Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नागापूरमध्ये साकारणार भव्य नागेश्वर पार्क
मनमाड / वार्ताहर

 

पोहण्याचा तलाव, मुलांसाठी वॉटर पार्क, मीनी ट्रेन, बोटींग, हेल्थ क्लब, ध्यानधारणा केंद्र अशी सर्व प्रकारची अत्याधुनिक सुविधा असलेले सुमारे अडीच कोटी रूपये खर्चाचे भव्य नागेश्वर पार्क येथून जवळच असलेल्या नागापूर येथील श्री नागेश्वर मंदिराच्या प्रांगणासमोर साकारण्यात येणार आहे. या नागेश्वर पार्कचे भूमीपूजन अभूतपूर्व उत्साहात आणि संपूर्ण धार्मिक वातावरणात महाराष्ट्रातील नामवंत संत महात्म्यांच्या उपस्थितीत झाले.
मालेगाव, चांदवड, येवल्यासह नांदगाव तालुक्याला श्री नागेश्वर पार्क हे भूषणावह ठरणार आहे. पार्कचे भूमीपूजन पांडुरंगशास्त्री सौताडेकर, नागापूर येथील महंत १०८ हरी नारायणपुरी महाराज, इतिहासतज्ज्ञ प्रा. नितीन बानगुडे पाटील आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमाला खान्देशरत्न तुकाराम महाराज जेऊरकर, वारकरी संप्रदायाचे जिल्हा संपर्कप्रमुख श्रावण महाराज उकाणेकर, महंत माधवगिरी महाराज, वल्लभानंद महाराज, तुकाराम महाराज हिसवळकर आदी यावेळी उपस्थित होते. शिवसेनेचे आ. संजय पवार यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार केला.
प्रा.बानगुडे यांनी आपल्या व्याख्यानात शिवचरित्राचा आढावा घेतला. शिवरायांच्या कारकिर्दीला आज ३०० वर्ष झाली तरी त्याच्या कर्तृत्वाची जादू आजही कायम आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव चिरंतन राहील. हाताशी कोणतीही साधन सामग्री नसताना केवळ आपल्या सवंगडय़ांच्या बळावर त्यांनी हिंदवी राज्य उभे केले. शिवराज्य केले ते रयतेसाठी होते. जलसंधारण, पाणी अडवा-पाणी जिरवा या आज असलेल्या योजना या शिवकालीन योजना आहेत. शिवरायांनी त्या योजना सुरू केल्या. कर्तृत्वाचे नाव म्हणजे शिवाजी महाराज. त्यांनी स्वत:चा उदो उदो न करता लोककल्याणकारी राज्य केले. याच लोककल्याणकारी राज्याची संकल्पना आज प्रत्यक्षात उतरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेचे आ. संजय पवार आणि जि. प. सदस्य राजेंद्र पवार यांच्या पुढाकाराने व नागापूर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने हे पार्क आकार घेणार आहे.