Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पोलीस महासंचालकांची गडचिरोली जिल्ह्य़ास भेट
रांगी आश्रमशाळा घटनेतील आरोपीस अटक
गडचिरोली, ५ ऑगस्ट / वार्ताहर

राज्याचे पोलीस महासंचालक एस.एस. विर्क यांनी मंगळवारी गडचिरोली जिल्ह्य़ास भेट दिली. या दरम्यान त्यांनी देसाईगंज या ठिकाणी तयार होत असलेल्या राज्य राखीव पोलीस बल गट-१३ (एस.आर.पी.एफ.) साठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी केली. दरम्यान, रांगी आश्रमशाळा

 

घटनेतील एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
विर्क यांनी गडचिरोली व गोंदिया जिल्ह्य़ाचे पोलीस अधीक्षक व इतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुका तसेच धार्मिक उत्सवसंबंधी पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीत नक्षलविरोधी अभियानाचे अप्पर पोलीस महासंचालक पंकज गुप्ता, नागपूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुरिंदरकुमार, गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक राजेश प्रधान, पोलीस अधीक्षक जयकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.
धानोरा तालुक्यातील रांगी येथील शासकीय आश्रमशाळेतील तीन शिक्षिकांवर अत्याचार व इतर शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी कसोशिने शोध करून एका आरोपीस अटक केली आहे.
आरोपीचे नाव सुनील दशरथ गावडे (२५) रा. गोडलवाही असे असून तो नक्षलवाद्यांच्या चळवळीतील ग्राम पातळीवरील सदस्य आहे. तसेच तो संगम सदस्य, नक्षलवाद चळवळीचा ग्राम पातळीवरील कणा, म्हणजेच मेट म्हणून काम करतो. आरोपी हा गोंडवाणा गणतंत्र पार्टीचा युवा मोर्चाचा तालुका अध्यक्ष असल्याचे पोलिसांनी सांगितले.
२९ जुलैला रांगी येथील आश्रमशाळेत शहीद सप्ताह दरम्यान तीन अज्ञात आरोपींनी शाळा का सुरू ठेवली, अशी विचारणा करून तीन शिक्षिकांवर अत्याचार करून इतर शिक्षकांना मारहाण केली. या घटनेबाबत १ ऑगस्टला धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
गुन्ह्य़ाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तपासकार्याकरता सहा पथके तयार केली. त्यातील रांगी भागात २, धानोरा-गोडलवाही भागात २ तसेच गडचिरोली व आरमोरी भागात २ पथके तयार करून आरोपींचा शोध घेण्यात आला. दरम्यान, पीडित व साक्षीदारांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचे रेखाचित्र तयार करून प्रसिद्ध करण्यात आले.
या गुन्ह्य़ातील अन्य दोन आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे गडचिरोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भाजीभाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत सांगितले. गुन्ह्य़ातील आरोपींनी त्याच दिवशी धानोरा तालुक्यातील सोडे येथील आश्रमशाळेतील शिक्षकांना शहीद सप्ताहा दरम्यान शाळा बंद करण्याची धमकी देऊन मारहाण केली व त्यांच्याजवळील मोबाईल संच हिसकावून घेतले.
दरम्यान, रांगी येथील घटनेचा सौदामिनी सोल्जर्स या संघटनेने निषेध केला आहे. भ्याड नक्षलवादी, निवडणुकीत गुंतलेले संवेदनशून्य पुढारी व कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे जिल्ह्य़ातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे, असे संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मिनल चिमुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.