Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

नवनीत

जी व न द र्श न
अज्झयणमेव झाणं

आगम ग्रंथ म्हणजे जैनशास्त्रात जिवाचे दोन भेद सांगितले आहेत. एक संज्ञी व दुसरा असंज्ञी. संज्ञी म्हणजे आपल्या बुद्धीचा उपयोग करणारा, ज्ञान ग्रहण करणारा, आत्मतत्त्व जाणून आत्मविकासाकडे आपल्या ज्ञानाचा ओघ वळवणारा. असंज्ञी म्हणजे ज्यांना ज्ञान नसणे- आपल्या बुद्धीचा उपयोग ज्ञान ग्रहण करण्याकडे तो करू शकत नाही. एकेंद्रियापासून चतुरेंद्रियापर्यंतचे सर्व जीव असंज्ञी. ज्याला दोनच भुका, जाणिवा असतात- पोटाची व शरीराची भूक. संज्ञी जीव विशेषत: आत्मार्थी जीव धर्म जाणून घेण्यासाठी बाहय़ सुरुवात न रमता तो आगम ग्रंथांचे अध्ययन करतो. आत्मशांती मिळविण्यासाठी तो अन्तर्लीन, एकाग्र होऊन विविध तत्त्वाचे अध्ययन करतो. ‘अज्झयणमेव झाणं’ असे म्हटले आहे. ते अध्ययन म्हणजेच ध्यान, असे म्हटले आहे. अध्ययन पाच प्रकारांनी करावे. शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ, आगमार्थ, भावार्थ. प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजून, त्या मागचा भाव समजून, हेतू समजून, कुठल्या योग्य-अयोग्य मान्यता त्या लिखाणामागे आहेत आणि शब्दार्थ, नयार्थ, मतार्थ समजून घेऊन सारं तीर्थकरांनी सांगितलेले आगम ग्रंथात ग्रथित झालेले आहे, असे नि:शंक होऊन त्यावर श्रद्धा ठेवणे, या चार कसोटय़ा पार केल्यानंतर जो निष्कर्ष निघतो तो भावार्थ.
अध्ययन, व्रताचरण, धर्माची तत्त्वे पाळून आत्मार्थी जीव मुक्तिपथाकडे जाऊ लागतो तेव्हा त्याला पाच लब्धी प्राप्त होतात. त्या क्षयोपशय लब्धी- ज्ञान मिळविण्यामध्ये कुठलीही अडचण न येता तत्त्वांचा विचार जाणणे, विशुद्ध लब्धी- मोहाची तीव्रता कमी होऊन तत्त्वाचे नीट परिशीलन करणे, देशना लब्धी- र्तीथकरांनी सांगितलेली तत्त्वे अंगीकारणे.
प्रायोग्य लब्धी- आपले परिणाम विचार पूर्ण शुद्ध होऊन तत्त्वांवर अखंड श्रद्धा बसणे, करण लब्धी- वरील चार लब्धी प्राप्त झाल्यावर अन्तमुहूर्तात (अगदी थोडय़ा काळात) सर्व पापांतून मुक्त होणे. साधकाला मुक्तिमार्गाकडे नेणाऱ्या या खूप वरच्या पायऱ्या आहेत.
लीला शहा

कु तू ह ल
सापेक्षतावादातील निष्कर्ष
विशिष्ट सापेक्षतावादातील निष्कर्ष हे निव्वळ दृष्टिभ्रम आहेत का?

विशिष्ट सापेक्षवादाच्या सिद्धान्तानुसार अंतर व काळाची मूल्ये निरीक्षकाच्या संदर्भ चौकटीनुसार बदलतात. हे बदल प्रत्यक्षात घडत असून, दृष्टिभ्रम निश्चितच नाहीत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे म्युऑन कणांचा जमिनीवरून घेतला गेलेला वेध. वैश्विक किरण वातावरणात शिरतात तेव्हा हवेशी होणाऱ्या क्रियेतून म्युऑन या अल्पायुषी कणांची निर्मिती होते. सुमारे दहा किलोमीटर उंचीवर निर्माण होणारे हे कण प्रकाशाच्या सुमारे ९९.९ टक्क्यांइतक्या वेगाने प्रवास करतात, पण त्यांचे सुमारे दोनलक्षांश सेकंदांचे छोटे आयुष्य पाहता, इतक्या प्रचंड वेगाने प्रवास करूनही या कणांना नष्ट होण्यापूर्वी सहाशे-सातशे मीटर्सचा पल्लाही गाठता येणार नाही. म्हणजे हे कण जमिनीपर्यंत पोहोचणे शक्य नाही. परंतु प्रत्यक्षात म्युऑन कण हे जमिनीपर्यंत पोहोचत असल्याचे दिसून आले आहे. गतीत असलेल्या कणांशी निगडित असलेला काळ हळू धावत असल्यामुळे हे घडू शकते.
म्युऑन कण हे स्थिर असताना फक्त दोनलक्षांश सेकंद इतकाच काळ तग धरत असले तरी प्रकाशाच्या ९९.९ टक्क्यांइतक्या वेगाने प्रवास करताना त्यांचे आयुष्य सुमारे वीस पटींनी म्हणजे चाळीस लक्षांश सेकंदांइतके लांबते. या काळात हे कण दहा किलोमीटर अंतरावरील जमिनीपर्यंत सहज पोहोचू शकतात. इ.स. १९४० साली रोस्सी आणि हॉल या शास्त्रज्ञांनी न्यू हॅम्पशायर येथील माऊंट वॉशिंग्टन या डोंगराच्या पायथ्याशी उपकरणे ठेवून केलेल्या एका विशेष प्रयोगाद्वारे हे म्युऑन कण विशिष्ट सापेक्षतावादानुसार अपेक्षित संख्येत जमिनीवर पोहोचत असल्याचे दाखवून दिले. सर्न, स्लॅक किंवा फर्मिलॅब यांसारख्या जगद्विख्यात संस्थांनी अशाच प्रकारच्या चाचण्या प्रयोगशाळेत निर्माण केलेल्या अल्पायुषी कणांवरही केल्या आहेत. या चाचण्यांचे निष्कर्षही विशिष्ट सापेक्षतावादाला पुष्टी देत असल्याचे आढळले आहे.
राजीव चिटणीस
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

दि न वि शे ष
सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचे निधन

ब्रिटिशांनी केलेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवून भारतीय राष्ट्रवादी चळवळीचा पाया रोवणाऱ्या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा जन्म बंगालमध्ये झाला. आयसीएस झाल्यानंतर कलेक्टर म्हणून ते रुजू झाले होते, पण ब्रिटिशांनी खोटेनाटे आरोप करून त्यांना कामावरून कमी केले तेव्हा मेट्रोपोलिटन इन्स्टिटय़ूटमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. अध्यापनाद्वारे सुशिक्षित भारतीय तरुणांमध्ये त्यांनी राजकीय जागृती निर्माण केली. ‘बंगाली’ या त्यांनी काढलेल्या वृत्तपत्रातून त्यांनी सरकारवर टीका केली. इंडियन असोसिएशन नावाची संस्थाही त्यांनी स्थापन केली. काँग्रेसचे ते दोन वेळा अध्यक्षही होते. १९०५च्या वंगभंग चळवळीच्या वेळेस त्यांची लोकप्रियता कळसाला पोहोचली होती. काँग्रेसवर जसा जहालांचा प्रभाव वाढू लागला तेव्हा ते जहाल विरोधी मवाळ गटात सामील झाले. ब्रिटिशांविरुद्ध लढताना त्यांचा ब्रिटिश न्यायप्रियतेवरचा विश्वास अढळ होता. टिळकांच्या स्वराज्याच्या कल्पनेशी ते समरस झाले नाहीत. एकंदरीत नव्या विचारसरणीशी त्यांनी जुळवून घेतले नाही. परिणामी राष्ट्रीय चळवळीतून ते बाहेर फेकले गेले. १९१५ नंतर काँग्रेस पूर्णपणे जहालांच्या हातात गेल्यावर एक नवी राजकीय संघटना त्यांनी काढली, पण तिला यश आले नाही. तरीही बंगालच्या विधिमंडळावर निवडून येऊन काही काळ मंत्री म्हणून त्यांनी काम केले. गांधीजींच्या असहकार चळवळीपासून ते जरा दूरच राहिले. ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही पदवी दिली. तथापि, ते काही ब्रिटिशधार्जिणे नव्हते. शस्त्राच्या बळावर ब्रिटिश राज्य करू शकत नाही, याची जाणीव ते वारंवार ब्रिटिशांना देत होते. ‘ए नेशन इन मेकिंग’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. वयाच्या ७७व्या वर्षी ६ ऑगस्ट १९२५ रोजी त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

गो ष्ट डॉ ट कॉ म
मॉलमधली मदत

ईशानीला खेळण्यांचा खूप सोस होता. कितीतरी बाहुल्या, त्यांचे फ्रॉक, वस्तू तिच्याकडे होत्या. शिवाय कापूस भरलेले निरनिराळे प्राणी कितीतरी होते. तिच्याकडे बाहुलीचे घर होते. घराला स्वयंपाकघर, झोपायची खोली, दिवाणखाना होता. त्यात सामान होते, पण या सगळय़ाचाच तिला खूप कंटाळा आला होता. तिने शेफालीला मोबाईलवर विचारले, ‘काय गं? वाचते आहेस की चित्रे काढत बसली आहेस?’ तिला ठाऊक होते की शेफालीला बाहुल्या, खेळणी असे काहीसुद्धा आवडत नाही. तिच्याकडे खूप खूप पुस्तके असतात. ती जेव्हा पाहावं तेव्हा पुस्तकात डोकं खुपसून बसलेली असते. तिला चित्रे खूप छान काढता येतात. कुठलेही वेगळे दृश्य तिला भावले की पेन्सिलने ती रेखाचित्र काढते. त्यात रंग भरते. दोघींच्या आवडी वेगळय़ा असल्या तरी त्यांची अगदी पहिलीच्या वर्गापासून मैत्री होती. दोघी एका बाकावर बसायच्या. डबा एकत्र खायच्या. शेफाली म्हणाली, ‘मोबाईल कशाला केलास? आज सुट्टी आहे तर ये ना माझ्याकडे. मला वाचायचा, चित्रे काढायचा अगदी कंटाळा आलाय. प्रत्यक्षच गप्पा मारू, नाहीतर भटकू.’ ईशानी म्हणाली, ‘मॉलमध्ये जाऊया. सेंट्रल मॉल दोघींच्याही घराच्या जवळ आहे.’’ ‘‘अगं, पण पैसे कुठे आहेत आपल्याकडे?’’ शेफालीनं शंका काढली. ‘‘बघायला कशाला लागतात पैसे? चल, ये तू, मी मॉलच्या दाराशी वाट पाहते.’’ पर्सेस, नेलपेंट्स, कपडे, सँडल्स-शूज बघत वेळ बरा चालला होता. एका कोपऱ्यापाशी टेबलवर काही पत्रके, छापील कागद, छायाचित्रे मांडून ती गरजू मुलांसाठी पैसे गोळा करत होती. दोघीही तिच्याजवळ घुटमळल्या. त्या मुलांची छायाचित्रे, त्यांनी केलेल्या वस्तू आणि बाईंचे निवेदन या सगळय़ाचा परिणाम झाला. आपण मदत केली पाहिजे, असे दोघींनाही फार वाटले, पण जवळ पैसेच नव्हते. त्या फिरत पुढे निघाल्या. खेळण्यांच्या दुकानात ईशानीचे पाय वळले. पाहतात तर दुकानात प्रचंड पसारा झाला होता. मध्यम वयाच्या छान दिसणाऱ्या बाई घामाघूम होऊन खेळणी नीट मांडत होत्या, पण फार थकलेल्या होत्या. ‘काकू, आम्ही मदत करतो.’’ शेफाली म्हणाली आणि पाहता पाहता दोघींच्या मदतीने सारे दुकान पूर्ववत लावून झाले. बाई फार खूश झाल्या. दोघींना त्यांनी मदतीबद्दल पैसे देऊ केले. ईशानी संकोचली. नको म्हणू लागली. तेवढय़ात शेफालीने हात पुढे करून पैसे घेतले. ईशानीला आश्चर्य वाटले. शेफाली तिला घेऊन गरजू मुलांसाठी पैसे गोळा करणाऱ्या बाईंकडे गेली आणि नुकतेच मिळालेले पैसे दोघींच्या नावाने तिने देऊन टाकले. आजचा संकल्प- मी गरजूंना मदत करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com