Leading International Marathi News Daily
गुरुवार ६ ऑगस्ट २००९
  पाणी-बचतीचं प्रोजेक्ट
  ओपन फोरम
बॅग / पर्स मध्ये काय असतं?
  थर्ड आय
कलामसाहेब, तुम्ही ‘सावत्र’च ठरलात
  ब्लॉग कॉर्नर
बाळकृष्ण आणि पर्यावरण
  ग्रूमिंग कॉर्नर
संवाद साधण्याची कला..
  स्मार्ट बाय
  दवंडी
नाम बडे और दर्शन खोटे..
  लँग्वेज कॉर्नर
जर्मनीतील शाळा
  यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

यंग अचिव्हर
आगळ्यावेगळ्या

कुटुंबात कोणीही संगीतात करिअर केलेले नसतानासुद्धा केवळ मुलीची आवड म्हणून तिला सिंथेसायझर या अगदीच वेगळ्या वाद्याचे शिक्षण देऊन त्यातच करिअर करण्यास प्रश्नेत्साहन देणारे व त्या दिशेने तिची यशस्वी वाटचाल व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आई-वडील विरळाच, अशाच आगळ्यावेगळ्या आई-वडिलांच्या पोटी जन्मण्याचे भाग्य लाभलंय सिंथेसायझर शिकलेल्या व अगदी लहान वयातच सिंथेसायझरवर साथ करता करता संगीत संयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या दर्शना अमेय जोग व अगदी लहान वयातच सिंथेसायझरवर बोटे फिरवणाऱ्या अमृता ठाकूरदेसाईला.
दर्शना जोग
एखाद्या कुटुंबात संगीतात करिअर करणारे कोणीतरी असले तरीसुद्धा घरातल्या मुलीची संगीताची आवड जाणून तिला एखादे वाद्य शिकायची इच्छा आहे, हे जाणून प्रश्नेत्साहन दिले जात नाही. घरातल्या मुलीला नृत्य किंवा गायन यापैकी काहीतरी शिकवण्याकडे पालकांचा कल असतो. अभ्यासाव्यतिरिक्त मुलगी नृत्य किंवा गायन शिकलीय हे आपल्या आप्तेष्टांना

 

अभिमानाने सांगण्यासाठी किंवा लग्न ठरवताना एक विशेष क्वालिफिकेशन म्हणून उपयोग होईल या विचाराने मुलीला नृत्य वा गायन शिकवले जाते. एखादे वाद्य शिकवून त्यातच करिअर करण्यास तर अजिबात उत्तेजन दिले जात नाही. कुटुंबात कोणीही संगीतात करिअर केलेले नसतानासुद्धा केवळ मुलीची आवड म्हणून तिला सिंथेसायझर या अगदीच वेगळ्या वाद्याचे शिक्षण देऊन त्यातच करिअर करण्यास प्रश्नेत्साहन देणारे व त्या दिशेने तिची यशस्वी वाटचाल व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणारे आई-वडील विरळाच, अशाच आगळ्यावेगळ्या आई-वडिलांच्या पोटी जन्मण्याचे भाग्य लाभलंय सिंथेसायझर शिकलेल्या व अगदी लहान वयातच सिंथेसायझरवर साथ करता करता संगीत संयोजनाची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या दर्शना अमेय जोग व अगदी लहान वयातच सिंथेसायझरवर बोटे फिरवणाऱ्या अमृता ठाकूरदेसाईला. सिंथेसायझर हे वाद्य महिलांनी वाजवायच्ां वाद्यच नाही, अशी जणू आपल्या समाजाची धारणा असताना या दोन तरुणींनी हे आगळेवेगळे वाद्य शिकून प्रश्नविण्य संपादन केलंय. कार्यक्रमात सिंथेसायझरची साथ करता करता सर्व गाण्यांचे संगीत संयोजन करणे, अशी दुहेरी कामगिरी अगदी सहजतेने व कुशलतेने पार पाडणारी दर्शना एकमेव महिला असावी.
दर्शना जोग ही सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांची नात-सून, अलका जोग व श्रीनिवास जोग यांची सून, अमेय जोग यांची पत्नी तर सुनंदा व विष्णू नांदुरकर यांची सुकन्या. नाशिकमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या दर्शनाला अगदी तिसरीत असल्यापासूनच गाण्याची आवड होती. घरात कुणालाच संगीतात गती नव्हती, पण चुलत वहिनी योगिता नांदुरकर मात्र गात असे. आपणही तिच्यासारखे गाण्यातच करिअर करावे, अशी स्वप्ने दर्शना नेहमीच बघत असे. तिची वहिनी गाण्याचे क्लासेस घेत असे, सुरुवातीला दर्शना दाराआड उभी राहून चोरून गाणे ऐकत असे. नंतर ती क्लासमध्ये जाऊन बसू लागली, गाणे शिकली व हळूहळू ती छोटय़ा मुलांना गाणे शिकवू लागली. तिथेच बघून बघून हार्मोनियम शिकली. तिची आवड बघून आईने तिला गाणे शिकायला पाठवले. पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ती पुण्यात आली आणि तिची करिअरची दिशाच पक्की झाली. विजय बक्षी यांच्याकडे ती प्रथम गाणे शिकली व त्यानंतर अद्वैत पटवर्धन यांच्याकडे ती सिंथेसायझर वाजवण्यास सहा महिन्यांतच शिकली. हार्मोनियमची आवड असणाऱ्या दर्शनाला विविध वाद्यांचे आवाज काढणाऱ्या सिंथेसायझरचीच पुढे गोडी लागली. जबरदस्त आकलनक्षमता, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास याच्या जोरावर दर्शना अद्वैत पटवर्धन यांच्या अनुपस्थितीत त्यांचे क्लासेस सांभाळू लागली. हळूहळू गणपतीत छोटय़ा छोटय़ा कार्यक्रमात सिंथेसायझरवर साहाय्यक म्हणून साथ करणाऱ्या दर्शनाचे एक मुलगी म्हणून कौतुक होऊ लागले व तिला इतरही कार्यक्रमासाठी बोलावले जाऊ लागले. या कार्यक्रमामध्ये साथ करताना तिला प्रकर्षाने जाणवलं की, ऑर्केस्ट्रात अनेक वाद्यांचा समावेश असूनही गाणी जशीच्या तशी वाजवली जात नाहीत, त्यातले बारकावे राहून जातात, लोक खूप खोलात जात नाहीत, छोटय़ा छोटय़ा जागा घेत नाहीत. जे काय करायचे ते परफेक्ट करायचे, त्यात उणिवा ठेवायच्या नाहीत, या तिच्या जात्याच, स्वभावामुळे अगदी लहान वयातच म्हणजे ज्या वयात गाणे शिकायचे त्या वयातच तिने संगीत संयोजनाचे आव्हान स्वीकारले. तिची संगीताची जाण, लाघवी बोलणे, कामावरची निष्ठा, मेहनत करण्याची चिकाटी, गाणे अगदी बारीकसारीक बारकाव्यासह जसेच्या तसे सादर करण्याची हौस विशेषत: जुन्या गाण्यातील वाद्यांचे पिसेस हुबेहूब लोकांपर्यंत पोहोचवण्याची जिद्द, जन्मजात नेतृत्वगुण इ.मुळे तिने संगीत संयोजनाची जबाबदारी अगदी लहान वयात पहिल्याच कार्यक्रमात उत्तम रीत्या पार पाडली आणि त्यानंतर तिला मागे वळून बघावेच लागले नाही.
आपल्या संगीत संयोजनातील करिअरच्या सुरुवातीचे श्रेय ती श्रुती संस्थेचे बेलवलकर यांना देते. त्यांनी तिच्यावर विश्वास टाकून ही जबाबदारी दिली नसती तर दर्शनाच्या या सुप्त गुणाचा विकास खुंटला असता. त्यानंतर ओ. पी. नय्यर यांच्या गीतांचा कार्यक्रम, मनोहारी सिंग यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम, आकाशवाणीवर गीत रामायणाचा कार्यक्रम, गीत रामायणाचा सांगता कार्यक्रम, आर. डी. बर्मन यांच्या गीतांचा कार्यक्रम यामध्ये तिचा यशस्वी सहभाग होता. आता तर तिचे सतत कार्यक्रम चालूच आहेत. हल्लीच लतादीदींच्या वाढदिवसाच्या दिवशी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सादर केलेल्या ‘दीदी आणि मी’ या कार्यक्रमात हृदयनाथजींबरोबर सिंथेसायझरवर साथसंगत करण्याचे भाग्य तिला लाभले. महाराष्ट्रात इतरही तो कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमामुळे तिची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला लवकरच होईल. पुण्यात शंकर महादेवनबरोबरही गणेश क्रीडा केंद्रातील कार्यक्रमात तिचा सहभाग होता. ओ. पी. नय्यर यांच्या गाण्यांवर आधारित ५२ गाण्यांचा आणि २३ वादकांचा सहभाग असलेल्या दोन दिवस सादर केलेल्या कार्यक्रमात संगीत संयोजनाचे काम करताना दर्शनाला खूप शिकायला मिळाले. नवे अनुभव आले. दर्शना सांगते, ‘संगीत संयोजनाचे काम म्हणजे एखाद्या कुशल कार ड्रायव्हरसारखे असते. ड्रायव्हरला पुढे, मागे, आजूबाजूला खूप सावधपणे लक्ष ठेवावे लागते व त्यानुसार ड्रायव्हर जसा गाडीचा वेग कमी-जास्त करतो व वाहनावर ताबा ठेवतो तसेच गाण्यालाही सांभाळावे लागते, कधी वेग वाढवावा लागतो, कधी कमी करावा लागतो. हल्ली प्रत्येक संगीताच्या कार्यक्रमात अनेक वादक मंडळी असतात, त्या सगळ्यांची वैयक्तिक प्रॅक्टिस करून घ्यावी लागते, परत सगळ्यांचा मेळ बसवावा लागतो, गायकाचे हावभाव इ. बाबतीत मार्गदर्शन करावे लागते. गाण्याची नोटेशन्स काढावी लागतात, एका गाण्याचे नोटेशन काढायला एक तास लागतो, बरेच वादक बारीक बारीक जागा सोडतात, त्यामुळे त्यांना वाद्यावर कधी हलका हात फिरवायला सांगायला लागते, तर कधी कधी जोरात वाजवून घ्यावे लागते. जुन्या वाद्यांवर प्रॅक्टिस करून घ्यायला वेळ लागतो. मी वयाने लहान असल्याने सर्व कार्यक्रमात वादक आणि गायक माझ्यापेक्षा मोठेच असतात, त्यांच्याकडून करवून घ्यायचे म्हणजे मला अवघडल्यासारखे होते. ओ. पी. नय्यर यांच्या गाण्याच्या कार्यक्रमातील ५२ गाण्यांची प्रॅक्टिस मुंबईत तीन आठवडे चालू होती. कारण १५-२० वादक मुंबईचेच होते. परत पुण्यातल्या वादकांची वेगळी प्रॅक्टिस व सगळ्यांची मिळून एकत्र प्रॅक्टिस असा एक महिनाभर कार्यक्रम चालू होता. संगीत संयोजनासाठी मेहनत व चिकाटी तर हवीच, पण कार्यक्रम सादर केल्यानंतर लोकांची पसंती ऐकून श्रमपरिहार होतो.’ सतत नवीन कार्यक्रम घ्यायचे, निरनिराळे कार्यक्रम ऐकायचे, लोकांना भेटायचे, माहिती करून घ्यायची व स्वत:ची संगीत संयोजनाची व सिंथेसायझरची कला विकसित करायची हा तिचा अखंड कार्यक्रम चालू असतो.
दर्शना पुढे सांगते, ‘मी हे सगळे करू शकले ते माझे पती आणि सासरच्या सर्वाच्याच सहकार्यामुळे व प्रश्नेत्साहनामुळेच. माझे पती अमेय जोग सिंथेसायझर वाजवतात. रेकॉर्डिगमध्ये त्यांचा जास्त सहभाग असतो, कार्यक्रमात गातातही. माझे आजे सासरे प्रभाकर जोग यांच्या ‘गाणारं व्हायोलिन’ या कॅसेटचे सगळे काम त्यांनीच सांभाळलंय. गाण्याचे नोटेशन काढण्यास त्यांची खूपच मदत होते. प्रभाकर जोग यांचे मार्गदर्शनही खूप मोलाचे असते. समोरच्याला चटकन समजेल असे नोटेशन काढ, असा त्यांचा आग्रह असतो, त्याबाबत ते मला मार्गदर्शन करतात. माझ्या सासू-सासऱ्यांचाही सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. सिंथेसायझर हे वाद्य १५ किलो वजनाचे आहे. त्याशिवाय नोटेशन स्टॅन्ड, बॅग इ. उचलून न्यायचे, प्रवास करायचा म्हणजे खूप दमणूक होते, खूप दमल्यावर भलत्या वेळी जरी मला झोपावेसे वाटले तरी त्यांची ना नसते, उलट तेच मला आराम करायला सांगतात. माझ्या सासूबाई गाणे शिकलेल्या नाहीत, पण इतकी वर्षे ऐकत आल्या असल्याने त्यांचा कान छान तयार झालाय, आवडही आहे, त्यामुळे त्या आमच्या गाण्याच्या चर्चामध्ये खूप इंटरेस्ट घेतात, प्रश्न विचारतात, शंकांचे निरसन करून घेतात, त्यामुळे खूप बरे वाटते. माझ्या करिअरमध्ये माझ्या आई-वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी मला प्रश्नेत्साहन दिले, क्लास लावलाच, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिशय महागडा उत्तम प्रतीचा सिंथेसायझर घेऊन दिलाय. मेडिकल किंवा इंजिनीअरिंगला अॅडमिशन घेतली असतीस तर फी भरावी लागलीच असती ना असा विचार करून त्यांनी एवढे महागडे वाद्य मला घेऊन दिले म्हणून मी आज इतकी प्रगती करू शकले. चांगले चांगले कार्यक्रम सादर करून लोकांना भरपूर आनंद मिळवून द्यायचा हेच माझे ध्येय आहे.’
अमृता ठाकूरदेसाई
ज्या वयात फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद जीवन जगत हुंदडायचे, बागडायचे, पाटर्य़ामध्ये मजा करायची, त्या वयात अमृता ठाकूरदेसाई ही पुण्याच्या स. प. महाविद्यालयात द्वितीय वर्ष कलाशाखेत शिकता शिकता, सिंथेसायझर शिकलीय व त्यातच प्रश्नविण्य मिळवण्यासाठी धडपडतेय. अमृताचे वडील महेश ठाकूरदेसाई गिटार, मेंडोलीन व सरोद वाजवतात. नोकरीबरोबरच वाद्य वाजवणे हा छंद त्यांनी जोपासलाय. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच अमृताच्या कानावर सूर पडत होते. वडील वाजवायला बसले की छोटी अमृता तिथेच घोटाळायची, कान देऊन ऐकायची. तिच्या घरी एक छोटेसा सिंथसायझर होता. तिच्या गाण्याची आवड बघून वडील तिला सिंथेसायझर वाजवायला शिकवत. पुढे शिरीषा जोशी यांच्याकडे ती हार्मोनियम वाजायला शिकली व हार्मोनियमच्या तीन परीक्षाही दिल्या. शाळेच्या संगीत शिक्षिका गोडसेबाई तिला हार्मोनियम वाजवायला प्रश्नेत्साहन देत. शाळेच्या सर्व कार्यक्रमात हार्मोनियम वाजवायला अमृताच असायची, त्यामुळे स्टेजवर कार्यक्रमात सहभागी होण्याची सवय तिला अगदी लहानपणापासूनच लागली. हार्मोनियमकडून सिंथेसायझर या सहसा मुली न वाजवणाऱ्या वाद्याकडे कशी वळलीस? या माझ्या प्रश्नावर अमृता झटकन उत्तरली, ‘हार्मोनियमवर गाणे वाजवताना मर्यादा पडतात, संपूर्ण गाणे अगदी व्यवस्थित वाजवायचे तर सिंथेसायझर शिकायला हवे हे मला लहानपणीच सिंथेसायझर वाजवायला शिकल्यामुळे लक्षात आले होते. त्यामुळे मी पण दर्शनाप्रमाणेच अद्वैत पटवर्धन यांच्याकडे सिंथेसायझरचे सहा महिने शिक्षण घेतले. सिंथेसायझर वाजवायला खूप अवधान ठेवावे लागते. या एकाच वाद्यातून सर्व प्रकारच्या वाद्यांचे आवाज काढता येतात, त्यामुळे झटकन बोटे फिरवावी लागतात. हवी तिथे बोटे फिरली तर त्या त्या वाद्यांचा आवाज येतो, त्यामुळे खूप एकाग्रता ठेवावी लागते.’
अमृताच्या करिअरची सुरुवात झाली ती वडिलांच्या तिच्याबद्दलच्या आत्मविश्वासामुळे व प्रश्नेत्साहनामुळेच. अमृताचे वडील टेल्को कंपनीत नोकरी करतात आणि टेल्कोच्या लोकांचा कलासागर नावाचा ग्रुप असून त्यातर्फे वर्षभर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. टेल्कोच्या लोकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून त्यांच्याच लोकांचा कार्यक्रम असल्याने, अमृताला नेहमीच भाग घ्यायला मिळत असतो व लोकांची कौतुकाची थापही तिला स्फूर्तिदायी ठरते. कॉलेजच्या स्पर्धामध्येही तिचा सहभाग असतो. तिची आई जरी संगीत शिकलेली नसली तरीसुद्धा मुलीला सतत प्रश्नेत्साहन व पाठिंबा देऊन पुढील वाटचालीस प्रेरित करते. कुठेही कार्यक्रम असेल, कितीही वाजता असेल, तरी तिची अमृताला सोबत करण्याची तयारी असते. अमृताला जर्मन विषयात बी. ए. करून भाषांतरकार म्हणून काम करायचंय, पण त्याच वेळी सिंथेसायझर वाजवण्याचे करिअरही चालू ठेवायचे आहे.
सिंथेसायझरची साथ व संगीत संयोजन या महिलांसाठी आगळ्यावेगळ्या क्षेत्रात आत्मविश्वासाने पाय रोवणारी दर्शना व अभ्यासाबरोबरच चिकाटीने व जिद्दीने सिंथेसायझरमध्ये प्रश्नविण्य मिळवण्यासाठी धडपणारी अमृता, आजच्या तरुणींना प्रेरणादायी ठरतील यात शंकाच नाही.
शैलजा सांगळे