Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाचा विशेष सभेला फटका
चंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

नगर पालिका कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका चंद्रपूर पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेला बसला. पालिकेतील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने दुपारी एक वाजता आयोजित सभा नगराध्यक्ष मनोहर पाऊणकर यांना रद्द करून पुढे ढकलावी लागली. कर्मचारी संपावर असल्याने शहरात

 

सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
राज्यातील नगर पालिका व महानगर पालिका कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ३ ऑगस्टपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला जिल्हय़ात कामगारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण २०८० पैकी १९१५ कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. चंद्रपुरात ९९६ पैकी ९४६ कामगारांनी, भद्रावतीत ११४ पैकी ११४, वरोरा १९० पैकी १२५, ब्रह्मपुरी ७८ पैकी ७८ मूल १२७ पैकी १२६ व बल्लारपुरात ४०० पैकी ३५० आणि राजुरा नगर पालिकेत १७५ पैकी १७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत.
संपामुळे पालिका कार्यालयात सर्वत्र शुकशुकाट आहे. या सर्व कामगारांनी केंद्राकडे विविध मागण्यांचा वारंवार पाठपुरावा केला. मात्र मागण्या अजूनही मान्य झाल्या नाहीत. केंद्र शासनाप्रमाणे नगर पालिका कर्मचाऱ्यांना विनाअट सहावा वेतन आयोग लागू करावा, १० मार्च ९३ नंतरचे उर्वरित रोजंदारी कार्मचारी कायम करण्यात यावे, नगर पालिका कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शनसाठी शासनाचे शंभर टक्के अनुदान द्यावे,आदी मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप केला.
कर्मचारी संपात सहभागी झाले असल्याने शहरात नियमित होणारी साफसफाईची कामे बंद झाली आहे. यामुळे सर्वदूर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. राज्यातील एकूण २२५ पालिका तसेच बारा महानगरपालिकांमध्ये संपाला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती भारतीय स्वायत्तशासी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश देशपांडे यांनी दिली. या संपाचा फटका चंद्रपूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेला बसला. संपात सर्व कर्मचारी सहभागी झाले असल्याने नगर पालिका कार्यालयात सर्वदूर शुकशुकाट आहे. एकही कर्मचारी कामावर नसल्याने विविध विषयासंदर्भात आयोजित नगर पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष डॉ. मनोहर पाऊणकर यांना रद्द करावी लागली. मागण्या मान्य होईस्तोवर हा संप सुरूच राहणार असल्याची माहिती कामगारांनी दिली.