Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

लोकमानस

जनतेच्या पैशावर राजकारण्यांचा खेळ

 

जनतेच्या पैशाचा चुराडा करणाऱ्या अलीकडच्या घटना वाचून राजकारण्यांना सामान्य जनतेच्या पैशाविषयी काहीही पर्वा नसल्याचे अधोरेखित होते. पहिली घटना म्हणजे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वीजमंडळाच्या मालमत्तेची केलेली नासधूस. याने वीज दरवाढीचा प्रश्न सुटणार नाही. दुसरी घटना मनसेच्या कार्यकर्त्यांनी एम.एस.आर.सी.ई.च्या कार्यालयात मोडतोड केल्याची. कुठलीही नवीन संगणक प्रणाली सुरू करताना काही प्रमाणात Teething Trouble अपेक्षित आहे. निषेध करताना मालमत्तेची नासधूस करून असे प्रश्न सुटत नसतात.
तिसरी घटना मात्र अधिक गंभीर आहे. तो प्रश्न वांद्रे-वरळी सी लिंकवर होणाऱ्या वाहतुकीच्या खोळंब्याचा. हजारो कोटी रुपये खर्च करून बांधलेला हा सागर सेतू, वाहतुकीची कोंडी कमी करण्याऐवजी जर वाहतुकीचे प्रश्न वाढवणार असेल तर हा सेतू बांधण्याचा प्रस्ताव देणाऱ्या मंत्र्यांना आणि त्यांच्या सल्लागारांना या उधळपट्टीबद्दल जबाबदार धरून जनतेचा हा हजारो कोटींचा अक्षरश: पाण्यात गेलेला पैसा त्यांच्याकडून सव्याज वसूल केला पाहिजे! सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे किंवा जरूर नसताना अशी मालमत्ता निर्माण करणे ही कृत्ये दंडनीय गुन्हा या सदरात आणण्याची तरतूद हवी.
राजीव मुळ्ये, दादर, मुंबई

खाजगी वाहनांवर र्निबध हवा
वृक्ष जोपासनेसंदर्भातला शुभदा पटवर्धन यांचा लेख (२८ जुलै) वाचला. लेखात सुरुवातीलाच मान्य केले आहे की, विविध सोयी, नवीन रस्ते, रस्त्यांचे रुंदीकरण इत्यादी कामांसाठी वृक्ष तोडणे क्रमप्राप्त असते. मुळात वाढत्या वाहनांच्या सोयीसाठी रस्तारुंदीची गरज भासते. वाहनांचा वापर करणाऱ्यांमध्ये हे पर्यावरणप्रेमी नसतात?
अंधेरी (प.) येथील एका रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये बरीच झाडे तोडणे आवश्यक होते. पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन तोडगा सुचविला की वाढत्या वाहनांचा भार कमी करण्यासाठी झाड आणि पाठीमागे घेतलेला फुटपाथ यामधील निर्माण झालेली चिंचोळी पट्टी ही केवळ रिक्षा व दुचाकी वाहनांसाठी वापरली जाईल. वृक्षतोड टळली पण चिंचोळी जागा फेरीवाल्यांनी व्यापून टाकली! त्यामुळे तेथून दुचाकी तर सोडाच, परंतु माणसांना चालणेही दुरापास्त झाले. रस्ता रुंद न झाल्यामुळे वाहनांची कोंडी, परकीय चलनात विकत घेतलेल्या पेट्रोलची नासाडी, हवेचे प्रदूषण, वेळेचा अपव्यय हे पर्यावरणविरोधी आहे, हे आंदोलकांच्या लक्षात येत नाही का?
सार्वजनिक वाहने तीन टक्के तर ९७ टक्के वाहने खासगी आहेत. सार्वजनिक वाहने जरी तिप्पट झाली तरी ९० टक्के लोकांची प्रवासाची सोय होऊ शकेल. १० टक्क्यांसाठी ९० टक्के रस्ता ही स्थिती बदलायला हवी.
सतीश कोळवणकर, (वास्तुविशारद) वांद्रे, मुंबई

कार उत्पादनावर नियंत्रण आणा
मुंबईतील वाहतुकीची कोंडी सोडविण्यावर उपाय म्हणून खासगी मोटारींच्या प्रवेशावर र्निबध आणावेत. विशिष्ट नंबरच्या खासगी मोटारींना विशिष्ट दिवशी रस्त्यावर येण्यास बंदी करावी, अशा प्रकारच्या सूचना करण्यात येत आहेत. हा खरा उपाय नाही.
देशामध्ये गेल्या काही वर्षांत कारचे उत्पादन भरमसाट वाढले आहे. त्यावर नियंत्रण आणायला हवे. दरवर्षी पाहणी करून प्रत्येक कंपनीला विशिष्ट संख्येतच कार उत्पादन करण्यास परवानगी द्यावी.
शहरातील रस्ते रुंद करणे अथवा उड्डाणपूल बांधणे याला स्वाभाविक मर्यादा आहेत. तसेच बेदरकार ड्रायव्हिंग, नियमांचे पालन न करणे, अनावश्यक घाई करून ओव्हरटेक करणे या कारणांनी ही वाहतूक कोंडी होते. यासाठी चालकांचे योग्य प्रशिक्षण होणे आवश्यक आहे. या दोन गोष्टी अमलात आणल्या तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न उग्र रूप धारण करणार नाही.
विद्यालंकार घारपुरे, दापोली, जि. रत्नागिरी

अंधश्रद्धेच्या जाळ्यात गुरफटलेले लातूर
लातूरमध्ये चालत आलेली एक प्रथा नुकतीच टीव्ही वाहिन्यांवर पाहिली. चार ते पाच महिन्यांच्या मुलांना ५० फुटांवरून खाली फेकण्याच्या या प्रथेत लोक लहान मुलांना वरून खाली फेकतात व खाली १० माणसे चादर धरून उभी असतात. हे सर्व पाहताना या मुलांचे पालकही आनंदाने हसत असतात. या दृश्याने आश्चर्य वाटले. मुलांना उंचावरून फेकण्याचा हा अमानुष प्रकार आपणच थांबवला पाहिजे. असल्या प्रकाराने मुलांना कायमचे अपंगत्व,येऊ शकते.या कृत्यात सहभागी होणाऱ्यांना तुरुंगवास किंवा मोठी शिक्षा व्हायला हवी. आपल्या अपत्यांना धोक्यात घालणाऱ्यांना तर जन्मठेपच व्हायला हवी.
जय किशोर नार्वेकर, मुंबई (इयत्ता बारावी)

सुरक्षिततेसाठी गोविंदाची सुट्टी हवी
मुंबईतील गोपाळकाला म्हणजे दिवसभर गोविंदा पथकांचा हैदोस! एकाच दिवशी मिळतील तितक्या हंडय़ा फोडण्यासाठी गोविंदा पथकांची चढाओढ. अनेक ठिकाणी भररस्त्यात हंडय़ा बांधल्या जातात. गल्लीबोळातील हंडय़ांची तर गणतीच नसते. काही ठिकाणी रस्ते बंद केले जातात तर काही ठिकाणी एकेरी वाहतूक केली जाते.
या दिवशी शहरात बहुतांश शाळांना सुट्टी दिली जाते. परंतु मराठी नसलेल्या तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना सुट्टी दिली जात नाही. मुले शाळेत तर जातात आपल्या वेळेवर म्हणजे सकाळी लवकरच, परंतु त्यांची शाळा सुटते त्या वेळी मात्र रस्त्यावरील वाहूतक पूर्णपणे विस्कळीत झालेली असते. मुलांना घरी यायला फार उशीर होतो किंवा ते वाहतुकीत अडकून बसतात. यासाठी मुंबईतील सर्व शाळांच्या प्रमुखांना आदेश देऊन त्यांच्या कोटय़ातील किंवा मुख्यमंत्री कोटय़ातील सुट्टय़ांपैकी एक सुट्टी गोपाळकाला शुक्रवार, १४ ऑगस्ट २००९ रोजी जाहीर करावी.
गणेश पवार, महालक्ष्मी, मुंबई

दहीहंडी: दोन दु:खद निर्णय
गोविंदा पथकांना आलेल्या व्यावसायिक स्वरूपामुळे व जीवघेण्या स्पर्धेत युवकांच्या जिवाशी खेळ होत असल्यामुळे बंद करण्यात आलेल्या गोविंदा पथकात ६० वर्षे जुना ‘विजय बजरंग’ संघाचा गोविंदा असावा, ही खेदाची बाब. त्याचे शल्य असतानाच, बालकांना दहीहंडीच्या शेवटच्या थरावर चढविण्यास मनाई करण्यास नकार देत केवळ सुरक्षेची नियमावली करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने मन विषण्ण झाले! गोपाळकाला काही दिवसांवरच आला असताना ही नियमावली अखणार कधी आणि बालकांची सुरक्षितता साधणार कशी?
वास्तविक ‘विजय बजरंग’ हे सर्वाना हवेहवेसे गोविंदा पथक होते. पारंपारिकता जपणारे, नेत्रसुखद, शिस्तबद्ध असे मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखविणारे आणि सुरक्षिततेबाबत अगदी जबाबदार. पहिल्या प्रयत्नातच दहीहंडी फुटण्याबाबत त्याची ख्याती होती. ‘विजय बजरंग’ पाळत असलेल्या सुरक्षेबाबत सांगायचे तर गोविंदा दहीहंडीच्या खाली आधी दाटीवाटीने उभे राहात. एकेका शिट्टीबरहुकूम एकेक थर क्रमाने चढे. दहीहंडी फोडल्यावरही उलटय़ा क्रमाने गोविंदा उतरत. चुकणाऱ्याला झेलण्यासाठी जमिनीवर २०-२५ फुटांच्या व्यासाचे वर्तुळ गोविंदांनी केलेले असे. त्यांच्याजवळ प्रथोपचाराची पेटी तयार असे.
त्याच वेळी बैलगाडय़ांतून श्रीकृष्णकालीन दृश्याचा देखावा मन प्रसन्न करीत असे. या आनंदाला आजची केजी ते ऑनलाइन पिढी मात्र मुकत आहे, याचे वैषम्य वाटते.
किरण चौधरी, वसई