Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

कॉंग्रेसच्या मेळाव्यात गणेश नाईकांवर शरसंधान
नवी मुंबई/ प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँॅग्रेस या राज्यातील दोन मित्रपक्षांमध्ये चांगलीच जुंपली असून वाशी येथील विष्णुदास भावे नाटय़गृहात मंगळवारी रात्री भरलेल्या कांॅग्रेस पक्षाच्या मेळाव्यात पक्षाच्या नवी मुंबईतील प्रमुख नेत्यांनी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या कारभारावर तोंडसुख घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. पक्षाचे प्रांताध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत भरलेल्या जंगी मेळाव्यात नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघावर काँॅग्रेस नेत्यांनी जोरकसपणे दावा सांगितला.

पनवेलमधील आरोग्य सेवेची झाडाझडती
पनवेल/प्रतिनिधी

‘स्वाइन फ्ल्यू’ने पुण्यातील रिदा शेख या विद्यार्थिनीचा बळी घेतल्याच्या पाश्र्वभूमीवर पनवेलमधील आरोग्य सेवा खडबडून जागी झाली आहे. आमदार विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी ४ वाजता पनवेलमधील सर्व डॉक्टरांची बैठक बोलाविण्यात आली असून, या बैठकीत आरोग्य सुविधा आणि सेवांचा आढावा घेण्यात येणार आहे.

पांडवकडय़ाचा वनवास अखेर संपणार!
पनवेल/प्रतिनिधी - खारघर येथील प्रसिद्ध पांडवकडा धबधब्यावर जाण्यासाठी पर्यटकांवर घालण्यात आलेली अन्यायकारक बंदी अखेर उठणार आहे. ‘वृत्तान्त’मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘पांडवकडय़ाचे महाभारत’ या लेखामुळे या अन्यायाला वाचा फुटली असून, जनक्षोभाची दखल घेणे प्रशासनाला भाग पडले आहे.

सागरपूजनानंतर आजपासून मासेमारीला सुरुवात
उरण/वार्ताहर - पावसाळी मासेमारी बंदीची मुदत संपुष्टात आल्याने गुरुवारपासून खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात झाली आहे. नारळी पौर्णिमेचा मुहूर्त साधून उरण, मोरा व करंजा परिसरातून सुमारे पाचशेहून अधिक मच्छिमार ट्रॉलर्स मासेमारीसाठी हळूहळू रवाना होऊ लागले आहेत.शासनाच्या पावसाळी मासेमारी बंदीची मुदत नारळी पौर्णिमेच्या म्हणजेच ५ ऑगस्ट रोजी संपुष्टात आली आहे. गुरुवारपासून खोल समुद्रात मासेमारी व्यवसायाला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. पावसाळी बंदीच्या ६२ दिवसांच्या प्रदीर्घ विश्रांतीमध्ये हजारो मच्छिमार ट्रालर्स विविध बंदरांत विसावले होते. या बंदी काळात मासेमारी व्यवसाय पूर्णत: बंद झाल्याने माशांची आवक कमी झाली होती. यामुळे मासळीचे भाव कडाडल्याने मासळी खवय्याचे हाल सुरू होते. मात्र मासेमारी बंदीचा कालावधी समाप्त झाल्याने हजारो मच्छिणार ट्रॉलर्स विविध बंदरातून खोल समुद्राकडे रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. इंधन, बर्फ व जाळी, रेशन व मच्छिमार ट्रॉलर्सची डागडुजी करून मच्छिमार गुरुवारपासून सुरू होणाऱ्या मासेमारीसाठी सज्ज झाले आहेत. खोल समुद्रातील मासेमारीला सुरुवात होणार असल्याने मासळीची आवक वाढणार आहे. त्यामुळे मासळीचे भावही कमी होण्यास मदत होणार आहे. मात्र मासळीचे कडाडलेले भाव कमी होण्यासाठी मासळी खवय्यांना आणखी १५ दिवस तरी वाट पाहावी लागेल.

मराठी माणसाने आता उद्योगाकडे वळावे -वामनराव पै
बेलापूर/वार्ताहर - जे काम करण्यास टाळाटाळ करतात, ते जीवनात कधीच प्रगती करू शकत नाही. काम म्हणजे नोकरी करणे इतकेच अपेक्षित नसून मराठी माणसाने आता उद्योगाकडे वळावे, असे प्रतिपादन सद्गुरू वामनराव पै यांनी नेरुळ येथे केले. हावरे बिल्डर्सचे संचालक सुरेश हावरे व जीवनविद्या मिशनतर्फे आयोजित ‘सर्वात श्रेष्ठ योग उद्योग’ या विषयावर मार्गदर्शन करताना पै बोलत होते. मनुष्याने असा उद्योग (काम) करावा की, ज्यातून स्वत:सह समाज व राष्ट्र यांचे भले होईल. आपल्याला खऱ्या ‘स्व’ची ओळख झाल्याशिवाय आपण चांगला उद्योग करू शकत नाही, असे पै म्हणाले. हिंदू धर्माने आपल्याला संस्कृती दिली असून, गुणकर्माधिष्ठित हा धर्म आहे; मात्र काहींनी त्याला जाती व्यवस्थेत बांधले आहे. त्यामुळे हिंदू धर्माचा ऱ्हास होऊ लागला आहे. हिंदू धर्मात जन्माला येऊन ज्याला स्वत:ला हिंदू म्हणवून घेण्यास लाज वाटते त्याच्यासारखा दरिद्री अन्य कोणी असू शकत नाही, असे पै यावेळी म्हणाले. याप्रसंगी सुरेश हावरे यांचा सपत्नीक सत्कार सद्गुरू पै यांच्या हस्ते करण्यात आला. पै यांनी सांगितलेले अध्यात्म प्रॅक्टिकल असल्याचे हावरे म्हणाले. या क्षेत्रात खूप गोंधळ आहे. उद्योग, नोकरी वा राजकारण यासाठी अध्यात्म हाच पाया असून, आपल्या जीवनाचाही पाया अध्यात्म आहे, असे हावरे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे नवी मुंबई जिल्हाप्रमुख भगवान ढाकणे, शिवसेनेचे विजय चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.

कोपरखैरणे येथे युवकाची आत्महत्या
बेलापूर/वार्ताहर - कोपरखैरणे येथील उद्यानात एका झाडाला गळफास घेऊन २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या युवकाची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रात्रीच्या वेळी या युवकाने सेक्टर-३ येथील उद्यानात एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

७६२५ वे आरोग्य शिबीर
उरण/वार्ताहर - येथील सेवाभावी डॉक्टर विनायक मयेकर यांनी गगनगिरी महाराज आश्रम, खोपोली येथे ७६२५ वे मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. तीन दिवस आयोजित केलेल्या या आरोग्य शिबिरात गरीब-गरजू १२६० रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.