Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

कोल्हापूर पालिका इमारतीतच ‘डास पैदास केंद्र’
कोल्हापूर, ६ ऑगस्ट / विशेष प्रतिनिधी

 

डासांची पैदास रोखण्यासाठी राज्यात महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींच्या पातळीवर गप्पी मासे पैदास केंद्राला उत्तेजन दिले जात असले तरी कोल्हापुरात महानगरपालिकेत डासांचेच एक नवे पैदास केंद्र गेले काही महिने आपली उत्तरोत्तर प्रगती करते आहे. महापालिकेच्या मुख्य इमारतीत असलेल्या या केंद्राकडे जाण्याची बुद्धी अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांना झाली नसली तरी डासांनी मात्र आपले प्रताप दाखविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांवर डासांच्या निर्मूलनासाठी ‘चॅरिटी बिगिन्स अ‍ॅट होम’ असे महापालिकेच्या प्रशासनाला सांगण्याची वेळ आली आहे.
महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला, की डाव्या हाताला जकात विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या तळमजल्यावर हे ‘डास पैदास केंद्र’ आकाराला आले आहे. या कार्यालयाच्या शेजारी एका बाजूला ड्रेनेज विभाग, तर दुसऱ्या बाजूला भांडार विभागाचे कार्यालय आहे. या दोन कार्यालयांच्या मध्ये असलेल्या एका मोकळय़ा खोलीमध्ये एक फुटापेक्षा जास्त उंचीचे पाणी गेले अनेक महिने कुजलेल्या अवस्थेत आहे. या पाण्यात डासांच्या माद्यांनी यथेच्छ अंडी घालून आपला संसार सुरू केला आणि या संसाराचा वेलू गगनावर गेला तरी अद्याप महापालिकेचे आरोग्य खाते मात्र ढिम्म आहे. विशेष म्हणजे या पाण्यातून वाट काढून पलीकडे जाण्यासाठी सध्या लाकडी फळय़ांचा आधार घेण्यात आला आहे. या फळीवरून कर्मचाऱ्यांची सतत ये-जा चालू असते. पाण्यातून वाट काढण्यासाठी फळय़ा टाकण्यात आल्या असल्या तरी पाणी काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असे कोणास वाटत नाही.
या पैदास केंद्राची चौकशी करता धक्कादायक माहिती समजली. संबंधित ठिकाणी असलेली गळती शोधून सापडत नाही म्हणून जमा होणारे पाणी पंपाद्वारे बाहेर टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. अर्थात हा पंप चालू होण्यास महिनोन्महिने जातात हा भाग निराळा! शेकडो कोटी रुपयांची विकासकामे हाती घेणाऱ्या आणि त्यांच्या खासगीकरणाचे प्रस्ताव लीलया तयार करणाऱ्या महापालिकेतील अभियांत्रिकी विभागाला ही गळती कशी सापडत नाही हा प्रश्न कोणालाही पडावा. याचे उत्तरही महापालिकेत पावला पावलावर उपलब्ध आहे. केवळ निष्काळजीपणा असे उत्तर मिळते.