Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

घाई
सजण दारी उभा, काय आता करू?
घर कधी आवरू? मज कधी सावरू?

 

सुरेश भटांची यशवंत देवांनी सजवलेली सुंदर कविता! माझ्या मनात ‘गोड घाईचं’ प्रतिकच होऊन बसलेली! गाणं ऐकताना पापणी मिटली-रे मिटली की त्या निमिषार्धातसुद्धा तारांबळ उडालेली ‘ती’ सजणी डोळ्यासमोर उभी राहते. तिची उडालेली गडबड, आवरलेल्या घरातसुद्धा तिला दिसणारा गोंधळ, मनात उचंबळणारं प्रेम! सगळं काही!
वैद्यकीय शिक्षण घेत असताना एक नाटक ‘बसवत’ होतो. एका सीनमध्ये लगीनघाई स्टेजवर दाखवायची होती. वैद्यकीय कॉलेजातील उत्साही नाटय़कर्मीना काही केल्या ‘घाई’ दाखवता येत नव्हती. होत होता नुसता ‘गोंधळ’! शेवटी ३-४ माणसांचे वेगळे गट करून प्रत्येकाच्या संवादापासून स्टेजवरच्या हालचालीपर्यंत लक्ष पुरवून नंतर सगळ्यांना एकत्र ‘घाई’ घडवायला सांगितलं. ती घडवलेली घाई मात्र फारच ‘सुंदर’ वाटली!
गोड घाई? सुंदर घाई? कविता नि नाटकांच्या काल्पनिक आयुष्यात असे शब्द ठीक आहेत हो! पण प्रत्यक्ष आयुष्यात? सकाळी मुलाला बालमंदिरात नेण्यासाठी बाई आल्या की आठवतं का ‘सजण दारी उभा’? भर पेडर रोड सकाळच्या वेळात लोकं थांबवतात तेव्हा अडलेल्यांना वाटणारी ‘घाई’ कधी सुंदर असते का? रुग्णवाहिकेत अत्यवस्थ रुग्णाच्या बाजूला बसलेल्या नातेवाईकाची घाई कशी असते? दर दिवशी घरचं सगळं काम आटोपून ऑफिसमध्ये अक्षरश: ‘मरत मरत’ वेळेत पोचणाऱ्याची घाई कशी असते? स्वानुभवावरून सांगतो, अजिबात चांगली नसते!
आयुष्यात त्याने घाई अनुभवली नाही तो ‘स्थितप्रज्ञ’ अशी व्याख्या करणं कदाचित चुकीचं ठरणार नाही. ‘काळ-काम-वेगा’च्या गणिताचे भावनिक प्रतिबिंब म्हणजे घाई! फरक तो एवढाच की, गणित नेहमीच रोखठोक असतं. सोडवण्याची पद्धत, उत्तर सत्यस्पर्शी असतं. पण त्याची भावनिक छटा. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या ‘समज नि उमजेला’ धरून असते.
१० वीच्या परीक्षांना समाजाने दिलेल्या अवास्तव महत्त्वामुळे साधारण नोव्हेंबर महिन्यात एक नवीन साथ मुंबईतच नाही तर बऱ्याच ठिकाणी येते. ‘एक्झाम टेन्शनची!’ १५ वर्षांच्या कोवळ्या मनात पालकांच्या नि स्वत:च्या अपेक्षा, स्पर्धा, अभ्यास. जवळ येणारा निर्णायक (?) दिवस आणि या सर्वामुळे डोळ्यात तरळणारी ‘मरणासन्न’ भिती!’ मनातली भिती लक्ष केंद्रित होऊ देत नाही, झोप उडवते, निरुत्साही बनवते, व्यक्तीला चिडचिड बनवते! छातीतली धडधड, शरीराचा थरकाप, विचारांची घाईगर्दी! सर्वच नवंनवं आणि न सोसणारं! कोलमडतात बिचारी!
परीक्षा तीच, दिवस तेवढेच, अभ्यासक्रम तोच! बऱ्याच वेळा कुवतही तेवढीच! पण तरीही काही जणं असतात बऱ्यांपैकी बिनधास्त! काही दिवसांपूर्वी एक फार्मा कंपनीत काम करणारा काश्मिरी विस्थापित त्याच्या बायकोबरोबर आला होता भेटायला! स्वत:ची उखडलेली पाळंमुळं परत रुजवायची घाई घेऊन जगत होता तो ‘कॉर्पोरेट’ आयुष्य! अवघड डेड लाईन्स, कंपनीच्या असंभव अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा आणि जगण्यातल्या न्यायावरचा उडालेला विश्वास! आता आपल्या आयुष्यात ‘अजून एका चुकेला वाव नाही’ अशी मनाची घडण आणि त्यातून प्रत्येक गोष्ट पुन: पुन्हा तपासण्याची जडलेली सवय, त्यातून होणारा वेळाचा अपव्यय आणि ओढवणारी घाई!
पण तरीही तशाच परिस्थितीतसुद्धा काही जणं असतात बऱ्यापैकी बिनधास्त!
माझा एक मित्र आहे. चांगला शिकला वाचलेला, सामाजिक जाणिवेचा. वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक काम साधण्याचा यथाशक्ती प्रयत्न करणारा. एकदा काम हातात घेतलं की, भारावून काम करायचं. तहानभूक, दिवसरात्र याचा विचार न करता! स्वभाव लोकांना समजला नि आता सारखी कामं येतात. ‘शेवटल्या-क्षणाचं- नियोजन’ हे ब्रीदवाक्य असल्याने फारशी पूर्वतयारी न करता लढलेल्या लढायांचे व्रण आता जाणवतायत! अ‍ॅसिडीटी, डोकेदुखी, निरुत्साह, ब्लडप्रेशर, थकवा! काम नाकारल्यामुळे आप्तेष्ठांची (?) ऐकायला लागणारी कुरबुर वेगळी.
पण तरीही अशाच परिस्थितीतसुद्धा काहीजणं असतात बऱ्यापैकी बिनधास्त!
काहीजण असेही असतात. काही दिवसांपूर्वी एका समारंभात एक जोडपं भेटलं होतं. मध्यमवयीन नि सुखवस्तू! आपल्या नवजात श्रीमंतीबद्दल मनापासून आनंद आणि अभिमान बाळगणारे. सौ. सांगत होत्या की कसं, याला कामाशिवाय ‘रेस्टलेस’ होतं! चार दिवसांच्यावर मुंबईबाहेर जाणं कसं अशक्य असतं! मुंबईतसुद्धा कुठल्याही कौटुंबिक किंवा शाळांच्या कार्यक्रमांना त्याची उपस्थिती कशी अशक्य असते वगैरे वगैरे.. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की त्या पुढे म्हणाल्या की, हल्ली हा माणूस सुट्टीवरच नाही तर दर दिवशी संध्याकाळीसुद्धा काम घरी घेऊन येतो आणि काम नसेल तर अस्वस्थ होतो! ‘काळ-काम-वेगाच्या’ गणिती नियमांना झुगारणारी ही कुठची घाई?
स्थिर राहूनही वाढते उंची, जातात पाळे खोल खोल
स्थिरतेचाच बुरखा पांघरून जगते गती निराळ्या पातळीत!

घाई, अस्वस्थता, बैचेनी या मानसिक स्थिती आहेत. वरचेवर जरी त्यांचे समीकरण काळ-काम-वेगाशी असले तरी बऱ्याच वेळा या भावनांचा उगम माणसाच्या व्यक्तिमत्त्वाशी असतो. भरपूर कामाचं प्रेशर असूनसुद्धा काही माणसं बिनधास्त राहू शकतात तर काही माणसांना कामाचं चक्क व्यसन लागतं!
कामाबद्दलची अस्वस्थता/घाई ही मेंदूला ताणतणावांच्या रासायनिक प्रक्रियांनी जागरूक करते. मन आणि मेंदूच्या कार्यक्षमतेच्या कक्षा वाढविण्याचा हा हातघाईचा प्रयत्न असतो. साहजिकच हा प्रयत्न शरीरावर बऱ्यापैकी ओझं वाढवतो. थोडय़ा काळातील ‘उपाय’ वाटणारा हा प्रयत्न हळूहळू शरीराला/मनाला असा काही पिळून काढतो की आता ‘अपायच’ जास्त होतो. अशा रासायनिक प्रक्रियांचे दूरगामी परिणाम ताणतणावाच्या दुष्परिणामांना कारणीभूत होतात.
काहीवेळा काम आणि अस्वस्थता यांची मनात संगत जडते, काम पूर्ण झाल्यानंतर मिळणाऱ्या सुखावर अनुभवाबरोबर! कामासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी हा फलश्रुतीचा अनुभव महत्त्वाचा आहे. पण काही असमाधानी लोकांना या अनुभवाची विचित्र हाव सुटते. हा अनुभव महिन्याकाठी सोडा दिवसासाठी किंवा तासाकाठी अनुभवायाचा प्रयत्न सुरू होतो नि त्यातून जडत एक प्रकारचं कामाचं व्यसन! कौटुंबिक, भावनिक संबंध न जपणारं नि आयुष्याचं कोडं फक्त कामात सोडवणारं!
काही लोक पैशासाठी काम करतात, काही प्रतिष्ठेसाठी! काही आनंदासाठी तर काही चक्क कामासाठी! गतिमान आयुष्यात कामाची चक्रे समाजाचाच वेग पकडतात. काही जणांना तो मानवतो काहींना नाही. बऱ्याच जणांना असं वाटतं की जो आपल्याला मानवतो! पण वाढत्या वयाबरोबर निसर्गाविरुद्ध झालेल्या या छोटय़ा-मोठय़ा लढाया आपले व्रण दाखवू लागतात.
पण गम्मत अशी असते की आपल्याला नाही तरी मनाला आपली काळजी असते! ताणतणाव जसे मनात निर्माण होतात तशीच त्यावर मात करण्याची यंत्रणादेखील मतच तयार करू शकतं, किंबहुना अशी यंत्रणा मनात असते. पण ती कार्यान्वित करायला लागते नि जोपासायला लागते.
बा. भ. बोरकर जेव्हा भिजल्या तृणांवर ‘एक क्षण स्मित चांदणं’ मागतात किंवा ‘गीत गा क्षण धार तू, नदीच्या तटी लहरून जा’! म्हणतात जेव्हा जे याच मनाच्या यंत्रणेबद्दल बोलत असतात. असे ‘चार-एक’ क्षण आपल्या आयुष्यातील कित्येक ताणतणावांच्या प्रक्रियांना यशस्वीरित्या सामोरं जाण्यासाठी उपयुक्त असतात. मनाचं जीवनसत्त्वच असतं म्हणाना हे!
योगविद्येतील ‘शवासन’, वैद्यकशास्त्रातील Jackobson's Progressive Muscular Relaxation शिकून आपण बऱ्याच वेळा मनाला ‘काळ-काम-वेगाच्या भावनिक अतिरेकापासून वाचवू शकतो. पण देर आए दुरुस्त आए’! हा वाक्प्रचार नेहमीच व्यवहारी असतो असं नाही, तेव्हा हे शिकायचीसुद्धा ‘घाई’ आलीच!
n doc_ashished@yahoo.com