Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..

माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..
एक गमतीदार किस्सा आहे. योशुआ बेल (Yoshua Bell) हे नाव ऐकून तुमच्या मनात कदाचित काहीच घंटा किणकिणणार नाहीत. योशुआ बेल हा जगप्रसिद्ध अमेरिकन क्लासिकल व्हायलनिस्ट आहे. वयाच्या चौदाव्या वर्षापासून तो आपल्या व्हायोलिनने लोकांना मंत्रमुग्ध करतो आहे. जगभर त्याचे कार्यक्रम सोनी आयोजित करीत असते. कार्यक्रम जाहीर झाला की लोकांची झुंबड उडते आणि अत्यंत महागडी अशी तिकिटं तासा- दोन तासांत संपतात. या योशुआ बेलला घेऊन

 

‘वॉशिंग्टन पोस्ट’ या दैनिकाने २००७ साली एक प्रयोग केला. वॉशिंग्टन डीसी या टय़ूब रेल्वेच्या स्टेशनवर योशुआ बेल सर्वसामान्य पोशाख घालून साधारण माणसासारखा व्हायोलिन वाजवीत बसला. समोर व्हायोलिनची केस उघडी ठेवून. हेतू हा की, ऐकणाऱ्या लोकांनी त्यात काही पैसे टाकावेत. या जगद्विख्यात व्हायलनिस्टला किती लोकांनी ओळखलं असेल?.. कुणीच नाही. त्याच्यासमोर २५-३० डॉलर्सच्या वर रक्कमही जमा झाली नाही. ज्याचे संगीत ऐकण्यासाठी लोक शेकडो डॉलर्स खर्च करायला तयार होते त्याची ही परिस्थिती का झाली असावी?
दुसरा किस्सा आहे खुद्द चार्ली चॅप्लीनचा. त्याची ती मिशी, काठी आणि चालण्याची ढब प्रचंड लोकप्रिय झाल्यानंतर एका संस्थेने चार्ली चॅप्लीनसारखा अभिनय करणाऱ्यांसाठी एक स्पर्धा ठेवली. त्यात स्वत: चॅप्लीन गेला. त्याला कोणी ओळखलं तर नाहीच पण त्याचा नंबर दुसरा आला. म्हणजे स्वत: चॅप्लीनलाही चॅप्लीनसारखा अभिनय करता आला नाही का? बालगंधर्व स्त्री वेशात जाऊन हळदीकुंकू घेऊन आले ही कथाही आपल्याला माहीत आहे. हे असं का झालं असावं? जाहिरातीच्या भाषेत याला म्हणतात ब्रँडिंग. एखादा ब्रँड जाहिरातीच्या तंत्राने मोठा केला जातो, तेव्हाच लोकांना त्याचे महत्त्व पटते.
अगदी कंपनीच्या किंवा उत्पादनाच्या नावापासूनही ही सुरुवात होऊ शकते. ग्राहकांच्या मनात असलेल्या एखाद्या नावाशी काय जोडलं जावं याच्या कल्पना मोडीत काढून तुम्ही काही विकू शकत नाही. म्हणजे पाहा, तुम्ही ज्या वेळी बाजारातून तयार लोणचं आणायला जाता त्या वेळी नकळत तुमचा हात बेडेकर, कुबल, प्रवीण किंवा तत्सम भारतीय नावाच्या लोणच्यांकडे जातो. कारण सोपं आहे. लोणचं ही संकल्पना भारतीय आहे. त्यामुळे त्याचे नावही भारतीय असल्याने तुम्हाला त्याच्या सच्चेपणाची मनात खात्री वाटते.
मदर्स रेसीपीचे लोणचे वाईट नसेल कदाचित पण ते तुम्ही घेण्याचा संभव फार कमी आहे. पण जर तुम्ही नूडल्स घ्यायला गेलात तर जोशींचे किंवा मानकामेंचे नूडल्स घेणार नाही. त्यासाठी मॅगी किंवा तशाच परकीय नावाचा ब्रँड तुम्हाला लागेल. कारण नूडल्स आपल्या नाहीत.
पुडय़ातून येणाऱ्या बिस्किटांची नावे आंग्लाळलेली लागतात पण सायकलवरून फिरणाऱ्या विक्रेत्याकडून आपण खारी घेतो. कुकीज घेत नाही, नानकटाई घेतो. अत्यंत महत्त्वाचा घटक आहे हा. अगदी आत्ता आत्ताचं उदाहरण घ्या. दांडी नमक हा मिठाचा ब्रँड एवढा लोकप्रिय का व्हावा? जवळपास ८० टक्के मार्केट शेअर या मिठाने खावा? का? कारण एकच, दांडी हे नाव. दांडीच्या सत्याग्रहाचा मिठाशी इतका जवळचा संबंध आहे की त्यामुळे हे नाव लगेच ठसले. इतके ठसले की टाटा मिठाला देश का नमक अशी देशप्रेमाची संकल्पना घेऊन जाहिराती कराव्या लागल्या. देश का नमक या वाक्याला तसा काय अर्थ आहे सांगा?
जिथे विक्री आहे तिथे ब्रँडिंग आहे. मनोरंजनाचे क्षेत्र त्याला अपवाद कसा असेल? जर आपण तयार केलेले कार्यक्रम लोकांना आवडायला हवे असतील, तर आपल्या लोकांना सतत ते समोर दाखवले पाहिजेत. तुम्हाला काय वाटतं कार्यक्रम तयार करणाऱ्या किंवा तो प्रक्षेपित करणाऱ्या लोकांना आपला कार्यक्रम फालतू आहे किंवा आपण त्यात मिसळ करतोय हे कळत नसेल? एवढय़ा बुद्धिमान लोकांना हे कळतं, पण त्यांना त्यांचे चॅनेल किंवा कार्यक्रम विकायचा असतो. इंडियन आयडॉल झाला अभिजीत सावंत. त्याचे पुढे काय झाले? म्हणजे करिअर काय झाले? पण जेव्हा तो कार्यक्रम चालू होता तेव्हा म्हणजे देशात सगळ्यात महत्त्वाचे काय असेल तर आयडॉल अशी हवा निर्माण केली गेली होती आणि आता? कुठल्या तरी पक्षात प्रवेश केला म्हणून त्याचे फोटो छापावे लागतात.
उगवत्या सूर्याला सलाम करणारे क्षेत्र आहे हे. तिथे दया, माया, लोभ, मोह नाही, वस्तू वापरायची, घासून गुळगुळीत झाली की ती फेकून द्यायची.. किंवा दुसरी चांगली नाही मिळाली तर जुन्यालाच पॉलीश करून ती वापरत राहायची. सारेगमप हा झी मराठीचा ब्रँड झाला. उत्तम पद्धतीने पेश करून त्यांनी तो बनवला. तुम्हाला आठवत असेल तर सगळ्या टीव्ही कलाकारांना घेऊन त्यांनी सारेगमप केलं होतं. त्याची पहिली फेरी झाल्यावर या क्षेत्रातला एक तज्ज्ञ मला म्हणाला प्रसाद ओक जिंकणार. का? कारणही तयार होतं त्याच्याकडे. कारण त्याची एक मालिका जोरात झी मराठीवर चालू आहे. दुसऱ्याच कुणाला तरी मोठे करून त्यांना फायदा काय? एका गोष्टीचा फायदा सगळीकडे झाला पाहिजे. ब्रँडिंग म्हणतात ते यालाच. आणि तसंच झालं. म्हणजे प्रसाद ओक वाईट गायला असं मला मुळीच म्हणायचं नाहीये. पण असंही असू शकेल की नाही? तसाच स्टार्सच्या नाचाचा कार्यक्रम. त्यात तर अंतिम फेरीत काय राडे झाले तेही तुम्हाला आठवत असतील. त्यात कोण जिंकलं.. का जिंकलं? तुम्हीच आठवा आणि ठरवा. या कलाकारांमध्ये काही न्यून होतं असं दाखवण्याचा अजिबात हेतू नाही, पण त्याबरोबर इतर फायदे लक्षात घेतलेच नसतील असं नाही.
लहान मुलांचा सारेगमप ही तर लॉटरीच लागली. मग वर्षभर कार्यक्रम चाललाच पण आता प्रत्येक इव्हेंटमध्ये ही बच्चे कंपनी हवीच. कारण त्यांना पाहायला लोकांना आवडते. जे आवडते ते द्या. उदाहरण एका वाहिनीचं दिलं असलं तरी दुसरीकडे हेच चालू असतं. आणि त्यात मला काही गैरही वाटत नाही. लोकांना आपलं वाटतं की आपल्यासाठी कार्यक्रम चालू असतात. आपलं मनोरंजन व्हावं. आपल्या जीवनात दोन घटका आनंद निर्माण व्हावा म्हणून वाहिन्या पदरमोड करून कार्यक्रम करतात. तसं कृपया समजू नका. हा व्यवसाय आहे. ही जाहिरातीची नजर एकदा तुम्हाला मिळाली की कुठला कार्यक्रम का आला, कसं त्याला पेश केलं गेले, त्याचे पुढे काय झालं हे पाहण्यात तुम्हाला खूप गंमत येऊ लागेल. मग प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा हे पडद्यामागचं राजकारण किंवा व्यवसायनीती हा तुमच्या मनोरंजनाचा विषय बनेल.
आज मराठी वाहिन्यासुद्धा काही कलाकार बुक करून टाकतात. म्हणजे असं की त्यांनी त्यांच्या वाहिन्याचे कार्यक्रम वगळता दुसरीकडे कार्यक्रम करायचे नाहीत. त्यासाठी लाखो रुपये मोजले जातात. आधीच मराठीत कलाकार कमी. त्यात बरे नाववाले असे बुक होतात. मग मिळेल ते कलाकार. करा कार्यक्रम, बरं तेही नंतर मोठे होतात. प्रत्येकाला एक चेहरा लागतो. हे सगळे ब्रँड आहेत ते नट- नटय़ा आहेत. किंवा क्रिकेटर. कारण आपल्या देशात दोनच धर्म आहेत. सिनेमा आणि क्रिकेट. त्यातले जे हीरो आहेत त्यांचे अनुकरण करायला आम्हाला आवडतं. मग हेमा मालिनी एक भांडी घासायचा साबण विकत असेल तर तिने आयुष्यात कधी स्वत: भांडी घासली असतील का हा विचार आमच्या मनात येत नाही. आमची स्वप्नं आणि आमचे आदर्श कोण तर नट- नटय़ा. आज दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, राष्ट्रीय पातळीवर आदर्श बनेल असा एकही माणूस ही दोन क्षेत्रे सोडून नाहीच आहे. अमर्त्य सेन, अब्दुल कलाम, नंदन नीलकेणी अशी हाताच्या बोटावर मोजण्यासारखी व्यक्तिमत्त्वे आहेत, पण ती सामान्य माणसांपासून इतकी लांब आहेत की क्रिकेटर आणि नट-नटय़ांना पर्याय नाही. मग त्यांना जाहिरातदार कंपन्या लाखो-करोडो रुपये देऊन जर अडकवून टाकत असतील तर ते किती पैसे मिळवतात म्हणून ओरडा कशाला करायचा? आपल्या स्वत:ला एक ओळख निर्माण होईल, एक चेहरा मिळेल तो आपल्या कर्तृत्वावर मिळेल अशी महत्त्वाकांक्षा आपण ज्या दिवशी ठेवू त्या दिवशी हे बंद होईल, पण तो दिवस आपल्याला अजिबात पाहायला मिळणार नाही, याची मला खात्री आहे.
asparanjape1@gmail.com