Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

नाटय़गृहाची ‘अर्धवट’ इमारत पूर्ण करण्यासाठी सरकारला साकडे
यवतमाळ, ५ ऑगस्ट / वार्ताहर

साडेतीन कोटी रुपये खर्च करून ‘अर्धवट’ बांधकाम झालेल्या यवतमाळातील ‘नाटय़गृहा’चे (रंगमंदिराचे) काम पूर्ण करण्यासाठी शासनाने अडीच कोटी रुपये आणखी देऊन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून चर्चा असलेल्या या रंगमंदिरास पूर्ण करावे, अशी मागणी यवतमाळातील पंधरा

 

‘रसिक संस्था’नी केली आहे.
यवतमाळ नगर परिषदेने सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या हस्ते ‘नाटय़गृह’ इमारतीचे भूमिपूजन केले होते. त्यावेळी शिंदे यांनी नाटय़गृहाला आणखी अडीच कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती व नाटय़गृह (रंगमंदिर) अद्ययावत सोयींनी युक्त व विदर्भातील प्रथम क्रमांकाचे ठरावे असे भव्य असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याप्रमाणे रंगमंदिराचे काम सुरू झाले. साडेतीन कोटी रुपये खर्च झाले. नाटय़गृहाची इमारत आता मात्र अपूर्णावस्थेत आहे. काही लोकांनी या सुंदर वास्तुला ‘शौचालय’ केले आहे. परिसरात ‘जंगल’ उभे झाले आहे.
यवतमाळातील रसिक संस्थांनी वारंवार सरकार दरबारी निवेदने दिली. माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगर परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब चौधरी, आमदार मदन येरावार आणि जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी स्वत: या बाबीकडे लक्ष देऊन निधीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण, ‘निष्पत्ती शून्य’चा अनुभव पदरी पडला.
‘डीपीसी’ मधून प्रस्ताव
जिल्हा नियोजन समितीमधून सव्वा दोन कोटी रुपये या नाटय़गृहाला मंजूर करण्यात आले होते पण, शासनाने या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. आता खासदार भावना गवळीपासून तर आमदार मदन येरावार आणि पालकमंत्री मनोहर नाईकांपासून नगर परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब चौधरी या सर्वानी पुन्हा एकदा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ११ ऑगस्टला हा प्रस्ताव ‘डीपीसी’ मध्ये मंजूर होण्याची शक्यता आहे.
नाटय़गृहासाठी कलाश्रयचे कृष्णराव गोडे, अशोक फाळके, चिंतामणी थिएटर्सचे हरिओम शर्मा, कला रसिकचे राजाभाऊ कनगिनवार कलासंवर्धनचे महेंद्र गुल्हाने, संगीत विद्यालयाचे मुकुंद शेंडे, पंचमवेदचे राजाभाऊ भगत, अस्मिताचे अशोक आष्टीकर, कला कांचनचे गजानन बिंड, कला वैभवचे संगीतबारी, नटराज कला अ‍ॅकेडमीचे अ‍ॅड. प्रवीण जानी, डॉ. किशोर सोनटक्के आदींनी मंत्र्यांपासून आमदार खासदारापर्यंत सर्वाना निवेदने देऊन नाटय़गृहाचे अपूर्ण काम पूर्ण करण्यास अडीच कोटी रुपये द्या, अशीच मागणी केली आहे.