Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

व्यक्तिवेध

आशियाचा ‘नोबेल पुरस्कार’ मानले जाणारे रेमन मॅगसेसे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आणि गेली ३०-३२ वर्षे ग्रामविकासाच्या क्षेत्रात झपाटल्यागत कार्य करणाऱ्या दीप जोशी यांच्या रूपाने आणखी एका भारतीयाने त्यावर आपली नाममुद्रा उमटवली. तमाम भारतीयांना अभिमान वाटावा अशीच ही बाब. दीप जोशी मूळचे उत्तरांचलातल्या पिथौरागढ जिल्ह्यामधल्या एका सुदूर खेडेगावातले. जोशींचं बालपण ज्या काळात त्या खेडेगावात गेलं, त्या काळात त्या गावात रस्ताही नव्हता आणि आज स्वातंत्र्याला ६० वर्षे उलटून गेली असतानाही तो झालेला नाही. शिक्षणाच्या निमित्ताने गावाबाहेर पडलेल्या दीप जोशींना बहुतांश ग्रामीण भागाची ही ‘खस्ता हालत’ दिसत

 

होती. आतल्या आत होणारी घालमेल त्यांना स्वस्थही बसू देत नव्हती. ग्रामीण भागासाठी काही केलं पाहिजे हा विचार मनात सारखा उसळी मारत होता. शेतीच्या प्रगत सुधारणांची माहिती देऊन तशी शेती करावयास शिकवणारा आपल्या गावात आलेला तरुण जपानी पदवीधर त्यांना दिसत होता. भाषा माहीत नाही, बोलता-लिहिता येत नाही, बोलणे समजत नाही, असे असतानाही तो तरुण मोडक्यातोडक्या इंग्रजीचा आधार घेत जपानी लागवड पद्धती कशी समजावून देत होता आणि ज्या कामासाठी आपण इतक्या लांब, इतक्या ग्रामीण वातावरणात आलो आहोत ते काम तडीस नेत असताना मिळणारा मनस्वी आनंद अनुभवत होता, हे जोशी दुरून पहात होते आणि त्याच वेळेस हा आनंद आपणही घेऊ शकतो, शिक्षण पूर्ण झालं की आपणही अशाच कामाला वाहून घेतलं पाहिजे असा विचारही करीत होते. मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी चालून आली. भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळवून जोशी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये डॉक्टरेटसाठी दाखल झाले. तिथल्याच स्लोन्स स्कूलमधून त्यांनी व्यवस्थापनशास्त्रातली पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जोशींनी सिस्टिम्स रिसर्च इन्स्टिटय़ूट आणि फोर्ड फाऊंडेशनमध्ये काही काळ नोकरीही केली. पण मनात खोलवर दडलेली इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती. जोशी भारतात परतले. ग्रामीण विकासाची जी स्वप्नं मनात होती, ती हाती घेण्याची तयारी त्यांनी सुरू केली. झारखंड, बंगाल, ओरिसा, छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये त्यांच्या ‘प्रदान’चं काम मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे आणि समाजात अपेक्षित बदलही घडवत आहे. थेट कृषी उद्योगात किंवा कृषिपूरक उद्योगात विविध उपक्रम हाती घेणारे, एका अर्थाने दारिद्रय़निर्मूलनासारख्या महत्त्वाच्या मुद्दय़ालाच दिशा देणारे महिलांचे पाच हजाराहून अधिक बचतगट याद्वारे हे बदल घडविणं सुरू आहे. जोशी यांनी ‘प्रदान’च्या माध्यमातून स्वत: तर अनेक गोष्टी साध्य केलेल्या आहेतच, पण नव्याने या क्षेत्रात उतरणाऱ्या एनजीओजना सर्व प्रकारचं व्यावसायिक मार्गदर्शन करण्याचं महत्वाचं कामही ‘प्रदान’तर्फे सुरू आहे. जोशींना या कामाची कल्पना सुचली ती जामखेडच्या डॉ. अरोळे पतीपत्नीचं काम पाहताना. अरोळेंनाही पुढे मॅगसेसे पुरस्कार मिळाला; तरी त्यांच्या कामातल्या व्यावसायिकतेच्या उणीवा जोशींनी हेरल्या, गुणवान तरुण नोकरी-उद्योगाकडे वळतात ते पैशासाठी. पण त्यांनाही सामाजिक कामाची आवड असेल आणि या कामाद्वारेही त्यांची आर्थिक गरज पुरी केली जाण्याची शक्यता असेल, तर गुणवंतांची ही कार्यशक्तीदेखील अशा कामांकडे वळवता येऊ शकते हे जोशींनी जाणलं आणि त्या दिशेनं एनजीओजची मानसिकता व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले. टाटा, इन्फोसिस, गोदरेज, अझीम प्रेमजी फाऊंडेशनसारखे कॉर्पोरेट ग्रुप व्यावसायिक नीतिमत्ता जपतात, म्हणूनच त्यांनी सामाजिक बांधीलकीच्या भावनेने उदारहस्ते देऊ केलेलं धन घेण्यात एनजीओजना संकोच वाटता कामा नये, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. तो इतरांनीही जपला पाहिजे असा त्यांचा आग्रह आहे. ३०-३२ वर्षांची ‘प्रदान’ची, म्हणजेच जोशींच्या कामाची वाटचाल, तिला आलेलं यश, समाजाने घेतलेली तिची दखल म्हणजेच मॅगसेसे पुरस्काराने त्यावर उमटवलेली मोहोर.