Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

महावितरण कार्यालयासमोर कोल्हापुरात बेमुदत ठिय्या
कोल्हापूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या वीजबिलावरील विजेची पोकळ थकबाकी कमी करून इंधन अधिभार रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आजपासून ताराबाई पार्क परिसरातील वीज महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आजच्या या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.

सोलापूर शहर मध्यमधून माकपचे आडम मास्तर यांना उमेदवारी

सोलापूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

माकपचे ज्येष्ठ आमदार नरसय्या आडम मास्तर यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवार जाहीर केली आहे. त्यांनी या निवडणुकीची तयारी सरू केली असून त्यासाठी आपल्या हक्काच्या प्रत्येक कामगार व कष्टक ऱ्याकडून दहा रुपये निवडणूक निधीचे संकलन करण्यासही त्यांनी प्रारंभ केला. पक्षाने केलेल्या आपल्या उमेदवारीच्या घोषणेची माहिती आमदार आडम मास्तर यांनी स्वत पत्रकार परिषदेत केली.

कोल्हापूर पालिका इमारतीतच ‘डास पैदास केंद्र’
कोल्हापूर, ६ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

डासांची पैदास रोखण्यासाठी राज्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पातळीवर गप्पी मासे पैदास केंद्राला उत्तेजन दिले जात असले तरी कोल्हापुरात महानगरपालिकेत डासांचेच एक नवे पैदास केंद्र गेले काही महिने आपली उत्तरोत्तर प्रगती करते आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीत असलेल्या या केंद्राकडे जाण्याची बुद्धी अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांना झाली नसली तरी डासांनी मात्र आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे.

अवैध धंद्यांना लगाम बसल्याने सांगलीकर घेतोय मोकळा श्वास!
सांगली, ६ ऑगस्ट/ गणेश जोशी

‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ या तत्त्वावर पोलिसांची कार्यप्रणाली असते. परंतु सांगली जिल्ह्य़ात मात्र या ब्रीदवाक्यावर गेली अनेक वर्षे कोणाचाही विश्वास नव्हता. अवैध व्यवसायाच्या बळावर समाजकंटक कोटय़धीश होतात व त्यांचा दराराही निर्माण होतो. पण हे साम्राज्य किती तकलादू असते, हे गेल्या दोन वर्षांपासून अनुभवयास मिळत आहे.

बनावट नोटा बाळगणाऱ्या पुण्याच्या युवकाला सक्तमजुरी
इस्लामपूर, ६ ऑगस्ट/ वार्ताहर

शंभर रूपये दराच्या ४१०० रूपयांच्या बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या परशुराम बाबासाहेब वाघमारे (वय ३०, रा. ससाणेनगर, भरत चाळ, पुणे) याला येथील पहिले तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काजी यांनी सातवर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील सतीश आनंदराव पाटील साखराळेकर यांनी काम पाहिले.

नऊ वर्षांत कोल्हापूर आराखडय़ातील १८६ आरक्षणे वगळली- वोरा
कोल्हापूर, ६ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर शहराच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेला विकास आराखडा हा पैसे मिळविण्याचे एक मोठे कुरण बनला आहे. गेल्या नऊ वर्षांत या आराखडय़ातील १८६ आरक्षणे वगळण्याचा सभागृहाने जणू विक्रमच केला असून लँड माफियांनी महापालिकेतील कारभारी नगरसेवकांना हाताशी धरून सुरू केलेला हा उद्योग वेळीच थोपविला नाही तर उद्या कोल्हापुरात सार्वजनिक उपक्रमासाठी एकही जागा शिल्लक राहणार नाही, असा इशारा कोल्हापूर जनशक्तीचे अध्यक्ष सुभाष वोरा यांनी दिला आहे.

कोल्हापुरात नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
माहेरच्या लोकांनी केली नवऱ्याची धुलाई
कोल्हापूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी
अवघ्या दहा महिन्यांपूर्वी लग्न होऊन सासरी गेलेल्या शहनाज शेख या नवविवाहितेला आपल्या नवऱ्याचे अनैतिक संबंध असल्याचे लक्षात येताच तिने साळोखे पार्क येथील घरी बुधवारी रात्री गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. शहनाजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात आणला तेव्हा तिच्या माहेरच्या नातेवाइकांनी शहनाजचा नवरा आसिफ याची रुग्णालयाच्या आवारातच धुलाई केली.

सोलापुरात रविवारी जनसुराज्य फुंकणार विधानसभेचे रणशिंग
सोलापूर, ६ऑगस्ट/प्रतिनिधी

जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सोलापूर शहर जिल्हा शाखेचा मेळावा रविवारी ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता भवानी पेठेतील रेवम्मा पाटील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. पक्षाचे नेते, अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे हे या मेळाव्यास उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश थोबडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.मेळाव्यापूर्वी शासकीय विश्रामगृहापासून भव्य फेरी काढण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाच्यावतीने या मेळाव्याद्वारे रणशिंग फुंकले जाणार आहे, असे थोबडे यांनी सांगितले.

साताऱ्यात अतिरेकी..कमांडोचे फायरिंग.. जनतेत घबराट!
सातारा, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

सातारा शहरातील शासकीय नवीन प्रशासन इमारतीत जिल्हा रुग्णालयात अतिरेकी घुसले कमांडोचे फायरिंग झाले. वार्ता जिल्हाभर पसरल्याने जनतेत मोठी घबराट पसरली. एकच पळापळ काय झालंय हे जाणून घेण्यासाठी फोन खणखणाट बराच काळ सुरू होता. अकेर हा सगळा डेमो होता असे प्रशासनाने सांगितल्यानंतर सगळ्यांचा जीव भांडय़ात प डला.सातारा जिल्हा पोलीस दलाने कुणालाही सुगावा न लागू देता. अतिरेक्यांशी चकमक घडवून गोळीबार फायरिंगचे आवाजाने चित्तथरारक चित्र निर्माण केल्याने नवीन प्रशासन इमारतीतील कर्मचाऱ्यांची दाणादाण उडवून दिली. पोलीस कमांडोच्या पथकाने अतिरेकी पकडला त्याला जीपमध्ये घालून नेत असल्याचे दिसताच संतप्त झालेल्या जमावाने त्या वाहनावर दगडफेक केली. पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांनी लोकांना नंतर खरा प्रकार सांगून शांत केले. पोलीस अधीक्षक विठ्ठलराव जाधव, जिल्हाधिकारी विकास देशमुख प्रात्यक्षिकाच्या घटनास्थली हजर होते.

सांगलीत बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
सांगली, ६ऑगस्ट / प्रतिनिधी
जिल्ह्य़ातील बोगस वैद्यकीय व्यावसायिकांवर कडक कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी श्याम वर्धने यांनी दिल्या. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पुनíवलोकन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीत अधिष्ठाता डॉ. सुधीर चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. सी. महाजन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक वाघमारे, पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, समितीचे सदस्य डॉ. ज्ञानचंद्र पाटील, श्रीकांत मंत्री यांच्यासह समितीने अन्य सन्मानिय सदस्य उपास्थित होते. बोगस डॉक्टरांकडून सामान्य जनतेला असणारा धोका टाळण्यासाठी आरोग्याच्या सुविधा त्यांच्यापर्यन्त पोहचविणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी वर्धने म्हणाले की, वृत्तपत्रांमध्ये आरोग्याबाबत येणाऱ्या जाहिरातीची चौकशी करून अशा व्यावसायिकांवर तातडीने कारवाई करावी. जिल्ह्य़ात बोगस डॉक्टरांच्या प्राप्त तक्रारींची चौकशी करण्यात येत असून दोषी आढळल्यावर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

‘पक्षीय राजकारणाचा प्रभाव वाढल्याने वाई अनेक योजनांपासून वंचित’
वाई, ६ ऑगस्ट / वार्ताहर
वाई शहराच्या राजकारणात पक्षीय राजकारणाचा प्रभाव वाढल्यामुळे शहराला अनेक योजनांपासून वंचित राहावे लागत आहे, असे मत आमदार मदन भोसले यांनी व्यक्त केले. वाई नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदी नंदकुमार खामकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मदन भोसले व ज्येष्ठ काँग्रेस नेते शंकरराव गाढवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तेव्हा भोसले बोलत होते. या वेळी बोलताना भोसले म्हणाले की, जनकल्याण आघाडीच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासाला प्राधान्य देणारे राजकारण करून आपला वेगळा ठसा उमटविला आहे. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारणाला प्राधान्य देणारे नगरसेवक वाई शहराच्या विकासाचे विश्वस्त म्हणून नावारूपाला येतील. प्रारंभी उपनगराध्यक्ष नंदकुमार खामकर यांचा मदन भोसले व नीलिमा भोसले यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना उपनगराध्यक्ष नंदकुमार खामकर यांनी समाजासाठी करत असताना राजकारणात आलो. राजकारणात अनेक चढ-उतार अनुभवले. आपले कोण आणि परके कोण याची ओळख झाली. तरीही राजकारणाच्या माध्यमातून आपण समाजासाठी खूप काही केल्याची भावना मनात निर्माण झाल्याचे सांगतिले. या वेळी शहरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.

न्यायदंडाधिकारी परीक्षेत अपर्णा जैनापुरेंचे यश
सांगली, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी
कवठेपिरान येथील अ‍ॅड. श्रीमती अपर्णा कुमार जैनापुरे यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. अ‍ॅड. अपर्णा जैनापुरे यांचे एलएल.बी.पर्यंतचे शिक्षण येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या एन. एस. सोटी विधी महाविद्यालयात, तर एलएल.एम.चे उच्च शिक्षण शिवाजी विद्यापीठात झाले आहे. कवठेपिरान येथील सूर्योदय ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे माजी संचालक व प्रगतिशील शेतकरी कुमार कल्लाप्पा जैनापुरे यांच्या त्या कन्या होत. या परीक्षेतील त्यांच्या यशासाठी एन. एस. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. टी. चौगुले, उपप्राचार्या श्रीमती मीनल बापट व सरकारी वकील अ‍ॅड. अरुण जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नुकताच त्यांचा कवठेपिरान येथील विविध सहकारी संस्था, सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यासचे सोलापुरातील पत्रकारांना पुरस्कार
सोलापूर, ६ऑगस्ट/प्रतिनिधी
राष्ट्रीय पत्रकारिता कल्याण न्यास या संस्थेतर्फे येत्या शनिवारी सोलापुरात होणाऱ्या पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्याचे औचित्य साधून पाच स्थानिक पत्रकारांनाही पुरस्कार घोषित केले आहेत. प्रशांत माने (वृध्दापकाळ पेन्शन योजना घोटाळा) व चंद्रकांत मिराखोर (प्ले बॉय मालिका) या दोघा पत्रकारांना भाऊसाहेब गांधी स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार विभागून देण्यात येत आहे. तर सामाजिक पत्रकारितेसाठी अभिराज उबाळे (पंढरपूर, वारीच्या काळातील मैला वाहतूक करणारे मेहतर), व विजयकुमार सोनवणे (महिला बचत गट यशोगाथा) यांना विभागून देण्यात येणार आहे. दृक्श्राव्य पुरस्कार संजय पवार (दक्षिण सोलापूर तालुक्यातील दरोडाग्रस्त कुटुंबाची व्यथा) यांना जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरुप पाच हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे आहे. पुरस्कार निवड समितीवर अरुण करमरकर, प्रा. विलास बेत, शोभा बोल्ली यांनी काम पाहिले.

दूरसंचारची विद्यार्थ्यांसाठी‘कॅम्पस बझ’ प्रीपेड योजना
सांगली, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी

महाराष्ट्र दूरसंचारने ‘कॅम्पस बझ’ ही नवी प्रिपेडमोबाईल योजना जाहीर केली असून ही योजना खास करून विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. या योजनेंतर्गत कार्डची किंमत ९९ रुपये असून वैधता १८० दिवस आहे. हे कार्ड घेणाऱ्या प्रत्येकाचा आपोआप ग्रुप तयार होतो. या ग्रुपमधील आऊटगोइंगचा दर ३० पैसे प्रति मिनिट आणि इतर लोकल कॉल प्रति मिनिट एक रुपया आणि एसटीडी कॉल प्रति मिनिट १.५० रुपये आहे. लोकल एसएमएस २० पैसे तर राष्ट्रीय एसएमएसचा दर एक रुपया आहे. या योजनेसाठी रोजचा एक रुपया फिक्स्ड चार्ज पडणार आहे. ही योजना मर्यादित कालावधीसाठी (स्टॉक असेपर्यंत) असून यामध्ये मॅजिक-१, मॅजिक-५ आणि मॅजिक-१२ या सुविधाचा वापर करून कमी कॉलरेटचा लाभ घेता येतो, असे सांगली दूरसंचारने प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविले आहे.

माधव पवार यांच्या काव्यसंग्रहाचे शिंदेंच्या हस्ते रविवारी प्रकाशन
सोलापूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

कवी माधव पवार यांच्या ‘शुभशकुनांचे पक्षी’ या पहिल्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी ९ ऑगस्ट रोजी केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अ‍ॅम्फी थिएटरमध्ये सायंकाळी सहा वाजता आयोजिल्याची माहिती प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. ज्येष्ठ कवी फ. मुं. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभास प्रा. राजेंद्र दास व प्रा. डॉ. येळेगावकर हे उपस्थित राहणार आहेत. सुविधा प्रकाशन संस्था व कवी रा. ना. पवार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकाशन सोहळा होणार आहे. कवी पवार हे दिवंगत ज्येष्ठ कवी रा. ना. पवार यांचे चिरंजीव आहेत. ते मिमिक्री कलावंतही आहेत. त्यांनी लिहिलेली गाणी प्रल्हाद शिंदे यांच्यापासून ते स्वप्नील बांदोडकरांपर्यंत अनेक गायकांनी गायली आहेत. त्यांच्या गाण्यांच्या टी-सिरीज कंपनीने कॅसेट्स काढल्या आहेत. या पत्रकार परिषदेस कवी माधव पवार यांच्यासह पद्माकर कुलकर्णी आदी उपस्थित होते.

‘डी मार्ट’ची चौकशी सुरू
सांगली, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी
शहरातील शंभर फुटी रोडवरील बहुचर्चित ‘डी मार्ट’ या व्यापारी संस्थेच्या चौकशीचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने आज चौकशी केली व मोजणीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.‘डी मार्ट’ या व्यापारी संकुलाबाबतीत महापालिकेच्या तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी या जागेवर असणारे आरक्षण उठवून डी मार्टला परवाना दिला होता, असा मुद्दा उपस्थित करून शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांनी आवाज उठविला होता. बऱ्याच गदारोळानंतर महापालिकेचे आयुक्त दत्तात्रय मेतके यांनी या व्यापारी संस्थेच्या उभारणीपासून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उपायुक्त विजय कुलकर्णी, सहायक नगररचनाकार ए. आर. पाटील, शाखा अभियंता डी. आर. पांडव व जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत आडके यांच्या पथकाने आज डी मार्टमध्ये जाऊन संबंधित आर्किटेक्ट व बांधकाम व्यावसायिक यांना तेथे बोलवून चौकशी केली. डी मार्ट उभारण्यापूर्वी महापालिकेला देण्यात येणारी जागा कोणत्या निकषानुसार परवानगी दिली व आरक्षणात उठविण्यात आले, याबाबत चर्चा करण्यात आली. यावर या परिसराची मोजणी करून चित्र स्पष्ट झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

दारूबंदी समर्थक महिलांच्या सहय़ांची किणीत पडताळणी
पेठवडगाव, ६ ऑगस्ट / वार्ताहर
किणी येथील महिलांनी दारूबंदीसाठी मागणी केलेल्या निवेदनातील सहय़ांची पडताळणी करण्यासाठी आलेल्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांकडे महिलांनी उत्स्फूर्तपणे सभेस उपस्थिती लावून दारूबंदीची मागणी केली. किणीतील हनुमान मंदिरात उपस्थित राहिलेल्या ९७५ महिलांनी या अधिकाऱ्यांपुढे सहय़ा करून आपली मागणी सार्थ ठरवली.हातकणंगले तालुक्यातील वाठार या महामार्गावरील मुख्य चौकाठिकाणच्या गावात दारूबंदी यशस्वी झाल्यानंतर जवळच्याच भादोले व किणी गावातील महिलांनीही आपल्या गावातही दारूबंदी व्हावी अशी मागणी केली असून त्यासाठी गुप्त मतदान घेण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यानुसार या निवेदनातील सहय़ांची सत्यता पडताळणीसाठी राज्य उत्पादनशुल्क खात्याचे अधिकारी ए. ए. क्षीरसागर व सहकारी यांचे पथक किणी येथे आले होते. त्या वेळी ९७५ महिलांनी त्या पथकापुढे स्वाक्षरी करून आपली मागणी सार्थ असल्याची त्या अधिकाऱ्यांनाही खात्री दिली व किणीत दारूबंदीसाठी गुप्त मतदान घेण्याची मागणी केली. या वेळी सरपंच सविता माने व नीता पाटील, आरिफा बिजली, रंजना पाटील, बचतगटाच्या महिला, ग्रा.पं.सदस्य मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सहकारमहर्षी कारखान्याकडून उसाला प्रतिटन २०० रुपये आगाऊ हप्ता
माळशिरस, ६ ऑगस्ट/वार्ताहर
सहकारमहर्षी साखर कारखान्याने दिल्याप्रमाणे पोळ्याच्या सणासाठी सभासदांच्या उसाला प्रतिटन २०० रुपयांप्रमाणे आगावू हप्ता काढला असून, तो बँकेत जमाही केला आहे. या हप्त्याने सभासदांना या हंगामातील उसाच्या किमतीपोटी आतापर्यंत प्रतिटन १५०० रुपयांची उचल मिळाल्याचे कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले.अकलूज येथील सहकारमहर्षी साखर कारखान्याने नीरा खोऱ्यात नेहमीच गाळपाचा व दराचा उच्चांक केला आहे. गत गळीत हंगामात कारखान्याने १० लाख १२ हजार ८९३ मे. टन उसाचे गाळप करून १२ लाख १४ हजार ३२० साखर पोत्यांचे उत्पादन केले. याशिवाय कारखान्याचे प्रतिदिनी ७ हजार मे.टन उस गाळपाचे विस्तारीकरण सुरू असून, त्यासाठी ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कारखान्याने ३३ मे. वॉट वीजनिर्मितीचा सहवीजनिर्मिती प्रकल्प हाती घेतला असून, त्याचे कामकाज अंतिम टप्प्यात असल्याचेही ते म्हणाले.

पश्चिमद्वार व्यापारी मंडळाकडून विठ्ठल मंदिर परिसराची स्वच्छता
पंढरपूर, ६ ऑगस्ट/वार्ताहर
पंढरपूर नगरपरिषदेचे कर्मचारी सहावा वेतन व इतर मागण्यांसाठी संपावर गेल्याने पंढरी कचरामय झाल्याने विठ्ठल मंदिर परिसर ते गोपाळकृष्ण मंदिर चौफाळा या परिसराची स्वच्छता पश्चिमद्वार व्यापारी मंडळाकडून करण्यात आली. न.पा. कर्मचारी संपाचा तिसरा दिवस असून, शहरात सर्वत्र कचरा व कचऱ्याचे ढीग लागले आहेत. मंदिर परिसरात तर कचराच होता. त्याचा त्रास भाविकांना व इतरांना होऊ नये यासाठी गुरुवारी सकाळी पश्चिमद्वार व्यापारी मंडळाच्या १५ ते २० कार्यकर्त्यांनी परिसर झाडून सर्व कचरा गोळा केला व घंटागाडी आल्यावर त्यात टाकला. त्यामुळे हा परिसर स्वच्छ दिसत होता.इतर परिसरात मात्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे, तसेच काही भागात जनावरे मरून पडल्याने त्याची दरुगधी सुटून नागरिकांना त्रास जाणवत आहे. सध्या तरी पंढरीत कचऱ्याचे साम्राज्य आहे.

अ‍ॅट्रसिटीच्या खटल्यात तिघा बंधूंची निर्दोष मुक्तता
सोलापूर, ६ऑगस्ट/प्रतिनिधी

मोहोळ तालुक्यातील वडदेगाव येथे दलित सरपंचाला वाचनालयाची वर्गणी भरण्याच्या कारणावरुन झालेल्या भांडणात जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी भरलेल्या अ‍ॅट्रसिटीच्या खटल्यात उमेश खराडे यांच्यासह तिघा बंधूंची सोलापूरच्या सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. वडदेगावात सरपंच बाळासाहेब आठवले यांना वाचनालयाची वर्गणी भरण्याच्या कारणावरून ७ ऑगस्ट २००७ रोजी उमेश बाबुराव खराडे, तानाजी खराडे व तात्यासाहेब खराडे या तिघा बंधूंविरुध्द अ‍ॅट्रासिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींतर्फे वकील धनंजय माने यांनी काम पाहिले. अ‍ॅड. माने यांना अ‍ॅड. जयदीप माने, अ‍ॅड. प्रशांत यादव यांनी साह्य़ केले तर सरकारतर्फे अ‍ॅड. श्रीमती चितापुरे यांनी काम पाहिले.