Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

महापौरांच्या राजीनाम्याची मागणी
पतसंस्था थकबाकीदार प्रकरण
वार्ताहर / जळगाव
महापौर रमेश जैन व त्यांचे कुटूंबिय हे पतसंस्थांच्या टॉप शंभर ठेवीदारातील थकबाकीदार असल्याचे उघड झाल्याने त्यांना आर्थिक गुन्हेगार संबोधून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महानगर विकास आघाडीतर्फे महापालिकेसमोर जोरदार आंदोलन छेडण्यात येऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

लवकरच पदाची सूत्रे स्वीकारणार : देशभ्रतार
वार्ताहर / धुळे

नवे जिल्हा पोलीस अधीक्षक जिल्ह्य़ाची सूत्रे स्वीकारणार की नाहीत याबद्दल पोलीस वर्तुळातच साशंकता व्यक्त केली जात असली तरी ‘आपण लवकरच धुळे पदाची सूत्रे स्वीकारू’ अशी माहिती एच. व्ही. देशभ्रतार यांनी ‘लोकसत्ता’ला दूरध्वनीवरून दिली. सुनील कोल्हे यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर प्रमोद शेवाळे यांच्याकडे हे पद प्रभारी अधिकारी म्हणून सोपविण्यात आले आहे.

पालिका कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अस्वच्छतेची समस्या
शहादा, नवापूर / वार्ताहर

सहावा वेतन आयोग लागू करावा, सेवानिवृत्ती वेतनावर शंभर टक्के अनुदान द्यावे, रोजंदारी व मानधनावरील आणि कंत्राटी कामगारांना कायम करावे आदी मागण्यांसाठी शहादा, तळोदा, नंदुरबार आणि नवापूर या नगरपालिकेतील कर्मचारी संपावर गेल्याने सर्व शहरांमध्ये अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे.

आवक वाढल्याने कांदा दरात घसरण
लासलगाव / वार्ताहर

मागील सप्ताहात पावसाने उघडीप दिल्याने लासलगाव मुख्य बाजार आवारात कांद्याच्या आवकमध्ये वाढ झाली आहे. परिणामी कांद्याचे भाव घसरले आहेत. सप्ताहात कांद्यास कोलकाता, पाटणा, गोहाटी येथून तर विदेशातून दुबई, कोलंबो, बांगलादेश, येथून मागणी होती.

पानेवाडी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण
वार्ताहर / मनमाड

मनमाड-नांदगाव रोडवरील हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या इंधन प्रकल्पाचे काम सुरू होऊन सहा वर्षे झाल्यानंतरही प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना अद्याप नोकरीत कायम करण्यात न आल्याने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनीच्या प्रवेशव्दारासमोर बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे.दगू किसन आंधळे (५८), भागवत पुंजा पिंगट (७५), शंकर दगडू कातकाडे (७५) व जनाबाई मुरलीधर काकड (८०) हे सर्व पानेवाडी येथील प्रकल्पग्रस्त वयोवृद्ध या उपोषणात बसले आहेत. त्यांच्या जमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत. यापूर्वी अनेकदा आंदोलने झाली. २००६ मध्ये तर तब्बल दीड वर्षे साखळी उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी कंपनी प्रशासन प्रकल्पग्रस्तांच्या पाल्यांना कायम नोकरीत सामावून घेण्याबाबत लेखी आश्वासन दिले.तीन कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी प्रकल्पग्रस्तांच्या वारसांना नोकऱ्या द्याव्यात, अशी आंदोलनकर्त्यांची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी हे उपोषण सुरू असून अनेक ग्रामस्थ व नागरिकांनी या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

वाहनधारकांसाठी शुल्कामध्ये महापालिकेची सवलत
धुळे / वार्ताहर
पारगमन शुल्क आणि जकातही वाजवीपेक्षा अधिक प्रमाणात आकारण्यात येत असल्याचा आरोप होऊ लागताच महापौर मोहन नवले यांनी धुळ्यातील नोंदणीकृत वाहनमालकांकडून १०० ऐवजी केवळ ५० रुपये पारगमन शुल्क आकारण्यात येईल, अशी ग्वाही दिली. हे विरोधकांसाठीचे पॅकेज असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या. मात्र आजच्या महासभेत विरोधक अनुपस्थित राहिले.शहरासाठी धुळे महापालिकेने ठेकेदारामार्फत जकात आणि पारगमन शुल्काची वसुली सुरू केली आहे. मात्र १०० रुपये पारगमन शुल्क जास्त होते आणि ते परवडत नाही, असा आरोप करीत विरोधकांनी आजच्या महासभेवर बहिष्कार घातला. पण महापौर मोहन नवले यांनी मात्र धुळ्यातील नोदणीकृत वाहनधारकांकडून १०० ऐवजी केवळ ५० रुपये एवढेच पारगमन शुल्क आकारण्यात येईल, अशी घोषणा केली. यासाठी धुळ्यातील वाहनधारकांचा अहवाल मागविण्यात येणार आहे. येत्या १० महिन्यात या पद्धतीतून महापालिकेला सुमारे ७५ लाखाचा परतावा द्यावा लागणार आहे. आयुक्त अजित जाधव, स्थायी समितीचे सभापती सतीश महाले, उपमहापौर फजलू रहेमान, नगरसेवक संजय बाल्टे, जयश्री अहिरराव, विमल मुंदडा यांच्यासह अन्य नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

शहाद्यात मोटारसायकल चोरीचे सत्र पुन्हा सुरू
शहादा / वार्ताहर
काही दिवसांपूर्वी शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण कमी झाले होते. परंतु चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी वाहनचोरीचा धडाका लावला आहे.शहरातील सदैव गजबजलेला परिसर असलेल्या डी. के. मार्केटमधून रघुनाथ बेलदार यांची स्प्लेंडर मोटारसायकल चोरटय़ांनी लंपास केली. बेलदार हे मेडिकल दुकानात औषध खरेदी करण्यास गेले असता ही संधी साधत चोरटय़ांनी त्यांची मोटारसायकल लंपास केली. दोन दिवसांपूर्वीच म्हसावद येथील पोलीस कर्मचाऱ्याचीच मोटारसायकल देना बँकजवळून चोरीस गेली. शिवाय सायकल चोरीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. मात्र पोलीस अजूनही संथपणे तपास करीत असल्याचा आरोप केला जात आहे. चोरीला गेलेल्या मोटारसायकली धडगाव व खेतिया परिसराकडे नेल्या जात असल्याचा नागरिकांना संशय आहे. परंतु या बाबीकडे पोलीस गांभिर्याने लक्ष देत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

अंगणवाडी सेविकेस लुबाडणाऱ्या तोतया अधिकाऱ्यास अटक
शहादा / वार्ताहर

पुणे येथील बडे अधिकारी असल्याची बतावणी करून राणीपूर येथील अंगणवाडी सेविकेकडून पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्या भामटय़ास पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.निळकंठ बाबुराव लोहार (लोणखेडा) या भामटय़ाने राणीपूर येथे जावून अंगणवाडी शिक्षिकेस, तुमच्या अंगणवाडीत चार मुले दगावली असून त्याचा तपास करण्यासाठी पुण्याहून आलो आहे. प्रकरण मिटवायचे असेल तर दहा हजार रुपये द्या नाही तर तुमची नोकरी जाईल असा दम दिला. अंगणवाडी सेविकेने घाबरून त्याला पाच रुपये दिले परंतु या भामटय़ास राणीपूर येथील एका व्यक्तीने पाहिले होते आणि ओळखलेही होते. आपली फसवणूक झाल्याचे अंगणवाडी सेविका जयवंताबाई भोसले यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत लोहार यास ताब्यात घेतले आहे.

संगणक खरेदी अपहार प्रकरणी एकावर गुन्हा
धुळे / वार्ताहर
शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी लागणाऱ्या संगणक साहित्यासह १३७ वस्तुंच्या खरेदीत तब्बल आठ लाख ५४ हजार ८८१ रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी एका विरूध्द निजामपुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नावापाडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरी करताना या संशयिताने २००६ ते २००८ या शैक्षणिक वर्षांत हा अपहार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अनिल चौधरी यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, साक्री तालुक्यातील योगेंद्र वामनराव पाटील हे नवापाडा येथील शासकीय आदिवासी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये सेवेत असताना त्यांनी अनुदान मंजुर करून घेतले व संगणक साहित्यासह १३७ वस्तूंची खरेदी प्रक्रिया दर्शविली. या दरम्यान त्यांनी ‘डेड स्टॉक रजिस्टर’ आणि दैंनदिन ‘कॅश बुकात’ आवश्यक त्या नोंदी केल्या नाहीत. अशाप्रकारे पाटील यांनी तब्बल आठ लाख ५४ हजार ८८१ रूपयांचा अपहार केल्याचा आक्षेप आहे. त्यानुसार पाटील यांच्याविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बेकायदा गावठी पिस्तुलासह एकास अटक
मनमाड / वार्ताहर
विना परवाना गावठी पिस्तूल जवळ बाळगून येथील बस स्थानकात संशयास्पद अवस्थेत घुटमळणाऱ्या धुळे येथील एकास मनमाड पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शिताफीने पकडले.संशयिताबद्दल गुप्त माहिती मिळाल्यावरून नाशिक येथील दहशतवादविरोधी पथक येथे दाखल झाले. त्यांनी शहर पोलिसांच्या मदतीने मंगळवारी मध्यरात्री बस स्थानकात सापळा लावला. गावठी बंदुकीसह येथे आलेल्या धुळे परिसरातील स्वामीनगर येथे राहणाऱ्या कपिल चंद्रकांत शर्मा (२२) यास ताब्यात घेतले. त्याच्याजवळ असलेल्या रॅगझीनच्या बॅगमध्ये गावठी पिस्तूल मिळून आले. शर्माविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ठोंबळ तपास करत आहेत. पिस्तूल त्याने कोणत्या कारणासाठी कोणाकडून आणले. पिस्तूल जवळ बाळगण्याचा उद्देश काय, याबाबत पुढील तपास सुरू आहे. या गावठी बनावटीची किंमत २५ हजार रूपये असून बंदुकीचे मॅगझीन काळ्या लाल रंगाच्या बॅगमध्ये आढळून आले. एक मोबाईल हॅन्डसेटही पोलिसांनी जप्त केला आहे.

नवापूरमध्ये दुष्काळाची चिन्हे
नवापूर / प्रतिनिधी

नवापूरसारख्या अतिपावसाच्या भागातही यंदा दुष्काळाची स्थिती जाणवू लागली आहे. डांग या अरण्यमय प्रदेशाजवळ असलेल्या नवापूर तालुक्यात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो. पावसाळ्यात सर्वच नद्यानाल्यांना पूर येणे हे तालुक्यातील नेहमीचे दृश्य. कधी कधी तर दहा-दहा दिवस रात्रंदिवस कोसळायचा. सूर्यदर्शन होणेही मुश्किल. गतवर्षीसुद्धा सुमारे २००० मि.मी. पाऊस झाला होता. परंतु यंदा मात्र ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत तालुक्यात केवळ ३१० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात गेल्या वर्षांच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. दिवसभर पावसाचे वातावरण असते. रोजच वाटते चांगला नव्हे परंतु बऱ्यापैकी पाऊस येईल. परंतु तो येतच नाही. रंगावली नदीला जेमतेम एक पूर गेला. पीक हातातून जाणार आहेच, परंतु पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा भासणार आहे.