Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

नितीन राऊत यांचे सार्वजनिक जागेवर अतिक्रमण
नगरसेवक विनोद वालदेंसह ३०६ जणांचा समावेश; विभागीय आयुक्तांची कबुली
नागपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी
बेझनबाग भागातील सार्वजनिक उपयोगाच्या जागेवर ३०६ अतिक्रमणे झाल्याचे विभागीय आयुक्तांनी त्यांच्या अहवालात मान्य केले आहे. या भागातील आमदार व गृहराज्यमंत्री नितीन राऊत यांच्या तीन घरांच्या अतिक्रमणाचाही यात समावेश असल्याचे सांगणारा हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला सादर करण्यात आला आहे.

फळांच्या भावातही वाढ
नागपूर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून अन्नधान्य, भाजीपाला, साखर यांच्यासह फळांच्या भावातही चांगलीच वाढ झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या दिवसात फळांना असणारी मागणी कमी झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंसह सर्वच वस्तूंच्या भावात वाढ होत असल्याने सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. सध्या श्रावण महिन्यानिमित्त विविध सण साजरे करण्यात येत असल्याने फळांना विशेष मागणी असते. मात्र, मागणीच्या तुलनेत बाजारपेठेत फळं उपलब्ध नसल्याने फळांच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे.

कारागृहाच्या गजाआड भावंडांचे रक्षाबंधन
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

ज्या बहिणीचे रक्षण करताना ७ वर्षांपूर्वी रक्षाबंधनाच्या दोन दिवस आधी भावाच्या हातून गुन्हा घडला आणि त्यासाठी शिक्षा झाली, त्याच बहिणीने आज मध्यवर्ती कारागृहात येऊन शिक्षा भोगणाऱ्या भावाच्या हाताला राखी बांधली व डोळ्यातील आसवांना मोकळी वाट करून दिली.. मध्यवर्ती कारागृहात आज रक्षाबंधनाचा सण आयोजित करण्यात आला होता. मानवाची मूळ प्रवृत्ती गुन्हेगारीची नसते, परिस्थितीच त्याला गुन्हेगार बनवते.

पूर्व विदर्भातील सिंचन प्रकल्पांना ५२० कोटींचा फटका
राज्यपालांच्या निर्देशांची शासनाकडून पायमल्ली
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
गोसीखुर्द धरणाचा राष्ट्रीय प्रकल्पात समावेश झाल्यामुळे सिंचन प्रकल्पांसाठी अनुशेष निधीचे वाटप करताना हा प्रकल्प वगळून निधी देण्यात यावा, या राज्यपालांच्या निर्देशांचे राज्य शासनाने उल्लंघन केल्याने पूर्व विदर्भातील सिंचन प्रकल्पांना ५२० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

महाराजबागेत आणखी पाच नवीन पाहुणे
बारा वर्षांनंतर दोन मगरींचे आगमन

नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
महाराजबाग प्राणीसंग्रहालयात आज पाच नव्या पाहुण्यांचे आगमन झाल्याने पर्यटकांना नवे प्राणी पाहण्याची संधी चालून आली आहे. वर्धा जिल्हय़ातील पिपल्स फॉर अ‍ॅनिमल सेंटरमधून आज दुपारी साडेचार वाजताच्या दरम्यान दोन मगर, एक चिंकारा (भेडकी) एक चितळ आणि एक मोर आणण्यात आला. उल्लेखनीय म्हणजे तब्बल १२ वर्षांनंतर पहिल्यांदाच महाराजबागेत मगरींचे आगमन झाले आहे. वर्धा जिल्ह्य़ात २००४ साली स्थापन झालेल्या पिपल्स फॉर अ‍ॅनिमल सेंटरला रेस्क्यू सेंटर म्हणून केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने मान्यता दिली होती.

गंपूजी घाटोळेसह सात आरोपींना पोलीस कोठडी
उमेश घाटोळे खून प्रकरण
कुही, ५ ऑगस्ट / वार्ताहर
नरसाळा परिसरात झालेल्या उमेश गणपत घाटोळे (३६) याच्या खून प्रकरणाला कलाटणी मिळाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा नेते व प्रवक्ते गंपूजी पांडुरंग घाटोळे, संजय दौलत ढोबळे, नितीन माणिक देशमुख या तिघांना कुही पोलिसांनी शिताफीने ४ ऑगस्टला अटक केली. या प्रकरणातील सात आरोपींची सात ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली.

सेवानिवृत्त रेल्वे अधीक्षकाचा संशयास्पद मृत्यू
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

सादिकाबाद कॉलनीत राहणाऱ्या एका सेवानिवृत्त रेल्वे अधीक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. मुरलीमनोहर देवकीनंदनलाल सक्सेना (वय ८३) हे त्यांचे नाव आहे. त्यांच्या दारासमोर सकाळी साडेनऊ वाजता दुधाचा पुडा पडून असल्याचे शेजाऱ्यांना दिसले. त्यांना शंका असता त्यांनी मुरलीमनोहर यांच्या मुलाचा मित्र सचिन कृष्णचंद श्रीवास्तव (रा. प्रशांत कॉलनी) याला कळवले. सचिन तेथे आला. त्याने गिट्टीखदान पोलिसांना कळवले. पोलिसांनी दार उघडून बघितले असता न्हाणीघरात मुरलीमनोहर मृतावस्थेत दिसल़े पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेयो रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी तूर्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली. मुरलीमनोहर सक्सेना एकटेच राहत होत़े त्यांचा मृत्यू संशयास्पद असून शवविच्छेदन आहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे. बाहेरगावी राहत असलेल्या त्यांचा मुलाला ही घटना कळवण्यात आली.

महावीर युथ क्लबतर्फे विद्यार्थ्यांना भोजनदान
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
महावीर युथ क्लबच्या वतीने स्वातंत्र्य संग्राम सैनिक दिवं. आनंद बंड यांच्या पुण्यतिथीनिमित्त लकडगंज येथील अनाथ विद्यार्थीगृहातील विद्यार्थ्यांना भोजनदान करण्यात आले. यावेळी सकल जैन समाजाचे महामंत्री नरेश पाटनी, राकेश पाटनी, लोकेश पाटोदी, घनश्याम मेहता, दिलीप राखे, कुलभुषण डहाळे, अशोक जैन उपस्थित होते. महावीर युथ क्लबचे अध्यक्ष मनोज बंड यांनी सर्वाचे स्वागत केले. कार्यक्रमाला दिनेश सावळकर, आनंद भुसारी, रमेश उदेपूरकर, सुधीर गिल्लरकर, मनुकांत गडेकर, प्रभावीत बंड, उषा बंड आदी उपस्थित होते.

योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा समारोप
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
पतजंली योग समितीतर्फे आयोजित योग शिक्षक प्रशिक्षण शिबिराचा समारोप सुभाष नगरातील शितला माता मंदिर समाज भवनात झाला. माजी महापौर विकास ठाकरे, अ‍ॅड. नामदेवराव फटिंग, यशपाल आर्य, नगरसेविका प्रेरणा कापसे आणि शशिकांत जोशी प्रमुख पाहुणे होते. एक महिन्याच्या शिबिरात ७० जणांना प्रशिक्षण देण्यात आले. १०० जणांना भारत स्वाभिमानचे सदस्य करण्यात आले. डॉ. एम. पी. प्रचंड यांचेही शिबिरात व्याख्यान झाले. यावेळी पंजाबराव देशमुख, प्रा. रामू गावंडे, संजय खोंडे, दत्तू चौधरी, निहार बॅनर्जी, राजीव कर्ताळकर, वासुदेवराव रक्षक शोभा भागिया, योगाचार्य तोतडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

डॉ. आनंदमोहन सूर यांना आदरांजली
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
एन.के.पी.साळवे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्समध्ये डॉ. आनंदमोहन सूर यांना दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना स्वर्णपदक आणि ‘पिडियाट्रीक्स’ या विषयात उच्चांक गाठणाऱ्या विद्यार्थ्यांला पारितोषिक देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. याप्रसंगी बोलताना एन.के.पी. साळवे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. दासगुप्ता यांनी डॉ. सुर हे प्रेमळ, नम्र स्वभावाचे आणि विश्वासु व्यक्ती असल्याचे प्रतिपादन केले. विभागप्रमुख डॉ. विठ्ठल दांडगे यांनी डॉ. सूर यांच्या साधेपणावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमात उपस्थित असलेले इंडियन अकादमी ऑफ पिडियाट्रीक्सचे माजी अध्यक्ष आणि उदयपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. आर.के. अग्रवाल यांनी कुपोषण या विषयावर प्रकाश टाकला. कुपोषण ही समस्या फक्त डॉक्टरांचीच नव्हे, तर ही राष्ट्रीय समस्या आहे. सरकारने याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. अग्रवाल म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन डॉ. अंजली एडबोर यांनी केले. डॉ. पुनम महाजन यांनी आभार मानले. डॉ. तिडके, डॉ. अरोरा, डॉ. गाडेकर यांनी कार्यक्रमाकरता सहकार्य केले.

रिझव्‍‌र्ह बँक एम्प्लॉईज सोसायटीची आमसभा
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
रिझव्‍‌र्ह बँक एम्प्लॉईल को-ऑपरेटीव्ह सोसायटीची आमसभा संस्थेचे अध्यक्ष जीवन देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली धरमपेठ शिक्षण संस्थेच्या मुंडले सभागृहात पार पडली. संस्थेचे सचिव प्रफुल्ल नांदेडकर यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. संजय चेपुरवार यांनी लेखा विवरण सभेपुढे मांडले. लेखा विवरणांबाबत शंकांचे निरसन नांदेडकर व चेपुरवार यांनी केले. एक कोटी एक लाखांपेक्षा जास्त शुद्ध नफा मिळवल्याबद्दल उपस्थित सभासदांनी संचालक मंडळाचे कौतुक केले. सभासदांना १५ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. यावेळी सदस्यांनी अनेक प्रस्ताव मांडले. सुवर्ण महोत्सवी वर्षांत संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने गायिका बेला शेंडे यांचा कार्यक्रम, संस्थेच्या आजी व माजी पदाधिकाऱ्यांचा सत्कार, अंशधारकांना स्मृत्यर्थ सुवर्ण मुद्रेचे वितरण व अनेक सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे. संस्थेचे उपसचिव सुरेश भुंजे यांनी सर्वाचे आभार मानले.

माथाडी महामंडळाच्या मागणी सप्ताहाचा रविवारी समारोप
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
असंघटित, असुरक्षित कष्टकऱ्यांना न्याय मिळावा, त्यांना संरक्षण देणारे कायदे व योजना राबविणारे हात मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी महामंडळातर्फे मागणी सप्ताह पाळण्यात येत आहे. या सप्ताहाचा रविवारी, ९ ऑगस्टला क्रांती मैदानावर समारोप करण्यात येईल. शेतकऱ्यांना पेन्शन, विदर्भातील कामगार खात्यामध्ये अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार उपआयुक्त, कामगार अधिकारी यांच्या रिक्त जागा त्वरीत भरण्यात याव्यात, सामाजिक सुरक्षा कायदा, सुरक्षा रक्षक कायदा, मोलकरीण कायदा, बांधकाम कामगारांसाठी मंडळ स्थापन करण्यात यावे, आदी मागण्या महामंडळाच्या आहेत. सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी कळमना मार्केटमधील कामगारांनी एकत्र येऊन याला प्रारंभ केला. यावेळी किशोर पालांदूरकर, देवराव आंबटकर, खुशाल कावळे, कन्हायलाल मोर्य, पुनम जांगडे, गीता चावके आदींनी बाजार समितीच्या सचिवांना निवेदन दिले.

ग्राहक पंचायतच्या आयुक्तांना कर आकारणीबाबत सूचना
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

कर आकारणीबाबत महापालिकेचे अतिरिक्त उपायुक्त रामटेके यांच्याशी झालेल्या चर्चेबाबतचे लेखी निवेदन ग्राहक पंचायतच्यावतीने महापालिकेचे आयुक्त असिम गुप्ता यांना देण्यात आले. ऑक्ट्रॉय आकारणीबाबत निर्णय घेताना या चर्चेतील मुद्यांचा विचार करावा, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.व्हॅट आकारणीच्या वेळी तो सर्व लोकल टॅक्ससह राहील, असे आश्वासन सरकारने दिले होते. ते आश्वासन न पाळता महापालिका क्षेत्रात वेगळी ऑक्ट्रॉय आकारणी केली जाते हे निषेधार्ह आहे. उत्पादन मुल्यावर सर्व कर आकारणी व नफा आकारणी व्हावी, करावर कर किंवा नफा आकारला जाऊ नये, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा एमआरपी आकारणी व त्या पद्धतीला मुलत: विरोध आहे, ती रद्द व्हावी. एमआरपीमध्ये व्हॅट आकारणीसाठी जी मुळ किंमत हिशेबात घेण्यात आली आहे ती, म्हणजेच नफा वगळता उत्पादन मुल्य ऑक्ट्रॉय आकारणीसाठी हिशेबात घेण्यात यावे, अन्नधान्य, खाद्यतेल, साखर व गुळ या जीवनावश्यक वस्तुंवर कोणतीही कर आकारणी करण्यात येऊ नये, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरील बंदीचे स्वागत
कुंभार समाज महासंघातर्फे महापौर इवनाते यांचा सत्कार
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्ती शहरात येऊ न देता नाक्यावरच त्यावर बंदी घालण्यात येणार असल्याच्या महापालिकेच्या निर्णयाचे महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाने स्वागत केले असून या निर्णयाबद्दल महापौर माया इवनाते यांचा सत्कार केला. शहरात मोठय़ा प्रमाणात प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तींची आवक वाढल्यामुळे अनेक कुंभारांचा मातीपासून मूर्ती बनविण्याचा पारंपरिक व्यवसाय नष्ट होतो की काय, अशी भीती निर्माण झाली होती. महापालिकेच्या या निर्णयामुळे हजारो वषार्ंपासून पारंपरिक मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांच्या कला आपसुकच जोपासली जाणार आहे. महाराष्ट्र कुंभार समाजाचे जिल्हाध्यक्ष गोपाल बनकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर माया इवनाते यांना कुंभारांच्या समस्यांबाबत निवेदन दिले आणि त्यांचा सत्कार केला. यावेळी डॉ. मिलिंद गणवीर, नगरसेविका अल्का शेरकुले, भोलानाथ सहारे, चंदनलाल प्रजापती, दशरथ प्रजापती, श्रीराम बातकुलकर, राजीव आमदे, ज्ञानेश्वर गाते, चंदू ठाकरे, इश्वर वाल्दे आदी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या नावाने समाज भवन निर्माण केल्याबद्दल महापौर माया इवनाते, अनिल सोले व नाना शामकुळे यांचेही स्वागत करण्यात आले. सुरेश पाठक यांनी संचालन केले.

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे कुलगुरूंना निवेदन
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी महासंघाने सहावा वेतन आयोग व इतर मागण्यांकरता सुरू केलेल्या आंदोलनातंर्गत मंगळवारी लाक्षणिक बंद पुकारला होता. विद्यापीठ शिक्षकेत्तर सेवक संघाच्या नेतृत्त्वाखाली कर्मचाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी कुलगुरूंना निवेदन देण्यात आले. प्रशासनाने ऐनवेळी परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांमध्ये दुही माजविण्याचा प्रयत्न केल्याबद्दल कर्मचारी नेते राजेश ढेंगरे, गजू कुकडे, सुनील कातुरे, माया कोवे, सुनील अमरावतकर, बाळकृष्ण ईचे, दिनेश दखणे यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. कुलगुरू डॉ. एस.एन. पठाण, प्र-कुलगुरू डॉ. गौरीशंकर पाराशर, कुलसचिव सुभाष बेलसरे यांना कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. सचिव स्तरावर झालेल्या बैठकीत महासंघाला दिलेले लेखी आश्वासन तसेच, शिक्षण संचालकांनी फॅक्सद्वारे सहाव्या वेतन आयोगाच्या मान्यते करता मागविलेली आवश्यक माहिती तात्काळ मंत्रिमंडळाच्या बैठकीत समाविष्ट करीत असल्याचे कळविल्यामुळे महासंघाने सुरू केलेले आंदोलन तुर्तास स्थगित करत असल्याचे नागपूर विद्यापीठ शिक्षकेत्तर सेवक संघाचे महासचिव राजेंद्र पाठक यांनी कर्मचाऱ्यांच्या सभेत जाहीर केले.

संती गणेश मंडळ उभारणार तिरुपतीच्या मंदिराची प्रतिकृती
नागपूर, ५ जुलै / प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक वातावरणाची निर्मिती करणाऱ्या संती गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी तिरुपतीच्या बालाजी मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार असून ज्या जागेवर ही प्रतिकृती उभारण्यात येणार आहे, त्या जागेचे भूमिपूजन नुकतेच शेअरखानच्या क्षेत्रीय कार्यालयाचे प्रमुख संचालक शैलेश कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यवसायी रमेश पसारी, भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश व्यास, साई गजानन इन्फ्रास्ट्रक्चरचे विजयसिंह ठाकूर, भास्कर वाघोळे, डॉ. सुरेश चांडक, विश्वास गोसेवाडे उपस्थित होते. संजय चिचोळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी राजेश श्रीमानकर, सुनील साऊरकर, मंगेश वडय़ाळकर, अनिल वाघ, समीर वडय़ाळकर, आशिष बुधोलिया, जयंत दीक्षित, दत्ता हिवसे, राजू वितोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

कुंभलकर महाविद्यालयात एचआयव्ही-डॉट्सवर कार्यशाळा
नागपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी
कुंभलकर समाजकार्य सांध्यकालीन महाविद्यालयात एचआयव्ही-टीबी डॉट्सवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव योगेश कुंभलकर व व्यासपीठावर सहसचिव प्रकाश कुंभलकर, प्राचार्या डॉ. प्रगती नरखेडकर, प्रा. खुशाल मेले, राजेश कुंभलकर, रियाझ काझी, राजेश्री अंबारे होते. सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने एड्स व टीबीच्या रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचवून सामाजिक दायित्व पार पाडावे, असे आवाहन योगेश कुंभलकर यांनी केले. समाजातील एक जबाबदार घटक या नात्याने विद्यार्थ्यांनी रुग्णांना योग्य उपचारासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन डॉ. डकर यांनी केले. काझी व अंबारे यांनी एड्स, टीबी आजाराबाबत मार्गदर्शन करताना आजाराची कारणे, लक्षणे, त्याचे स्वरूप, त्यावर करण्यात येणारा उपचार आदीबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितेश अंबादे व संचालन प्रकाश कुंभलकर यांनी केले. प्रा. विलास धबाले यांनी आभार मानले.

जनसमस्या निवारण परिषदेचे सहआयुक्तांना निवेदन
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
जनसमस्या निवारण परिषदेच्यावतीने महापालिका झोन क्र.५चे सहआयुक्त दि.गो. पाटील यांना वॉर्डातील समस्यांचे निवेदन दिले. नंदनवन झोपडपट्टीत गेल्या अनेक महिन्यांपासून गडरलाईनच्या अनेक टाक्यांवरची झाकने फुटली आहेत. वॉर्ड क्र. ९९मध्ये दुषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांना कावीळची लागण झाली आहे. जगनाडे चौक ते के.डी.के. कॉलेज रोडच्या बाजूला असलेल्या नाल्या अर्धवट साफ केल्यामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरते. याच मार्गावरील हायमास्ट लाईटसुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. येथील पाणीसमस्या गंभीर आहे. या समस्यासंदर्भात परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनायक गणवीर यांच्या नेतृत्त्वाखाली निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात संघटन सचिव किशोर तांबे, बाबासाहेब गावंडे, सुरेश मेश्राम, मनोहर काळे, दक्षिण विभाग अध्यक्ष दशरथ कांबळे, पूर्व विभाग अध्यक्ष प्रशांत शेंडे, महिला आघाडी शहर अध्यक्ष नलिनी खोडे, सरचिटणीस यामिनी गोरेकर, सहसचिव संजय नगरारे आदी सहभागी होते.

सीताबर्डीवरील दत्त मंदिरात उद्यापासून भागवत प्रवचन
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
सीताबर्डीवरील मोदी नंबर २ मधील यमुनाबाई देशमुख दत्त मंदिर ट्रस्ट येथे शुक्रवार, ७ ऑगस्ट ते गुरुवार, १३ ऑगस्टपर्यंत श्री भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला असून अयोध्येतील ज्येष्ठ प्रवचनकार हरिनामदास वेदांती यांचे शिष्य विजयकुमार भागवत प्रवचन करतील. दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत होणाऱ्या प्रवचनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रवीण खनगन यांनी केले आहे.

प्राध्यापकांच्या संपामुळे विद्यापीठातील कामे खोळंबली
नागपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी
प्राध्यापकांच्या संपामुळे नागपूर विद्यापीठातील परीक्षा आणि तक्रार निवारण समितीच्या कामावर परिणाम होत आहे. तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष डॉ. एकनाथ कठाळेच या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. तक्रार निवारण समितीच्या कामावर त्यामुळे परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे.कोडनंबर नसलेल्या आणि त्यामुळे निकाल रोखून ठेवण्यात आलेल्या एलएलबीच्या नऊ विद्यार्थ्यांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी निकालात काढल्या. तसेच चौकशी करून तीन आठवडय़ात निर्णय घेण्याचे निर्देश विद्यापीठाला दिले आहेत. याचिकाकर्ते त्यांनी कोडनंबर नसलेल्या उत्तरपत्रिकांवर त्यांचे पेपर सोडवले आहेत. विद्यापीठाने त्यांचे निकाल रोखून ठेवलेले आहेत. प्रकरण सध्या विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे प्रलंबित आहे. विद्यापीठाने सर्व संबंधित महाविद्यालये, परीक्षक आणि विद्यार्थी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या त्रुटींसाठी कोण दोषी आहे, याची विचारणा करण्यात येत आहे. संपामुळे समितीच्या कामावर परिणाम होत असून त्याचा जाब, डॉ. कठाळे यांना विचारण्यात येईल, असे प्र-कुलगुरू गौरीशंकर पाराशर यांनी सांगितले.

देशाच्या विकासासाठी गुणवंतांनी समोर यावे झ्र्दराडे
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
भारताच्या सर्वागीण विकासासाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी एकजुटीने समोर यावे, असे आवाहन आयकर उपायुक्त पल्लवी दराडे यांनी केले. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, महिला आघाडीच्या वतीने बेझनबाग येथील योग भवनात आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष अरूण गाडे व प्रमुख पाहुणे म्हणून अमर रामटेके, राहुल वानखेडे, गजानन थुल, डॉ. विजय गेडाम, अमृत बन्सोड, डॉ. मिलिंद जीवने उपस्थित होते. जीवनाची परीक्षा उत्तीर्ण करायची असेल तर शीलवंत होणे आवश्यक आहे, असे पल्लवी दराडे म्हणाल्या. स्वप्न ती नव्हेत, जी झोपेत येतात, स्वप्ने ती आहेत, जी झोपू देत नाहीत, असे प्रतिपादन अमर रामटेके यांनी केले. उच्च शिक्षण क्षेत्रात नवनव्या संधी उपलब्ध असून, त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन डॉ. विजय गेडाम यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी स्वत:ला विद्यार्थीच मानत असत, असे डॉ. मिलिंद जीवने म्हणाले. आम्ही पूर्णपणे शिक्षणाच्या राष्ट्रीयीकरणासाठी येथे आहोत आणि हा लढा पुढे सुरू ठेवावा लागणार आहे, असे प्रतिपादन अरूण गाडे यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार मांडले.

रॅगिंगवर आज विद्यापीठात बैठक
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण परिषदेच्या वतीने उद्या, रॅगिंग या विषयावर संलग्नित महाविद्यालयांच्या प्राचार्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
नुकतेच राष्ट्रपतींनी रॅगिंगबाबत ठोस उपाययोजना करण्याविषयी सूचित केले होते. रॅगिंगविषयी कडक धोरण स्वीकारण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी बैठकीत चर्चा होईल. उद्या अव्यावसायिक महाविद्यालयांचे अध्यक्ष किंवा सचिव आणि प्राचार्याची बैठक १० वाजता गुरूनानक भवनात होईल. तर दुपारी २ वाजता व्यावसायिक महाविद्यालयांचे प्राचार्य, अध्यक्ष किंवा सचिवांची बैठक घेण्यात येणार आहे.

‘रिपब्लिकन आघाडी काँग्रेस नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करते’
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
रिपब्लिकन आघाडी ही काँग्रेस नेत्यांच्या इशाऱ्यावर काम करणारे नेते व कार्यकर्त्यांची संघटना असल्याचा आरोप रिपब्लिकन हितकारी संघटनेने केला आहे. रिपब्लिकन आघाडी विदर्भातील विधानसभेच्या काही जागा लढवणार आहे. परंतु, या आघाडीचे नेते रिपब्लिकन चळवळीशी प्रामाणिक आहेत का, असा सवालही संघटनेने केला आहे. आघाडीच्या नेत्यांच्या गैरव्यवहाराची आंबेडकरी जनतेला माहिती आहे. निवडणुका आल्या की, ही नेते मंडळी काँग्रेस किंवा भाजपला समर्थन देत असते, हे गेल्या काही निवडणुकांवरून स्पष्ट होते. लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉ. यशवंत मनोहर यांना धोका दिला आणि खासदार विलास मुत्तेमवार यांना समर्थन दिले, असा आरोपही संघटनेचे रक्षक खोडे यांनी केला आहे.

बँक कर्मचाऱ्यांच्या संपाला नॅशनल ऑर्गनायझेशनचा पाठिंबा
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
भारतीय मजदूर संघाशी संलग्नित असलेल्या नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्सने बँक कर्मचाऱ्यांच्या उद्या, गुरुवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या संपाला पांठिबा दिला आहे. या संपात देशभरातील १० लाख बँक कर्मचारी सहभागी होणार असल्याचे संघटनेने कळविले आहे. दोन दिवसाच्या या संपामुळे मात्र, संपूर्ण आर्थिक व्यवहार ठप्प होणार आहे. इंडियन बँक्स असोसिएशनशी वेतनवाढीसंबंधी झालेल्या बैठकीत काहीच तोडगा न निघाल्याने बँक अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी संपाचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना देण्यात येणारी पेन्शन योजना, भविष्य निर्वाह निधी आणि इतर अनेक मुद्यांवरील चर्चा निष्फळ ठरल्याने अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. वेतनवाढ आणि इतर प्रश्नावर चेन्नई येथे दोन दिवसाच्या संपानंतर ११ ऑगस्टला चर्चा होणार असून त्यात बेमुदत संपाबाबतही चर्चा करण्यात येणार असल्याचे नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्सने कळविले आहे.

द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या तुकडीची क्षमता पन्नासवर
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

द्विलक्षी (बायफोकल) व्यवसाय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढलेला कल लक्षात घेऊन मार्च २००९ पूर्वी शासनाने मंजूर केलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रत्येक तुकडीची प्रवेश क्षमता २५ वरून ५० पर्यंत वाढविण्यात आली आहे. या वाढीव प्रवेश क्षमतेसाठी जास्तीचे अनुदान किंवा नवीन कर्मचारी उपलब्ध करून दिले जाणार नाही, असे सहाय्यक संचालक एस.एम. हस्ते यांनी स्पष्ट केले आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मैत्रबन’मध्ये आठवडी निसर्गभ्रमणाची संधी
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
विदर्भातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मैत्रबन’च्या वतीने पुढील आठवडय़ापासून दर बुधवारी मोहगाव झिल्पी येथील मैत्रबन अ‍ॅडव्हॅन्चर कॅम्पिंगमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात दिवस घालवण्याची संधी अवघ्या २०० रुपयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. दर बुधवारी सकाळी ९ वाजता खरे टाऊनमधील डॉ. भाग्यश्री गंधे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटलपासून ज्येष्ठ नागरिकांना नेण्यासाठी गाडय़ांची व्यवस्था करण्यात आली आहे. मैत्रबनमधील दिवसभरातच्या वास्तव्यात नेचर ट्रेल, गटचर्चा, करमणूक कार्यक्रम, प्रश्नोत्तरे अशा उपक्रमाचा आनंद ज्येष्ठ नागरिकांना लुटता येईल. मैत्रबनचे संस्थापक रवींद्र गंधे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात असून इच्छुकांनी ९८२२०२२९३५ या मोबाईवर संपर्क साधावा, असे उपक्रमाच्या समन्वयक योशिता चव्हाण यांनी एका पत्रकातून कळवले आहे.

काँग्रेस नेते मोहनप्रकाश उद्या नागपुरात
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

प्रदेश काँग्रेसच्या वतीने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्यानंतर आता राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्राचे प्रभारी मोहनप्रकाश येत्या शुक्रवारी, ७ ऑगस्टला ग्रामीण भागातील सहाही मतदारसंघाच्या राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी येणार आहेत. बस स्थानकाजवळील जिल्हा मुख्यालयात येत्या शुक्रवारी, सकाळी ११ वाजतापासून मतदारसंघनिहाय बैठका होतील. रामटेक, सावनेर, काटोल, उमरेड, कामठी आणि हिंगणा या क्रमाने प्रत्येकी अर्धा तासाच्या या बैठका होतील. यात आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार, विधानसभेतील पराभूत उमेदवार, पदाधिकारी, सहकारी संस्थांचे पदाधिकारी आणि प्रमुख नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. यावेळी मोहनप्रकाश मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांशीदेखील चर्चा करणार आहेत. यासाठी विधानसभानिहाय सर्व संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्षा सुनीता गावंडे यांनी केले आहे.

व्यापारवृत्त
सॅमसंग टीव्हीची नवी श्रेणी बाजारात
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
डीजिटल तंत्रज्ञानामध्ये अग्रणी असलेल्या सॅमसंग इंडियातर्फे एलईडीएचडी टीव्हीची क्रांतिकारी ‘८०००’ ही श्रेणी बाजारपेठेत सादर करण्यात आली आहे. सँमसंगच्या एलईडीटीव्हीला अमेरिकेच्या बाजारपेठेत चांगला प्रतिसाद मिळाला. न्यूयॉर्कमधील सॅमसंग अक्स्पिरियन्स स्टोअरमध्ये ही ‘८०००’ श्रेणी सादर करण्यात आली. ‘८०००’ श्रेणीमध्ये ५५ इंची स्क्रीन साईज असलेल्या एलईडीटीव्हीचा समावेश आहे. याचबरोबर ‘६०००’ या श्रेणीमध्ये ३२ इंची एलईडीटीव्ही व ‘७०००’ श्रेणीमध्ये ५५ इंची स्क्रिन साईज असलेला एवईडीटीव्ही देखील सादर करण्यात आले आहेत. ही नवीन श्रेणी सादर करताना सॅमसंगच्या नैऋत्य आशियाई मुख्यालयाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक जुंगह सु शिन म्हणाले ‘‘सॅमसंग एलईडी टीव्हीमध्ये उत्कृष्ट रचनेचा वापर केला गेला असून ग्राहकांना एक अनोखा अनुभव मिळणार आहे. आमच्या ६००० ते ७००० या श्रेणींना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने आम्ही ‘८०००’ ही अधिक प्रगतीशील अशी एल ई डी टीव्हीज ची श्रेणी बाजारात सादर करीत आहोत. या श्रेणीमध्ये २००० एच झेड मोशन प्लस तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. या श्रेणीमुळे एल ई डी एच डी टीव्ही श्रेणी अधिक भक्कम झाली आहे. ई डी टीव्हीमध्ये पारंपरिक ओल्ड कॅथोड फ्लोरोसंट लॅम्पस् ऐवजी प्रायमरी लाईट स्टोअर्सचा वापर केला जातो. एल ई डी मध्ये अल्ट्रा हाय कॉन्ट्रास्ट रेषोज व स्लीम डेप्यमुळे अधिक कलात्मक रचना व ऊर्जा बचत शक्य होते.

‘द मोबाईल स्टोअर’तर्फे फेस्टिवल ऑफर
जगातील सर्व ब्रॅन्डचे मोबाईल हॅन्डसेट एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणाऱ्या ‘द मोबाईल स्टोअर’ तर्फे सणासुदीनिमित्त ग्राहकांसाठी विशेष फेस्टिवल ऑफर सुरू करण्यात आली आहे. या विशेष फेस्टिवल धमाका ऑफर अंतर्गत मोबाईल स्टोअरच्या कोणत्याही दुकानात मोबाईल हँन्डसेट, ब्लूटूथ, मेमरीकार्ड, एमपी ३ प्लेअर्स आणि गेमिंग उपकरणे खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला खरेदी केलेल्या किमतीवर पाच टक्के रोख परतावा मिळणार आहे.मोबाईल स्टोअरच्या देशभरातील सर्व दुकानांमध्ये ही ऑफर सुरू करण्यात आली आहे. खरेदीनंतर एक विवरणपत्र भरण्यासाठी देण्यात येईल, ग्राहकाने रोख परतावा मिळविण्यासाठी हे विवरणपत्र भरून प्रक्रिया केंद्राकडे पाठवायची आहे. ग्राहकांना मोबाईल खरेदीचा आनंद मिळवून देण्याबरोबरच सणांच्या उत्साहात भर टाकण्याच्या हेतूने ही ऑफर सुरू करण्यात आली आहे.

मायक्रोसॉफ्टची ऑनलाईन सेवा
मायक्रोसॉफ्ट इंडियाच्या विविध प्रकारच्या सेवाअंतर्गत भारतीय उद्योगांसाठी ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. यासाठी कंपनीने काही मुट ट्रायल जाहीर केले आहेत. यामध्ये ई-मेल, कोलॅबरेशन, कॉन्फरंसिंग आणि उत्पादत क्षमता वाढविणे यासारख्या उपाययोजनांचा समावेश आहे.
ग्राहक मायक्रोसॉफ्टतर्फे देण्यात आलेल्या या सेवेचा लाभ कंपनीच्या www.microsoft.com/india/onlineservices ¹या संकेतस्थ़ळावर जावून घेऊ शकतात. कंपनीने हे त्यांचे हे उत्पादन ऑक्टोबर २००९ मध्ये सादर करण्यात येणार आहे, मात्र, त्यापूर्वी या ऑनलाईन सेवेचा कुठला परिणाम होण्याची शक्यता आहे हे ही सेवा सुरु करण्यामागचे मुळ कारण असल्याचे कंपनीने कळविले आहे.