Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांवर स्वपक्षीय नाराज
जळगाव / वार्ताहर

 

येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी स्वार्थापोटी सत्ताधारी गटाशी जुळवून घेतल्याची शहरात चर्चा असून राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. महापालिकेच्या सभेत अनेक ज्येष्ठ नगरसेवक फक्त बसून असतात. त्यावरून हेच स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे १४ नगरसेवक आहेत. गणेश सोनवणे व इब्राहिम पटेल यांचा अपवाद वगळता बहुतेक ज्येष्ठ महासभेत फक्त बसण्यासाठीच येतात काय, हा प्रश्न शहरात चर्चेत आला आहे. महापालिकेत सत्ताधारी व विरोधकात काही विषयांवरून बऱ्याचदा संघर्षांची स्थिती निर्माण झाली असताना १४ मधील दोन-चार नगरसेवक वगळता ज्येष्ठ समजले जाणारे राष्ट्रवादीचे काही नगरसेवक ढिम्म बसलेले असतात. यावरून शहरात त्या नगरसेवकांबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले आहेत. महापालिकेत व तत्कालिन पालिकेत अनेक वर्षांपासून माजी आ. सुरेश जैन यांच्याच गटाची सत्ता आहे. जैन यांनी जळगाव पालिकेच्या राजकारणात १९८५ पासून प्रवेश केला तेव्हापासूनच सध्याच्या काही नगरसेवकांचाही पालिकेत प्रवेश झाला. अनेक वर्षे सोबत राहिल्यावर त्यातील काहींनी एकनाथ खडसेंचे नेतृत्व स्वीकारत भाजपची वाट धरली. तेथे बिनसल्यावर त्यांनी पुन्हा जैन यांच्या सोबत जाणे मान्य केले.
गेल्या वर्षी महापालिका निवडणुकीपूर्वी काहींनी त्यांची साथ सोडली व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यातील काही निवडून आले तर काही पराभूत झाले. त्यांना पराभूत करण्यासाठीही जैन गटाने बरेच प्रयत्न केले. राष्ट्रवादीच्या १४ नगरसेवकांपैकी अनेकांनी जैन यांच्याच नेतृत्वात धडे घेतले आहेत. आता विरोधात असूनही स्वत:च्या फायद्यासाठी त्यांनी जैन गटाशी जुळवून घेतल्याचे काही पदाधिकाऱ्यांचेच म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे महापौरांच्या राजीनामा मागण्यांसाठी झालेल्या आंदोलनात त्या नगरसेवकांची गैरहजेरी तेच सिद्ध करते, असे एक पदाधिकारी म्हणाला.