Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

क्रीडा

वाडाच्या नियमांना क्रिकेटपटूंचा विरोध का?
सुशीलकुमारचा सवाल
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट / पीटीआय
क्रिकेटपटूंनी कुठल्याही अटी न ठेवता बिनशर्त वाडाचे नियम स्वीकारावेत, असे ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशील कुमार याने म्हटले आहे. भारतीय क्रिकेटपटू सुरक्षा व खासगी बाबींच्या नावाखाली ‘वाडा’च्या नियमांचा उगाच बाऊ करत आहेत, असा टोलाही त्याने या वेळी लगावला. सुशीलकुमारही खुद्द वाडा च्या नियामांचे पालन करत आहे. त्यामुळे वाडामुळे कोणाच्याही खासगी आयुष्यात बाधा येत नाही, असा त्याचा दावा आहे. क्रिकेटपटूंनीही त्यांचे वैयक्तिक जीवन अबाधित राखले जाईल , याची खात्री बाळगावी, असे सुशील कुमारने सांगितले.

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठी आयसीसीची एमसीसीबरोबर बैठक
लंडन, ५ ऑगस्ट/ पीटीआय
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) एमसीसीबरोबर बैठक करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.कसोटी क्रिकेट बघण्यासाठी प्रेक्षकांची कमी होणारी संख्या आणि कसोटीमधून खेळाडू घेत असलेली निवृत्ती यामुळे या क्रिकेटच्या प्रकाराची लोकप्रियता घटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे कसोटी क्रिकेट अधिकाधिक सुदृढ बनविण्यासाठी एमसीसीच्या क्रिकेट समितीने एकदिवसीय आणि ट्वेन्टी- २० क्रिकेटसारखी अजिंक्यपद स्पर्धा खेळविण्याचा प्रस्ताव पुढे आणला असून त्यावर विचार करण्यासाठी आयसीसी त्यांच्याबरोबर बैठक करणार आहे.

क्लार्कला पोटदुखी
लंडन, ५ ऑगस्ट / वृत्तसंस्था

अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ, नॅथन हॉरित्झ आणि ब्रॅड हॅडिन यांना यंदाच्या अ‍ॅशएस मालिकेत दुखापतीला सामोरे जावे लागले होते आणि यामध्ये आता ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार मायकेल क्लार्क याचाही समावेश झालेला आहे. एजबस्टन येथील सामन्यात शतक झळकाविल्यानंतर क्लार्कच्या पोटात दुखायला लागले. त्यावर त्वरीत उपचार करण्यात आले असून त्याची परिस्थिती चिंताजनक नाही, असे संघव्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे. पहिल्या कसोटी दरम्यान अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापत झाली होती. त्याुमळे दुसऱ्या सामन्यातील त्याच्या संघप्रवेशाबद्दल साशंकता होती. पण दुसरा सामना तो खेळला आणि इंग्लंडला तब्बल ७५ वर्षांने लॉर्डसवर विजय मिळवून दिला. तिसऱ्या सामन्यादरम्यान फ्लिन्टॉफ फिट वाटला नाही आणि चौथ्या सामन्यातील संघप्रवेशाबद्दल आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

.. तो चेंडू अफलातूनच होता- स्वान
लंडन, ५ ऑगस्ट/ पीटीआय

अ‍ॅशेस मालिकेतील एजबॅस्टन येथील तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा फिरकीपटू गॅ्रमी स्वानने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंगला टाकलेला एक चेंडू अपेक्षेपेक्षा जास्तच वळला. तो चेंडू ऑफ स्टंपच्या जास्तच बाहेर असल्याने पॉन्टिंगने चेंडू सोडायचे ठरविले, पण भिंगरी सारख्या त्या चेंडूने पॉन्टिंगची यष्टी उद्ध्वस्त केली. यानंतर स्वानला एवढा आनंद झाला की त्याने संपूर्ण मैदानच डोक्यावर घेतले.

इंग्लंड संघात हार्मिसनला पाचारण
फ्लिन्टॉफचा निर्णय नाणेफेकीआधी
लंडन, ५ ऑगस्ट / वृत्तसंस्था
रॅन साईडबॉटम आणि स्टिव्हन हार्मिसन यांचा यजमान इंग्लंडने अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील ऑस्ट्रेलियाविरुद्ध हेडिंग्ले येथे येत्या शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी संघात समावेश करून गोलंदाजीची बाजू भक्कम केली आहे. या मालिकेत इंग्लंडचा संघ १-० ने आघाडीवर असून उर्वरित दोन कसोटी सामन्यांसाठी एकही कसोटी न खेळलेला वार्विकशायरचा फलंदाज जोनाथन ट्रॉटलाही संघात स्थान दिले आहे.

फिट राहण्यासाठी फ्लिन्टॉफ घेतोय इंजेक्शन
लीड्स, ५ ऑगस्ट / पीटीआय

अ‍ॅशेस मालिकेतील शेवटच्या दोन कसोटीत खेळण्यास ‘फिट’ राहावे म्हणून इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अ‍ॅन्ड्रय़ू फ्लिन्टॉफ याची केविलवाणी धडपड सुरू आहे. त्यासाठीच त्याने गेल्या १८ दिवसांत सहा इंजेक्शन्स घेतली आहेत. इंग्लंडला अ‍ॅशेस मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगलेला फ्लिन्टॉफ गुडघ्याच्या दुखापतीमुळे या मालिकेनंतर निवृत्त होणार आहे.फ्लिन्टॉफच्या उजव्या गुडघ्यास प्रचंड वेदना होत असूनही आपण शुक्रवारपासून हेडिंग्ले येथे सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीसाठी फिट ठरू, अशी वेडी आशा त्याला आहे. फ्लिन्टॉफच्याच दिमाखदार कामगिरीच्या बळावर अ‍ॅशेस मालिकेत १-० अशी आघाडी घेणाऱ्या इंग्लंड संघाला त्यामुळे चिंतेने ग्रासले आहे. लॉर्ड्स कसोटीत विजयी कामगिरी करून सामनावीर पुरस्कार मिळविणाऱ्या फ्लिन्टॉफला सामन्यादरम्यान, पाच इंजेक्शन्स घ्यावी लागली होती आणि काल त्याने सहावे इंजेक्शन घेतले. दरम्यान, इंग्लंड संघाचे प्रशिक्षक फ्लॉवर यांनी फ्लिन्टॉफ हा एजबॅस्टन येथील अनिर्णीत कसोटीत पूर्णपणे फिट नव्हता, अशी कबुली दिली आहे.

क्रिकेटपटूंची इतरांशी तुलना नको ! - युवराज
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट / पीटीआय
एकीकडे उत्तेजक सेवन विरोधी संघटनेच्या अटींचे पालन करण्याचा सल्ला विविध स्तरातून भारतीय क्रिकेटपटूंना दिला जात असताना भारतीय संघाचा डावखुरा शैलीदार फलंदाज युवराजने मात्र क्रिकेटपटूंची इतर खेळाडूंशी तुलना करू नये. भरगच्च कार्यक्रमातून त्यांना जो थोडासा मोकळा वेळ मिळतो, त्यात खासगी आयुष्य जगण्याचा त्यांना अधिकार आहे.युवराजने म्हटले आहे की, आम्ही खूप प्रवास करतो. संपूर्ण वर्षभर आम्हाला क्रिकेट खेळावे लागते. त्यामुळे इतर खेळांच्या तुलनेत आम्हाला जादा मोकळा वेळ मिळायला हवा. जवळपास नऊ महिने खेळल्यानंतर आम्ही घरी येतो. केवळ १० दिवसांसाठी आम्ही घरी असतो. या स्थितीत कुणीही आमच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावू नये अशी आमची इच्छा असते. आम्ही आमची बाजू बीसीसीआयपुढे मांडली आहे आणि आता ते आयसीसीशी यासंदर्भात चर्चा करतील.युवराजने असेही सांगितले की, इतर खेळातील खेळाडूंना मोठय़ा प्रमाणावर परदेश दौरे करावे लागत नाहीत. क्रिकेट आणि इतर खेळांत हा फरक आहे. आम्ही खूप खेळतो, त्यामुळे कुटुंबियांसह राहण्याची फार कमी संधी आम्हाला मिळते. इतर खेळाडूंना त्यांची मते असतील आणि आम्हाला आमची मते आहेत.

‘वाडा’च्या कलमांविषयी आयसीसी करणार टेलिकॉन्फरन्सद्वारे चर्चा
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट / पीटीआय
‘वाडा’च्या वादग्रस्त कलमाबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारिणीकडून भारतीय क्रिकेट बोर्डाशी टेलिकॉन्फरन्सद्वारे चर्चा केली जाणार आहे. त्यातून ही कोंडी फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भारताच्या आघाडीच्या क्रिकेटपटूंना ठावठिकाण्याबाबतच्या ‘वाडा’च्या अटींबद्दल आक्षेप घेतल्यानंतर हा वाद निर्माण झाला असून भारतीय क्रिकेटपटूंनी या कलमाला स्वीकारण्यास नकार दिला आहे. येत्या ऑक्टोबरच्या प्रारंभी आयसीसीच्या कार्यकारिणीची बैठक होणार असून त्यात या प्रकरणावर चर्चा केली जाणार आहे आणि हे प्रकरण तडीस नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड क्रिकेटपटूंच्या संघटनेची भारताला साथ
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट / पीटीआय

उत्तेजक विरोधी संघटनेच्या कलमांबाबत भारतीय क्रिकेटपटूंनी जो आक्षेप घेतला आहे, त्याची दखल दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंच्या संघटनांनीही घेतली आहे, मात्र नियम सर्वांसाठी सारखेच असून कुणालाही त्यातून सवलत देता येणार नाही, असेही त्यांनी नमूद केले आहे. या संघटनांनी म्हटले आहे की, भारतीय क्रिकेटपटूंनी जे आक्षेप घेतले आहेत, ते योग्य आहेत. आयसीसीने यासंदर्भात विचार करायला हवा. मात्र दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू त्या अटींचे पालन करीत आहेत. जर बीसीसीआये या अटी अमान्य केल्या तर आयसीसी इतर देशांनाही त्या अटी मान्य करण्याची सक्ती करणार नाही. न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंच्या संघटनेनेही त्यांच्या सुरात सूर मिसळताना म्हटले आहे की, आम्हालाही या अटी पसंत नाहीत पण आम्हाला त्यांचे पालन करावेच लागते. आयसीसीने ‘वाडा’च्या अटी मान्य करण्यास सुरुवात केल्यापासून आम्हालाही त्या मान्य कराव्या लागत आहेत.

आशियाई कॅरम स्पर्धेत दीडशे खेळाडूंचा सहभाग
पुणे ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

पुणे जिल्हा कॅरम संघटनेतर्फे आशियाई कॅरम स्पर्धा येथे ११ ते १४ ऑगस्ट दरम्यान होणार असून त्यामध्ये दहा देशांचे दीडशे खेळाडू सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा शिवछत्रपती क्रीडानगरी (बालेवाडी) येथे होत आहे. संघटनेचे अध्यक्ष आमदार गिरीश बापट व स्पर्धा सचिव सुभाष थोरवे यांनी ही माहिती दिली. ही स्पर्धा पुरुष व महिला विभागात होणार असून, त्यासाठी एकेरी, दुहेरी, सांघिक तसेच मिश्रदुहेरी असे गट ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत भारत, जपान, मालदीव,मलेशिया, बांगला देश, दक्षिण कोरिया, पाकिस्तान, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती, नेपाळ या देशांचे दीडशेहून अधिक खेळाडू भाग घेत आहेत.या स्पर्धेकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाचे अठरा कॅरम बोर्ड्स ठेवण्यात येणार आहेत. स्पर्धेतील सामने जुन्या नियमावलींनुसार होणार असून सामने दररोज सकाळी ९-३० वाजता सुरु होणार आहेत. स्पर्धेकरिता ३६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. या स्पर्धेस पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेकडून आर्थिक सहकार्य मिळणार आहे. तसेच कमल ढोले पाटील, विनायक निम्हण, मोहन जोशी, रमेश बागवे, चंद्रकांत शिवरकर आदी आमदारांनी स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य देण्यास मान्यता दिली आहे. विविध गटातील सामन्यांचे उद्घाटन याच आमदारांच्या हस्ते होणार आहे. महापौर राजलक्ष्मी भोसले व अपर्णा डोके याही उपस्थित रहाणार आहेत.

ब्रिजस्टोन स्पर्धेसाठी जीव मिल्खा सिंग सज्ज
अ‍ॅक्रॉन, ५ ऑगस्ट / पीटीआय

बरगडय़ांच्या दुखण्यातून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला भारतीय गोल्फपटू जीव मिल्खा सिंग उद्यापासून सुरू होणाऱ्या पीजीए टूसज्ञ ब्रिजस्टोन गोल्फ स्पर्धेत पुनरागमनास सज्ज झाला आहे. तीन आठवडय़ांपूर्वी बरगडय़ांना दुखापत झाल्याने जीवचा सराव बंद होता. मात्र काही दिवसांनंतर बरे वाटल्याने त्याने सराव सुरू केला आहे. मात्र या दुखापतीमुळे जीवला ब्रिटिश ओपन स्पर्धेला मुकावे लागले आहे.

अर्जेटिनाचा भारतावर सफाईदार विजय
पुणे ५ ऑगस्ट/प्रतिनिधी

जागतिक कनिष्ठ व्हॉलिबॉल स्पर्धेत यजमान भारताला आज अर्जेटिनाविरुद्ध सरळ तीन सेट्समध्ये पराभव स्वीकारावा लागला. अर्जेटिनाने हा सामना २५-१४, २५-२१, २५-१७ असा जिंकला. त्या वेळी विजयी संघाकडून कॉन्टी फाकुंडो व ख्रिस्तीयन पोग्लाजीन यांनी स्मॅशिंगचा सुरेख खेळ केला. भारताकडून नवीन राजाची लढत एकाकी ठरली. काल रशियाविरुद्ध सनसनाटी विजय मिळविणाऱ्या भारताकडून आज मात्र तसा सफाईदार खेळ झाला नाही.अव्वल साखळी ई गटात रशिया व अर्जेटिना यांनी प्रत्येकी तीन गुणांसह आघाडी राखली आहे. भारताची आता बेल्जियमशी लढत होणार असून, बाद फेरी गाठण्यासाठी भारतास हा सामना जिंकणे अनिवार्य आहे.

भारताची बेलारुसवर ६-० ने दणदणीत मात
महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक
बोस्टन, ५ ऑगस्ट / पीटीआय

राणी देवीच्या जबरदस्त हॅटट्रिकच्या जोरावर भारताने येथे सुरु असलेल्या महिलांच्या कनिष्ठ जागतिक हॉकी विश्वचषक स्पर्धेत बेलारुसवर ६-० ने शानदार विजय साजरा केला. या विजयाबरोबरच भारताने दुसरी फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाला ‘ड’ गटात मागे टाकत भारताने अव्वल स्थान पटकावले आहे. या गटात ऑस्ट्रेलियानंतर अमेरिकेचा क्रमांक आहे. उद्या होणाऱ्या सामन्यात आता भारत व अमेरिका आमने सामने उभे राहतील. एकतर्फी झालेल्या आजच्या सामन्यात रोसेलिन हिने १६ व्या मिनिटाला गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पूनम रानी, रितू रानी यांनी अनुक्रमे ३८ व ५१ व्या मिनिटाला गोल करत सामन्यावर पकड घट्ट केली. सरतेशेवटी रानी देवी हिने जोरदार आक्रमण करत अनुक्रमे ५३, ५४ व ५८ व्या मिनिटाला गोल करत हॅटट्रिक साधली. भारताकडून हॅटट्रिक नोंदवणारी ती पाचवी महिला खेळाडू बनली आहे. बेलारुसच्या संघ प्रतिस्पध्र्याची बल्याढय़ सुरक्षा फळी भेदण्यात सपशेल अपयशी ठरला.