शुक्ला, नितीन साब्दे, सचिन दिग्रसकर, वाहन चालक सेनेचे शहराध्यक्ष बालाजी डबडे, दत्ता मानकापे, निवृत्ती खैरे, ज्ञानेश्वर कलवले, राजेंद्र गव्हाणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी मनसेला रामराम ठोकून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. या सर्वाचे स्वागत करण्यात आले.

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या पोटनियम दुरुस्तीस मंजुरी - जाधव
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वार्षिक सभेने मंजूर केलेल्या पोटनियम दुरुस्तीस जिल्हा उपनिबंधकांनीही मंजुरी दिल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राघोबा जाधव यांनी दिली. संस्थेचा कर्जावरील व्याजदरही १० टक्के केल्याचे त्यांनी सांगितले.श्री. जाधव म्हणाले की, यापुढे संस्थेच्या प्रत्येक निवडणुकीत मतदानासाठी संस्थेचे खाते पासबुक हेच ओळखपत्र ग्राह्य़ समजण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संस्थेने सभासदांच्या वर्गणीत वाढ केली असून, शाळा-महाविद्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांचे ऑगस्टचे पगारपत्रक १५ ऑगस्टपूर्वी कळवून सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. चालू वर्षांत विशेष प्रावीण्याबद्दल पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांची नावे येत्या मार्चपर्यंत संस्थेकडे पाठवावीत, असे आवाहन उपाध्यक्ष विनायक उंडे यांनी केले.

राज्य गणित अध्यापक मंडळावर राजेंद्र सोनवणे यांची निवड
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
राज्य गणित अध्यापक महामंडळावर जिल्हा माध्यमिक सोसायटीचे संचालक व नेवासे येथील ज्ञानोदय इंग्लिश स्कूलमधील शिक्षक राजेंद्र सोनवणे यांची निवड झाली. या समितीवर जिल्ह्य़ाला दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व मिळाले आहे.राज्य गणित अध्यापक महामंडळाची विशेष बैठक नुकतीच पुणे येथे झाली. त्यात ही निवड करण्यात आली. अध्यक्ष प्रदीप गौतम (वर्धा) व सचिव विठ्ठलराव शिंदे (लातूर) यांनी सोनवणे यांच्या नावाचा ठराव मांडला होता. त्यानंतर मंडळाच्या शिक्षक भवन समिती प्रमुखपदी सोनवणे यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. सोनवणे हे जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे जिल्हा परीक्षाप्रमुख असून, ते नेवाशाचे अध्यक्ष आहेत. या निवडीबद्दल त्यांचे जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष विलासराव आठरे, उपाध्यक्ष रामनाथ वाघ, सचिव जी. डी. खानदेशे, तसेच माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे, अध्यक्ष राघू जाधव, उपाध्यक्ष विनायक उंडे,सचिव साहेबराव वाढेकर व मुख्याध्यापक जगन्नाथ शिदोरे यांनी अभिनंदन केले.

राहाता तालुक्यातील ग्रामपंचायतींचे संगणकीकरण
नगर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून राहाता तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीचे संगणकीकरण करण्याचा पथदर्शी प्रकल्प ‘महाग्राम डॉटकॉम’ कंपनीतर्फे राबविण्यात आल्याची माहिती संचालक दीपक गोरे व नीलेश शास्त्री यांनी दिली.संगणकाच्या वापरामुळे वेळ व पैशांची बचत होऊन कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. कंपनीने २०दिवसांत हे काम पूर्ण केले, असे गोरे म्हणाले.राहाता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेट ब्रॉडबॅन्ड सेवेने जोडल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

इंटिग्रेटेड शैक्षणिक संकुलाचे आज काष्टीत उद्घाटन
श्रीगोंदे, ५ ऑगस्ट/वार्ताहर
देशातील सर्वात मोठे व पहिले इंटिग्रेटेड शैक्षणिक संकुलाचे काष्टी येथे बुधवारी राष्ट्रीय संत भैय्यूजी महाराज यांच्या हस्ते उद्घाटन झाले. म्हणाले, जंगलीदास महाराजांच्या आशीर्वादाने होणाऱ्या समारंभाचे अध्यक्षस्थानी वनमंत्री बबनराव पाचपुते. आमदार शिवाजी कर्डिले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दादा कळमकर, व हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ झाला. संस्था परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालय, फार्मसी, एम. बी.ए. व पब्लिक स्कूल या निमित्ताने सुरु करीत आहे. शाळेतील पहिल्या दिवसापासून उच्च शिक्षणापर्यंतची येथे सुविधा असेल.

गोरोबा पतसंस्थेतर्फे नऊ टक्के लाभांश
जामखेड, ५ ऑगस्ट/वार्ताहर
येथील संत गोरोबा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना ९ टक्के लाभांश देण्याची घोषणा संस्थेच्या वार्षिक सभेत करण्यात आली. पतसंस्थेचे अध्यक्ष विठ्ठलराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली. सभेत गेल्या ९ वर्षांतील वाटचालीचा आढावा घेण्यात आला, तसेच ११ विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. उपाध्यक्ष जोर्वेकर, संचालक वाडेकर, खंडागळे, सभासद माधव देवतरसे, बंडुकाका देशमुख, प्रा. कुंभार, कोल्हे, ऑडीटर मेंगडे, व्यवस्थापक गौतम केवडे आदी उपस्थित होते. सभासदांना ९ टक्के लाभांश देणारी तालुक्यातील ही पहिलीच पतसंस्था ठरली.

पिंपळगाव खांड प्रकल्पाचे शनिवारी भूमिपूजन
राजूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड लघुपाटबंधारे प्रकल्पाचे भूमिपूजन शनिवारी (दि. ८) जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. पालकमंत्री दिलीप वळसे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार मधुकरराव पिचड यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती युवक नेते वैभव पिचड यांनी दिली. ४५ कोटी खर्चाचा हा प्रकल्प असून, १ हजार ७७८ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्याची क्षमता ६०० दशलक्ष घनफूट असल्याची माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नान्नोर यांनी दिली.

सार्वजनिक अस्वच्छतेकडे राजूर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
राजूर, ५ ऑगस्ट/वार्ताहर
सार्वजनिक ठिकाणी सुटलेली दरुगधी, तुंबलेल्या गटारी, जागोजागी कचऱ्याचे ढीग, मोकळ्या जागेवर आडोशाला प्रात:र्विधी या व अशा प्रकारांमुळे गावचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीचा अक्षम्य कारभारच यास कारणीभूत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकारांमुळे गावात साथींचे आजार बळावले आहेत. हागणदारीमुक्ती कार्यक्रम गावात औषधालाही दिसत नाही, तसेच सार्वजनिक स्वच्छतेबाबतही बेपर्वा वृत्ती वाढली आहे. उघडय़ावर शौचास बसणाऱ्यांमध्ये अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांचे प्रमाणच जास्त आहे. त्यामुळे महिला, तसेच शाळा-महाविद्यालयात ये-जा करताना विद्यार्थ्यांची कुचंबणा होते. गावच्या आरोग्याच्या प्रश्नावर आता सामाजिक संस्थांनी आवाज उठविण्याचे ठरविले आहे.

जवळ्यात ‘रास्ता रोको’
जामखेड, ५ ऑगस्ट/वार्ताहर

सच्चर आयोगाच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी तालुक्यातील जवळे येथे अल्लाउद्दीन काझी यांच्या नेतृत्वाखाली तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जामखेड-करमाळा रस्त्यावर झालेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किसनराव दळवी, प्रशांत पाटील, इशाक शेख, हुसेन शेख, शब्बीर शेख, ग्रामपंचायत सदस्य रफीक शेख, हबीब शेख, फकीर महंमद, अस्लम शेख आदींसह मुस्लीम बांधव सहभागी झाले होते.

‘कर्जत-जामखेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी’
जामखेड, ५ ऑगस्ट/वार्ताहर
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी दोन्ही तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी केली. या मतदारसंघात काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याचा दावा करून राष्ट्रवादीचा उमेदवार दिल्यास तो निवडून येऊ शकतो, असे कार्यकर्त्यांनी म्हटल आहे.
जि. प.चे माजी उपाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली. या मागणीबाबत पक्षश्रेष्ठींना प्रत्यक्ष भेटण्याचे बैठकीत ठरले. तालुकाध्यक्ष सुरेश भोसले, राजाराम लोखंडे, भाऊसाहेब जंजीरे, दिलीप बाफना, किसनराव दळवी, डॉ. भास्कर मोरे, नरेंद्र जाधव, लता पवार, निर्मला राळेभात, उमर कुरेशी या वेळी उपस्थित होते. बैठकीत अनेक इच्छुकांनी निवडणऊक लढविण्यास तयार असल्याचे सांगितले. पक्षाच्या डॉक्टर सेलला राज्यात सहा जागा मागण्यात आल्याची माहिती डॉ. मोरे यांनी दिली.

मांडवगणला दि. १० रोजी पाणी क्रांती परिषदेचे आयोजन
श्रीगोंदे, ५ ऑगस्ट/वार्ताहर

तालुक्यातील जिरायत भाग म्हणून हिणवून केवळ निवडणुकांपुरते उपयोग करणाऱ्या नेत्यांना धडा शिकविण्यासाठी व हक्काचे पाणी मिळविण्यासाठी मांडवगण येथे दि. १० ऑगस्ट रोजी पाणी क्रांती परिषदेचे आयोजन केल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, शेती आता व्यापार बनू पाहते आहे. पाणी व वीज असेल तर शेतकरी त्यात कष्टातून सोने पिकवेल, पण तालुक्यातील मांडवगण व नगर तालुक्यातील काही भागाला वर्षांनुवर्षे पाणी न मिळाल्याने तो भाग उजाड बनला आहे. तालुक्यातील पुढारी पाण्याची आश्वासने देतात, पण या भागातील युवक वर्ग राजकारण, जात-पात बाजूला ठेवून या पाण्यासाठी संघर्ष करण्यासाठी सरसावला आहे. जिल्ह्य़ातील शेवगाव तालुक्यातील ताजनापूर व निळवंडेचे पाणी तळेगाव भागात आणण्यासाठी वांबोरीचाटीला निधी दिला. मात्र श्रीगोंदे तालुक्यासह नगर तालुक्यातील गावांबाबत सरकार दुजाभाव करीत आहे. मात्र आपण हे हक्काचे पाणी कसे मिळवायचे यासाठी या पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे जगताप म्हणाले.

कनिष्ठ महाविद्यालय घोषणेचे निघोजला आतषबाजीने स्वागत
निघोज, ५ ऑगस्ट/वार्ताहर

मूलिकादेवी विद्यालयाशी संलग्न कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयास मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मान्यता दिल्याच्या घोषणेचे येथे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे खजिनदार माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी गेली ४ वर्षे यासाठी प्रयत्न, तर संस्थेचे सदस्य मच्छिंद्र वराळ यांनी पाठपुरावा केला.माजी खासदार बाळासाहेब विखे, तसेच शालेय शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज नगरमध्ये संस्थेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे या बाबत लक्ष वेधले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषणात याची घोषणा केली. पारनेर तालुका युवक विकास आघाडीचे संदीप वराळ, तसेच त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी येथे फटाक्यांची आतषबाजी करून या घोषणेचे स्वागत केले. या भागातील विद्यार्थ्यांना कला व वाणिज्य शाखेचे शिक्षण मिळण्याची आता सोय होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया श्री. संदीप वराळ यांनी व्यक्त केली. या भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे न्याय दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आपण आभार मानत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.