Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

राज्य

रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्याचे खासगी रुग्णालयांना आदेश
पुणे, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

खासगी रुग्णालयांनी रुग्णांना तपासणी करण्याची जबाबदारी झटकल्यानेच नायडू रुग्णालयात गर्दी होत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयानेच आता रुग्णांची प्राथमिक तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी यांनी आदेश देतानाच रु ग्णांची तपासणी न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्य़ात ‘साथ नियंत्रण रोग कायदा’ लागू करण्यात आला. या कायद्यानुसार ही परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव शर्वरी गोखले यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह संचालकांना कालच आदेश दिले आहेत.

.. तरच डॉक्टरांवर गुन्हा दाखल होऊ शकतो
पुणे, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

‘स्वाईन फ्लू’मुळे मृत्युमुखी पडलेल्या रिदा शेख या चौदा वर्षांच्या विद्यार्थिनीशी संबंधित सर्व कागदपत्रे जहांगीर व रुबी रुग्णालयातून प्राथमिक चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. आरोग्य खात्याकडून नेमण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीच्या अहवालात डॉक्टरांवर हलगर्जीपणाबद्दल ठपका ठेवण्यात आला तरच रिदा शेख प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही डॉ. सिंह यांनी यावेळी सांगितले.

पावसाअभावी पिके हातची जाण्याची भीती
लष्करी अळीच्या प्रकोपाची शक्यता
चंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

येत्या १० ऑगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर एक लाख हेक्टरमधील खरिपाची पिके हातची जाण्याची भीती कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही लष्करी अळीचा प्रकोप सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्हय़ात एकदाही मुसळधार पावसाने हजेरी लावली नाही. आजवर जो काही पाऊस पडला तो तुरळक स्वरूपाचा होता. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यंदा भाताचे लागवड क्षेत्र एक लाख ४५ हजार हेक्टर आहे.

खताची मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांकडून काळाबाजार
नागपूर, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

पावसाने दिलेली उघडीप, दमट वातावरणामुळे सोयाबीन आणि कापसावर पडलेली कीड आणि त्यामुळे कोमेजलेल्या रोपांना पुन्हा नवजीवन देण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात रासायनिक खतांचा वापर सुरू केला आहे. ही संधी साधून व्यापाऱ्यांनी खतांच्या किमती वाढविल्या आहेत. जिल्हा आणि तालुका पातळीवर कृषी खात्याचे भरारी पथक असतानाही अद्याप या काळ्याबाजारावर नियंत्रण येऊ शकले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दूरशिक्षण संस्थांतील संशोधन केंद्रांमध्ये अस्वस्थता
यु.जी.सी.च्या निर्णयाचा परिणाम
नाशिक, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी
मुक्त विद्यापीठांसारख्या दूरस्थ शिक्षण संस्थांच्या संशोधन केंद्रांना प्रतिबंध करण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यु.जी.सी.) घेतल्याच्या वृत्ताने अशा ठिकाणहून पीएच. डी. अथवा एम.फिल. साठी संशोधन प्रकल्प सादर केलेल्यांमध्ये संतप्त भावना आहे. नोकरी-व्यवसाय सांभाळून संशोधन करू इच्छिणाऱ्यांना अशी संशोधन केंद्रे म्हणजे मोठा आधार असताना यु.जी.सी.चा हा निर्णय अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया संबंधितांमध्ये व्यक्त होत आहे.

पंढरपुरात सर्व वारीसाठी आता घरगुती दराने वीज
सोलापूर, ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

पंढरपूरच्या वारीसाठी येणाऱ्या लाखो वारकरी व भाविकांच्या सोयीसाठी वीजजोडणी देण्याची अखिल भारतीय वारकरी मंडळाची मागणी शासनाने मान्य केल्याची माहिती वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.वारीच्या काळात पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी मोठय़ा प्रमाणात राहुटय़ा घालून राहतात आणि चार-पाच दिवस भागवत सांप्रदायाची निष्ठेने सेवा करतात. त्यासाठी मंडप, तंबू उभारून कार्यक्रमांचे नियोजन करावे लागते. त्यासाठी वीज लागते. परंतु वीजपुरवठा व्यावसायिक दराने होत असल्याने त्याचा भरुदड सामान्य वारकऱ्यांना सोसावा लागतो. या प्रश्नावर अ. भा. वारकरी मंडळाने शासन दरबारी पाठपुरावा करून घरगुती दराने वीजपुरवठा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न चालविले होते. त्याप्रमाणे ही मागणी शासनाने मान्य करून प्रति युनिट दोन रुपये दराने वीजपुरवठा करण्यात येणार असल्याचे इंगळे यांनी सांगितले.

वसंत कोल्हटकर यांचे निधन
नाशिक, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

विभागाचे माजी महसूल आयुक्त वसंत कृ. कोल्हटकर यांचे २२ जुलै रोजी पुणे येथे निधन झाले.कोल्हटकर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई व नात असा परिवार आहे. बारामती परिसरातून प्रशासकीय सेवेत रूजू होणारे ते पहिलेच अधिकारी होते. १९६४ ते १९९५ या काळात मराठवाडा, नाशिक, मुंबई येथे त्यांनी कामकाज सांभाळले. पुणे विभागाच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून निवृत्त झाल्यावर ते तेथेच स्थायिक झाले. अत्यंत कर्तव्यदक्ष, नि:स्पृह, आणि प्रसिध्दी पासून दूर असणारे अशी त्यांची ख्याती होती. मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थितीत त्यांनी राबविलेला ज्वारी संकलन प्रकल्प, सोलापूर-नाशिक विभागात तळागाळापर्यंत पोहचवलेली रोजगार हमी योजना या व्यतिरिक्त अनेक उपक्रम त्यांनी यशस्वी केले. प्रशासकीय सेवेत असतानाच त्यांनी ईश्वरी विज्ञानाची ‘बॅचलर ऑफ डिव्हिनिटी’ ही पदवी प्राप्त केली. ख्रिस्ती समाजाची त्यांनी हरतऱ्हेने सेवा केली. पुण्यातील चर्चेस मध्ये ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करून त्यांच्यासाठी विविध उपक्रम राबविले. त्यांच्या निधनामुळे समाज एका उत्तम मार्गदर्शकाला हरपल्याची खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यास मनसे सज्ज
खोपोली, ५ ऑगस्ट/ वार्ताहर

आपल्या अखत्यारितील भागांमध्ये कर्जत-पनवेल-उरण-पेण या चार विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. या चारही मतदारसंघांतून मनसेचे उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करण्याच्या दृष्टीने जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती मनसेचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मनीष खवळे यांनी दिली. या चारही विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या एकूण ५१२ शाखा निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर कार्यरत आहेत. त्यामध्ये कर्जत-१३५, पनवेल- १६५, उरण-१२५ व पेण-पाली-८७ शाखांचा समावेश आहे. कोकण विभाग सरचिटणीसांच्या माध्यमातून व शिफारशीनुसार इच्छुक उमेदवारांची नावे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सादर करण्यात आली आहेत. त्यांची मंजुरी मिळाली तरच या मतदारसंघात निवडणूक लढविण्यात येणार आहे, असा निर्वाळा त्यांनी दिला.

‘स्वाइन फ्लू’च्या प्रतिबंधासाठी रायगड जिल्हा सज्ज
अलिबाग, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

पुणे, ठाणे आणि मुंबईतून रायगड जिल्ह्यात ये-जा करणाऱ्यांचे प्रमाण, पर्यटनाच्या निमित्ताने जिल्ह्यात बाहेरून येणारा जनसमुदाय या पाश्र्वभूमीवर ‘स्वाइन फ्लू’च्या फैलावास आळा घालून, प्रतिबंध करण्यासाठी रायगड जिल्हा आरोग्य यंत्रणा आपत्तीपूर्व व्यवस्थापन यंत्रणेसह सज्ज करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुभाष सोनवणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. स्वाइन फ्लूच्या प्रतिबंधाकरिता रायगडमध्ये प्रभावी जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत असून, याअंतर्गत एस. टी. बस स्थानके, रेल्वे स्थानके आणि गर्दीची ठिकाणे येथे माहिती फलक, वृत्तपत्रांतून जाहिराती, एस. टी. बसेस व प्रवासी रिक्षांत माहिती फलक, तसेच माहितीपत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षणाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रबोधन मोहीम हाती घेण्यात आली आहे.रायगड जिल्हा रुग्णालयात १० बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आला असून, स्वाइन फ्लूवरील प्रभावी व परिणामकारक ठरलेल्या ‘टॅमीफ्लू’ या गोळ्या जिल्हा रुग्णालयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

कर्जतमधील गोळीबार प्रकरणातील तीनही आरोपींना अटक
कर्जत, ५ ऑगस्ट/ वार्ताहर

कर्जतच्या भर बाजारपेठेमध्ये २९ जुलै रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास गावठी कट्टय़ातून गोळी झाडून ठेकेदार असलेल्या २७ वर्षांच्या मारुती ऊर्फ बाबू काळुराम घारे या युवकाला जखमी करणाऱ्या हल्लेखोराला तसेच त्याच्या अन्य दोन्ही साथीदारांना गुन्हा अन्वेषण विभागाच्या सहकार्याने अटक करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे. या गोळीबारासाठी वापरण्यात आलेले गावठी रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आले आहे. गोळी झाडणाऱ्या आरोपीचे नाव आदिनाथ बडेकर असे असून, त्याला तसेच त्याच्या किरण कर्णुक आणि कुमार सोनार या दोन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कामावरून कमी केल्याबद्दलचा राग मनात ठेवून हा प्राणघातक हल्ला केला गेला होता. हा हल्लेखोर आपल्या दोन्ही साथीदारांसह फरार झाला होता.या हल्ल्यामध्ये जखमी झालेले घारे हे कर्जत तालुक्यातील मार्केवाडी येथील रहिवासी आहेत. व्यवसायाने ते ठेकेदार असून त्यांची पत्नी कर्जत तालुक्यातील सावेले ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. त्यांच्यावर हल्ला करणारा बडेकर हा पूर्वी घारे यांच्याकडे नोकरी करीत होता. तो खालापूर तालुक्यातील बीड-जांबरूंग येथील रहिवासी आहे. कामावरून काढून टाकल्याचा राग मनात ठेवून त्याने आपल्यावर हा प्राणघातक हल्ला केला असल्याची माहिती घारे यांनी पोलिसांना दिली होती.

विद्या विकास मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांचे अनोखे रक्षाबंधन
कर्जत, ५ ऑगस्ट/ वार्ताहर

‘कर्जत महिला मंडळाचे विद्या विकास मंदिर’ या शाळेच्या विद्यार्थ्यांनी कर्जत नगर परिषद क्षेत्रातील मुदे येथील नाना मातरनगर परिसरात असलेल्या ‘श्रीकृपा शासकीय महिला वसतिगृहा’तील महिलांकडून राख्या बांधून घेऊन आज अनोख्या पद्धतीचे रक्षाबंधन साजरे केले.नाना मास्तरनगर या विभागात असणाऱ्या या महिला वसतिगृहामध्ये विद्या विकास मंदिरच्या इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी जाऊन तेथील भगिनींकडून राख्या बांधून घेतल्या. त्यावेळी त्यांच्या समवेत अनघा केळकर, प्राची पाटील, स्मिता गणवे या वर्गशिक्षिका, मुख्याध्यापिका मीना प्रभावळकर, वसतिगृहाच्या अधीक्षिका गांधी, तसेच परिचारिका उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव व्हावी, या हेतूने हा उपक्रम करण्यात आला, अशी माहिती प्रभावळकर यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी व भगिनींनी समयोचित गाणी सादर केली. विशेष म्हणजे यावर्षी विद्यार्थ्यांनी स्वत: राख्या बनविल्या होत्या. खाऊवाटप करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आंदोलन
पालघर, ५ ऑगस्ट/ वार्ताहर

वनहक्क कायद्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ जंगल संघर्ष समितीच्या वतीने कष्टकरी संघटना, भूमिसेना, शेतमजूर शेतकरी पंचायत इ. संघटनांसह जनता दल (से.)मार्फत मुंबई-अहमदाबाद महामार्गावर नुकताच ‘रास्ता रोको’ करण्यात आला. पालघर तालुक्यातील चिल्हार फाटा, टेण नाका तर डहाणू तालुक्यातील चारोटी नाका येथे काही काळ वाहतूक रोखून धरून आंदोलनकर्त्यांनी आदिवासींच्या दृष्टीने जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे काम केले. उपविभागीय अधिकारी डहाणू यांच्या वतीने डहाणूच्या तहसीलदार यांनी चारोटी येथे निवेदन स्वीकारले. कायद्याच्या अंमलबजावणीदरम्यान होणारा वनविभागाचा हस्तक्षेप थांबवा, ग्रामसभांचा निर्णय डावलू नका, उच्च पातळीवरील दाव्यांच्या पडताळणीत पारदर्शकता आणा, वनहक्क समित्या व समित्या सहाय्यकांना मानधन तात्काळ अदा करा, या कायद्यांतर्गत निधी वापराचे सामाजिक लेखा परीक्षण करा इ.सह जमीन मोजणी व दावा पडताळणीचे अधिकार वनहक्क समित्यांनाच वापरू द्या, वनजमिनींवरील वस्ती-पाडय़ांची योग्यरीत्या मोजणी करा आणि पडताळणी व मोजणी प्रक्रियेत सर्वत्र समानता आणा इ. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. भूमिसेना नेते काळूराम दोधडे, कष्टकरी संघटनेचे मधुबाई धोडी, कलावती, शिवाजी, सिराज बलसारा, ब्रायन लोबो, शेतमजूर शेतकरी पंचायतचे रामभाऊ वाडू, जनता दलाचे रामा धडपी, अरविंद पाटील, आदिवासी एकता परिषदेचे दत्ताराम करबट इ.च्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.

बेळगांव सीमा प्रश्न: जनजागरासाठी ‘समर्थ महाराष्ट्र अभियान’ आज अलिबागेत
अलिबाग, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

बेळगाव, कारवार, निपाणीच्या गेल्या ५३ वर्षांपासूनच्या सीमा प्रश्नबाबत महाराष्ट्रात जनजागरण करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कार्याध्यक्ष किरण ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ‘समर्थ महाराष्ट्र अभियान’ उद्या (गुरुवार) संध्याकाळी पाच वाजता येथे दाखल होत आहे. पिंपळभाट येथे या अभियानाचे स्वागत केल्यानंतर संध्याकाळी साडेपाच वाजता जोगळेकर नाका (आंग्रे चौक) येथे जाहीर सभा होईल अशी माहिती समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी आज दिली. जाहीर सभेत शेकाप नेत्या मीनाक्षी पाटील, आमदार मधुकर ठाकूर, जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती पंडित पाटील, अलिबागचे प़ स़ सभापती अ‍ॅड़ आस्वाद पाटील आदी सहभागी होणार आहेत़ किरण ठाकूर यावेळी अभियानाची भूमिका मांडतील.दरम्यान, अभिव्यक्ती समर्थन पत्रकार संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष आविष्कार देसाई व जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी यांनी या अभियानास पाठिंबा जाहीर केला आह़े समितीचे सरचिटणीस गावडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज ‘अभिव्यक्ती’चे राज्य अध्यक्ष जयंत धुळप व कुळकर्णी यांच्यासह उपरोक्त स्थानिक नेत्यांसमवेत चर्चा करुन अभियानाची माहिती दिली़

सहावा वेतन आयोग लागू करण्याची मत्स्य महाविद्यालय प्राध्यापकांची मागणी
खास प्रतिनिधी ,रत्नागिरी, ५ ऑगस्ट

राज्यातील शासकीय कर्मचारी आणि पारंपरिक विद्यापीठातील प्राध्यापकांना लागू करण्यात आलेल्या सहाव्या वेतन आयोगाची कृषी विद्यापीठांमधील प्राध्यापक व अधिकाऱ्यांसाठीही अंमलबजावणी करावी, अशी मागणी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या प्राध्यापक व तांत्रिक अधिकाऱ्यांनी केली आहे.या मागणीसाठी सर्वानी काल (४ ऑगस्ट) काळ्या फिती लावून काम केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात मागणीचे निवेदन सादर केले. मत्स्य महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष डॉ. हुकुमसिंग धाकड, सरचिटणीस डॉ. मिलिंद सावंत, डॉ. आशिष मोहिते, प्रा. भरत यादव इत्यादी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.