Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

सॅटिसची फीत कापायची कुणी?
उद्घाटनावरून कलगीतुरा
दिलीप शिंदे
बहुचर्चित सॅटिस प्रकल्पाच्या उद्घाटनावरून ठाण्यात नव्या राजकीय दहीहंडीला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी हे उद्घाटन मुख्यमंत्री अशोक चव्हाण की शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यापैकी कोणाच्या हस्ते करावे, यावर सत्ताधारी शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये कलगीतुरा रंगला आहे.

स्वाइन फ्ल्यूसाठी ठाण्यात विशेष कक्ष
ठाणे/प्रतिनिधी

स्वाईन फ्ल्यू आजारासंबंधी लागणारा पुरेसा औषधसाठा व उपकरणांसह सर्व आरोग्यसेवा सज्ज ठेवण्यात आली असून, जिल्हा रुग्णालयात सहा खाटांचा कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांनी दिली. दरम्यान, महिन्यापूर्वी वसंत विहारमध्ये राहणारी महिला आणि नवी मुंबईतील एका व्यक्तीला स्वाईन फ्ल्यू झाला होता. त्यांना विमानतळावरूनच मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

एन. ए.चे अधिकार पालिका आयुक्तांना द्या
आ. केळकर यांची मागणी

ठाणे/प्रतिनिधी : नागरीकरणाचा वाढता वेग लक्षात घेता महापालिका क्षेत्रातील शेतजमिनीवरील बांधकामासाठी आवश्यक असलेला अकृषिक (एन. ए.) दाखला देण्याचे अधिकार महसूल विभागाऐवजी पालिका आयुक्तांना देण्याबाबत सरकारच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावाला एक वर्षांचा काळ उलटूनही त्यावर अद्याप अंतिम निर्णय होत नसल्याने संबंधितात नाराजी व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री, विठ्ठल कामत आणि ईशा देओल देणार फिटनेसचा मंत्र!
ठाणे/प्रतिनिधी - निरोगी राहण्यासाठी काय केले पाहिजे, कोणता आहार घ्यावा, सध्याच्या धावपळीच्या युगात तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम किती महत्त्वाचा असतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हवी असतील तर शनिवार, ८ ऑगस्ट रोजी थोडा वेळ काढायला हवा. राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कामत हॉटेल ग्रुपचे विठ्ठल कामत आणि अभिनेत्री ईशा देओल यांच्याशी आरोग्य, व्यायाम या विषयावर थेट गप्पा मारण्याचा कार्यक्रम हॉटेल सत्कार रेसिडेन्सी येथे शनिवारी सायंकाळी सहानंतर आयोजित करण्यात आला आहे.

‘पु.भा. भाव्यांची कथा वैशिष्टय़पूर्ण’
ठाणे/प्रतिनिधी - पु.भा. भावे, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले आणि व्यंकटेश माडगूळकर यांना मराठीतील नवकथेचे शिल्पकार मानण्यात येते, परंतु अन्य तिघांपेक्षा भावे अगदी वेगळे होते. कारण १९४० ते १९८० या काळातील कथा वाङ्मयावर आपला ठसा उमटविणारे भावे नुसतेच कथाकार नव्हते, तर पत्रकार, कादंबरीकार आणि नाटककारही होते. हिंदुत्वनिष्ठ असलेल्या भाव्यांचे व्यक्तिमत्त्व बहुरंगी आणि बहुढंगी होते.

ठाण्यात उद्या पाणी नाही
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे महानगरपालिकेच्या नवीन अतिरिक्त ११० दशलक्ष लिटर पाणी योजनेच्या जोडणीसाठी पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून ते शनिवार सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. महापालिकेच्या अतिरिक्त ११० एमएलडी पाणीपुरवठा योजनेच्या माणकोली येथील मुख्य जलसंतुलन टाकीची जलजोडणी व टेमघर जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारातील नवीन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक कामे करण्यासाठी हे शटडाऊन घेण्यात आले असून, या शटडाऊनमुळे पाचपाखाडी, ऋतुपार्क, साकेत, महागिरी, वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, नौपाडा, उथळसर, समतानगर, गांधीनगर, घोडबंदर रोड, पातलीपाडा, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, मुंब्रा आदी भागांतील पाणीपुरवठा शुक्रवारी सकाळी १० वाजल्यापासून ते शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंत म्हणजेच २४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.दरम्यान, या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

डेन्मार्कच्या फूटबॉल स्पर्धेत डोंबिवलीच्या विद्यार्थ्यांचे यश
डोंबिवली/प्रतिनिधी

डेन्मार्क येथे झालेल्या घाना फूटबॉल चषक स्पर्धेत महाराष्ट्र संघाने रौप्यपदक पटकावले आहे. यामध्ये चार खेळाडू हे डोंबिवलीतील आहेत. चिन्मय शिंदे, प्रणव नाईक, कुणाल जनकर, प्रीतेश पाटील असे हे डोंबिवलीतील चार खेळाडू आहेत. हे खेळाडू विद्यानिकेतन आणि चंद्रकांत पाटकर विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना न्याय ट्रस्टचे प्रशिक्षक किशोर अमरे यांनी मार्गदर्शन केले.फूटबॉलची प्रॅक्टिस करताना आता डोंबिवलीत मैदाने राहिली नाहीत. भागशाळा मैदान, सावळाराम क्रीडा संकुल येथे फूटबॉल खेळताना मर्यादा येत आहेत. त्यामुळे फूटबॉलसाठी स्वतंत्र मैदानाची आवश्यकता असल्याचे मत येथील फूटबॉलपटू, प्रशिक्षकांकडून व्यक्त केले जात आहे.

आरपीआय जिल्ह्यातील सर्व जागा लढविणार
शहापूर/वार्ताहर
आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे पानिपत करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला धडा शिकविण्यासाठी जिल्ह्यातील २४ जागा स्वबळावर लढविण्याचा निर्णय आरपीआयच्या आठवले गटाने घेतला आहे.ग्रामीण व शहरी विभागाचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव यांची महत्त्वाची बैठक महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य अण्णासाहेब रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली शांग्रिला हॉटेलमध्ये पार पडली. तेव्हा जिल्ह्यातील २४ जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व सचिवांची मते जाणून घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने देऊ केलेली राज्यसभेची जागा नाकारल्यामुळे आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.यावेळी आरपीआयचे सचिव शाम गायकवाड, आमदार सुमंतराव गायकवाड, आमदार पप्पू कलानी, काका खंबाळकर, सिद्राम ओहोळ, श्रीकांत भालेराव, बबन गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष भगवान गायकवाड आदी उपस्थित होते.

फार्महाऊसमधून २५ हजारांचा ऐवज लंपास
शहापूर/वार्ताहर
शहापूरजवळील अर्जुनली येथील कॅप्टन पार्थो दास यांच्या फार्महाऊसवर अज्ञात चोरटय़ांनी घुसून तेथील कर्मचाऱ्यांना कोयत्याचा धाक दाखवून घरफोडी केली व त्यांच्याकडील २५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.फार्महाऊसच्या खिडकीमधून चार चोरांनी प्रवेश केला. तत्पूर्वी त्यांनी तेथील एका बंगल्याची तोडफोड केली. प्रवेश करताच त्यांनी आतमध्ये झोपलेले कर्मचारी रवि ओझा व रामनरेश यादव यांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली व तेथेच दोराने बांधले. त्यांच्याजवळील एक सोनसाखळी, मोबाइल, डीव्हीडी प्लेअर, पंखा व रोख १० हजार रुपये घेऊन पोबारा केला. या चोरांनी तोंडावर फडके बांधल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही.