Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा

जर्मन भाषा, संस्कृती आणि परंपरा यांची ओळख करून देणारं पाक्षिक सदर
नीडा नदीच्या काठाकाठाने ब्रेंटानो नावाच्या एका वृक्षवेडय़ाने (१७७५ ते १८५१) निवडक आणि दुर्मिळ वृक्षांचे संकलन करून एक मनोहर अरण्य तयार केले आहे. तेही फ्रँटफर्ट सारख्या मोठय़ा शहराच्या कुशीत. त्यातून मैलोन्गणती फेरफटका मारता येतो. असेच एकदा वृद्धांचा एक हसता खेळता थवा सायकलींवरून लहानपणी शिकलेल्या बडबडगीतांची उजळणी करीत बाजूने गेला. सगळे अगदी एकसुरात गात होते.
Aus den blauen Bergen kommen wir
आऊस देन ब्लाऊअन् बेर्गन् कोम्मन वीयर

 

Unser Lehrer ist genau so dumm wie wir
उंझर लेहर इस्ट गेनाऊ सो डुम्म वी वीयर

Mit Brille aufder Nase
मीट् ब्रील्ल आऊफ देअर नाझऽ

Sieht er wie'ne Osterhase
झीट एअर वी आईनऽ ओस्टर हाझऽ

Aus den blauen Bergen Kommen wir!
आऊस देन ब्लाऊअन् बेर्गन् कोम्मन वीयर

बडबडगीताचा सारांश असा-
निळ्या निळ्या पर्वतांचे आम्ही रहिवासी.
(पण)आमचे गुरुजी म्हणजे आमच्याएवढेच बिनडोकी.
इस्टर सणाच्या सशासारखा
त्यांचा तो नाकावर ओघळलेला चष्मा!
निळ्या निळ्या पर्वतांतले आम्ही रहिवासी!

गुरुजींची चेष्टामस्करी करण्यातला बाळपणातला आनंद हे वृद्धत्व पुन: असं शोधत होते. मन एकदम स्वत:च्या शाळेतल्या दिवसात हरवलं! आणि एकदम लक्षात आलं! अरे! आपल्याकडची शाळापद्धत आणि जर्मनीतली शाळापद्धत यात फार मोठा मूलगामी फरक आहे. म्हणून आज त्या विषयी थोडेसे!
जर्मनीतील ‘कूकू’ घडय़ाळे, त्यांचे प्रीसीजन इंजिनीअरिंग, ३०-३० वर्षे न कुरकुरता काम करणारी दणकट जर्मन यंत्रे या मागे तंत्रविज्ञानातील जर्मनीची हस्तकौशल्याची परंपरा ठामपणे उभी आहे. औद्योगिक क्रांतीच्या कितीतरी आधीची! विचार करता- करता त्याचे मूळ त्यांच्या आजच्या शाळापद्धतीपर्यंत पोहोचले. ऑस्ट्रिया वगळता जगभरातल्या दुसऱ्या कोणत्याही देशात या तऱ्हेच्या शाळापद्धतीचे समांतर उदाहरण दिसून येत नाही. त्यामुळे ती विशद करताना जर्मन शाळांच्या प्रकारांचे भाषांतर करणे ही महाकर्मकठीण गोष्ट. जर्मन राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला ‘शिक्षण’ हा मूलभूत हक्क दिला आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठविले नाही तर दारात पोलीस उभा राहू शकतो, इतक्या कठोरपणे त्याची अंमलबजावणीही केली जाते. शाळेत गणवेष हा प्रकार कटाक्षाने नाही. त्यामागे विचार असा की प्रत्येक व्यक्तीचे- मग ते लहान मूल का असेना- व्यक्तिमत्त्व हवे तसे उमलू देणे आणि शाळेला लष्करी बाजू आणू न देता शासक आणि प्रजा हा विचार गणवेशासारख्या दृश्य स्वरूपात रुजू न देणे. जर्मनीत शाळेची पाठय़पुस्तके सर्वाना मोफत तर आहेतच, पण शाळा आणि युनिव्हर्सिटीपर्यंतचे सर्व शिक्षण श्रीमंत-गरीब सर्वानाच मोफत आहे. अगदी अलीकडे काही काही युनिव्हर्सिटींनी ठराविक अभ्यासक्रमांसाठी प्रत्येक सेमिस्टरसाठी नाममात्र फी आकारायला सुरू केली आहे. जर्मनीची लोकसंख्या सतत कमी होत चाललेली असल्यामुळे करदाते कमी आणि वृद्ध जास्त असे समाजचित्र उभे राहत आहे. त्यामुळे सरकार पूर्वीसारखा पैशाचा पुरवठा सर्व ठिकाणी करू शकत नाही हे वास्तव होत चालले आहे. अन्न- वस्त्र- निवारा आणि शिक्षण हे मूलभूत हक्क आहेत म्हणताना भौगोलिक क्षेत्रफळ आणि लोकसंख्येची घटना या निर्देशांकावर आधारित किंडर गार्टनची संख्या कायद्याप्रमाणे निश्चित केली जाते हे ओघानेच आले. प्रत्येक आईवडिलांना वाहनाशिवाय मुलांना पायी पोहोचवता येतील इतक्या किंडर गार्टन्स शहर रचनेत उपलब्ध करून देण्याचे सरकारवर कायदेशीर बंधन आहे. या जर्मन किंडर गार्टनमध्ये काय शिकवतात? तर आई-बाबांच्या मदतीशिवाय आपली दिनचर्या आणि घरातली छोटी मोठी आपल्याला पेलतील अशी कामे आपण कशी करू शकतो याचे जीवनकौशल्य. ट्रॅफिकचे नियम पाळून दुकानातून अर्धा लीटर दुधाचे पाकीट आणणे, संडासात फ्लश केल्यावर पूर्ण पाणी जाईपर्यंत थांबणे, पॉट खराब असेल तर ब्रश फिरवणे आणि पुढच्या मुलासाठी टॉयलेट स्वच्छ व सर्व ठीकठाक आहे हे पाहूनच बाहेर येणे, डिश वॉशरमध्ये भांडी कशी अरेंज करणे, उद्या आपल्याला काय न्याहारी हवी त्यामानाने खरेदीची यादी आठवणे, खूप तऱ्हेचे खेळ, आठवडय़ातून एकदा पोहणे.. रोज एकदा जवळच्या पार्कमध्ये, सरोवराकाठी शुद्ध हवेत शिक्षिकेबरोबर हा सर्व बालचमू जाता-येताना बघायला खूप मजा येते. लिहिणे वाचणे या पापी गोष्टींना किंडर गार्टनमध्ये सक्त मज्जाव आहे. मग येते प्रश्नथमिक शाळा. पहिली ते चौथी. तिथे हळूहळू पेन्सिल हातात धरायला सुरुवात होते. इयत्ता चौथीनंतर एकदम या शाळापद्धतीला तीन फांद्या फुटतात. कुठले मूल कुठल्या फांदीच्या दिशेने जाणार हे मुलाचा आजवरचा कल पाहून शिक्षक व आई-वडील एकत्र बसून ठरवतात. कारण आता शाळेची जी शाखा ठरते त्यावर पुढे खूप काही अवलंबून असते.
चौथीनंतरचा शाळेचा पहिला ऑप्शन म्हणजे ‘हाऊप्टशूऽल’ (Hauptshchule). ही शाळा नववीपर्यंत असते. येथील अभ्यासक्रम अगदी जीवनावश्यक कौशल्यांवर आधारलेला. गणित, शास्त्र, वाणिज्य, कला यांची आवश्यक तेवढी बेतास बेत व सोपी करून सांगितलेली थिअरी. मूळ भर तंत्राधिष्ठित हस्तकौशल्यावर. म्हणजे टर्नर, फिटर, प्लंबर, बेकर, फ्लॉरिस्ट, रिटेल दुकानातला विक्रेता, केशकर्तन, हॉटेल मॅनेजमेंटमधले स्वयंपाकी, वेटर, सुतार, रंगारी, मेस्त्री अशा व्यवसायात रस असणाऱ्या मुलांनी उगाच लॅटिन आणि न्यूरोफिजिक्स कशाला कम्पलसरी शिकायचं? अशा विचारातून ही शाळेची शाखा तयार केली आहे.
त्यांची ही नववीची परीक्षा झाली की, मग ही मुले व्होकेशनल ट्रेनिंगच्या अभ्यासक्रमासाठी स्थापन केलेल्या व्यावसायिक प्रशिक्षण तंत्रनिकेतनामध्ये प्रवेश घेतात. त्यात त्यांनी तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. आठवडय़ातून दोन दिवस थिअरी आणि तीन दिवस प्रत्यक्ष त्या व्यवसायात आठ तासाचे काम अशी ती तीन वर्षे असतात. आपण बेकरी या व्यवसायाचे उदाहरण घेऊ. आठवडय़ातून दोन दिवसांच्या थिअरीत या मुलाने-मैद्याची वर्गवारी, घाऊक खरेदीतील तत्त्वे, बेकरी चालवण्यासाठी लागणारे कॉस्िटग, कर्ज मिळवणे, फेडणे, व्याजदरातील उलथापालथ, ओव्हनचे प्रकार, त्याचे जुजबी स्वरूपाचे रिपेअर्स, मैदा आंबण्याची प्रक्रिया असा ‘बेकरी’ या व्यवसायासंबंधित फिजिक्स, केमिस्ट्री, फूम्ड सायन्स, वाणिज्य यातले थिऑरॉटिकल/ पुस्तकी ज्ञान मिळवायचे. आठवडय़ातले उरलेले तीन दिवस हा मुलगा एका बेकरीत प्रत्यक्ष काम करतो आणि हे पुस्तकी ज्ञान प्रत्यक्षात वापरून बघतो. त्यासाठी त्याला स्टायपेंड मिळतो.
तीन वर्षानंतर परीक्षा दिली की तो एक तर एखाद्या बेकरीत नोकरी करू शकतो किंवा त्याची पुढे शिकायची इच्छा असेल तर आणखी दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तो ‘मास्टर्स इन बेकरी’ बनू शकतो. अशा Meister (माइस्टर) केलेल्या मंडळींनाच स्वत:ची बेकरी स्थापन करण्याची परवानगी असते. वरती दिलेल्या व्यवसायांची यादी पुन्हा वाचलीत तर जर्मनीत पूल, बिल्िडग्ज का पडत नाही? गळका नळ का दिसत नाही? याची उत्तरे मिळतील.
दुसऱ्या शाळेची शाखा म्हणजे ‘रेआलशूऽल’ Realschule. ही शाळा दहावीपर्यंत असते. ज्या मुला-मुलींना कार मेकॅनिक, लॅब असिस्टंट, दंतवैद्याचे असिस्टंट, बँक क्लार्क, इलेक्ट्रिशियन अशा व्यवसायात काम करायची इच्छा असते ती मुले या प्रकारच्या शाळेत जातात. या प्रकारच्या व्यवसायात बौद्धिक ग्रहण आणि हस्तकौशल्य यांचा योग्य मिलाफ आवश्यक असतो. थोडेसे इंजिनीअरिंग, बँकिंग, वैद्यकशास्त्र याचा जुजबी बेस असावाच लागतो. त्यानुसार या शाळेतील अभ्यासक्रम आखलेला असतो. त्यानंतरचा प्रवास तंत्रनिकेतन ते Meister (माइस्टर) हा पहिल्या शाळेच्या प्रकारासारखाच होतो. फक्त इथे थिअरीवर भर थोडा जास्त असतो, ज्या ज्या बेकरीज्, बँक्स, कार-गराज कंपन्या, दवाखाने अशा ट्रेनीजना दरवर्षी आपल्याकडे काम करण्याची संधी देतात, त्यांना करसवलतींबरोबरच तंत्रनिकेतनातील अभ्यासक्रम ठरवण्याचा- बदलण्याचा, परीक्षापद्धती ठरवण्याचा- बदलण्याचा बरोबरीचा हक्क असतो.
त्यामुळे १९११ सालातले तंत्रज्ञान ‘मम’ म्हणून शिकवले जात नाही. शिक्षणमंत्रालय, राजकीय नेते यांच्या ढवळाढवळीला इथे पूर्ण मज्जाव आहे. आपल्याकडे IIT कशा यशस्वी ठरल्या आहेत? तर औद्योगिक जगत आणि शिक्षणक्षेत्र यांच्याशी सदैव संवाद साधून त्यानुसार वेळोवेळी अभ्यासक्रमात योग्य ते बदल केले जातात. म्हणून IIT चे पदवीधर गलेलठ्ठ पगारांच्या नोकरीवर आमंत्रित केले जातात. कारण त्यांचे ज्ञान ते ताबडतोब उपयोगात आणू शकतात. बरोबर हीच संकल्पना या दोन व्यवसायाभिमुख शाळाप्रकारांमध्ये आहे. एरवी दाराची बेल बंद पडली म्हणताना किंवा गाडी बंद पडली तर आपल्याकडील इंजिनीअर म्हणवणाऱ्या फार थोडय़ा लोकांना हे स्वत: दुरुस्त करू शकण्याचा आत्मविश्वास असतो. कारण पुस्तकी ज्ञान आणि वापरायचे ज्ञान यात मुळी केवढी तरी प्रचंड दरी आहे.
जर्मनीतला तिसरा शाळाप्रकार म्हणजे ‘ग्यूम्नासियूम’Gymnasium. ही शाळा बारावीपर्यंतची असते. अभ्यासक्रम पहिल्यापासून जबरदस्त आणि खोलवर जाणारा. वाणिज्य, शास्त्र, कला, खेळ असा सर्वसमावेशी. अकरा ते बारा विषय, लॅटिन/ स्पॅनिश/ फ्रेंच यातली एक भाषा कम्पलसरी. जर्मन इंग्रजी उच्च प्रतीचे. कठोर परीक्षापद्धत, सर्व भर थिअरीवर. पुढे तुम्ही भले अॅस्ट्रोफिजिक्समध्ये डॉक्टरेट करा, पण इथे कान्टशिलर वगैरे अभ्यासावाच लागतो. तत्त्वज्ञान, वाङ्मय, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र इ. हातात हात घालून आत्मसात करावे लागतात. या शालेय परीक्षेचे नाव ‘आबिटुअर’ Abitur. उत्तम मार्कानी आबिटुअर पास झालो तरच हव्या त्या विषयात पुढे युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला मिळते. प्रत्येक सोम्यागोम्या युनिव्हर्सिटीत जाऊ शकत नाही. वर उल्लेख केलेल्या Hauptschule किंवा Realschule मधून युनिव्हर्सिटीत प्रवेश ही अशक्यप्रश्नय गोष्ट आहे. त्यामुळे ‘युनिव्हर्सिटी’ या शब्दाला वेगळे परिमाण, वेगळे वजन आहे. तो डोंबाऱ्याचा खेळ नव्हे किंवा डिग्रीज छापणारा छापखाना नव्हे. Gymnasium या प्रकारच्या शाळेत जाणारी मुलेच पुढे शिक्षक, इंजिनीअर, डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, भाषांतरकार इ. व्यवसायांत जाण्यासाठी युनिव्हर्सिटीतील प्रवेशाला पात्र ठरतात. साधारणत: २५ ते २८ वयवर्षापर्यंत मुळी त्यांचे शिक्षणच चालू असते. बारावीनंतर १०/१२ सेमिस्टरची ५/६ वर्षे! याउलट आधीच्या दोन शाळाप्रकारांत साधारण विसाव्या वर्षापासून हे विद्यार्थी आपल्या पायावर उभे राहू शकतात. घर, गाडी, वर्षातून एखादी दोन-तीन आठवडय़ांची सहल/सुटी असे स्थैर्यपूर्ण जीवन जगू शकतात. ही त्रिस्तरीय शाळापद्धती जर्मनीत यशस्वी होण्याचे मूळ कारण म्हणजे शारीरिक श्रम आणि बौद्धिक श्रम याला सारखेच महत्त्व देणारी जर्मन समाजपुरुषाची मानसिक आणि शासकीय बैठक. जर्मनीतल्या बीयर गार्टनमध्ये किंवा डॉक्टरच्या वेटिंग रूममध्ये एक प्रश्नेफेसर आणि कार मेकॅनिक यांच्यातील वर्गभेद फारसा ध्यानात येत नाही. त्यांच्यातील वरवरचे संभाषण एका लघुत्तम साधारण पातळीवर सुसंवादात बदलू शकते.
बीयर संपली की दोघे आपापल्या सायकलींवरून घरी जातात. एकाची हवी तर २००० युरोची सायकल असते तर दुसऱ्याची
E-bay वर २०० युरोत घेतलेली. म्हणून काय झाले? दवाखान्यात दोघांना त्याच प्रतीची ट्रीटमेंट आणि औषधे मिळतात. त्यात फरक येत नाही. म्हणून जर्मन लोक मोठय़ा अभिमानाने सांगतात की, आमची नग्न भांडवलशाही नाही. फ्री मार्केट इकॉनॉमीच्या जागी त्यांनी सोशल मार्केट इकॉनॉमीचा मध्यममार्ग पसंत केला. समाजाला दुभंगणारी वर्गशाही व्यवस्था वितळून टाकण्यात जर्मनीला बऱ्यापैकी यश आले आहे. सर्व तऱ्हेच्या श्रमाला सारखेच महत्त्व असल्यामुळे हाताची टिचकी वाजवून उद्दामपणे वेटरला बोलवण्याचे, आपला मेन्यू ठरेपर्यंत त्याने टेबलाजवळ उभे राहावे, अशी अपेक्षा ठेवण्याचे दृश्य इथे दिसत नाही. महात्मा गांधी जे बोलले ते या मंडळींनी बऱ्याच प्रमाणात स्वत:च्या समाजापुरते करून दाखवले असले तरी दुसऱ्या कुठल्या तरी स्वरूपात तो वर्गभेद कसा दृगोच्चर होत राहतो ते आपण पुढच्या सदरात पाहू.

* * *

भाषावर्ग:
या वेळेच्या भाषावर्गात आपण जर्मन भाषेच्या शब्दरचनेचे एक विशेष समजून घेऊ.
वरील लेखात आपण
Hauptschule/Realschule असे शब्द वाचले. हे शब्द दोन मूळ शब्दांपासून बनले आहेत.
Haupt+Schule
आणि Real + Schule
एकदा का आपल्याला समजले की शब्द कुठे तोडायचा की जर्मन भाषेतले मोठमोठे शब्द लीलया आत्मसात करता येतात. याचे आणखी एक उदाहरण बघूया? आता मी एक भलामोठा शब्द देते.
Hauptschulabschlussprüfung
Haupt+Schul+Abschluss+Prüfung असे यातले चार शब्द.
त्यातले पहिले दोन म्हणजे Hauptschule तर आपल्याला ठाऊक आहे.
Abschluss (अब्श्लूस्स ) म्हणजे शेवट आणि Prüfung ( प्रूॅय्फूंग ) म्हणजे परीक्षा.
तेव्हा या लांबलचक शब्दाचा अर्थ Hauptschule- हाऊप्टशूऽल या शाळाप्रकारची अंतिम परीक्षा. आता घ्या बरं तुम्ही हातात चाकू आणि पाहा बरं खालील शब्द योग्य ठिकाणी तोडता येतात का?
Hotelzimmerreservierung
Telefonrechnung
Automobilindustrie
मात्र तुमची उत्तरे तपासून पाहण्यासाठी तुम्हाला २० ऑगस्टपर्यंत धीर धरावा लागणार!
vaishalikar@web.de