Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी अप्रशिक्षित अधिकाऱ्यांकडे
चंद्रपूर, ५ ऑगस्ट/ प्रतिनिधी

वन्यजीव व्यवस्थापन व संरक्षणाचे प्रशिक्षण नसलेले अधिकारी विदर्भातील ताडोबा, मेळघाट व पेंच व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव संरक्षणाची जबाबदारी पार पाडत आहेत. या अप्रशिक्षित अधिकाऱ्यांमुळे प्रकल्पातील वन्यजीव व्यवस्थापन योग्य पध्दतीने होत नसल्याची गंभीर बाब समोर

 

आली आहे.
विदर्भातील व्याघ्र प्रकल्पात वाघ, बिबटे, हत्ती, हरण, चितळ, सांबर यासह पक्षी व सरपटणारे प्रश्नणी आहेत. या तीनही व्याघ्र प्रकल्पांचे प्रमुख म्हणून क्षेत्र संचालक हे उपवनसंरक्षक दर्जाचे स्वतंत्र पद आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. शेषराव पाटील यांची महिनाभरापूर्वी बदली झाली. तेव्हापासून ताडोबाची जागा रिक्त असून या प्रकल्पाचा प्रभार आलापल्ली वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक आर.एस. गोवेकर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. आलापल्ली व ताडोबा व्याघ्र प्रकल्प अशा दोन ठिकाणी काम करताना गोवेकर यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोवेकर यांनी डेहराडून येथे वन्यजीव व्यवस्थापन व संरक्षणाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांना वन्यजीव व्यवस्थापनाचा चांगला अनुभव आहे. आलापल्ली येथे त्यांनी वन्यजीव व्यवस्थापनात चांगले कामही केले आहे. मात्र प्रकल्पातील इतर अधिकारी अप्रशिक्षित आहेत.
ताडोबा प्रकल्पाचे सहायक उपवनसंरक्षक निरंजन विवरेकर मेळघाट प्रकल्पातून ताडोबात बदलून आले आहेत. त्यांनी एक वर्षाचा यशस्वी कार्यकाळ पार पाडला असला तरी वन्यजीव व्यवस्थापनाचे प्रशिक्षण त्यांनी घेतलेले नाही. विवरेकर यांची वीस वर्षाची सेवा झाली असून यातील एकोणवीस वष्रे त्यांनी अमरावती येथील वनराजीक महाविद्यालयात विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे. अशा स्थितीत त्यांच्यावर ताडोबात वन्यजीव व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. ६२५ चौरस किलोमीटरचा ताडोबा प्रकल्प ताडोबा, मोहुर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात विभागला गेला आहे. ताडोबाचे वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून के.आर. सोनवणे, मोहुर्ली येथे ए.व्ही. पट्टे, कोळसा येथे आर.बी. कामडी आणि संशोधन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैद्य आहेत. विशेष म्हणजे या चारही वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना वन्यजीव व्यवस्थापन व संरक्षणाचा अनुभव नाही. अशा अप्रशिक्षित अधिकाऱ्यांकडे ताडोबा प्रकल्पाच्या संरक्षणाची आणि व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाने सोपवली आहे. यातील एकाही अधिकाऱ्याने प्रत्यक्ष फिल्डमध्ये काम केलेले नसल्याने ताडोबा प्रकल्पात वाघ किंवा इतर प्रश्नण्यांची शिकार झाली किंवा एखाद्या प्रश्नण्याला दुखापत जरी झाली तरी या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित अधिकाऱ्यांची मदत घ्यावी लागते. हीच स्थिती मेळघाट व पेंच या प्रकल्पात आहेत.
मेळघाट प्रकल्पाचे क्षेत्र संचालक ए.पी. मिश्रा तर पेंच येथे भारतीय वन सेवेतील मोहन झा आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांना वन्यजीव व्यवस्थापन व संरक्षणाचा अनुभव नाही. सहायक उपवनसंरक्षक गिरीश वशिष्ट हे डेहराडून येथून प्रशिक्षण घेऊन आले असून त्यांनी सलग दहा वष्रे ताडोबात काम केले आहे. त्यामुळे सध्या वन खात्याच्या वन्यजीव विभागात गिरीश वशिष्ट व गोवेकर प्रशिक्षित आहेत. वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक बी. मुजूमदार इतरत्र गेल्यापासून या पदाचा प्रभार जोशी यांच्याकडे आहे.