Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

वेळेत वीज जोडणी न दिल्याबद्दल वितरण कंपनीला २३ हजाराचा दंड
ग्राहक न्याय मंचाचा निर्णय
अंजनगावसुर्जी, ५ ऑगस्ट / वार्ताहर

कृषीपंपाच्या विद्युत पुरवठय़ासाठी मागणीपत्रानुसार रकमेचा भरणा केल्यानंतरही नियोजित वेळेत वीज जोडणी न दिल्या कारणावरून वीज वितरण कंपनीला २३ हजार रुपयांचा दंड ग्राहक न्याय

 

मंचाने ठोठावला.
तालुक्यातील निमखेड बाजार येथील शेतकरी गजानन खडसे यांनी कृषीपंपासाठी विद्युत मागणी अर्ज १९९९ ला केला होता. वीज मंडळाच्या मागणीपत्रानुसार त्यासाठी रक्कमही भरली होती. वीज मंडळाने वेगवेगळी कारणे सांगून त्यांना वीज पुरवठा केला नाही. अखेर गजानन खडसे यांनी येथील ग्राहक पंचायतीकडे आपली तक्रार नोंदविली. ग्राहक पंचायतीच्या मार्गदर्शनानुसार मार्च महिन्यात वीज न्यायमंचाकडे रीतसर तक्रार अर्ज दाखल करण्यात आला.
न्याय मंचासमोर हे प्रकरण नुकतेच आले असता, मंचाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर वीज वितरण कंपनीने कृती मानकाप्रमाणे विद्युत पुरवठासाठी मागणी केलेल्या रकमेचा भरणा केल्यानंतर ३ महिन्यांत वीज जोडणे बंधनकारक असता. शेतकऱ्यांच्या कृषीपंपास वीज पुरवठा न करणे म्हणजे कंपनीच्या वीज पुरवठा अटीचे उल्लंघन केले आहे.
कृतीमानके व नियमानुसार वीजमंडळ दोषी असल्याचे सांगून कर्तव्यात केलेल्या अक्षम्य दिरंगाईबाबत प्रती दिवस एक हजार रुपयेप्रमाणे एकूण २३ हजार रुपये दंड ठोठावीत असल्याचा निर्णय दिला. दंडाची रक्कम धनादेशाद्वारे शेतकऱ्याला देऊन त्यांच्या कृषीपंपाला त्वरित वीज पुरवठा करावा असा आदेश दिला आहे. वीज पुरवठा न केल्यामुळे शेतकरी ओलिताचे पीक घेऊ शकला नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा वाद ग्राहक मंचाच्या अधिकार कक्षात येत नसल्यामुळे तक्रारकर्त्यांची पीक भरपाईची मागणी फेटाळली आहे. या शेतकऱ्याला ग्राहक पंचायतचे प्रश्नंत उपाध्यक्ष बबनराव खंडारे यांच्या मार्गदर्शनार्थ आनंद संगई, ओमप्रकाश
कबाडे व महेंद्र शिंदीजामेकर यांनी सहकार्य केले.