Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात

आपल्याच स्वप्नरंजनात रममाण असणाऱ्यांना डोळे उघडायला लावणारं सदर ‘थर्ड आय’.
मुंबईच्या लोकल ट्रेनमधून एक मुलगा आणि त्याचे ‘सावत्र’ वडील प्रवास करीत असतात. त्या मुलाच्या सावत्र बापाला कोणीतरी धक्काबुक्की केली; थोडीफार बाचाबाची झाली. आजूबाजूचे प्रवासी मध्ये पडले. काहीजण खवळले. तर काही समजावू लागले. तो मुलगा मात्र ‘हे तुम्ही जे काही केलंत, ते योग्य नाही केलंत,’ असा फक्त निषेध नोंदवत राहिला. असं का? कारण बहुतेक त्याचा बाप ‘सावत्र’ होता म्हणून असेल कदाचित! त्या बापलेकांचं रक्ताचं नातंच नव्हतं, तर मग कुठून येणार ती कणव? तो जिव्हाळा?
कलामसाहेब तुमचंही थोडंफार तस्संच झालंय्. तुम्ही या देशाचं सर्वोच्च पद भूषवलंत पण त्या सर्वोच्च पदावर निवड होताना, दुर्दैवाने तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे शिलेदार नव्हतात. त्यामुळे गेल्या एप्रिल महिन्यात जेव्हा एखाद्या अमेरिकन विमान

 

कंपनीकडून तुम्हाला अपमानास्पद वागणूक मिळाली असली आणि तुम्ही माजी राष्ट्रपती आहात तरीही इथे तुमच्या रक्ताचं म्हणजे पक्षीय रक्ताचं नातं असलेले कोणी ‘राजकीय नातेवाईक’च तुम्हाला नाहीत. त्यामुळे तुमच्या अपमानाचं फारसं कोणाला अप्रूप नाही..
अगदीच चारचौघात, जगात किंवा ‘सार्क’ देशाच्या समूहात आपली लाज जाऊ नये म्हणून संसदेत थोडाफार गदारोळ झाला. त्या गदारोळाचा आमच्या सहिष्णू आणि षंढ जनतेने ‘लाइव्ह टेलिकास्ट’सुद्धा बघितला, पण ही कणव इतकीच! त्या ट्रेनमधल्या मुलासारखी. राजकीय नातेवाईक नसलेली सर्वोच्च पदावरची व्यक्ती म्हणून तुम्ही ‘सावत्र’च राहिलात. अहो, इतिहास बघा ना; या देशाचे राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती हे कोणत्या ना कोणत्या तरी राजकीय पक्षाचे शिलेदार होते. पक्षसेवा (राष्ट्रसेवा नव्हे!) केल्याचं बक्षीस म्हणून मग त्यांना सर्वोच्च पद बहाल करण्यात आलं. अर्थातच कायदेशीर मतदान करूनच! पण शेवटी ‘ते’ पद भूषवणारे सर्वच जण राजकीय रक्ताचं नातं असणारे होते.
आज जर तुम्ही कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचे नातेवाईक असता तर तुमच्या या अपमानाचा केवढा निषेध झाला असता, मोर्चे निघाले असते; अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने झाली असती. पक्षाचे झेंडे अभिमानानं मिरवत, जाळपोळ झाली असती. ‘त्या’ अमेरिकन विमान कंपनीने, सुरक्षेच्या कारणास्तव तुम्हाला तुमचे ‘जोडे’ काढायला लावले ना? मग तुमचे जर कोणी राजकीय नातेवाईक असते, तर त्यांनी त्या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांची जोडय़ांचे हार घालून धिंड काढली असती.
पण तसं काहीच झालं नाही आणि होणारही नाही. कारण तुम्ही ‘राष्ट्रभक्त’ आहात, ‘राजकीय पक्षाचे भक्त’ नाहीत. तुम्ही तुमच्या कष्टाने, कर्तृत्वाने या राष्ट्राची सेवा करत राहिलात. त्या सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्यावरही तुम्ही ‘पाच वर्षात बरेच काही राहून गेलं’ म्हणून पुन्हा राष्ट्रसेवा करायला लागलात. चेन्नईच्या विद्यापीठात तुम्ही शिक्षक म्हणून नव्हे तर पुन्हा एकदा एक ‘विद्यार्थी’ म्हणून रुजू झालात. पण त्यापेक्षा जर तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाचे ‘माजी शिलेदार’ असता तर? सर्वोच्च पदावरून निवृत्त झाल्यावरही देशाच्या राजकारणात, सामाजिक आणि आर्थिक घडामोडीत लक्ष घालून लुडबूड केली असतीत तर त्या अमेरिकन विमान कंपनीचं एकही विमानच इथे उतरलं नसतं, एवढा तुमचा अपमान जिव्हारी लागला असता हो!
कलामसाहेब, तुम्ही या देशाचं सर्वोच्च पद भूषवलंत म्हणजे थोडक्यात या भारत नावाच्या कुटुंबाचे तुम्ही पालनकर्ते होतात. ‘भारत’ नावाच्या या घरातली कर्ती-सवरती व्यक्ती! तुम्ही कितीही श्रेष्ठ, सर्वोच्च असलात किंवा आदरणीय असलात तरीही त्या विमान कंपनीचे परदेशी विमान कंपनीचे, परदेशी शिष्टाचाराचे, सुरक्षेचे नियम तुम्ही पाळायलाच हवेत, असा इथल्या काही लोकांनी सूर आळवलाय. कारण आपल्या या देशात म्हणे सर्वाना समान वागणूक असायला हवी. इथे उच्च-नीच भेदभावाला थारा नाही. परंतु या माझ्या बंधू आणि भगिनींना हे लक्षात येत नाही, की हा अपमान, हे नियमांचं कठोर पालन, आपल्या घराच्या चौकटीत येऊन झालंय. प्रत्येक घराचे, प्रत्येक चौकटीचे, प्रत्येक देशाचे काही अंतर्गत कायदे असतील की नाही? मग आमच्या घरातले, आमच्या चौकटीतले, आमच्या देशातले कायदे मोडीत काढणाऱ्या आणि स्वत:चे कायदे ‘या’ चौकटीत राबवणाऱ्या ‘बाहेरच्या’ लोकांचे चोचले खपवून घ्यावेसे का वाटले, तुमच्या या घरातल्या, तुमच्या या देशातल्या लोकांना?
कारण तुम्ही या घरातले नक्कीच आहात पण इथे तुम्हाला कोणी राजकीय नातेवाईक नाहीत. इथल्या जमिनीवर, इथल्या भिंतीवर, इथल्या विटेच्या प्रत्येक तुकडय़ावर, इथल्या छतावर, इथल्या माणसांवरही तुमचं जीवापाड प्रेम आहे. या घराशी, या राष्ट्राशी तुमची निष्ठा आहे पण तरीही तुमचे इथे कोणी राजकीय नातेवाईक किंवा कुणाशीही राजकीय रक्ताचं नातं नाही म्हणून तुम्ही ‘सावत्र’च नाही ना राहिलात?
पण कलामसाहेब नाइलाज आहे हो! जोपर्यंत या देशात ‘राष्ट्रप्रेमा’पेक्षा, पक्षप्रेम- व्यक्तिपूजा, लांगूलचालन यालाच महत्त्व दिलं जातं, तोपर्यंत हे असंच चालणार आणि मग आर्थिक बळाच्या जोरावर स्वत:ला बलाढय़ मानणाऱ्या प्रत्येक राष्ट्राचा त्या देशांवर, येनकेन प्रकारेण अंकुश राहणार. तुमच्याच देशात, तुमच्याच मायभूमीवर, तुमच्याच कर्मभूमीवर, आज दोनशे वर्षानी पुन्हा एकदा त्या गोऱ्या मंडळींनी तुमचा so called insult केला, हे इथल्या जनतेला कळायलासुद्धा तीन महिने लागले. कारण तुमचा अपमान झाला, तेव्हा इथे सगळे ‘निवडणुका’ नावाचा खेळ खेळत होते. सत्तेसाठी हपापलेल्या त्या प्रत्येकाला, आपल्या खुर्चीचं प्रेम जास्त महत्त्वाचं होतं. पण तुम्ही जर त्यातल्या एका जरी राजकीय पक्षाचे नातेवाईक असता ना तर तुमच्या अपमानाचा ‘मुद्दा’ उपस्थित करून, सगळा खेळ अजून रंगतदार करता आला असता, पण तुम्ही तुमच्या कार्यात आणि राष्ट्रप्रेमातच मग्न राहिलात.
अमेरिकेसारखा बलाढय़ देश मात्र, अशा सर्व देशांची, तिथल्या संस्कृतीची, तिथल्या राहणीमानाची, तिथल्या आर्थिक दुर्बलतेची जंत्री/ नोंद आपल्या वहीत हुशारीने करून ठेवतो. मागच्या एका लेखात मी लिहिलं होतं ना, ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए।’ ते ‘झुकनेवाले’ देश आणि ‘राज्यकर्ते किंवा जनता’ कोण, हे अमेरिकनाना चांगलंच ठाऊक आहे.
प्रकाश आमटे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला, परंतु तो स्वीकारण्यासाठी तिथे उपस्थित राहण्यासाठी सुद्धा, अमेरिकन वकिलातीने त्यांना अडवलं. त्यांच्या कायदेशीर दृष्टीकोनातून, ‘आमटे’ ही व्यक्ती योग्य आणि सुरक्षित नव्हती. असाच एखादा पुरस्कार जर आपल्या देशाकडून, एखाद्या परदेशी व्यक्तीला जाहीर झाला असता, तर आपल्या भारतीय वकिलातीने, त्या परदेशी व्यक्तीच्या बाथरूमपासून, या देशापर्यंत ‘रेड कार्पेट’ घातलं असतं. एखाद्या देशाचे र्निबध काटेकोर, कडक असू शकतात. परंतु मग आपणही आपल्या मायभूमीतल्या या पुत्रांचं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक स्थान’ त्या देशाला, परदेशस्थांना पटवून द्यावयाची जबाबदारी का घेऊ नये? त्यांच्या ‘राष्ट्रभक्ती’ची, निष्ठेची जाणीव का करून देऊ नये? कारण आपले राज्यकर्ते खंबीर नाहीत, आपल्या राष्ट्रप्रेमापेक्षा, बंधूभावापेक्षा, त्यांना हितसंबंध आणि खुर्चीप्रेम जास्त महत्त्वाचं वाटतं.
आज माजी राष्ट्रपतींचा विमानाच्या पायऱ्यांवर, तोही आपल्याच देशात अवमान होतो, परंतु या देशातले अनेकजण आपली परंपरा, आपली संस्कृती जगाला दाखवण्याच्या प्रयत्नात असतात, तेव्हा ‘फक्त’ अमेरिका हा एकमेव so called बलाढय़ देश, त्यात आपल्या नियमांचा काटेकोरपणा आणि शिस्त दाखवत, वाट अडवत राहतो. आणि त्यांची ही मक्तेदारी, आमचा देश, आमचे राज्यकर्ते, आम्ही मुकाटपणे स्वीकारतो. तेव्हा त्यांच्या पायरीची ओळख करून द्यावी असे आमच्या राज्यकर्त्यांना, संस्कृतीरक्षकांना का नाही वाटत?
जुलै महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेत, फिलाडेल्फिया येथे, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे विश्व अधिवेशन झालं. त्या कार्यक्रमाचे निमंत्रण असूनही सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे आणि मराठी संस्कृतीचा आवाज, अजूनही वयाच्या ८० व्या वर्षी बुलंद करणारे, शाहीर विठ्ठल उमप यांना अमेरिकन वकिलातीकडून प्रवेश नाकारण्यात आला. आपली संस्कृती जगभरात पसरावी यासाठी, शाहीर विठ्ठल उमप यांच्यासाठी कोणीही सरकारी पातळीवर प्रयत्न केले नाहीत, असा शाहीरांनी स्वत: आरोप केला, पण हेच आपल्या देशाकडून मायकेल जॅक्सनच्या बाबतीत झालं असतं तर? मायकेल जॅक्सनला जर भारतात व्हिसा नाकारला असता, तर अमेरिकन सरकारने आपल्या एका तरी कलाकाराला, त्यांच्या देशात पाय ठेवू दिला असता?
का सहन करतो आपण एखाद्या देशाची मक्तेदारी? एखाद्या देशाच्या एका कंपनीकडून झालेला अपमान? तोही याच मातीत? याच मायभूमीवर? क्लिंटनला या देशाबद्दल प्रेम वाटतं, पण म्हणून या माजी अध्यक्षाची, भारतभेटीच्या वेळी त्यांच्याच देशात, विमानाच्या पायऱ्या चढताना भारतीय सुरक्षेच्या नावाखाली, शारीरिक तपासणी करता येईल? आपला एक कर्तव्यदक्ष अधिकारी, त्यांच्याच देशात त्यांची अशी तपासणी करण्यापूर्वी, आपल्या राज्यकर्त्यांनी त्यानंतर आपल्यापुढे काय वाढून ठेवलं असेल, याचा दोन सेकंदात १०० वेळा विचार करेल, पण अमेरिकन वकिलातीमधला एखादा अधिकारी आपल्या काटेकोर नियमांसाठी आणि राष्ट्रप्रेमासाठी, संपूर्ण अमेरिकेच्या कौतुकास पात्र ठरतो, ही आपल्यासाठी शरमेची बाब आहे.
पण तूर्तास ‘कलाम’ किश्श्याबद्दल आपण एवढंच म्हणू शकतो की, कलामसाहेब, तुमच्या अपमानाबद्दल आम्ही फक्त सह्य़ा गोळा करून निषेध नोंदवू शकतो किंवा संसदेत निषेधाचा ठराव करू शकतो. फार फार तर अमेरिकन सरकारला ‘हे तुम्ही जे काही केलंत, ते योग्य नाही केलंत’ असं एक ओळीचं पत्र पाठवू शकतो, पण तुम्ही या देशाच्या सर्वोच्चपदाबरोबरच, एका तरी राजकीय पक्षाचे नातेवाईक असता, एका तरी राजकीय पक्षाचा रक्तगट तुमच्या रक्तगटाशी जुळला असता ना, तर मा कसम! नुसतं डोळ्यापुढे चित्र आणा की आम्ही काय काय केलं असतं.. मग माझ्यासारख्या हतबल स्तंभलेखकाची ‘सावत्र’ हा शब्द वापरायचीही हिंमत झाली नसती.
sanjaypethe@yahoo.com