Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

अग्रलेख

काळजीची साथ!

 

‘स्वाईन फ्लू’ ने चारच दिवसांपूर्वी पुण्यातील रिदा शेख या चौदा वर्षांच्या विद्यार्थिनीच्या रूपात देशातील पहिला बळी घेतला आणि इतके दिवस काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या या विषयाकडे मीडियासह नागरिकांचेसुद्धा एकदम लक्ष वेधले गेले. इलेक्ट्रॉनिक मीडियाला तर एकाएकी सरकारी आरोग्य यंत्रणेची आठवण झाली. अनेक नागरिकांनी सार्वजनिक रुग्णालयांकडे धाव घेतली. आपल्याला स्वाईन फ्लूची लागण झालेली नाही ना, याची खात्री करून घेण्यासाठी पुण्यात सार्वजनिक नायडू रुग्णालयासमोर लोकांची झुंबड उडाली. त्यांच्याकडून डॉक्टर व रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीही झाली. ही कृती समर्थनीय नसली तरी त्यातून सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवरील लोकांच्या संतापाचे प्रदर्शन झाले. आताच्या परिस्थितीत लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यात सार्वजनिक यंत्रणा अपयशी ठरली आहे याचेच ते निदर्शक होते. देशाच्या अनेक भागात स्वाईनफ्लूचा संसर्ग झाल्याची उदाहरणे असली, तरी महाराष्ट्रात त्याचे प्रमाण अधिक आहे. त्यातही आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे व आयटी क्षेत्राचे प्रमुख केंद्र बनलेल्या पुण्यात अधिकच अस्वस्थता पसरली. भारतातील पहिला बळी पुण्यातील विद्यार्थिनीचा असल्याने आणि राज्यात या रोगाची लागण झालेल्या १६९ पैकी ११५ जण पुण्यातील असल्याने तेथे अधिक तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक होते. तेच गेल्या तीन-चार दिवसांमध्ये पाहायला मिळाले. ही प्रतिक्रिया सध्या पुण्यापुरती मर्यादित असली, तरी अशीच घबराट कायम राहिली तर हे लोण इतरत्र पसरायला वेळ लागणार नाही. कारण राज्याच्या इतर भागातील स्वाईनफ्लूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच आहे. हे रोखण्यासाठी लोकांना विश्वासात घेण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी प्रशासनाला खडबडून जागे व्हावे लागेल. देशात कालपर्यंत एकूण सहाशेचा आकडा ओलांडला गेला. त्यात दिवसेंदिवस वेगाने भर पडतच आहे. ही स्थिती केवळ भारतातच नाही तर या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या ‘एच१एन१’ या विषाणूचा फैलाव जगभर झाल्याचे आढळले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, जुलैअखेपर्यंत १६८ देशांमध्ये एक लाख ६२ हजार ३८० लोकांना या विषाणूची बाधा झाली आहे. या संसर्गामुळे ११५४ जणांचा बळीसुद्धा गेला आहे. या विषाणूचा संसर्ग जगभरातील १५ ते ४५ टक्के लोकांना म्हणजेच सुमारे एक ते तीन अब्ज लोकांना होण्याची शक्यता असल्याच इशारासुद्धा या संघटनेने दिला आहे. जागतिक आरोग्य संघटना सुरुवातीपासूनच या स्थितीकडे लक्ष ठेवून आहे. हळूहळू हा जगाच्या कानाकोपऱ्यात पसरत असला, तरी त्याच्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याबाबत या संघटनेच्या महासंचालक मार्गारेट चान यांनी जून महिन्यात सर्वानाच सावधही केले होते. पण हा विषाणू अंटाक्र्टिका वगळता सर्वच खंडांमध्ये पोहोचला असून, स्वाईनफ्लू ही जागतिक महाआपत्ती बनली आहे. या आपत्तीमुळे जगात आतापर्यंत बळी पडलेल्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अगदीच नगण्य आहे. तरीसुद्धा या संसर्गाबाबत भारतापासून संपूर्ण जगात इतक्या युद्धपातळीवर दक्षता का घेतली जात आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. त्याला कारणही तसेच आहे. कारण स्वाईनफ्लूला कारणीभूत ठरलेला ‘एच१एन१’ हा विषाणू व तो ज्या जातकुळीचा सदस्य आहे त्या ‘एन्फ्लूएन्झा-ए’ या जातकुळीतील विषाणूंचे वागणे अतिशय अनिश्चित असते. त्यामुळे या विषाणूंच्या गुणधर्मामध्ये अतिशय झपाटय़ाने बदल घडून येऊ शकतात. ‘एच१एन१’ या विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण सध्या अतिशय अल्प असले, तरी कदाचित त्याच्या गुणधर्मामध्ये बदल झाले तर तो घातक ठरू शकतो. अर्थात, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे बदल होतील, हे निश्चितपणे सांगता येत नाही. कदाचित या बदलांमुळे तो नष्टसुद्धा होऊ शकेल किंवा माणसाच्या दृष्टीने अपायकारक ठरणारही नाही. पण वेगळ्या प्रकारचे बदल झाले, तर तो आतापेक्षा जास्त हानिकारकही ठरू शकतो. या अनिश्चिततेमुळेच अधिक सावधगिरी घेतली जात आहे आणि या विषाणूमध्ये काही बदल तर होत नाहीत ना, यावर लक्ष ठेवले जात आहे. काळजी घेण्याचे दुसरे कारण म्हणजे ‘एन्फ्लूएन्झा-ए’ या जातकुळीतील विषाणूंचा घातक इतिहास! त्यांच्यामुळे विसाव्या शतकात अनेक साथी उद्भवल्या. त्यात जगभर कोटय़वधी लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात १९१८-१९ मध्ये जगभर ‘स्पॅनिश फ्लू’ या रोगाची साथ पसरली होती. त्याची लागण जगातील तब्बल ४० टक्के लोकांना झाली आणि त्यात जगभर पाच कोटींहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. त्यात प्रामुख्याने तरुणांचा समावेश होता. त्याला कारणीभूत ठरलेल्या विषाणूचे नामकरण ‘एच१एन१’ असे करण्यात आले होते. त्यानंतर १९५७ साली ‘आशियाई फ्लू’ या साथीत तब्बल वीस लाख लोकांचा बळी गेला. त्या विषाणूची ओळख ‘एच२एन२’ अशी होती. पुढे १९६८ सालच्या साथीला ‘एच३एन२’ हा विषाणू जबाबदार ठरला. त्याची सुरुवात हाँगकाँगमध्ये झाली व त्याने जगभर सुमारे दहा लाख लोकांचा बळी घेतला. ‘एन्फ्लूएन्झा-ए’ जातकुळीतील विषाणूंच्या या पाश्र्वभूमीमुळेच आता सावधुगरी बाळगणे आवश्यक आहे. काळजी घेणे याचा अर्थ घाबरून जाणे नाही. कारण १९१८-१९ च्या साथीच्या वेळी पहिले महायुद्ध सुरू असल्याने त्याचा प्रसार झालाच, शिवाय त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेले नाही. म्हणूनच त्या वेळचा मृतांचा आकडा इतका मोठा होता. शिवाय विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील वैद्यकीय प्रगतीच्या तुलनेत आता हे क्षेत्र अतिशय प्रगत आहे. पूर्वी प्लेग, कॉलरा, देवीसारख्या रोगांच्या साथीतच एकाच फटक्यात हजारो लोकांचा बळी जायचा. त्या वेळी अशा रोगांवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने जागतिक आरोग्य संघटनेसारखी यंत्रणासुद्धा नव्हती. त्यामुळे विसाव्या शतकातील साथींप्रमाणेच आताही जीवितहानी होईल, ही भीती निर्थक आहे. आता कोणतेही आव्हान पेलण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील आणि भारतातील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरालॉजी, नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस यांसारख्या अद्ययावत संस्था सज्ज आहेत, सतर्कसुद्धा आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या विषाणूमध्ये होणाऱ्या बदलांवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. या विषाणूला निष्प्रभ करणारी लस विकसित करण्याचे कामही सध्या सुरू आहे. ही लस येत्या सहा महिन्यांमध्ये उपलब्ध होऊ शकेल, असे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरालॉजीच्या संचालकांनी जाहीर केले आहे. या आश्वासक घडामोडी आहेत. आता प्रश्न आहे तो या संशोधकांवर विश्वास ठेवायचा की घाबरून जायचे हा! अलीकडच्या काळात लोकांमध्ये या सर्वच विषयांवर जागरूकता वाढत असतानाच अतिकाळजी व घबराट वाढली आहे. हा मोठा विरोधाभास आहे. त्यात शिक्षितांचीच संख्या जास्त आहे. नेहमीचा फ्लू आणि स्वाईनफ्लू यामध्ये केवळ लक्षणांवरून फरक करता येत नाही. त्यामुळे केवळ ताप-खोकला झाल्यावर घाबरून जाण्याचे कारण नाही. औषधांनंतरही प्रकृती सुधारली नाही, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने चाचणी करावी, या स्पष्ट सूचना असतानाही रुग्णालयांमध्ये विनाकारण गर्दी करून काहीही निष्पन्न होणार नाही. याचा अर्थ आरोग्य यंत्रणा व प्रशासनाचा कारभार सुरळीत आहे असे निश्चितच नाही. आर्थिकदृष्टय़ा परवडत नसतानासुद्धा सामान्य माणूस सार्वजनिक यंत्रणेपेक्षा खासगी रुग्णालयांकडे का जातो, हा या यंत्रणांच्या कारभाराचाच पुरावा आहे. त्यात सुधारणा झाल्या नाहीत आणि आताच्या कसोटीच्या परिस्थितीत या यंत्रणांनी लागलीच आपल्या कार्यपद्धतीत सकारात्मकता आणली नाही तरी परिस्थिती हाताबाहेर जाईल. या यंत्रणा आपल्यासाठी झटत असल्याचे दिसले, तर नागरिकसुद्धा प्रशासन, आरोग्य यंत्रणेला शक्य तेवढे सहकार्य करायला पुढे येतील आणि या रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी वैयक्तिक काळजीसुद्धा घेतील. बाहेरून आल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुणे, शिंकताना-खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे, आजारी असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळणे असे घरोघरी केले जाणारे संस्कार आचरणात आणले, तरी ती महत्त्वाची खबरदारी ठरेल. लोकांकडून ही काळजी घेतली तरी आरोग्य यंत्रणेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अर्थात, या उणिवा असल्या तरी आताची वेळ आहे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा, प्रशासन, खासगी डॉक्टर्स व नागरिकांनी एकत्र काम करण्याची आणि स्वाईनफ्लूला जबाबदार असलेल्या ‘एच१एन१’चा संभाव्य उपद्रव रोखण्याची!