Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

विशेष लेख

आव्हान
घबराटीच्या विषाणूचे!

‘एच वन एन वन’ म्हणजेच, स्वाईन फ्लूचा मुख्यत: अमेरिकेच्या मार्गाने भारतात शिरकाव झाल्यानंतर या रोगाचा संसर्ग झालेली शाळकरी मुलगी दगावल्याची पुणे येथे नुकतीच नोंद झाली. जवळपास दोन-अडीच महिने या विषयाचा पाठपुरावा केल्यानंतर त्या अर्थाने पहिली ब्रेकिंग न्यूज हाती आल्याने एरवी आक्रमकता असलेला मीडिया आता यापुढे अधिक आक्रमक होईल. मीडियाच्याच साक्षीने पालिका-शासन आणि संबंधित खासगी रुग्णालय यांच्यात आरोप-प्रत्यारोप, खुलासे-निवेदने,

 

चौकशी समित्या असले नित्याचे प्रकार होतील. पण त्यामुळे या आजाराचा सामना करावा लागलेले विद्यार्थी-पालक अधिकच सैरभैर होतील. अशा प्रसंगी केवळ आकडेवारी नि आरोग्यसज्जतेची सरकारी छापाची माहिती देऊन भागणार नाही. तर पुणे आणि परिसरातील विद्यार्थी-पालकांनाच नव्हे, तर संबंध राज्यातल्या जनतेला धीर देण्याचेही अवघड काम प्रशासनाला अग्रक्रमाने हाती घ्यावे लागेल. राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी परस्परभिन्न वक्तव्ये करून जनतेमध्ये चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी घेतानाच आपत्ती व्यवस्थापनाच्या पातळीवर नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश पोहोचवण्यासाठी तातडीने पावले उचलावी लागतील. कारण, प्रारंभापासून शासन आणि नागरिक यांच्यात असलेला सुसंवादाचा अभाव, जनतेचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा उडालेला विश्वास आणि परिस्थितीवर सर्वस्तरीय नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले शासन-प्रशासन यामुळे ‘एच वन एन वन’पेक्षाही घबराटीच्या विषाणूनेच एव्हाना नागरिकांच्या मनाचा ताबा घेतलेला असेल. भविष्यात स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळवणारी लस उपलब्ध होईलही, पण या घबराटीच्या विषाणूवर नियंत्रण कसे मिळवायचे, हेच व्यवस्थेपुढचे यापुढच्या काळातही मोठे आव्हान असेल..
‘या स्वाईन फ्लूबद्दल कुणीच धड माहिती देत नाहीए. त्यामुळे आम्ही पालक अतिशय चिंतेत आहोत.’..‘महिनाभराच्या अंतराने गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. तोपर्यंत स्वाईन फ्लूवर नियंत्रण नाही मिळवलं, तर मुंबई-पुण्यात हाहाकार माजेल.’
पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात दाखल रिदा शेख ही शाळकरी मुलगी स्वाईन फ्लूच्या विषाणूसंसर्गामुळे दगावल्यानंतर पुण्याच्याच काही चिंताग्रस्त पालकांनी ब्लॉगवर नोंदवलेल्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया. यातली एक तर टोकाची. मात्र प्रशासनाबद्दलचा अविश्वास हा या दोन्ही प्रतिक्रियांमधला सामायिक घटक. कदाचित सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरच्या अविश्वासापोटीच रिदा शेखच्या नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात तर दाखल केले नसेल? कारणे काहीही असतील. कालांतराने त्याची चिकित्सा होईलही, पण याक्षणी मात्र रिदा शेखच्या जाण्याने आधीच चिंतेने वेढलेल्या विद्यार्थी-पालकांमध्ये अधिकच गोंधळाचे वातावरण पसरणे स्वाभाविक आहे. त्यातही जी मुले किंवा पालक रियाच्या संपर्कात आली असतील त्यांच्यासाठी ही घटना नक्कीच मानसिक खच्चीकरण करणारी असेल. शासनाने वेळोवेळी आवाहन करूनही मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल न करण्याचा हलगर्जीपणा पालकांनी का दाखवला, खासगी रुग्णालयाने वेळीच शासकीय रुग्णालयाला का कळवले नाही. मुळात, शासकीय पातळीवर सज्जता असताना रियाच्या पालकांना तिला प्रथम नायडू किंवा औंधच्या पालिका रुग्णालयात दाखल करावेसे का वाटले नाही, असे असंख्य प्रश्न यापुढे उपस्थित केले जातील. याचे उत्तरही कदाचित जनतेमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल असलेल्या परंपरागत अविश्वासातच दडलेले असेल. स्वाईन फ्लूच्या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने अ‍ॅलर्ट जारी केल्यानंतर स्थानिक पातळीवरच्या शासकीय रुग्णालयांतून अव्यवस्था आणि गैरसोयीच्या कहाण्या ऐकल्या- बघितल्यानंतर समजा कुणी आपल्या मुलाला किंवा मुलीला खासगी रुग्णालयात दाखल केले असेल तर त्या पालकांना तरी दोष कसा देणार? जनतेचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर विश्वास नाही आणि खासगी रुग्णालयांवर शासनाचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही, यात बळी मात्र सामान्य माणूसच ठरणार. हाच रिया शेख दगावल्याच्या घटनेचा अन्वयार्थ आहे.
रिदा शेखची केस जगापुढे येण्याआधी चित्र तसे बऱ्यापैकी आश्वासक दिसत होते. अलर्ट जारी झालेला असला तरीही घाबरून जाण्याची गरज नाही, हेच आरोग्य मंत्रालयाच्या पातळीवर वारंवार सांगितले जात होते. हा संदेश मीडियाने सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा यासाठीच गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफच्या सहकार्याने तातडीची राष्ट्रीय पातळीवरची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेदरम्यान उपस्थित मीडिया प्रतिनिधींना नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेबल डिसिजेस आणि एअरपोर्ट हेल्थ सेंटर या संस्थांच्या कार्याचाही प्रत्यक्ष भेट घडवून ओळख करून देण्यात आली. स्वाईन फ्लूचा विषाणू पसरू नये, म्हणून इथला प्रत्येक जण बूट, हातमोजे, मास्क, गॉगल, संबंध शरीर झाकणारा सूट, अ‍ॅप्रन आदी वैयक्तिक सुरक्षा साधने (पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट) वापरून टोकाची काळजी घेत असल्याचेही या वेळी बघायला मिळाले होते. मुळात, यंत्रणेत सगळीकडेच अनागोंदी नि विसंवाद असतो असे कुणालाही वाटत नाही. अगदी ब्रेकिंग न्यूजला चटावलेल्या मीडियालाही. पण स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली पातळीवर काम करणाऱ्या तज्ज्ञ-कर्मचाऱ्यांमध्ये सतर्कता, निष्ठा आणि प्रामाणिकता दिसली, ती स्थानिक पातळीपर्यंत तितक्याच तीव्रतेने झिरपते का, हाच खरा प्रश्न होता.
शाळाबंदचे सत्र दिल्लीपाठोपाठ पुण्यातच वेगाने घडत असल्यामुळे स्वाभाविकपणे गेले काही दिवस मीडिया पुण्यातल्या परिस्थितीवर नजर ठेवून होता. त्यातूनच नायडू हॉस्पिटल आणि औंध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांना अनंत गैरसोयींना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र समोर आले होते. सार्वजनिक रुग्णालयांचे व्यवच्छेदक लक्षण असलेली अस्वस्छता, खाटांची अनुपलब्धता, मास्क आणि रुग्ण तपासणीसाठी आवश्यक बॅटऱ्यांचा तुटवडा अशा नेहमीच्याच समस्यांमुळे गोंधळात अधिकच भर पडत असल्याचेही दिसत होते. केवळ नाइलाजाने शासकीय रुग्णालयांच्या वाटेला जावे लागलेल्यांना मनस्ताप, संताप आणि उद्वेगाचा अनुभव येत असल्याचे पालकांच्या प्रतिक्रियांवरून दिसून येत होते. त्यात भरीस भर म्हणून साध्या फ्लूच्या रुग्णांनाही दाखल करून घ्यावे, त्यांच्यावर स्वाईन फ्लूचे उपचार केले जावेत. शाळेने मागितलेले रोग बरा झाल्याचे प्रमाणपत्र द्यावे यासाठी पालकांनी डॉक्टर-आरोग्यसेवकांना भंडावून सोडल्याचेही लपून राहिले नव्हते. रुग्णांवर उपचार करताना अनेक ठिकाणी वैयक्तिक सुरक्षिततेसंबंधी आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे डोळेझाक होत असल्याचेही वरचेवर उघडकीस येत होते. काही ठिकाणी खासगी पॅथॉलॉजी लॅबचालक स्वाईन फ्लूसाठी रक्ताचे नमुने तपासून फसवणूक करत असल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यात भरीस भर म्हणून की काय, विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना स्वाईन फ्लूची आपत्ती ही आपल्यासाठी मोठी सुवर्णसंधी आहे, असे मानून समाजसेवेचे पुण्य पदरात पाडून घेण्यासाठी विविध राजकीय पक्षांची स्थानिक पातळीवरची फौज जनजागृती कार्यक्रमांद्वारे पुणे शहरात कार्यरत झाल्याचेही बघायला मिळत होते.
एकीकडे मीडियाच्या माध्यमातून स्वाईन फ्लूच्या संदर्भात आजवर जी काही आकडेवारी बाहेर येत होती, ती सर्व शासकीय रुग्णालयांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची. पण कितीही गंभीर प्रसंग असू दे, शक्यतो शासकीय रुग्णालयात दाखल होणे टाळून सामान्य नागरिक प्राधान्य देतात, त्या खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे किती रुग्ण दाखल आहेत, किती उपचार घेताहेत, किती बरे झाले आहेत, या रोगासंदर्भात खासगी रुग्णालयांची सज्जता कशी आहे, तिथे एकापासून दुसऱ्याला संसर्ग होऊ नये, यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी होते आहे अथवा नाही, खासगी रुग्णालयातले किती नमुने तपासणीसाठी दिल्ली-पुण्याच्या प्रयोगशाळेत गेले आहेत? अ‍ॅलर्ट जारी असताना खासगी रुग्णालयांच्या कारभारावर नियंत्रण कोणाचे, याची माहिती काल-परवापर्यंत शासनाकडे क्वचितच होती. कदाचित जनतेत घबराट पसरू नये यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या तात्पुरत्या धोरणात्मक निर्णयाचा भाग म्हणून ती मीडियापर्यंत येऊ दिली गेलीही नसेल. पण ती माहिती मीडियापर्यंत पोहोचली नव्हती. नाही म्हणायला, आम्ही खासगी रुग्णालयांच्याही संपर्कात आहोत. त्यांना औषधांचा पुरेसा पुरवठा कसा करता येईल, याची चाचपणी करीत आहोत, असे सूतोवाच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी केले होते. सर्वसाधारणपणे आजार लपवण्याची किंवा टाळण्याची नागरिकांची वृत्ती असल्याने स्वाईन फ्लूच्या प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचणे शासनाला शक्य नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले होते. त्यांच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य होते. यात संपूर्णपणे दोष शासन-प्रशासनाचा नसला तरीही, एकटय़ा शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येवरून आजाराचे गांभीर्य सामान्य जनतेपर्यंत पोहोचणार कसे ही शंका होतीच.
भारतात आता स्वाईन फ्लूमुळे एका बळीची नोंद झाली असली तरी बहुसंख्य रुग्ण दहा-बारा दिवसांच्या औषधोपचारानंतर यातून बरे झाले असल्याचीही शक्यता आहे. किंबहुना, आजवर स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेल्या ५५१ जणांपैकी ४२२ जण (अर्थातच शासकीय रुग्णालयातले) बरे झाल्याची आकडेवारी या विशेष कक्षातर्फेच नुकतीच जाहीर करण्यात आली होती. मग अशा वेळी विद्यार्थी-पालकांना धीर आणि विश्वास देण्याचा प्रयत्न जनहितार्थ जाहिरातींच्या माध्यमातून गेल्या महिन्याभरात का झालेला नाही? मीडिया जर अशा लोकांपर्यंत पोहोचत नसेल, तर आपत्ती व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग म्हणून सामान्य जनतेत विश्वास निर्माण करण्यासाठी आरोग्य मंत्रालय, राज्य शासनाच्या पातळीवर असा पुढाकार घेणे गरजेचे नव्हते का? शासन-प्रशासनाला याचेही महत्त्व न्यूयॉर्क-जिनिव्हा येथे बसलेल्या जागतिक आरोग्य संघटनेतल्या तज्ज्ञांनी जाणीव करून दिल्यानंतर जाणवणार आहे? एरवी, जनतेने टीव्हीवरच्या लाइफबॉय आणि डेटॉलच्या जाहिराती बघूनच स्वच्छतेचे धडे घ्यायचे का, आदी प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहेत.
पुण्याच्या एका घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे होईलही, भविष्यात स्वाईन फ्लूच्या विषाणूवर मात करणारी लसही उपलब्ध होईल, पण प्रारंभापासून शासन आणि नागरिक यांच्यात असलेला सुसंवादाचा अभाव, जनतेचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा उडालेला विश्वास आणि परिस्थितीवर सर्वस्तरीय नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेले शासन-प्रशासन यामुळे समाजाचे मानसिक खच्चीकरण करणाऱ्या सर्वात धोकादायक अशा घबराटीच्या विषाणूला रोखायचे कसे, हेच प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनापुढचे वेगळ्या आजाराच्या संदर्भातही यापुढच्या काळात सगळ्यात मोठे आव्हान असेल.
शेखर देशमुख
Shekhardeshmukh72@rediffmail.com
(लेखक स्वतंत्र पत्रकार तसेच हेन्री जे. कैझर फॅमिली फाऊण्डेशनच्या इंटरनॅशनल हेल्थ जर्नालिझम प्रोग्रामचे फेलो आहेत.)