Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

महावितरण कार्यालयासमोर कोल्हापुरात बेमुदत ठिय्या
कोल्हापूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या वीजबिलावरील विजेची पोकळ थकबाकी कमी करून इंधन अधिभार रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीने आजपासून ताराबाई पार्क परिसरातील वीज महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. आजच्या या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केले.
कृषी पंपांचे वीजदर १९९६ साली ३०० रुपये प्रतिअश्वशक्तीवरून १ हजार रुपये करण्यात आले होते. या अन्यायी वीज दरवाढीविरुद्ध फेडरेशनच्या वतीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्युत नियामक आयोगासमोर शेतकऱ्यांची भूमिकाही मांडली. त्या वेळी शासन व महावितरण कंपनी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून सवलतीच्या दराने पाणीपुरवठा संस्था व खासगी पंपधारक शेतकरी यांनी बिले भरली आहेत. त्यानंतर वेळोवेळी वीज आकार वाढविण्यात आला. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वाढीव दराची बिले आलेली आहेत. त्यामध्ये इंधन अधिभार, डिमांड चार्ज, पॉवर फॅक्टर पेनल्टी, विलंब आकार, दंड, दंडव्याज अशी बरीच आकारणी केली गेली आहे. सवलतीच्या दराने वीजबिले भरणाऱ्या पाणीपुरवठा संस्था व शेतकऱ्यांच्या वीजबिलात पोकळ थकबाकी वाढतच गेली.
सवलतीच्या दराने वीजबिले भरल्यानंतर पोकळ थकबाकी इंधन अधिभार कमी करावा, कृषी पंपधारकांची बिले निरंक करावीत, या मागणीसाठी कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्हय़ातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व खासगी पंपधारक शेतकरी यांनी निर्णायक आंदोलन छेडण्याचे ठरवले. त्याप्रमाणे मागणी मान्य होईपर्यंत वीज महावितरण कंपनीसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन आजपासून सुरू करण्यात आले. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व प्रा. एन. डी. पाटील, अशोक पाटील किणकर, बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी केले. या आंदोलनात पाणीपुरवठा संस्थांचे सभासद, पदाधिकारी तसेच खासगी पंपधारक शेतकरी हेही मोठय़ा संख्येने सहभागी झाले आहेत. आंदोलन बेमुदत चालणार असल्याने आंदोलनाच्या ठिकाणी बाडबिस्तराही आणला.