Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बुलढाणा जिल्ह्य़ातील रेल्वे मार्गाबाबत पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
खासदार, आमदारांनी प्रयत्न करण्याचे रेल्वे लोक आंदोलन समितीचे आवाहन
बुलढाणा, ५ ऑगस्ट / प्रतिनिधी

जिल्हा विकासाचा राजमार्ग ठरू शकणाऱ्या शेगाव-जालना आणि मलकापूर-जालना या रेल्वेमार्गाच्या निर्मितीबाबत मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रयत्न करावे, तसेच या संदर्भात एक बैठक

 

तातडीने आयोजित करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्य़ाचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. या दोन्ही लोहमार्गाकरता प्रयत्न करणाऱ्या रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने देखील बुलढाणा व जालना जिल्ह्य़ांशी संबंधित सर्व खासदार व आमदारांनी या प्रश्नाबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रलंबित असलेल्या शेगाव-जालना रेल्वेमार्गाच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे पडले आहे. या रेल्वेमार्गाचे काम गेल्या ६० वर्षात कायमस्वरूपी दुर्लक्षित असून रेल्वे बोर्डानेदेखील दोनदा सर्वेक्षण करून हा प्रकल्प फायदेशीर नसल्याच्या कारणावरून नाकारला आहे. जिल्ह्य़ातीलच दुसरा प्रस्तावित रेल्वेमार्ग मलकापूर-जालना असून या रेल्वेमार्गाची तर त्यापेक्षाही जास्त दुर्गती आहे. शेगाव-जालना आणि मलकापूर जालना या दोन्ही रेल्वेमार्गाबाबत रेल्वे लोक आंदोलन समिती गेल्या दोन वर्षापासून जोमाने कार्यरत आहे. समितीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा करून शासनाचे लक्ष वेधले. माजी रेल्वेमंत्री लालुप्रसाद यादव यांच्याशी समितीने घेतलेल्या यवतमाळ भेटीप्रसंगी लालुप्रसाद यादव यांनी राज्यसरकारच्या भागीदारीतून या पुढील प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचे केंद्र सरकारचे धोरण असल्यामुळे प्रथम राज्य सरकारकडे मागणी करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार समितीकडून डॉ. िशगणे यांच्यामार्फत राज्य शासनाकडे मागील सहा महिन्यांपासून पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचीच प्रचिती म्हणून पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पत्र पाठवून या दोन्ही रेल्वे मार्गासाठी खास बाब म्हणून केंद्र सरकारकडे मागणी करावी आणि याच संदर्भात संबंधितांची एक बैठक तातडीने आयोजित करावी, अशी मागणी केली आहे.
बुलढाणा जिल्ह्य़ाच्या सर्वागीण विकासासाठी शेगाव-जालना आणि मलकापूर-जालना या दोन्ही रेल्वेमार्गाची भूमिका महत्त्वाची असणार आहे. राज्य सरकारने वर्धा-यवतमाळ-नांदेड, वडसा-गडचिरोली, मनमाड-इंदूर आणि नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाबाबत केंद्र सरकारकडे आग्रही भूमिका घेऊन केंद्र सरकारशी भागीदारी करण्याची तयारी दाखवली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ातील दोन्ही रेल्वेमार्गाविषयी धोरण स्वीकारणे गरजचे आहे.
यासाठी जिल्ह्य़ाशी संबंधित असलेले केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक, खासदार प्रतापराव जाधव, खासदार आनंदराव अडसूळ, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते भाऊसाहेब फुंडकर, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार विजय शिंदे, आमदार चैनसुख संचेती, आमदार रेखा खेडेकर, आमदार दिलीप सानंदा व आमदार डॉ. संजय कुटे या सर्वानी संयुक्तपणे प्रयत्न करून या प्रश्नावर रान उठवावे व जिल्ह्य़ाचा विकास साकारावा, असे आवाहन रेल्वे लोक आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.