Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

महापौरांच्या राजीनाम्याची मागणी
पतसंस्था थकबाकीदार प्रकरण
वार्ताहर / जळगाव

 

महापौर रमेश जैन व त्यांचे कुटूंबिय हे पतसंस्थांच्या टॉप शंभर ठेवीदारातील थकबाकीदार असल्याचे उघड झाल्याने त्यांना आर्थिक गुन्हेगार संबोधून राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महानगर विकास आघाडीतर्फे महापालिकेसमोर जोरदार आंदोलन छेडण्यात येऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
महापौरपद हा एक मानबिंदू असून हे पद शहराच्या सन्मानाचे प्रतिक आहे. शहराचा महापौर हा आर्थिक गुन्हेगार असू नये अशी आमची पूर्वीपासूनची भूमिका आहे. तथापि, महापौर रमेश जैन व त्यांचे कुटुंबीय हे पतसंस्थांच्या टॉप शंभर थकबाकीदारांपैकी एक असल्याचे उघडकीस आल्याने त्यांच्यात नैतिकता असेल तर स्वत:हून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी तसेच महानगर विकास आघाडीने पत्रकात म्हटले आहे.
महापालिका भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेस व महानगर विकास आघाडीच्या समर्थक कार्यकर्त्यांनी महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करीत परिसर दणाणून सोडला. जैन यांच्या विरोधातील जोरदार घोषणाबाजीमुळे नागिरकांनीही प्रचंड गर्दी केली होती. पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला होता.
जळगाव शहर व जिल्ह्य़ातील हजारो ठेवीदार पैशांअभावी हवालदिल असून हलाखीचे जीवन जगत आहेत. वृद्ध ठेवीदारांकडे त्यांच्या औषधोपचारासाठी देखील पैसा नाही. त्यामुळे अनेक ठेवीदारांचा मृत्यू झालाच्या घटना घडल्या आहेत.
दुसरीकडे राजकीय छत्राखाली सन्मानाची पदे भोगणारी मंडळी ठेवीदारांच्या पैशांवरच मौज करीत आहेत. महापौर जैन आपल्या भाषणातून अनेकदा नैतिकेचे धडे शिकवतात. अशावेळी त्यांची नैतिकता कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित करून नैतिकता असल्यास त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अशी मागणी पत्रकात करण्यात आली आहे. सहकार विभाग व पोलिसांनी संस्थांच्या थकबाकीदारांची नावे चौका-चौकात लावावी असेही पत्रकात म्हटले आहे.
गेल्या आठवडय़ात महानगर विकास आघाडीतर्फे नगरसेवकांना स्थायी सभागृहात बसण्यास मज्जाव केल्याच्या निषेधार्थ पालिकेवर मोर्चा नेऊन महापौर रमेश जैन यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती.