Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात राहण्याची सक्ती नाही!
केंद्राची नवी मागदíशका जारी
पुणे, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
केंद्राच्या आरोग्य मंत्रालयाने नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शिकोंमध्ये संशयित रुग्णाची शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी केल्यानंतर ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना रुग्णालयातील स्वतंत्र कक्षामध्ये (आयसोलेटेड वॉर्ड) राहण्याची सक्ती केली जाणार नाही. याउलट रुग्णाच्या इच्छेनुसार त्यांना घरीच स्वतंत्र कक्षात राहण्याचा सल्ला दिला जाईल, असे म्हटले आहे. ‘स्वाइन फ्लू’ने देशातील पहिला बळी हा पुण्यात गेल्याने पूर्वीची जाहीर केलेल्या मार्गदर्शिकेनंतर नव्याने आदेश जारी केले जातील, असे केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाब नबी आझाद यांनी म्हटले होते.

आजारी शहर
मुकुंद संगोराम

जगाच्या नकाशावर पुणे शहराचे स्थान आणखी एका कारणामुळे झळकू लागले आहे. विद्येचे माहेरघर, उद्योगाचे मोठे केंद्र, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्त्वाचे शहर, सांस्कृतिक नेतृत्व करणारे शहर, अशी जरी पुण्याची ओळख जगाला असली तरी, त्या लौकिकात आता ‘स्वाइन फ्लू’च्या धुमाकुळाने भरच घातली आहे. परदेशातून पुण्यात आलेल्या ‘स्वाइन फ्लू’चे विषाणू शाळांमध्ये पसरले आणि त्याने उग्र रूप धारण केले, तरीही महापालिका आणि राज्य सरकार मात्र त्याबाबत कार्यक्षमतेने पावले उचलताना दिसत नाही. ‘

रिदा शेख मृत्यूप्रकरणी कागदपत्रे पोलिसांच्या ताब्यात
समितीच्या अहवालानंतरच गुन्ह्य़ाबाबत निर्णय

पुणे, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाईन फ्लू’मुळे मृत्युमुखी पडलेल्या रिदा शेख या चौदा वर्षांच्या विद्यार्थिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे जहांगीर व रुबी रुग्णालयातून प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य खात्याकडून नेमण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालात डॉक्टरांवर हलगर्जीपणाबद्दल ठपका ठेवण्यात आला तरच रिदा शेख प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही डॉ. सिंह यांनी यावेळी सांगितले.

‘स्वाइन फ्लू’बाबत आजपासून विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती
पुणे, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

‘स्वाइन फ्लू’बाबत शहरात भीती उत्पन्न करण्याचे कारण नाही. या आजाराबाबत कोणती काळजी घ्यावी याचे धडे शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांनी पालकांपर्यंत पोहोचविल्यास योग्य ती दक्षता सर्वचजण घेतील, असा विश्वास महापालिका आयुक्त महेश झगडे यांनी आज व्यक्त केला. या जनजागृती मोहिमेला गुरुवारपासून लगेच सुरुवात होत आहे.

प्रवाशांच्या संख्येवर परिणाम नाही;
रेल्वे आवारात माहिती फलक
पुणे, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी
‘स्वाइन फ्लू’च्या पाश्र्वभूमीवर बाहेरच्या राज्यातून किंवा शहरातून पुण्यात येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर कोणताही परिणाम झालेला नाही. रेल्वे व बसच्या प्रवाशांची रोजची संख्या कायम आहे. दरम्यान, ‘स्वाइन फ्लू’बाबत दक्षता घेण्यासाठी रेल्वेच्या वतीने पुणे स्थानकाच्या आवारात फलक लावण्यात आले आहेत.

निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ४०० गाळ्यांचे वाटप
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन

िपपरी, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘झोपडपट्टी विरहित शहर’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याच्या हेतूने िपपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचे उद्घाटन अखेर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतील गाळ्यांचे वाटप येत्या ११ ऑगस्टला (मंगळवारी) निगडी येथे पवार यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे.

‘पीएमपी’चा दैनंदिन पास बसमध्येच मिळणार
खाडे यांची नुसतीच घोषणा; अंमलबजावणी नाही
पिंपरी, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
प्रवासी संख्या वाढविण्याबरोबरच उत्पन्नात वाढ करण्यासाठी एक दिवसाच्या प्रवासासाठीचा दैनंदिन पास बसमध्ये वाहकाकडेच उपलब्ध करुन देण्याची योजना ‘पीएमपी’ने आखली असल्याची माहिती ‘पीएमपी’चे व्यवस्थापकीय संचालक नितीन खाडे यांनी दिली. खाडे यांनी ‘पीएमपी’ची सूत्रे स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम ही घोषणा केली होती. मात्र, तीन महिन्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.

‘अण्णा भाऊंच्या साहित्यातून उपेक्षित व्यवस्थेचे चित्रण’
परिसंवादातील मत
पिंपरी, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या महापुरुषांना जातीच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या साहित्याचा आधार घेऊन परिवर्तनाची लढाई सुरू करणे आवश्यक आहे, असे मत आज एका परिसंवादात व्यक्त करण्यात आले. अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून उपेक्षित व्यवस्थेचे चित्रण मांडले असून, खऱ्या अर्थाने अण्णांचे साहित्य म्हणजे श्रमकरी कष्टकऱ्यांचे साहित्य असल्याचे नमूद करण्यात आले.

दीपशिखा
कालिदासाने वर्णन केलेल्या दीपशिखेप्रमाणे जीवनाचे प्राणपंख, आस्था आणि सद्भाव यासह काही लोक अवतीभोवतीच्या लोकांच्या मानसिक ऊर्जेला प्रवाहित करीत त्यांना प्रकाशाची व परिवर्तनाची दिशा बहाल करीत असतात. अशा एका श्रेष्ठ प्रतीच्या, आत्मनिष्ठ आणि प्रेमधर्मी आधुनिक ज्येष्ठ प्रकाशयात्रीशी म्हणजेच बा. रा. प्रभुणे ऊर्फ बापूसाहेब यांच्याशी माझा काही वर्षांपूर्वी परिचय झाला. महत्त्वाचे म्हणजे यांच्याबरोबरच्या सततच्या संवादातून व संदर्भ ग्रहणातून एका अतूट सनातन संवादाचा व संगतीचा लाभ झाल्याची सफलता मला लाभली.

चिंचवड मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून मतदारांना ‘खिरापत’
विद्यार्थ्यांना पालकांसह दिल्ली सफर, विमा पॉलिसी, गणेश मंडळांना रुग्णवाहिका, बचत गटांना रिक्षा

पिंपरी ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांना निवडणुकीपूर्वीच ‘ज्वर’ चढला आहे . आपल्या संभाव्य मतदारांना खूश करण्यासाठी बहुतेक सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांची जोरदार चढाओढ सुरु आहे.अगदी विद्यार्थ्यांपासून महिला ,ज्येष्ठ नागरिक व संस्था, संघटना व मंडळांच्या कार्यकर्त्यांना आपलेसे करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

सेंट अॅन्स शाळेतील आणखी एका विद्यार्थिनीला ‘स्वाइन फ्लू’
पुणे, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

लष्कर भागातील सेंट अॅन्स या शाळेतील आणखी एका विद्यार्थिनीला ‘स्वाईन फ्लू’ ची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे या शाळेला काही दिवसांकरिता सुटी द्यावी, अशी विनंती महानगरपालिकेच्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाला करण्यात येणार आहे. महापालिकेचे आरोग्य विभाग प्रमुख डॉ. आर. आर. परदेशी यांनी ही माहिती दिली. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी ज्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली त्यांना काही दिवसांची सुटी देण्याचा उपाय अवलंबिण्यात आला होता. त्यानुसार शहरातील अभिनव विद्यालय, सेवासदन हायस्कूल, सिंबायोसिस इत्यादी शाळा काही दिवसांकरिता बंद ठेवण्यात आल्या होत्या. सेंट अॅन्स या शाळेतील रिदा शेख या विद्यार्थिनीचे या आजाराने निधन झाले. त्यापाठोपाठ याच शाळेतील दहावीच्या एका विद्यार्थिनीला या आजाराची लागण झाली असल्याचे आज स्पष्ट झाले. त्यामुळे ही शाळाही काही दिवस बंद ठेवणे गरजेचे झाले आहे. त्याबाबत राज्य शासन बोर्डाला आदेश देणार आहेच. त्याचबरोबर पालिकेनेही तशी विनंती केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोथरूड, येरवडय़ात आज पाणीपुरवठा नाही
पुणे, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
लष्कर पाणीपुरवठा केंद्राच्या आवारातील मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम गुरुवारी (६ ऑगस्ट) केले जाणार असल्यामुळे त्या दिवशी येरवडा, वडगावशेरी, नागपूर चाळीसह अनेक भागांचा दिवसभराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच या भागांना शुक्रवारी (७ ऑगस्ट) पाणीपुरवठा उशिरा व कमी दाबाने होईल.गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत. येरवडा गावठाण, गांधीनगर, नागपूर चाळ, कल्याणीनगर, शास्त्रीनगर, वडगावशेरीचा काही भाग, सोपाननगर, संगमवाडी, आळंदी रस्ता व परिसर, विश्रांतवाडी. वारजे जलकेंद्राला होणारा वीजपुरवठा गुरुवारी (६ ऑगस्ट) बंद राहणार असल्यामुळे पुढील भागांचा पाणीपुरवठा गुरुवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत बंद राहणार आहे. पौड रस्ता, उजवी व डावी भुसारी कॉलनी, शास्त्रीनगर, बावधन, भुगाव रस्ता परिसर, सूस रस्ता, बाणेर, बालेवाडी, पाषाण, वारजे महामार्ग परिसर, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, गांधीभवन, महात्मा सोसायटी. या सर्व भागांना शुक्रवारी (७ ऑगस्ट) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हडपसरमध्ये पर्यायी रस्त्यांची मागणी
हडपसर, ५ ऑगस्ट/ वार्ताहर
वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे हडपसर भागात वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी ग्लायडिंग सेंटर कम्पाऊंडलगत असलेला रस्ता विकसित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हडपसर विभागाचे सरचिटणीस सुरेश हडदरे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.ग्लायडिंग सेंटरलगतचा रस्ता विकसित केल्यास रेल्वे फाटकाजवळ रोज होणारी कोंडी टळेल व ससाणेनगर रस्त्यास पर्यायी रस्ताही तयार होईल. श्रीकृष्ण कॉम्प्लेक्सवरून हा रस्ता ग्लायडिंग सेंटपर्यंत आहेच, हा रस्ता नवीन कॅनॉलवर पूल बांधून क्षेत्रिय कार्यालयामागील जुन्या कॅनॉलवरील पुलास जोडल्यास सोलापूर रस्त्यापर्यंत हा मार्ग होईल, असे हडदरे यांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर पाणी निस्सारणासाठी पावसाळी गटारे बांधण्याचीही त्यांनी मागणी केली आहे. ससाणेनगर, महंमदवाडी, काळेबोराटेनगर परिसरात एकही बगीचा नसल्याने येथे नाईकनवरे असोसिएट्सने मान्य केलेला बगीचा विकसित करावा, अशीही मागणी त्यांनी वाहतूल पोलीस निरीक्षक व हडपसर क्षेत्रिय कार्यालयास पत्रकान्वये केली आहे. पत्रकावर अध्यक्ष शिवाजीराव भाडळे, नगरसेवक वसंत मोरे यांच्याही सह्य़ा आहे.

शिंपी समाजातील उच्चशिक्षित वधू-वरांचा कार्यक्रम
पुणे, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
बहुभाषिक शिंपी महासंघ व नामदेव शिंपी शादी डॉटकॉमतर्फे शिंपी समजातील उच्चशिक्षित वधू-वरांचा ‘राज्यस्तरीय महापसंती’ कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे.
बहुभाषिक शिंपी महासंघ संस्थेचे संस्थापक उत्तम मांढरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून ऑफिस नं. ३, भवानी टॉवर, मंदार सोसायटी, धनकवडी या पत्त्यावर अथवा ९८२२००९८९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मांढरे यांनी केले. पंधरा ऑगस्ट रोजी हा मेळावा, नवी पेठ येथील निवारा सभागृात सकाळी दहा ते पाच या वेळेमध्ये होणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले.

‘साज और आवाज’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
श्रीयशलक्ष्मी आर्टतर्फे ६ ऑगस्ट रोजी ‘साज और आवाज’ या वैशिष्टय़पूर्ण वाद्यमैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही वाद्यमैफल यशवंतराव चव्हाण नाटय़गृह, कोथरूड येथे रात्री ९.३० वाजता होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या संचालिका मंजुश्री ओक यांनी दिली. ओक म्हणाल्या की, या वाद्यमैफलीत पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य सुनील अवचट यांचे बासरी वादन आणि पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य मदन ओक यांचे संतूरवादन या दोन्हींचा एकत्रित आविष्कार अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.कार्यक्रमाच्या पूर्वार्धात या दोघांचे सोलोवादन आणि उत्तरार्धात ही दोन्ही वाद्ये ज्या गाण्यांत वापरली आहेत, अशा मराठी-हिंदी गाण्यांचे गायनही होणार आहे. अली हुसेन, जयदीप ढमढेरे आण मंजुश्री ओक हे गायक कलाकार या गाण्यांचे सादरीकरण करणार आहेत. या वाद्यमैफलीचे संगीत संयोजन विवेक परांजपे तर निवेदन मंगेश वाघमारे करणार आहेत. कार्यक्रमास प्रवेशशुल्क आहे.

महापालिकेतील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुणे, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
महापालिकेतील चार क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यांनी बदलीच्या जागी आजपासून काम सुरू केले. या बरोबरच तीन उपायुक्तांकडील कार्यभारातही बदल करण्यात आला आहे. सहकारनगर कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी सुनील केसरी यांची बदली विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयात करण्यात आली आहे. ते गेली साडेचार वर्षे सहकारनगर कार्यालयात होते. विश्रामबागवाडा कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी माधव जगताप यांची बदली हडपसरचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून करण्यात आली आहे. हडपसरचे क्षेत्रीय अधिकारी माधव देशपांडे बिबवेवाडीचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून बदलून आले आहेत, तर बिबवेवाडीचे क्षेत्रीय अधिकारी अनिल जगताप यांची सहकारनगरचे क्षेत्रीय अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. उपायुक्त सुरेश जगताप यांच्याकडील सेवकवर्ग विभागाचा पूर्ण कार्यभार आता उपायुक्त के. सी. कारकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तसेच उपायुक्त सुधाकर तेलंग यांची बदली करण्यात आली असून त्यांच्याकडे भूमी,जिंदगी विभागाचा पूर्ण कार्यभार देण्यात आला आहे. तेलंग यांच्या जागी महाराष्ट्र शासनाच्या सेवेतून आलेले श्री. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने पटकावली चार रौप्यपदके
पुणे, ५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी
इंग्लंडमधील केंब्रिजला झालेल्या ४१ व्या रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने चार रौप्यपदकांसह सातवे स्थान पटकाविण्यात यश मिळवले. मुंबईचा अभिषेक पद्मनाभन याच्यासह जयपूरचे विनायक गगराणी व श्रुती खत्री आणि मणिकांत कोटरू या युवा संशोधकांचा रौप्यपदक विजेत्यांमध्ये समावेश आहे.रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री आणि केंब्रिज-ऑक्स्फर्ड विद्यापीठांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या या ऑलिम्पियाडमध्ये ७० देशांमधील २७० संशोधक सहभागी झाले होते. थिअरीबरोबरच प्रॅक्टिकल ज्ञानाची चाचणीही या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली. भारतीय पथकाच्या प्रमुख मार्गदर्शकपदी पुण्याच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रीसर्च (आयसर) या संस्थेतील प्रो. डॉ. ए. ए. नातू होते. त्याचप्रमाणे मुंबईच्या भाभा संशोधन केंद्रातील डॉ. स्वाती लाडगे व बंगलोरचे डॉ. ए. श्रीनिवासन यांचाही या पथकामध्ये समावेश होता. सुमारे ३५ हजार युवासंशोधकांमधून भारतीय संघासाठी चार सदस्यांची निवड करण्यात आली.या ऑलिम्पियाडमध्ये चीन व रशियाने चार सुवर्ण पदकांसह अव्वल स्थान पटकावले. पुढील वर्षी टोकियोला यापुढील रसायनशास्त्र ऑलिम्पियाड भरविण्यात येणार आहे.

माजी सैनिकांपेक्षा पालिकेला महत्त्व ठेकेदाराच्या माणसांचे!
पुणे, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

महापालिकेच्या बहुद्देशीय पथकांत काम करणाऱ्या २०५ माजी सैनिकांचा पगार गेले तीन महिने थकला असून, या सैनिकांना हटवून त्यांच्याऐवजी ठेकेदारामार्फत माणसे नेमण्याचा घाट घालण्यात आल्याची माहिती आज उजेडात आली. शहरात विविध ठिकाणी उपद्रव करणाऱ्या, तसेच कायदा मोडणाऱ्या नागरिकांवर, व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने १४ क्षेत्रीय कार्यालयांमध्ये १४ बहुद्देशीय पथके नेमली आहेत. या पथकांमध्ये हेतुत: माजी सैनिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांमध्ये काम करणाऱ्या २०५ माजी सैनिकांचा पगार थकवण्यात आला असून, हे सैनिक पगाराच्या मागणीसाठी महापालिकेत खेटे घालत आहेत. हे माजी सैनिक शिवसेनेचे बिबवेवाडीचे शाखाप्रमुख घन:श्याम मारणे, तसेच अन्य कार्यकर्त्यांबरोबर महापालिकेत आले. संबंधित विभागप्रमुखांची भेट घेऊन या सैनिकांना पुढील सहा महिन्यांसाठी कामाची ‘ऑर्डर’ काढावी, तसेच थकित पगार द्यावा, अशी मागणी या वेळी मारणे यांनी केली. ही मागणी केल्यानंतर सायंकाळी पाचपर्यंत ऑर्डर निघेल, असे आम्हाला सांगण्यात आले. मात्र सहापर्यंत वाट पाहूनही ऑर्डर निघाली नाहीच. या माजी सैनिकांना कामावर न घेता मर्जीतील ठेकेदाराला काम देण्याचा घाट अधिकाऱ्यांनी घातला आहे. त्यामुळे आयुक्तांनी तीन दिवसांपूर्वी आदेश दिल्यानंतरही सैनिकांना न्याय मिळाला नाही, असे मारणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पालिका सेवेत कायम करण्यासाठी घंटागाडी कामगारांची ‘रॅली’
पिंपरी, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
महापालिकेच्या आरोग्य खात्यात गेली १३ वर्षे कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या ‘घंटागाडी’ कामगारांनी महापालिका सेवेत कायम करावे या मागणीसाठी आज रॅली काढली होती.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष आझम पानसरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत मोठय़ा संख्येने घंटागाडी कामगारांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. कंत्राटी पध्दत रद्द करा, घंटागाडी कामगारांना सेवेत कायम करा , कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते, बोनस, भविष्य निर्वाह निधी, उपदान, रजा आदी सुविधा देण्यात याव्यात अशा घोषणा दिल्या. तसेच महापालिका प्रशासनाच्या कामगार विरोधी धोरणांच्या तीव्र निषेधाच्या घोषणा दिल्या. नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, नगरसेवक मारुती भापकर, पिंपरी-चिंचवड कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर, हिंद कामगार संघटनेचे अध्यक्ष कैलास कदम, विरोधी पक्षनेते संतोष मारणे, नगरसेवक बाबू नायर, सनी ओव्हाळ, रिपाईचे सचिव बाळासाहेब भागवत , सामाजिक कार्यकर्ते निलेश सुंभे , कष्टकरी पंचायत संघटनेचे अध्यक्ष बाबा कांबळे आदी सहभागी झाले होते. यावेळी झालेल्या सभेत महापालिका प्रशासनाच्या आडमुठय़ा धोरणाचा निषेध करण्यात आला. घंटागाडी कामगारांना कायम कार्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा व सेवेत कायम केले नाही , तर याहीपेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा वक्त्यांनी दिला.

दारु व्यापाऱ्यास िपपरीत अटक
पिपरी, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

पिंपरी भाटनगर येथील गावठी दारु गाळणाऱ्यांना गुळाची ठेप व नवसागराचे बॉक्स पुरविणाऱ्या व्यापाऱ्याच्या दुकानावर छापा टाकून आठ हजार रुपयांचा माल जप्त केला. पिंपरीचे वरिष्ठ निरीक्षक जयवंत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, भगवानदास तेलाराम पेशवानी (वय ७५, रा. लिंकरोड, पिपरी) असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास पेशवानी याला अटक करण्यात आली. त्या वेळी दुकानातून गुळाच्या २८ ठेपा व नवसागराचे चार बॉक्स असा सात हजार नऊशे चाळीस रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पिंपरी पोलिसांकडून चिंचवड, भोसरी, निगडी पोलिसांच्या मदतीने भाटनगर येथील अवैध दारु धंद्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास पन्नास हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच दारुचा धंदा करणाऱ्या तिघा महिलांना अटक करण्यात आली.

‘बहुचर्चित’ ताथवडे अखेर पालिकेत समाविष्ट
वर्षांकाठी तीन कोटींचे पालिकेला उत्पन्न
पिंपरी, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

पालकमंत्री अजित पवार आणि माजी खासदार नाना नवले यांच्यातील यापूर्वीच्या राजकारणाने ‘बहुचर्चित’ ठरलेले ताथवडे गाव अखेर बारा वर्षांनंतर िपपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट करण्यात आले आहे.
िपपरी पालिकेच्या हद्दीलगत असलेली गावे ११ सप्टेंबर १९९७ मध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आली. तेव्हा पालिका हद्दीला अक्षरश: खेटून असलेले ताथवडे गाव मात्र बेटासारखे बाजूला ठेवण्यात आले होते. ताथवडय़ाचा पिंपरी पालिकेत समावेश करावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून होत होती. मात्र नवले यांचा विरोध असल्याने तो निर्णय होत नव्हता. बऱ्याच वर्षांनंतरचा हा तिढा संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या निमित्ताने झालेल्या राजकीय तडजोडीच्या निमित्ताने सुटला. त्यानंतर नवले यांनी दोन पावले मागे जात ताथवडय़ास िपपरी पालिकेत समाविष्ट करण्यास हरकत नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतरही गावपातळीवर बऱ्याच घडामोडी झाल्या. अखेर राज्य शासनाने ३१ जुलैला याबाबतचा अध्यादेश काढला.ताथवडय़ाचा पालिकेत समावेश झाल्यानंतर पालिकेने या ठिकाणी दोन जक१ात नाके सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. पुनावळे आणि ताथवडय़ाच्या रस्त्यांवर लवकरच हे नाके सुरू होणार असून, या माध्यमातून वर्षांकाठी तीन कोटी रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळू शकेल, अशी माहिती जकात अधीक्षक अशोक मुंडे यांनी पत्रकारांना दिली.

निगडीमध्ये गुरुवारी श्रावणी काव्य स्पर्धा
पिंपरी, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी
निगडी येथील नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ, तसेच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारी (६ ऑगस्ट) दुपारी श्रावणी काव्य स्पर्धा व मान्यवरांच्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंडळाचे काव्यसंमेलनाचे हे १७ वे वर्ष आहे. प्राधिकरणातील संत तुकाराम उद्यानात दुपारी साडेतीन वाजता संमेलन सुरू होणार आहे. खासदार गजानन बाबर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होईल. सामाजिक कार्यकर्ते व साहित्यिक सुरेशचंद्र सुरतवाला संमेलनाचे अध्यक्ष असणार आहेत. ज्येष्ठ उर्दू शायर सय्यद आसिफ, प्रकाशक सुनील यादव व पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंडळाच्या सचिव माधुरी ओक यांनी आज दिली. काव्यप्रेमींनी उपस्थित राहून संमेलनाची शोभा वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सीमाभाग केंद्रशासित करण्यासाठी आज चिंचवडगाव येथे सभा
पिंपरी ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न सुटेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत काढण्यात आलेल्या ‘समर्थ भारत अभियान’ची यात्रेचे उद्या (गुरुवार) चिंचवडगाव येथे आगमन होत आहे. सकाळी १० वाजता चापेकर चौकातून मोरया समाधीपर्यंत प्रचारफेरीनंतर जाहीर सभा होणार आहे. समितीचे सरचिटणीस व ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर अभियानाचे नेतृत्व करत आहेत.महाराष्ट्र शासनाला ‘जाग’ आणण्यासाठीच ‘समर्थ भारत अभियान’ काढत आहोत असे त्यांनी स्पष्ट केले .या अभियानात मराठी बांधवांनी या अभियानात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले .चिंचवड येथून पुढे अलिबाग, पनवेल, डोंबिवली, ठाणे मार्गे आठ ऑगस्ट रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे सभेने या अभियानाचा समारोप होणार आहे.

गरवारे नायलॉन्स कामगारांची नऊ ऑगस्टला द्वार सभा
पिंपरी, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणामुळे दिवाळखोरीत गेलेल्या गरवारे नायलॉन्स कंपनीतील कामगारांच्या हलाखीच्या परिस्थितीवर संघटितपणे मात देण्यासाठी पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील कामगारांची जाहीर सभा कंपनीच्या पिंपरी येथील गेटवर रविवारी दुपारी ४ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेत सरचिटणीस एस. बी. मोरे, आर. सी. गुजराथी, सी. बी. साळुंखे उपस्थित राहणार आहेत. या सभेला मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मोरे यांनी केले आहे.

तरूणीच्या खून प्रकरणातील आरोपी जब्बाल कोठडीत
पिंपरी, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
बाणेर येथील एका सॉफ्टवेअर कंपनीच्या तरुणीचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केलेला आरोपी अनमोल जब्बाल (वय २७) याला १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वसमत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक माणिकराव पेरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनमोल स्वर्णसिंग जब्बाल (वय २७, रा. ८/८०१, ओझस अपार्टमेंट, पाषाण-बाणेर िलकरोड, पुणे) याला पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. जब्बाल याला मंगळवारी रात्री वसमत पोलिसांनी श्रद्धा सुरेश छाजेड (वय २४) हिचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक केली. आज दुपारी त्याला वसमत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. भागवत यांच्यासमोर हजर केले असता त्यांनी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी जब्बालने या गुन्ह्य़ामध्ये वापरलेली हुन्डई गेट्स गाडी जप्त केली आहे. डीएनए व सीए तपासणी अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे पेरके यांनी सांगितले.

भुशी धरण परिसरात खासगी वाहनांना दुपारी तीननंतर बंदी
लोणावळा, ५ ऑगस्ट/वार्ताहर

लोणावळा शहरात पर्यटनाकरिता येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मागील काही काळापासून मोठी वाढ झाली आहे. येथील भुशी धरण तर पर्यटकांचे हृदयस्थान बनले आहे. या धरण परिसरात आठवडा सुट्टीत लाखों पर्यटक वर्षांविहाराकरिता येत असल्याने येथील वाहतूक कोंडी सर्वाकरिता मोठी समस्या बनली आहे. त्या समस्येवर मात करण्याकरिता भुशी धरण परिसरात दुपारी तीन नंतर परिसरातील वाहने वगळता सर्व पर्यटक वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय लोणावळा शहर पोलिसांनी घेतला आहे. याविषयी बोलताना लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक बलराज लंजिले यांनी सांगितले की भुशी धरण परिसरात सकाळपासूनच पर्यटकांच्या शेकडो वाहनांची रांग लागलेली असते. कित्येक वेळेस सुमारे तीन-चार किमी पर्यंत वाहतूक कोंडी होते. ही समस्या सोडवण्याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी पाचनंतर भुशी धरणाकडे जाणाऱ्या गाडय़ांवर बंदी घालण्यात येत होती. यात दोन तासाने वाढ करत ती दुपारी ३.०० पासून लागू करण्यात येणार आहे. येत्या स्वातंत्र्यदिनापासून तीन सुटय़ा सलग आल्याने लोणावळ्यात लाखो पर्यटक दाखल होणार हे निश्चित असल्याने येत्या आठवडय़ापासूनच हा निर्णय अमलात आणण्याची शक्यता आहे.