Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

पुरात वेढलेल्या गावच्या ‘थरारक’ आठवणी
पळशीचे अद्यापही पुनर्वसन नाही
यवतमाळ, ५ ऑगस्ट / वार्ताहर

६ ऑगस्ट अमरावती विभागात विसरता येणार नाही असा दिवस. कारण याच दिवशी २००६ मध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पैनगंगा नदीला महापूर आला आणि या पुराने उमरखेड तालुक्यातील पळशी हे गाव पूर्णत: वेढून टाकले होते. सारे गाव रात्रभर जीव मुठीत धरून होते.

 

पैनगंगेचे तांडव आणि त्यात गावकऱ्यांचा जिल्हा प्रशासनाशी तुटलेला संपर्क अशा स्थितीत ६ ऑगस्टची रात्र ही शेवटची ‘काळरात्र’ आहे अशाच मन:स्थितीत गावकरी होते. उजाडले तेव्हा सुखरूप आहोत, या कल्पनेनेच गावकरी तशाही नैसर्गिक संकटाला सामोरे जाण्यास सिद्ध होते आणि हिमतीने त्यांनी रात्र काढली. यवतमाळात रात्री बारा वाजता जेव्हा तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी शिवानंद मिश्रा यांना पळशी गाव पुराने चहुबाजूंनी वेढल्याचे समजले तेव्हा त्यांनी जे प्रयत्न केले त्याची करावी तेवढी स्तुती थोडीच ठरेल.
पळशी हे गाव उमरखेड तालुक्यात आहे. याच तालुक्यातील प्रतिभा खडसे जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. मिश्रा यांनी मध्यरात्री प्रतिभा खडसे यांचे पती विजय खडसे यांना बोलावले. मिश्रा यांनी लष्कराचे जवान पळशीला रवाना केले. थर्मोकोलच्या होडय़ा आणि पट्टीचे पोहणारे पाठवले. एक रात्र आणि एक दिवसपर्यंत पूर ओसरला नाही आणि गावकरी, लहान मुले, महिला, वृद्ध सारे सारे पुरात अडकून होते. पालकमंत्री मनोहर नाईक हे सुद्धा सकाळी पळशीला पोहोचले. ते देखील काठावर बसून गावकऱ्यांना धीर देत मदत मिळावी म्हणून जीवाचे रान करत राहिले. गावकऱ्यांना पुरातून बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरशिवाय पर्याय नव्हता पण, हेलिकॉप्टर कोठून आणावे हेच कोणाला कळेना. मिश्रा यांनी मुंबई, काटोल, नागपूर, हैदराबाद अशा अनेक ठिकाणी दूरध्वनी संपर्क केला पण, प्रत्येक ठिकाणी ‘राँग नंबर’ हेच उत्तर मिळाले. शेवटी जयपूरवरून हेलिकॉप्टर आणण्यात आले आणि गावकऱ्यांना हेलिकॉप्टरच्या सहाय्याने दोर बांधून एकेकाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. दरम्यान, हेलिकॉप्टरनेच जेवणाची पाकिटे टाकण्यात आली. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेची आजही आठवण ताजी आहे. ६ ऑगस्टची ‘ती’ रात्र आणि ‘तो’ दिवस आयुष्यातला कधीही विसरता येणार नाही, असा दिवस आहे. त्या दिवसाच्या अनुभवाने खूप काही शिकवले, असे मिश्रा यांना बुधवारी ‘लोकसत्ता’ला दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. पाऊस थांबला, पैनगंगा ‘शांत’ झाली. गावकरी सुखरूप बचावले. प्रश्नणहानी झाली नाही. आता या घटनेला ३ वर्षे झालीत. पळशीचे पुनर्वसन करण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यावेळी पालकमंत्री मनोहर नाईक यांनी जाहीर केले होते. ४११ कुटुंबांच्या जीवनात जो प्रसंग आला तो पुन्हा येऊ नये म्हणून तब्बल दोन वर्षानी म्हणजे २५ जानेवारी २००८ ला अमरावती आयुक्तांकडे पुनर्वसनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला. पुनर्वसनाचे अंदाजपत्रक तयार करा, असे लातूरच्या (म्हणजे मराठवाडय़ाच्या) एकात्मिक घटक भूकंप पुनर्वसन कार्यकारी अभियंता यांना ६ मे २००८ ला कळवण्यात आले. एक वर्ष लोटले पण, पळशीचे पुनर्वसन मात्र कागदावरसुद्धा झाले नाही, यापेक्षा दुसरी शोकांतिका कोणती असू शकते?
पळशीच्या नैसर्गिक आपत्तीने एक गोष्ट मात्र केली. अशा संकटकाळात कोठेही हेलिकॉप्टर लागले तर ते प्रशासनाकडे उपलब्ध होऊ शकते. अर्थात, हेलिकॉप्टर बोलावण्याचा प्रसंग येऊ नये अशीच प्रशासनाची परमेश्वराला प्रश्नर्थना आहे पण, त्यासोबतच यंदा धो धो पावसाची चातकासारखी प्रतीक्षाही सामान्य माणसाबरोबर प्रशासनही करीत आहे.