Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

खान्देश विकासाच्या लढय़ाची तयारी - आ. रोहिदास पाटील
धुळे / वार्ताहर

 

गेल्या २५ वर्षांपासून खान्देशच्या अनुशेषासाठी लढत असून आता हा लढा संपूर्ण खान्देशात सर्वव्यापी करण्याची वेळ येऊन ठेपल्याने आपण आता खान्देश विकासाच्या लढय़ाची तयारी सुरू केली आहे, असे प्रतिपादन प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आ. रोहिदास पाटील यांनी तालुक्यातील आर्वी येथे झालेल्या जाहीर सभेत केले.
आर्वी परिसरात आ. पाटील यांच्या विशेष निधीतून सुमारे तीन कोटी रुपयांच्या कामांचे उद्घाटन व भूमीपूजन करण्यात आले. त्यानिमित्ताने आर्वी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. अनेक वर्षांपासून आपण खान्देशच्या अनुशेषाचा लढा लढत असून आज त्याचे यश दृष्टीपथास पडत आहे. शासनाने विभागीय बैठकीत सुमारे साडेसहा हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आणि खान्देशातील महत्वाच्या प्रश्नावर स्वत:च्या सरकारबरोबर लढण्याची तयारी असते. सुलवाडे जामफळ उपसासिंचन योजना आणि थर्मल पॉवर स्टेशन, झोडगे एमआयडीसी होण्याची मागणी आपण लावून धरली आणि आज त्याच योजनेकरीता शासनाने १५० कोटी रुपये मंजूर केले. खान्देशातील जनतेला खान्देश विकासाच्या या लढय़ात समाविष्ट करून घेण्यासाठी आपण आता खान्देश विकासाच्या लढय़ाची तयारी सुरू केली आहे, असेही ते म्हणाले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर गर्दे, भगवान गर्दे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी पाटील यांच्या हस्ते आर्वी परिसरातील पुरमेपाडा, बेंद्रेपाडा, बल्हाणे, सडगाव, धाडरा, अनकवाडी येथील रस्ता डांबरीकरण, खडीकरण, गावापर्यंत काँक्रिटीकरण, साठवण बंधारे, अशा विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. या कामांकरिता पाटील यांच्या विशेष निधीतून व स्थानिक विकास निधीतून सुमारे तीन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.