Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सोलापूर शहर मध्यमधून माकपचे आडम मास्तर यांना उमेदवारी
सोलापूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

माकपचे ज्येष्ठ आमदार नरसय्या आडम मास्तर यांना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उमेदवार जाहीर केली आहे. त्यांनी या निवडणुकीची तयारी सरू केली असून त्यासाठी आपल्या हक्काच्या प्रत्येक कामगार व कष्टक ऱ्याकडून दहा रुपये निवडणूक निधीचे संकलन करण्यासही त्यांनी प्रारंभ केला.
पक्षाने केलेल्या आपल्या उमेदवारीच्या घोषणेची माहिती आमदार आडम मास्तर यांनी स्वत पत्रकार परिषदेत केली. यापूर्वी १९७८ साली त्यांनी सर्वप्रथम सोलापूर शहर उत्तरमधून विधानसभेची निवडणूक जिंकली होती. त्यानंतर १९९५ व २००४ साली ते सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले होते. या मतदारसंघाची पुनर्रचना होऊन आता शहर मध्य मतदारसंघ निर्माण झाला आहे. या नव्या पुनर्रचित मतदारसंघाची मतदारसंख्या पावणेतीन लाख आहे. ही निवडणूक सोपी नसली, तरी आपण केलेल्या कार्याची दखल मतदार घेतील व पुन्हा आपणास निवडून देतील, असा विश्वास आमदार आडम मास्तर यांना वाटतो. शहरातील बेघर व गरीब विडी कामगारांसाठी अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे अहिल्यादेवी परुळेकर प्रकल्पाच्या माध्यमातून दहा हजार घरकुले केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने उभारली. त्यानंतर मीनाक्षीताई साने प्रकल्पाच्या माध्यमातून आणखी पाच हजार विडी घरकुलांची उभारणी हाती घेण्यात आली आहे. याशिवाय मोची, मातंग, मुस्लिम समाजासाठीही घरकुलांची योजना आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ८ हजार विडी कामगारांना दारिद्रय़रेषेखालील पिवळ्या रेशनकार्डाचे वाटप करण्यात आले असून त्यापैकी पाच हजारांपेक्षा कामगार व त्यांचे कुटुंबीय शहर मध्य मतदार संघात राहतात, असा दावा आमदार आडम मास्तर यांनी केला आहे. या निवडणुकीत आपली लढत काँग्रेसबरोबर राहणार असून त्यानंतर दोन क्रमांकांचा शत्रू शिवसेना-भाजप युती राहणार असल्याचे भाकीतही त्यांनी नोंदविले. या पत्रकार परिषदेस माकपचे प्रदेश सचिव मंडळाचे सदस्य रवींद्र मोकाशी, नगरसेविका नसीमा शेख, एम. एच. शेख, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी आदी उपस्थित होते.