Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पावसाअभावी पिके हातची जाण्याची भीती
लष्करी अळीच्या प्रकोपाची शक्यता
चंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

येत्या दहा ऑगस्टपर्यंत पाऊस आला नाही तर एक लाख हेक्टरमधील खरिपाची पिके हातची जाण्याची भीती कृषी खात्यातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही लष्करी

 

अळीचा प्रकोप सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.
पावसाळा सुरू झाल्यानंतर जिल्हय़ात एकदाही मुसळधार पावसाने हजेरी लावली नाही. आजवर जो काही पाऊस पडला तो तुरळक स्वरूपाचा होता. पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यंदा भाताचे लागवड क्षेत्र एक लाख ४५ हजार हेक्टर आहे. यातील फक्त ७१ हजार हेक्टरमध्येच आतापर्यंत रोवणी होऊ शकली. उर्वरित ७६ हजार हेक्टरमध्ये अद्याप रोवणी झालेली नाही. या क्षेत्रात रोवणीसाठी शेतकऱ्यांनी १३ हजार ८८९ हेक्टर क्षेत्रात धानाचे पऱ्हे लावले होते. पाऊस नसल्यामुळे यातील १३०० हेक्टरमधील पऱ्हे करपून गेले आहेत, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
७१ हजार हेक्टरमध्ये धानाची रोवणी झाली त्यातील साडेचार हजार हेक्टरमधील पीक आता हातून गेले असून येत्या पाच दिवसात पाऊस न पडल्यास उर्वरित क्षेत्रातील धान पीक खराब होण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्हय़ात आवत्या भाताचे क्षेत्र २० हजार ४२७ हेक्टर आहे. पाण्याअभावी हे पीक वाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या भागात पिकांसाठी सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी बावीस दिवसानंतर एकदा पाणी मिळाले तरी पिके वाचू शकतात. मात्र पाऊस दहा ते बारा दिवसानंतर हवा. जिल्हय़ात गेल्या २७ जुलैपासून पावसाने दडी मारल्याने व येत्या दहा दिवसात तो येण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्याने प्रशासनाची काळजी वाढली आहे तर बळीराजा चिंतातूर दिसू लागला आहे.
पावसाअभावी सोयाबीनची अवस्था अशीच वाईट आहे. सोयाबीनसाठी कृषी खात्याने यंदा एक लाख तीस हजार हेक्टर क्षेत्रासाठी नियोजन केले असले तरी सोयाबीनचा पेरा पाऊणेदोन लाख हेक्टपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. सुरुवातीला पाऊस आल्याबरोबर शेतकऱ्यांनी तातडीने सोयाबीनची पेरणी केली. आता पीक पावसाअभावी वाळत चालले आहे. येत्या पाच दिवसात पाऊस आला नाही तर अठरा ते वीस हजार हेक्टरमधील पीक वाया जाऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय उन्हामुळे या पिकावर यंदाही लष्करी, उंटअळी तसेच चक्रीभुंगाचा प्रकोप आता जाणवू लागला आहे. गेल्या वर्षी या अळीच्या प्रकोपामुळे एक लाख हेक्टरमधील सोयाबीन वाया गेले होते. त्यामुळे यंदा सोयाबीन लावू नये, असे आवाहन कृषी खात्याने केले होते. कारण हंगाम संपला की लष्करी अळी सुप्तावस्थेत जाते. हा धोका ठाऊक असूनही शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनचा पेरा केला. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सुप्तावस्थेत असलेली ही अळी आता सक्रिय झाली असून तिने अंडे देण्याची प्रक्रिया सुरू केल्याने पाऊस झाला नाही तर तिचा प्रकोप मोठा असेल अशी भीती आहे.
कापूस व कडधान्याची इतर पिकेही धोक्यात आली आहेत. आठवडाभरात पाऊस झाला नाही तर दहा हजार हेक्टरमधील पीक हातून जाईल. पावसाअभावी पिके हातून जाण्याची शक्यता लक्षात येताच कृषी खात्याने आता दुबार पेरणीचे नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता इतर पिकांची तयारी करावी, असे आवाहन कृषी अधिक्षक अशोक कुरील यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले.
अळीचा प्रकोप थांबवण्यासाठी ४४ हजार लिटर कीटकनाशक औषधांची मागणी नोंदवण्यात आली आहे. जिल्हय़ातील भद्रावती, राजुरा, जिवती, कोरपना, वरोरा व चिमूर तालुक्यांमध्ये ५० टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर चंद्रपूर, बल्लारपूर व गोंडपिपरी या तीन तालुक्यात ५५ टक्के पाऊस झाला आहे. नागभीड, सिंदेवाही व ब्रह्मपुरी तालुक्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला असला तरी आता पिके धोक्यात आली आहेत. सावली, पोंभूर्णा तालुक्यात ६० टक्क्यापेक्षा जास्त पाऊस असला तरी सर्वाधिक धान क्षेत्र असलेल्या तळोधी परिसरात कमी पाऊस असल्याने पिके धोक्यात आली आहेत.
पावसाअभावी धानाची रोवणी खोळंबली
गोंदिया - आठवडय़ापासून पावसाने दडी मारल्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतातूर झाले आहेत. गोंदिया जिल्हा धानाचे कोठार म्हणून ओळखला जातो. लागवडीयोग्य जमिनीपैकी सुमारे १ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रफळात प्रश्नमुख्याने धानाचेच पीक घेतले जाते. अधिक उत्पादनासाठी अलीकडे शेतकरी आवत्या पद्धतीपेक्षा रोवणी पद्धतीचा वापर अधिक करतात. त्यामुळे धान पिकाखालील १ लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्रफळापैकी १० हजार ५७४ क्षेत्रफळावर आवत्या पद्धतीने तर १ लाख ८४ हजार हेक्टर क्षेत्रफळावर रोवणी पद्धतीने धानाची लागवड केली जाते. या वर्षी सुरुवातीलाच पावसाळा उशीर झाल्याने धान रोपे तयार करण्यात उशीर झाला होता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय होती अशा शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली होती. १५-२० दिवसांपूर्वी मान्सून बरसला. मात्र, रोवणी करण्यासाठी रोपे पुरेशी वाढली नव्हती. ज्या शेतकऱ्यांनी आधीच पेरणी घातली होती. त्यांचीच रोवणी सुरू झाली. रासायनिक खतांचा काळाबाजार सुरू असूनही शेतकऱ्यांनी रासायनिक खतांची खरेदी केली व धानाची रोपे लवकर वाढावे म्हणून प्रयत्न केले. आता ती रोपे वाढली आहेत तर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे एका बाजूला रोवणी कशी करावी हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली त्या रोपांना जोम धरण्यासाठी मातीत ओलावा असणे आवश्यक असताना पाऊस नसल्याने रोवणी केलेली रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत.
आर्णी परिसरातील शेतकरी हवालदिल
आर्णी - परिसरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने पिकांची स्थिती ढासळत आहे. उंट अळीमुळे सोयाबीनची वाईट अवस्था झाली असून जिल्ह्य़ात सर्वात कमी पाऊस आर्णी भागात झाल्याने डोलणारी पिके आता करपू लागली आहेत. अरुणावती धरणात केवळ ७ टक्के पाण्याचा साठा असल्याने सिंचनाचाही अभाव आहे.