Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

दूषित अन्न-पाण्यामुळे होणारे आजार
पावसाळ्यातील आजार भाग- ३

शहरी माणसांचे जीवन घडय़ाळाच्या काटय़ाप्रमाणे पळत असते. अर्थार्जनासाठी घराबाहेर पडताना शरीराचा, कपडय़ाचा नीटनीटकेपणा सांभाळणारे आहाराबद्दल किती जागरूक असतात? पोळी-भाजीचा डबा सोबत घेऊन जाण्याची संस्कृती आता बदलतच चालली आहे. ऑफिसच्या बाहेर

 

टपरीवर मिळणारे वडापाव, भेळ, बर्गर आणि सँडविचेस आता बहुसंख्य तरुण-तरुणींचे ‘लंच’ होऊ लागलेत. स्वत:च्या शरीराची, सौंदर्याची, कपडय़ांची इतकी काळजी घेणारी ही पिढी आपल्या खाण्यापिण्याबाबत इतकी उदासीन का? आपल्याला लाभलेला हा मानवी देह, उंच भराऱ्या घेणारं मन, विवेकबुद्धी व त्यापासून होणारा धनलाभ हा स्वहितासाठी कसा असावा, याचं समर्थ रामदास यथोचित वर्णन करतात,
नरदेहाचे उचित। काही करावे आत्महित
यथानुशकत्या चित्तवित्त। सर्वोत्तमी लावावे
आपल्या बेजबाबदार वागण्याने स्वत:चे नुकसान करून घेणाऱ्याला समर्थ आपल्या परखड वाणीतून सज्जड दमच भरतात, ‘घात करुनि आपुला। काय रडशील पुढिला
बहुत मोलाचे आयुष्य। विषयलोभे केला नाश.
खरं तर नित्यनेमाने पण विशेषत: पवसाळ्यात तरी आपण आपल्या जिभेच्या लोभावर नियंत्रण ठेवायलाच हवे. पावसाळ्यात उघडय़ावरील शिजवलेले अन्नपदार्थ, दुथडी भरून वाहणाऱ्या गटारांवर बांधलेल्या टपऱ्यांवर शिजवलेले चमचमीत चायनीज, भेळ-पाणीपुरी, शीतपेये याचा समाचार घेणारे महाभाग पाहिले की जिभेचे चोचले पुरविण्याच्या लोभापोटी आपण अनारोग्याला कसे निमंत्रण देत असतो ते मनोमन पटते. म्हणूनच आज आपण पावसाळ्यातील दूषित खाद्यपदार्थ व पाण्यापासून होणाऱ्या आजारांविषयी जाणून घेऊया.
पावसाळ्यात सखल भागात पाणी साचणे ही तर नित्याची बाब. पूरजन्य परिस्थितीमुळे जमिनीखालील जलवाहिन्यांमध्ये दूषित पाणी झिरपण्याची शक्यता अधिक असते. जागोजागी होणाऱ्या पाणीचोरीमुळे यात भरच पडते. असे दूषित पाणी स्वच्छ करून, गाळून अथवा उकळून न पिल्यास एकाच विभागातील इमारतीमधील अनेकांना पोटाचे विकार उद्भवू शकतात. पावसाळ्यात हवेतील आद्र्रता जास्त असल्याने अन्नपदार्थामध्ये जीवाणू वाढण्याची प्रक्रिया वेगाने होत असते. तसेच ओलसरपणामुळे माश्यांचे प्रमाणही जास्त असते. या घाणीवर घोंघावणाऱ्या माश्याच उघडय़ावरील अन्नपदार्थ दूषित करीत असतात. दूषित अन्नपाण्यामुळे जुलाब (हगवण), टायफॉईड व कावीळ असे मुख्यत्वे पोटाचे विकार होतात. जुलाब हे लहान अथवा मोठे आतडे यांना आतील भागातून आलेल्या सुजेमुळे तसेच जीवाणू-विषाणूंच्या प्रश्नदुर्भावामुळे होतात. मानवी विष्ठेद्वारे बाहेर फेकलेले हे जीवाणू दूषित पाणी अथवा अन्नामध्ये मानवाकडून अथवा माश्यांद्वारे सूक्ष्म स्वरूपात मिसळल्याने हे आजार होत असतात.
आमांश- अमिबियासिस-
‘अमिबा’मुळे मोठय़ा आतडय़ांचे विकार होतात. मळमळ-उलटी, वारंवार शौचास होणे, आव पडणे तसेच काही वेळा आवरक्त पडणे, पोटात वरचेवर दुखणे ही लक्षणे अमिबियासिसमध्ये दिसून येतात. खाल्ल्यानंतर लगेचच कळ मारून शौचास होणे हे या आजाराचे मुख्य लक्षण होय. तीव्र प्रकारच्या आजारात अमिबामुळे यकृतबाधाही होते. इ. कोलाय, कॉलरा, रोटाव्हायरस यामुळेही आतडय़ांना बाधा होते. अशा वेळी रुग्णास ताप येणे, पातळ जुलाब होणे, मळमळ होणे अशी लक्षणे दिसतात. कॉलरामध्ये तर अगदी पाण्यासारखे जुलाब होतात. सतत होणाऱ्या पातळ जुलाबांमुळे रुग्णाचे शरीर शुष्क होऊ लागते व रक्तदाबही कमी होतो. गॅस्ट्रो-कॉलरा रुग्णांवर वेळीच उपचार न केल्यास मूत्रपिंड निकामी होऊन लघवीचे प्रमाण कमी होऊ लागते, रक्तातील क्षार (सोडियम) कमी होऊन ग्लानी येणे अशी तीव्र लक्षणे दिसून येतात. तीव्र स्वरूपाचा हा आजार प्रश्नणघातकही ठरू शकतो.
‘टायफॉईड’ हा आजारही दूषित अन्नपाणी सेवन केल्याने होतो. ‘साल्मोतेला टायफी’ हे या आजाराचे जीवाणू छोटय़ा आतडय़ांवर हल्ला करतात व आतडय़ाच्या आतील बाजूस छेद निर्माण करतात. टायफॉईड अल्सरमधून रक्तस्रावही होऊ शकतो. सतत चढत राहिलेला ताप, पोटदुखीसह उलटी-जुलाब अशी लक्षणे या आजारात दिसतात. बऱ्याच रुग्णांमध्ये ताप आलेला असतानाही हृदयाचे ठोके मात्र धिम्या गतीने आढळतात. ही या आजाराबाबतची विशेष बाब तीव्र स्वरूपाच्या टायफॉईडमध्ये रुग्ण शॉकस्थितीत जाणे, न्यूमोनिया होणे, मेंदूज्वर होणे अशा गंभीर बाबी होऊ शकतात. दूषित अन्नपाण्यामुळे होणारी कावीळ ही मुख्यत्वे दोन प्रकारात मोडते. हिपाटायटीस-ए व हिपाटायटीस-ई या आजारात मळमळ-उलटय़ा, भूक न लागणे, पोटात उजव्या बाजूस वरती दुखणे, डोळे पिवळे होणे व लघवी गडद पिवळ्या रंगाची होणे अशी लक्षणे दिसतात.
पोटाच्या या विकारांचे निदान करताना महत्त्वाच्या रक्तचाचण्या व शौचतपासणी आवश्यक ठरते. रक्तातील पांढऱ्या पेशींचे वाढते प्रमाण सोडियम-पोटॅशियम या क्षारघटकांची कमतरता, मूत्रपिंडाचे कार्य दर्शविणारे सिरम क्रियाटीनीन हे महत्त्वाचे ठरते. शौच तपासणीद्वारे अमिबा तसेच इतर जीवाणू, पांढऱ्या पेशी व रक्तपेशी याबाबत माहिती मिळते. टायफॉईडच्या निदानासाठी ‘विडाल टेस्ट व क्लॉट कल्चर’ हा रक्ततपास आवश्यक असतो. तापाच्या दुसऱ्या आठवडय़ात ‘विडाल टेस्ट’ महत्त्वाची ठरते. यकृताच्या विविध इन्झाईम्सची पातळी तसेच प्रत्यक्ष विषाणूंच्या तपासण्या काविळीसाठी उपलब्ध आहेत. उपचारपद्धती-जुलाब सौम्य स्वरूपाचे असल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रतिजैविके तसेच ‘जलसंजीवनी’ उपयुक्त ठरते.
‘ओरल रिहायड्रेशन सोल्युशन’ची पावडर उकळून थंड केलेल्या पाण्यातून रुग्णाच्या तहानेप्रमाणे दिल्यास निश्चितच फायद्याचे ठरते. जलसंजीवनी आपण घरच्या घरीही बनवू शकतो. एक लिटर पाण्यात अर्धा चमचा मीठ व आठ चमचे तांदळाची पावडर मिसळून बनविलेले मिश्रण रुग्णांना ‘जीवनदायी’ ठरते. पोटाच्या विकारांमध्ये शरीरात योग्य प्रमाणात पाण्याचे प्रमाण ठेवणे हेच महत्त्वाचे आहे. प्रश्नथमिक उपचारांनी नियंत्रणात न येणाऱ्या रुग्णांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करणे हिताचे ठरते. रक्तदाब व लघवीचे प्रमाण यांचा मेळ साधत अशा रुग्णांना योग्य प्रमाणात सलाईन व नसेमधून प्रतिजैविके द्यावी लागतात.
दूषित अन्नपाणी यापासून होणारे आजार टाळण्यासाठी काही महत्त्वाचे नियम पाळणे आवश्यक ठरते. पाणी नियमित उकळून प्यावे. भाजीपाला व फळे वाहत्या पाण्यात कमीतकमी तीन वेळा धुऊन घ्यावी. मांसाहार स्वच्छ करताना विशेष काळजी घ्यावी. अन्नसेवनाअगोदर हात साबण लावून स्वच्छ धुवावे. रस्त्यावर शिजवलेले, उघडे अन्नपदार्थ खाण्याचे पूर्णपणे टाळावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले घर, ऑफिस व परिसर स्वच्छ ठेवावा.
वदनी कवळ घेता। नाम घ्या श्रीहरिचे
सहज हवन होते। नाम घेता फुकाचे
जीवन करि जिवित्वा। अन्न हे पूर्णब्रह्म
उदर भरण नोहे। जाणिजे यज्ञकर्म
मित्रहो, तुमच्या-माझ्या बालपणी पंगतीच्या सुरुवातीला घराघरांतून-गावागावांतून होणारी ही उद्घोषणा आपण सर्वानी पुन्हा एकदा प्रत्येक दिवशी मोठय़ाने म्हणण्याची गरज आता भासू लागली आहे हे निश्चित!
डॉ. संतोष सलाग्रे
dr_santoshsalagre@hotmail.com