Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कुरघोडीच्या राजकारणाला वेग

 

दोन दशकापूर्वी काँग्रेसची पकड असलेल्या अकोला जिल्ह्य़ाचे आताचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. भाजप-सेना युतीची जोरदार मुसंडी आणि भारिपबमसंच्या वाढत्या प्रभावामुळे येथील काँग्रेसच्या अस्तित्वालाच ग्रहण लागले आहे. गमावलेली सत्तासूत्रे पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी काँग्रेसची ज्येष्ठ मंडळी कंबर कसून कामाला लागली आहे. अकोला जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये अकोला पूर्व, अकोला पश्चिम, अकोट, बाळापूर आणि मूर्तीजापूर या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. परिसीमन आयोगाने केलेल्या बदलानंतर बोरगाव मंजू विधानसभा मतदारसंघ अकोला पूर्वमध्ये सहभागी करून घेण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्य़ातील पाच विधानसभा मतदारसंघापैकी अकोट, बाळापूर आणि अकोला पश्चिम हे तीन मतदारसंघ भाजप-सेना युतीच्या ताब्यात आहेत. बोरगाव मंजू हा मतदारसंघ भारिप-बमसंने तर, मूर्तीजापूर राष्ट्रवादीने बळकावला आहे. भारिपबमसं व बसपा या पक्षांमुळे होणाऱ्या मतविभाजनाचा फटका येथे नेहमीच काँग्रेसला बसत आला आहे. लोकसभा निवडणुकीतही हेच चित्र दिसले. अनपेक्षित बदल न झाल्यास थोडय़ाफार प्रमाणात याचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकांमध्येही होण्याची शक्यता आहे.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ या भागात राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचा मानला जातो. काँग्रेसचे दिवंगत नेते व माजी मंत्री अरुण दिवेकर यांचा भाजपचे गोवर्धन शर्मा यांनी येथून पराभव केला. त्यानंतर काँग्रेसची सुरू झालेली घसरण आजतागायत थांबलेली नाही. अझहर हुसेन, लक्ष्मणराव तायडे, सुधाकर गणगणे, बाबासाहेब धाबेकर हे काँग्रेसचे नेतेही पराभवाचा वारू थांबवू शकले नाहीत.
केवळ अकोला जिल्हाच नव्हे तर, पश्चिम विदर्भातील अन्य जिल्ह्य़ांमध्येही काँग्रेसची ही दारुण अवस्था झाली आहे. यावर मात करण्यासाठी मुकुल वासनिकांसारख्या मुरब्बी नेत्याच्या खांद्यावर पश्चिम विदर्भातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी टाकण्याची तयारी पक्षश्रेष्ठींनी चालवल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकांचे घोडामैदान जवळ आहे. जागा वाटपातही काही बदल घडण्याची शक्यता आहे. यावरूनही बरीच उलथापालथ घडू शकते. सहकार क्षेत्रातील नेत्यांचा येथील राजकारणावर प्रभाव आहे. या नेत्यांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली आहे. माजी मंत्री वसंतराव धोत्रे तसेच, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष कोरपे व सुभाष कोरपे यांच्या गटाकडे या राजकारणाची सूत्रे आहेत. सुभाष कोरपेंनी काँग्रेसकडे विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मागितल्यामुळे संपूर्ण चित्र बदलले आहे. एरवी राष्ट्रवादीशी बांधील असलेला सहकार गट सुभाष कोरपेंच्या भूमिकेमुळे काय पवित्रा घेतो, याकडे अनेकांचे लक्ष आहे.
उमेदवारी मिळवण्यासाठी चाललेल्या या मारामारीत यापासून अलिप्त राहणारा परंतु, काँग्रेसशी निष्ठावान असलेला जुन्या कार्यकर्त्यांचा वेगळा गट आहे. या गटाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी पुढाकार घेतलेल्या राजाभाऊ देशमुख या ज्येष्ठ नेत्याचे नाव उमेदवारीसाठी पुढे केले आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात सेनेची उमेदवारी मिळवण्यासाठी गुलाबराव गावंडे आणि विजय मालोकार या नेत्यांमध्येच अहमहमिका लागली आहे. मालोकारांना उमेदवारी दिली तर सेनेला या मतदारसंघावर भगवा फडकावता येईल. अकोटमध्ये काँग्रेसचे प्रकाश भारसाकळे, सेनेचे पुरुषोत्तम चौखंडे व संजय गावंडे यांनी रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. मूर्तीजापूर मतदारसंघ राखीव झाल्यामुळे येथून निवडून आलेले राष्ट्रवादीचे आमदार तुकाराम बिरकड यांनी बाळापूरकडे मोर्चा वळवला आहे. यामुळेच बाळापूरला तिहेरी संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि भारिपबमसं असा संघर्ष येथे रंगणार आहे. अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने या पाश्र्वभूमीवर तीव्र स्वरूप धारण केले आहे.
विधानसभा निवडणुकीत अकोला पूर्व, अकोट आणि बाळापूरमध्ये मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसू शकतो. मराठा उमेदवारांच्या संघर्षांचा फायदा या मतदारसंघामध्ये भारिपबमसंला मिळण्याची चिन्हे आहेत. याउलट, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील चित्र आहे. भाजपचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात यावेळी अटीतटीचा संघर्ष होणार आहे. येथून विजयाची हॅट्ट्रीक केलेल्या गोवर्धन शर्मा यांच्या विरोधात रिंगणात उतरण्यासाठी महापौर मदन भरगड, रमाकांत खेतान, विजय देशमुख या काँग्रेसच्या नेत्यांनी तयारी केली आहे. माजी मंत्री अजहर हुसेन यांनीही येथून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसने उमेदवारी न दिल्यास अपक्ष निवडणूक लढवण्याची भाषा त्यांनी वापरल्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी अधिकच वाढली आहे.
क्रांतिकुमार ओढे