Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण

पर्यावरणाचा समतोल राखणं हा विषय आपल्याकडे फार प्रश्नचीन काळापासून हाताळला गेला आहे. पर्यावरणाबद्दल आताच विचार होतोय असं अजिबात नाही. पशुपक्षी, वृक्षवल्ली यांची जोपासना नि वाढ होण्याच्या दृष्टीने प्रत्येक गावाबाहेर गर्द झाडी- जंगल असे. वृक्षवल्ली गावांत तर असतच पण दोन गावांमध्ये व्यवस्थित जंगल राखलं जाई. जंगल तोड करून तेथे वस्ती करीत नसत.
अगदी महाभारत काळीसुद्धा याची प्रचीती आपल्याला येते. बाळकृष्णाला अवघ्या आठव्या-नवव्या वर्षी याची उत्तम जाण होती. कोणीही म्हणेल कशावरून? पण बाळकृष्णाच्या बाललीला आठवून पाहा, म्हणजे सहज ध्यानात येईल. गाई राखणारा हा गोपालकृष्ण गोवर्धन पर्वताची काळजी गाईंइतकीच घेताना आढळतो. उत्तम, मृदू सुरावटींच्या सहवासात वृक्षवल्लींची वाढ चांगली होते. कर्कश संगीत त्यांच्या वाढीला बाधक ठरते, हे सिद्ध झालं आहे. उगाच का बाळकृष्ण जंगलामधूनसुद्धा बासरीचं मधुर गुंजन करीत होता, त्याच्या मुरलीच्या मंजुळ नादब्रह्माने अवघे विश्व मंत्रमुग्ध होत असे. गायी-गुरंच काय

 

वृक्षवल्लीसुद्धा स्तब्ध होऊन त्या मंजुळ स्वराने आनंदित होत, मग माणसांची कथाच काय? गोपी उगाच का खुलावल्या होत्या. कृष्णाने बासरीचा वापर एवढय़ाचसाठी केला असावा. तेथे वेळूची बनंही अधिक, त्यामुळे बासरी सहज उपलब्ध होणार शिवाय आजसुद्धा सर्व वाद्यांमध्ये बासरीचाच आवाज कानांना अधिक मधुर असल्याचे जाणवते.
कालिया नागाची कथा माहीत नसणारे विरळाच. निदान यमुनेच्या डोहातून खवळलेल्या कालियाने फणा बाहेर काढलेला नि एका हातात कृष्णाने कालियाची शेपटी धरलेली नि कालियाच्या डोक्यावर बाळकृष्ण नाचतो हे चित्र कुठे ना कुठे पाहिलेले असतेच. त्यामुळे लोकांना ही कथा थोडी का होईना माहीत असते, पण तशी ही कथा बहुतेकांना जुजबी माहीत असते. मुलांनाही ही कथा वर वर सांगितली जाते. यमुनेच्या काठी मुलं विटी-दांडू खेळत असता विषारी डोहात विटी जाऊन पडते. बरं डोहाचे पाणी विषारी तरी किती? या काठावरून त्या काठावर उडत जाणारे पक्षी डोहात मरून पडत. अशा डोहात पडलेली विटी आणायला बाळकृष्ण उडी घेतो. मला नातवंडांनी विचारले, अगं आजी, दुसरी विटी नसती का घेता आली खेळायला? आम्ही चौपाटीवर फूटबॉलने खेळताना फूटबॉल गेला समुद्रात. लाटेबरोबर आतच जायला लागला तेव्हा आम्ही दुसरा फूटबॉल घेतला पण समुद्रात गेलो नाही. त्यावर मी उत्तर दिले, केवळ विटी आणायला बाळकृष्ण गेला नव्हताच मुळी. ज्या कालियाने यमुनेचे पाणी विषारी केले, गायी-गुरं, पशुपक्षी पाणी पिताच मरू लागले, पक्षी तर पाणीही न पिताच मरत अशा विषारी पाण्याच्या काठची झाडेझुडपे तरी कशी जगतील? या विषारी पाण्यामुळे हवा दूषित झाली नि आजूबाजूच्या परिसरात पाणी टंचाई निर्माण झाली. हे सारे कालियामुळे घडले. हा समाजावर कालियाने केलेला अन्याय बाळकृष्ण कसा सहन करणार? त्याच्या जन्मच मुळी दुष्टांच्या नाशासाठी झालेला होता. विटीचे निमित्त होते डोहात उडी मारण्यासाठी. पण कालियाला यमुनेच्या डोहातून हुसकावून लावणे हे महत्त्वाचे कार्य कृष्णाला करायचे होते. पाणी टंचाईमुळे होणारा सामाजिक अन्याय नि विषारी पाण्यामुळे नि वायूमुळे पर्यावरणाचा ऱ्हास या महत्त्वाच्या कारणासाठी बाळकृष्णाने कालिया नागाला डोहांतून हाकलले. कालिया तेव्हा बाळकृष्णाला म्हणाला, ‘मी येथून कसा जाऊ? मला गरुडाची भीती वाटते.’ त्यावेळी बाळकृष्णाने त्याला सांगितले, ‘तुझ्या डोक्यावर माझी पावले उमटली आहेत. ती पाहून तुला गरुड काहीही करणार नाही.’ आजची कॉम्प्युटर युगातली मोबाईल वापरणारी १०-१२ वर्षाची मुलं हुशार आहेत. आमच्यापेक्षा अधिक माहिती (कॉम्प्युटर नि मोबाईलची) अधिक आहे. त्यांनी मला ही कथा ऐकताना प्रश्न विचारला, ‘गरुडाची भीती कालियाच्या डोक्यावरील पावले पाहिल्यामुळे नाहीशी होते असे कृष्णाने का सांगितले? याचा अर्थ काय?’ त्यांना मी सांगितले ‘कृष्ण हा विष्णूचा अवतार मानतात. विष्णूचं वाहन गरुड, विष्णू शेषावर पहुडलेला म्हणजे विष्णूची नागाशी नि गरुडाशी सलगी आहे. या दोघांचे आपसात जरी वैर असले तरी हे दोघे विष्णूच्या म्हणजेच कृष्णाच्या आज्ञेत आहेत.’ एवढी कथा सांगावी तेव्हा कालियाची कथा पूर्ण होते. यावरून महाभारतकाळीसुद्धा पर्यावरणाच्या रक्षणाचा विचार होता. ‘झाडे लावा नि झाडे जगवा’ हे सार्वकालिक आहे.
बाळकृष्णाला एवढय़ा लहानपणी एवढी समज कशी, असा काहींना प्रश्न पडू शकतो आणि त्यामुळे या कथा काल्पनिक म्हणण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. त्या काळी नंदालासुद्धा लोकं विचारीत, तुझा मुलगा असा कसा? त्यावर नंदा सांगत असे, तुझा मुलगा देवाचा अवतार असल्याने तो अचाट कृत्ये करील असे ऋषिमुनींनी मला सांगितले आहे आणि म्हणूनच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘तुझ सगुण म्हणू की निर्गुण रे। सगुण निर्गुण एक गोविंदु रे।।’ जो प्रश्न ज्ञानेश्वरमाऊलीला पडला, त्याचे उत्तर आपण पामर काय देणार? भारतात असा एकही संत, नाही की जो कृष्ण चरित्राने मोहित झाला नाही. महाराष्ट्रातील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आदी संतांनी कृष्णाच्या अगाध बाललीलांचे कौतुक केले आहे. उत्तर भारतात सूरदास, मीराबाई यांची लेखणीही कृष्णाच्या लीलांनी पावन झाली आहे.
संत शिरोमणी तुकाराम महाराज तर म्हणतात- ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन चरे.’ केवळ माणसांपुरता संतांनी विचार केला नाही. मानवतेचे खोटे ढोलही बडवले नाहीत.
वेदांमध्ये तर अंतरिक्ष शांति: असा उल्लेख आढळतो. म्हणजेच आजच्यासारखीच यानं अवकाशात त्या वेळीही सोडली जात असली पाहिजेत. वाटेल तशी याने सोडून त्यांच्यात टक्कर होऊन ‘अंतरिक्ष शांति’ बिघडू शकते हेच सूचित होत नाही काय? आमच्या पूर्वजांनी केवळ पृथ्वीचाच विचार केला नसून अवकाशाचा-अंतरिक्षाचाही केला आहे..
पर्यावरणाबरोबर.
उषा गिंडे