Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

धो-धो पावसासाठी कावड यात्री भाविकांचा महादेवाला अभिषेक
यवतमाळ, ५ ऑगस्ट / वार्ताहर

यवतमाळ जिल्ह्य़ात पावसाअभावी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून धो धो पाऊस यावा म्हणून अनेक शिवभक्तांनी ‘कोटेश्वर ते यवतमाळ’ अशी ४५ कि.मी. अंतराची पायी कावड

 

यात्रा काढून येथील सिद्धेश्वर मंदिरात महादेवाला अभिषेक केला.
हजारो श्रीफळ फोडून प्रसाद वितरण करण्यात आले. कावड यात्रेत सहभागी झालेल्या आणि भगवे वस्त्र धारण केलेल्या भाविकांचे यवतमाळकरांनी जोरदार स्वागत केले.
यवतमाळात ९ लाख हेक्टर क्षेत्रात खरिपाची पेरणी झाली आहे. मृगाचा पाऊस एक महिना उशिरा येऊनही पिकांची स्थिती समाधानकारक होती. आता पावसाने दडी मारली आहे, पिकांनी माना खाली टाकल्या आहेत, चार लाख हेक्टरवरील कपाशीवर आणि तीन लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकावर अळ्यांनी आक्रमण केले आहे. पिकांना आता पावसाची गरज आहे पण, पाऊस नाही म्हणून शेतकरी हवालदिल झाला आहे.
३० जूननंतर पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्य़ात पावसाची सरासरी ९११ मि.मी. आहे. आतापर्यंत केवळ २४२ मि.मी. पाऊस झाला म्हणजे केवळ २७ टक्के पाऊस झाला आहे. अरुणावती, अडाण, पुस, बेंबळा, कोखी, सायखेड, वाघाडी, लोअरपूस, नवरगाव इत्यादी सिंचन प्रकल्पात ९ ते ३० टक्केच जलसाठा आहे.
यवतमाळला पाणीपुरवठा करणाऱ्या चापडोह आणि निळोणा धरणात सध्यातरी समाधानकारक पाणीसाठा आहे पण, तो किती दिवस पुरणार? असाही प्रश्न आहे.