Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

शिवसैनिकांच्या देखरेखीखाली खत विक्री
वणी / वार्ताहर

 

दिंडोरी तालुक्यात खतांची कृत्रिम टंचाई, साठेबाजी व काळाबाजार असे प्रकार कृषी विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीमुळे सुरू असतानाच शिवसैनिकांनी सुमारे १३०० गोण्या खत असलेले दोन ट्रक पकडून दुकानदारांना त्यांचे वाटप योग्य किंमतीने करावयास भाग पाडले.
वणी-दिंडोरी रस्त्यावरील ओझरखेड धरणाच्या सांडव्यालगत दोन ट्रक संशयास्पद स्थितीत उभे असल्याचे शिवसेनेचे पदाधिकारी उत्तम जाधव व गणेश देशमुख यांच्या दृष्टीस पडताच त्यांनी ट्रक चालकाकडे ट्रकमध्ये काय आहे, याबद्दल चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी गाडीची ताडपत्री उघडून आत पाहिले असता खतांच्या गोण्या आढळून आल्या. आतील माल कोणाचा आहे, अशी विचारणा केल्यावर कळवण आणि सुरगाणा येथील हा माल असल्याचे चालकाने सांगितले. चालकाकडे शिवसैनिकांनी बिल मागितले असता तो दाखवू शकला नाही. अधिक चौकशी अंती तो माल वणी येथील बोरा कृषी सेवा केंद्र व जगदंबा कृषी सेवा केंद्राचा असल्याचे सांगितले.
दरम्यान, या घटनेची खबर शेतकऱ्यांना लागल्याने त्यांनी तेथे गर्दी केली. शिवसैनिकांनी वणी पोलिसांना याची माहिती दिली. अखेर चालकाने वणी येथील मालकाशी संपर्क साधला असता त्याने गाडी वणी येथे घेवून या, आम्ही खताच्या गोण्या तातडीने विक्री करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही ट्रक वणी येथे संबंधित मालकांच्या सुपूर्द करण्यात आल्यानंतर शिवसैनिकांच्या देखरेखीखाली त्यांची बाजार भावाप्रमाणे विक्री करण्यात आली. विशेष म्हणजे सकाळी वणी-पिंपळगाव रोडवरील चौफुलीवर विविध मागण्यांबाबत रास्ता रोको करण्यात आला होता. त्यात खतांच्या काळ्या बाजाराबाबतचे निवेदन देण्यात आले होते. शेतकरी वर्गाने शिवसैनिकांच्या निर्णयाचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले. वणीत रासायनिक खतांचा होणारा काळाबाजार रोखण्याबाबत वरिष्ठ पातळीवर उपाययोजना राबवाव्यात असे शेतकऱ्यांनी सांगितले.