Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

घरोघरी -वय वेडं
चिंतामणी : चिरंजीव उठले नाहीत वाटतं अजून?
चंदना : उठला. बाहेर गेलाय.
चिंतामणी : बाहेर गेलाय. आता? कुठे?
चंदना : माहीत नाही मला.
चिंतामणी : माहीत नाही? घरातून बाहेर जाताना सांगून वगैरे जाण्याची पद्धत असते का नाही काही? का आता त्याचीही त्याला गरज वाटत नाही. कधीही घराच्या बाहेर जा. कधीही घरात या. अरे, काय धर्मशाळा वाटली का काय घर म्हणजे? का हॉटेल? बरं, या अशा वागण्यावर त्यांना काही बोलायचं नाही..
चंदना : जाऊ दे नं मणी आता. काल काय कमी झालं आहे का?
चिंतामणी : म्हणजे काय माझंच चुकतंय असं म्हणायचं आहे का काय तुला? तुला सांगून ठेवतो चंदना, तुझ्या या अशा

 

वागण्यामुळेच तो अजिबात भीक घालेनासा झाला आहे.
चंदना : मी कुठं म्हटलंय, तुझं चुकलंय. उगीच काही तरी मनात घेऊन परत चिडू नकोस.
चिंतामणी : आणि काय गं, तो न सांगता गेला, तूही विचारलं नाहीस, कुठे जातोय, केव्हा परत येणार आहे?
चंदना : विचारलं, पण न सांगता निघून गेला.
चिंतामणी : हेच हेच ते. स्वत:ला इतका शहाणा समजायला लागलाय ना की विचारूच नकोस.
चंदना : असं काही नाहीये. अरे, त्याच्याही मनात कालचा वाद अजून घोळत असेल. तो अशा मार्गानी दाखवायचा मग. मी खोदून खोदून विचारलं असतं तर काय झालं असतं? पुन्हा सकाळी उठल्या उठल्या भांडण झालं असतं. मी एकदा विचारलं. त्यानं काही उत्तर दिलं नाही म्हटल्यावर मी गप्प बसले. ही सकाळची प्रसन्न वेळ छान असते. मन आपोआपच शांत होतं. येईल शांत झाला की. तू उगीच भलभलत्या कल्पनांनी डोक्यात राख घालून घेऊ नकोस.
चिंतामणी : म्हणजे त्यानं कसंही वागलेलं तुला चालतंय आणि मलाच सांगते आहेस की मी डोक्यात राख घालून घेतोय. तुला पटलं त्याचं असं न सांगता घरातून निघून जाणं?
चंदना : पटलेलं तर मलाही नाही..
चिंतामणी : एक्झ्ॉक्टली, नाही ना पटलेलं, मग कशाला त्याची बाजू घेते आहेस? थांब येऊ तर दे त्याला, बघतोच त्याच्याकडे. त्याची थेरं दिवसेंदिवस वाढतच चालली आहेत.
चंदना : मणी, अरे, असं काय करतोस? शांत हो ना जरा.
चिंतामणी : कसा शांत राहू? त्याचं वागणं बघ जरा. अगं, वेळीच याला आवर घातला नाही ना तर उद्या पश्चात्तापाची वेळ येईल.
चंदना : इतकं काही टोकाला जाण्याइतकी परिस्थिती नाही निर्माण झालीये.
चिंतामणी : चंदना, परिस्थितीचं गांभीर्य तुझ्या लक्षातच येत नाहीये, का मुलावरच्या प्रेमापायी तू त्याच्याकडे दुर्लक्ष करते आहे?
चंदना : दोन्हीही नाही. फक्त मला असं वाटतंय की, तू सुतावरून स्वर्ग गाठतो आहेस. अरे, अजून कशाचा कशाला पत्ता नाही आणि तू कुठपर्यंत जाऊन पोचला आहेस.
चिंतामणी : म्हणजे काय? हे असे विचार ही विषवल्ली आहे. ती वेळीच खुडून टाकली पाहिजे.
चंदना : मला तरी असं वाटतं, तुला वाटतो तितका चैतन्य बेजबाबदार नाही..
चिंतामणी : आधी मलाही असंच वाटायचं. पण तो मोठा होतोय ना तसं त्याला वाटतंय त्याला शिंगं फुटली आहेत. हल्ली बघ, प्रत्येक बाबतीत वाद, भांडणं. पूर्वी शब्द झेलायला तयार असणारा मुलगा आता फक्त शब्दानं शब्द वाढवत जातो. इतका त्रास होतो ना चंदना त्याच्या वागण्याचा..
चंदना : तो ज्या वयात आहे त्या वयाचा विचार केला तर हे स्वाभाविक नाही का मणी? जरा भूतकाळात डोकावून बघ. अरे, हे वयच असं वेडं असतं.
चिंतामणी : अरे, म्हणून तर मोठय़ा माणसांचं ऐकायला पाहिजे ना. आम्ही कशासाठी आहोत मग? इथे काडीची अक्कल नाही आणि चाललाय बापाला शिकवायला! आम्हीही त्या वयातून गेलोय. पण असे वेडेपणे नाही केले. हा असा बापाच्या जिवाला घोर नाही लावला कधी!
चंदना : खरं?
चिंतामणी : खरं म्हणजे? खरंच. दादांच्या पुढे तोंड वर करून बोलायची शामत होती का आमची?
चंदना : मग आताही चैतन्यनं तसंच वागायला हवं का?
चिंतामणी : मग, मी बाप आहे त्याचा!
चंदना : मणी, रागावू नकोस, पण माझ्या मते तू ना चैतन्याचा खूप बुद्धी भेद करतो आहेस..
चिंतामणी : बस का! आली का गाडी परत माझ्यावर.. तुला ना हल्ली दुसरा काही उद्योगच राहिला नाहीय. येता जाता मलाच टोकत असतेस. चिरंजीवही तेच फीलिंग देत असतात. मला तर हल्ली बोलावंसंच वाटत नाही त्यामुळे. मी ऑफिसमध्ये असतो ना तेच बरं असतं. तो आणि तू बघून घ्या.
चंदना : मणी, प्लीज, शांत हो. मला वाटलंच होतं तू रागावणार म्हणून. यातून सुटण्यासाठी ऑफिसमध्ये वेळ काढणं किंवा घराबाहेर राहाणं हा उपाय आहे का? ती पळवाट आहे. मला एक सांग, तू आता जे बोललास ते चैतन्य बोलला असता तर चाललं असतं का तुला? केवढा गहजब केला असतास. म्हणून मी काय म्हणते आहे ते ऐकून तर घे. तुला वाटतोय तेवढा हा प्रश्न मोठा नाहीये रे. तू मला एक सांग, तू चैतन्यचा कोण आहेस?
चिंतामणी : ए, काय डोकंबिकं फिरलंय का तुझं? हा काय प्रश्न झाला?
चंदना : डोकं पूर्ण ताळ्यावर ठेवून मी हा प्रश्न विचारला आहे. तू फाटे न फोडता, प्रतिप्रश्न न विचारता उत्तर दे.
चिंतामणी : त्याचा बाप.
चंदना : ओके, म्हणजे नात्यानं तू त्याचा बाप आहेस. पण तुमच्यातलं काय नातं तू लहानपणापासून त्याच्यावर बिंबवत गेला आहेस?
चिंतामणी : ..
चंदना : का रे, गप्प बसलास? लौकिक अर्थानं तू त्याचा बाप असलास तरी खरं नातं मित्रत्वाचं आहे हेच तू त्याच्या मनावर ठसवलंस. अगदी त्यासाठी त्यानं तुला आहोजाहो करू नये, यासाठी आग्रहही धरलास. चैतन्यनं तुला अरे-जारे म्हणणं दादांना अजिबात मान्य नव्हतं, तर त्यांच्याशीही वाद घातलास.
चिंतामणी : अरे हो, पण त्याचा काय संबंध आता?
चंदना : आहे. आताच खरा संबंध आहे. कारण चैतन्य जसा मोठा होतोय तसा तू तुझी मित्रत्वाची भूमिका सोडून कुठे तरी बापाच्या भूमिकेत शिरतो आहेस. चैतन्य तुझ्याशी मित्रत्वाच्या नात्यानं बोलायला जातो आहे आणि तू त्याच्याशी बापाच्या भूमिकेतून बोलायला जातो आहेस.. तू केव्हा बापाच्या भूमिकेत असतोस आणि केव्हा मित्राच्या भूमिकेत असतोस, हेच त्याला कळत नाही..
चिंतामणी : न कळायला काय झालं? लहान आहे का आता?
चंदना : बघ, किती सहजी भूमिका बदलतोस तू. कालच काय सांगत होतास त्याला? तो लहान आहे अजून आणि आज म्हणतो आहेस, लहान आहे का आता? म्हणजे तुझ्या सोयीनं तू त्याला लहान आणि मोठा ठरवणार.
चिंतामणी : अगं, पण असं तर होणारच ना. तो इतकाही लहान नाहीये की साध्या साध्या गोष्टी कळू नयेत आणि इतकाही मोठा नाहीये की त्याचे निर्णय त्यानं घ्यावेत.
चंदना : हो नं. म्हणूनच हे वेडं वय असतं. अरे, जिथे आपल्यालाच तो केव्हा लहान आणि केव्हा मोठा हे कळत नाही, तिथं त्याला काय कळणार?
चिंतामणी : मग आपण काय करायचं?
चंदना : आपण त्याचा कल बघून वागायचं. म्हणजे जेव्हा त्याला मोठं वागवावं असं वाटत असेल तेव्हा आपण त्याला मोठय़ा मुलासारखंच वागवायचं. त्याला जेव्हा लहान व्हावंसं वाटतं तेव्हा तसं वागवायचं. मित्र म्हणून बोलावसं वाटत असेल तर मित्र म्हणून गप्पा मारायच्या..
चिंतामणी : अगं, हे किती अवघड आहे.
चंदना : पालक होणं, पालकत्व निभावणं सोपं नसतंच मुळी. पण मी म्हणतेय तसा प्रयत्न करून तर बघ.
चिंतामणी : हो. आता आपली आज्ञाच आहे म्हटल्यानंतर करतो प्रयत्न. महाराणी साहेबांची मर्जी सांभाळायलाच हवी.
चंदना : मी नाही इतकी र्वष दोन मुलांना सांभाळलं? आणि यापुढेही सांभाळावं लागणार असं दिसतंय.
चिंतामणी : कोण बाबा ही दोन मुलं? ए, लग्नाआधीचं काही लफडं बिफडं नाही ना..
चंदना : मार खाशील हं आता. त्या धाकटय़ा मुलाला सांभाळणं सोपा पण मोठा मुलगा? नको रे बाबा..
shubhadey@gmail.com