Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादीला सेनेचा शह..

 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने बुलढाणा जिल्ह्य़ातील सात विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना-भाजप या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चुरशीची लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या सात मतदारसंघांपैकी बुलढाणा, चिखली, मेहकर, सिंदखेडराजा व खामगाव हे सहा मतदारसंघ बुलढाणा लोकसभा तर, मलकापूर विधानसभा मतदारसंघ रावेर लोकसभा मतदारसंघात आहे.
यापूर्वी २००४ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत २००९ ची विधानसभा निवडणूक वर्षांनुवर्षे सत्ता भोगणाऱ्या प्रस्थापित आमदारांसाठी राजकीय अस्तित्वाचा रणसंग्राम ठरणारी असेल. सध्या जिल्ह्य़ातील सात आमदारांपैकी शिवसेनेकडे दोन, भाजपकडे तीन, काँग्रेसकडे एक तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक आमदार आहे. मतदारसंघाच्या फेररचनेत मेहकर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला असून तेथील विजयी आमदार प्रतापराव जाधव नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा २८ हजार मतांनी पराभव करून खासदार झाले आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. येथे भाजपची स्थितीही भरभक्कम आहे. ही बाब लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. शिंगणे यांनी घेतलेल्या तुल्यबळ मतांमुळे घाटावरील सिंदखेडराजा, मेहकर, चिखली व बुलढाणा मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यापैकी आज केवळ सिंदखेडराजा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे आहे.
सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे गेल्या पंधरा वर्षांपासून डॉ. राजेंद्र शिंगणे हे प्रतिनिधित्व करतात. हा मतदारसंघ म्हणूनच शिंगणे सोडू इच्छित नाहीत. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील कमिटमेंटनुसार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तोताराम कायंदे या मतदारसंघाच्या उमेदवारीवर हक्क सांगून आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीपुढे सिंदखेडराजामधून कायंदे व बुलढाण्यातून शिंगणेंनी लढावे, असा प्रस्ताव आला आहे. त्यासाठी मेहकर हा राखीव मतदारसंघ काँग्रेसला सोडून बुलढाणा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीने काँग्रेसला गळ घातली आहे. असे असले तरी यावेळची सिंदखेडराजाची विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसला एवढी सोपी नाही. शिंगणे येथे उमेदवार असल्यास त्यांच्याविरोधात अ‍ॅन्टी इन्कंबन्सी लाट निर्माण होण्याचा प्रचंड धोका आहे. कायंदे उमेदवार असल्यास जातीय समीकरणात शिवसेना-भाजप युती प्रबळ होऊ शकते. शिंगणेंच्या विरोधातील नकारात्मक लाट कॅश करण्यासाठी सेनेकडून पुन्हा डॉ. शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
चिखली विधानसभा मतदारसंघ जिल्ह्य़ाच्या राजकारणाची राजधानी मानला जातो. सुमारे ३५ वर्षे हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. या मतदारसंघावर २० वर्षे शरद पवारांचे स्नेही भारत बोंद्रे यांचा वरचष्मा होता. १९९५ मध्ये पहिल्यांदाच भाजपच्या रेखा खेडेकर यांनी काँग्रेसचा हा गड काबीज केला. त्यानंतर पंधरा वर्षांत तो पुरता उद्ध्वस्त करीत सत्तेची सूत्रे स्वत:कडे राखली. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांनी रेखा खेडेकरांच्या विरोधात कडवी झुंज दिली. त्यात अवघ्या १२०० मतांनी त्यांना निसटता विजय मिळला. या मतदारसंघाची अजब तऱ्हा आहे. खेडेकर या शिवधर्मीय असल्याने हिंदुत्ववादी व वारकरी, विशेषत: संघवाले खेडेकरांना निवडणुकीत विरोध करीत काँग्रेसला मदत करतात. मराठा-बहुजन बहुल मतदारांच्या पाठिंब्याने रेखा खेडेकर बाजी मारतात. मात्र, यावेळी त्यांच्याविरोधात नकारात्मक लाट आहे. काँग्रेसच्या उमेदवारीसाठी राहुल बोंद्रेसोबत नरेंद्र खेडेकर, धृपतराव सावळे हेही इच्छुक आहेत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या विजयराज शिंदेंच्या विरोधात सक्षम आणि तगडा उमेदवार काँग्रेसकडे नसल्याचे दिसून येते. याला मात्र काँग्रेसचे धृपतराव सावळे व राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे अपवाद आहेत. यापैकी कुणीही उमेदवार दिल्यास विजयराज शिंदे यांचा पराभव अटळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शिंगणेंसाठी चाचपणी करीत आहे. काँग्रेसकडून हर्षवर्धन सपकाळ, राजेंद्र गोडे, विजय सावळे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.
खामगावमध्ये गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसचे दिलीप सानंदा यांचे एकछत्री राज्य आहे. त्यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत नकारात्मक लाट होती. सानंदा यांच्या विरोधातील नकारात्मक लाट कॅश करणारा तगडा उमेदवार दिल्यासच सानंदांचा पराभव होऊ शकतो. अन्यथा, साम-दाम-दंड-भेदात तरबेज असलेल्या सानंदांना पराभूत करणे अतिशय कठीण आहे. पुनर्रचित जळगाव विधानसभा मतदारसंघात पूर्वीच्या खामगाव मतदारसंघातील शेगाव तालुक्याचा बराचसा भाग गेल्याने नवा खामगाव मतदारसंघ सानंदांसाठी आव्हानात्मक झाला आहे. मात्र, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघ भाजपचे विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासाठी अनुकूल झाला आहे. डॉ. कुटे यांना काँग्रेसमध्ये विरोधक म्हणून समर्थ पर्याय नाही, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसचे कृष्णराव इंगळे, डॉ. उज्ज्वला पाटील, अंजली टापरे हे दावेदार उमेदवार आहेत.
मेहकर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीसाठी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव हे निर्णायक आहेत. येथे त्यांचे दोन कट्टर समर्थक नितीन मोरे व डॉ. संजय रायमूलकर यांच्यात उमेदवारीसाठी लढाई सुरू आहे.
सोमनाथ सावळे