Leading International Marathi News Daily

गुरुवार, ६ ऑगस्ट २००९

विविध

अमेरिकेच्या दोन महिला पत्रकारांची उत्तर कोरियाच्या बंदीवासातून सुटका
वॉशिंग्टन ५ ऑगस्ट/पीटीआय
अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन हे सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी त्या देशात गेले पाच महिने पकडून ठेवण्यात आलेल्या दोन महिला अमेरिकी पत्रकारांची सुटका करण्यात यश मिळवले आहे. क्लिंटन यांनी उत्तर कोरियाचे वरिष्ठ नेते किम जोंग- द्वितीय यांच्याकडून या दोन महिला पत्रकारांसाठी खास माफी मिळवली व नंतर ते त्या दोघींना घेऊनच प्याँगयाँग येथून अमेरिकेकडे रवाना झाले, असे बिल क्लिंटन यांचे प्रवक्ते मॅट मॅकेन्ना यांनी सांगितले. क्लिंटन यांनी लॉरा लिंग (३२) व युना ली (३६) या दोघींना उत्तर कोरियातील बंदीवासातून सोडवले आहे, असे मॅकेन्ना म्हणाले.

‘ड्रोन’ हल्ल्यात बैतुल्ला मेहसूदची पत्नी ठार
इस्लामाबाद, ५ ऑगस्ट/पी.टी.आय.

वझिरिस्तान येथील आदिवासी भागात अमेरिकेच्या चालक विरहित विमानाने (‘ड्रोन’) आज केलेल्या हल्ल्यात तालिबान प्रमुख बैतुल्ला मेहसूद याच्या पत्नीसह तीन जण ठार झाले. मेहसूद याचे सासरे मलिक इक्रमुद्दीन यांच्या दक्षिण वझिरिस्तान येथील घरावर स्थानिक वेळेनुसार मध्यरात्री १२.४५ वाजता ‘ड्रोन’द्वारे हल्ला करण्यात आला. मात्र हल्ल्यावेळी मेहसूद या घरात उपस्थित होता का, याबाबतचा तपशील अद्याप उपलब्ध झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. लपण्यासाठी बैतुल्ला मेहसूद या घराचा अनेक वेळा वापर करीत असे.

दिलीपकुमार यांना ‘भारतरत्न’ देण्याची चित्रपट उद्योगाची मागणी
‘नेटवर्किंग’द्वारे प्रचार सुरू
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट/पी.टी.आय.
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविण्यात, यावे अशी मागणी चित्रपट उद्योगातूनच पुढे आली असून या संदर्भात राष्ट्रपतींना पाठविण्यात येणाऱ्या निवेदनास दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांतपासून बॉलीवुडचा बादशाह शाहरुख खानपर्यंत अनेक नामवंतांनी पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या पुढाकारातून ‘दिलीपकुमार फॉर भारतरत्न’ ही फेसबुक कम्युनिटी उघडण्यात आली आहे.

आघाडीच्या चाचपणीसाठी ‘राष्ट्रवादी’ नेत्यांच्या हालचाली
नवी दिल्ली, ५ ऑगस्ट/खास प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसदरम्यान आघाडी होणार की नाही, या तूर्तास गुलदस्त्यात असलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे दिल्लीत दाखल झाले. आघाडीचे काय होणार हा प्रश्न पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून काँग्रेसच्या नेत्यांशी ‘संपर्क’ वाढविण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख यांच्यासोबत, तर नागरी विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी ठाकरे यांच्याशी चर्चा केली.

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
जीनिव्हा ५ ऑगस्ट/पीटीआय

अमेरिकेसारख्या प्रगत देशासह अनेक ठिकाणी स्वाईन फ्लूची साथ पसरत असून या रोगाची साथ आटोक्यात येण्यास अजून बराच कालावधी लागणार आहे. या दरम्यानच्या काळात अंदाजे २ अब्ज लोकांना स्वाईन फ्लूच्या इन्फ्लुएंझा ए एच १ एन १ विषाणूची लागण होण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात ही धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत किती जणांना या विषाणूची लागण झाली आहे हे अजून निश्चितपणे समजलेले नसले तरी स्वाईन फ्लूची लागण काही रूग्णांमध्ये सौम्य स्वरूपाची असू शकते. जगभरातील १५ ते ४५ टक्के लोकांना या रोगाची लागण होण्याची शक्यता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. असे असले तरी तीस टक्के लोकांना स्वाईन फ्लूची लागण होण्याची शक्यता गृहित धरून धोरण निश्चिती करायला हवे असे या संघटनेचे मत आहे. जगातील ६ अब्ज लोकसंख्येपैकी ३० टक्के लोकांना लागण होईल असे गृहित धरले तर जगात जवळपास दोन कोटी लोकांना स्वाईन फ्लूची लागण होईल असे म्हणावे लागेल.

गुजरातच्या शाळांमध्ये सरकार देणार आवळा कँडी!
बडोदा, ५ ऑगस्ट/पी.टी.आय.

महाराष्ट्रात सर्व शाळकरी मुलांना पोटभर जेवण देण्यासाठी खिचडी देण्याची योजना भ्रष्टाचारामुळे करपण्याच्या बेतात असताना गुजरात मात्र मुलांचे केवळ पोट भरण्यासाठी नव्हे तर त्यांची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी आणि बौद्धिक कुवत सुधारण्यासाठी प्रयत्नरत आहे. यासाठी प्रत्येक मुलाला आवळा कँडी देण्याची योजना आखली जात आहे.गुजरातचे आरोग्य व कुटुंबकल्याणमंत्री जयनारायण व्यास यांनी या योजनेची माहिती दिली. महाराजा सयाजीराव विद्यापीठात आवळ्यावर आयोजिण्यात आलेल्या एका परिसंवादादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना ‘माध्यान्ह भोजना’बरोबर आवळा कँडी देण्याची योजना तयार करा, अशी सूचना आपण विख्यात आहारतज्ज्ञ मृणालिनीदेवी पौर आणि विद्यापीठाचे कुलगुरु रमेश गोयल यांना केली असल्याचेही ते म्हणाले. या योजनेनुसार आंगणवाडीसेवकांना आवळा कँडी तयार करण्याचे तसेच आवळ्याच्या रोपवाटिका उभारण्याचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आवळा अतिशय गुणकारी, सहज परवडण्याजोगे आणि जीवनसत्वांनी युक्त असे फळ असून तो ऊर्जेचा मोठा स्रोत असल्याचे ते म्हणाले.

काश्मीर स्वतंत्र झाल्याशिवाय शांतता अशक्यच
पाकिस्तानने दाखवले खायचे दात!
इस्लामाबाद, ५ ऑगस्ट/वृत्तसंस्था

दहशतवादी कारवाया सुरू असल्या तरी चर्चा सुरूच राहील, असे संयुक्त निवेदनाद्वारे भारताकडून वदवून घेतल्याला तीन आठवडे उलटत नाहीत तोच पाकिस्तानने आपल्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचा निर्वाळा देत काश्मीर जोवर स्वतंत्र होत नाही तोवर दक्षिण आशियात कायमची शांतता नांदू शकत नाही, अशी घोषणा केली आहे.भारत-पाकिस्तानच्या १६ जुलैच्या संयुक्त निवेदनात काश्मीर प्रश्नाचा उल्लेखही नव्हता. या पाश्र्वभूमीवर पत्रकारांनी छेडले असता परराष्ट्र खआत्याचे प्रवक्ते अब्दुल बसित म्हणाले की, आमच्या परराष्ट्र धोरणात कोणताही बदल झालेला नाही. आम्हाला आजही स्वतंत्र काश्मीरच हवे आहे. काश्मीरमधील जनतेच्या इच्छेनुसार काश्मीर प्रश्न सोडवण्यावर आम्ही ठाम आहोत.आता पाकिस्तानात लोकशाहीनियुक्त सरकार आले असल्याने उभयपक्षी चर्चेचा मार्ग अधिक व्यापक झाला आहे. आता या पाठबळावर आम्ही आमचे उद्दिष्ट अधिक वेगाने साधू शकतो, असेही ते म्हणाले. भारताबरोबरचे अनेक प्रश्न चर्चेने सोडवता येऊ शकतात. त्यामुळे उभय देशांतील चर्चा महत्त्वाचीच आहे, असेही त्यांनी नमूद केले.

काश्मीरमध्ये चकमकीत नऊ अतिरेकी ठार
श्रीनगर, ५ ऑगस्ट/वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या सहा चकमकींत हिजबुल मुजाहिदीन संघटनेच्या म्होरक्यासह ९ जण ठार झाले.पाकव्याप्त काश्मीरमधून पहाटे घुसखोरी करू पाहणाऱ्या अतिरेक्यांशी सीमारेषेवर मंगळवारी लष्कराची पहिली चकमक झडली. ताबारेषेजवळील तंगधर भागामध्ये झालेल्या या चकमकीमध्ये तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल जी.एस. ब्रार यांनी दिली. काश्मीर खोऱ्यातील चकमकींमध्ये पाच दहशतवादी ठार झाले. त्यात हिजबुल मुजाहिदीन या काश्मीरमधील सर्वात मोठय़ा समजल्या जाणाऱ्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या नूर मुहंमद ऊर्फ मन्सूर याचाही समावेश आहे. दोडा जिल्ह्यातील चकमकीत तो ठार झाला. ताबारेषेवर पूंछ क्षेत्राजवळ लष्कराशी झालेल्या चकमकीत आणखी एक दहशतवादी ठार झाला, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.

संक्षिप्त
अमहदिनिजाद यांचा शपथविधी

तेहरान, ५ ऑगस्ट/पी.टी.आय.
जोरदार राजकीय विरोध चिरडून टाकत इराणचे ५२ वर्षांचे कडवे नेते महम्मद अहमदिनिजाद यांनी आज अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. जूनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत त्यांच्या निवडीला आक्षेप घेत विरोधकांनी चालविलेले उग्र आंदोलन पोलिसांनी आज चिरडून टाकले. या शपथविधी समारंभाला पार्लमेंटच्या २९० सदस्यांपैकी २४० सदस्य उपस्थित होते. बडे विरोधी नेते तसेच अहमदिनिजाद यांचे कडवे विरोधक मिर हुसेन मौसवी हे मात्र समारंभास उपस्थित नव्हते. धार्मिक नेते म्हणून दबदबा असलेले माजी अध्यक्ष अकबर हशेमी राफसंजानी यांचीही गैरहजेरी जाणवत होती.

दुष्काळप्रश्नी मुख्यमंत्री बैठकीची मागणी
हैदराबाद : देशाच्या विविध भागांत असलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीबाबत तसेच अन्नधान्याच्या कडाडलेल्या दरांबाबत ठोस चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, जीवनावश्यक वस्तूंचे भाव आटोक्याबाहेर जात असल्याने सामान्य नागरिक भरडला जात आहे. दरवाढ रोखण्यासाठी आणि पर्यायी पिकांसाठी केंद्राने कृतीयोजना आखली पाहिजे. या महिनाअखेरीस भाववाढीविरोधात भाजप आंदोलन उभारणार आहे. १७ ऑगस्टपासून भाजपची तीन दिवसांची चिंतन बैठक होत असून त्यात या आंदोलनाची रूपरेखा ठरविली जाणार आहे.

सौदीतील आगीत भारतीयासह सहा मृत्युमुखी
दुबई : आठवडय़ाच्या सुरुवातीला सौदी अरेबियात एका गॅस प्लॅंटमध्ये झालेल्या गळतीनंतर लागलेल्या आगीत एका भारतीयासह सहाजण ठार झाले. अथेन्स येथील कन्सॉलिडेटेड काँन्ट्रॅक्टर इंटरनॅशनल कंपनीच्या खुरासानियाह गॅस प्रोसेसिंग प्लँटलगत निवासी भागामध्ये ३० हजार कामगार राहतात. रविवारी सकाळीच येथे आग लागली व कामगार निद्रावस्थेत असतानाच त्यांच्यावर काळाने झडप घातली. ४० कामगार बेपत्ता झाले असून मृतांमध्ये तीन बांगला देशी व एक भारतीय आहे.

व्यायामशाळेत गोळीबार; चार ठार, १० जखमी
न्यूयॉर्क : पिट्सबर्ग या शहराच्या बाहेरील एका व्यायामशाळेत एका माथेफिरू बंदुकधाऱ्याने केलेल्या बेछूट गोळीबारात चारजण ठार तर १० जण जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबारात हा माथेफिरू ठार झाला असून त्याची ओळख मात्र पटलेली नाही. रात्री आठच्या सुमारास हा माथेफिरू बंदुकधारी व्यायामशाळेच्या कोपऱ्यात काही काळ उभा राहिला. त्यानंतर त्याने खोलीचे दिवे घालविले आणि गोळीबार सुरू केला. व्यायामशाळेच्या दुसऱ्या मजल्यावर व्यायाम करणाऱ्या डेनिस करी (२८) याने सांगितले की, हा हॉल किंकाळ्या आणि वेदनांनी भरून गेला. या घटनेत १० महिला जखमी झाल्या आहेत.

चीनमध्ये प्लेगची साथ
बीजिंग : पश्चिम चीनमधील एका खेडय़ात न्यूमोनिक प्लेगच्या साथीत तिघे दगावले आहेत. अनेक लोक या गावातून पळून गेले आहेत. लोकांची काटेकोर तपासणी केली जात आहे. या गावाची लोकसंख्या दहा हजार आहे.