Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

अवैध धंद्यांना लगाम बसल्याने सांगलीकर घेतोय मोकळा श्वास!
सांगली, ६ ऑगस्ट/ गणेश जोशी

 

‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ या तत्त्वावर पोलिसांची कार्यप्रणाली असते. परंतु सांगली जिल्ह्य़ात मात्र या ब्रीदवाक्यावर गेली अनेक वर्षे कोणाचाही विश्वास नव्हता. अवैध व्यवसायाच्या बळावर समाजकंटक कोटय़धीश होतात व त्यांचा दराराही निर्माण होतो. पण हे साम्राज्य किती तकलादू असते, हे गेल्या दोन वर्षांपासून अनुभवयास मिळत आहे. पोलीस अधीक्षक म्हणून कृष्णप्रकाश यांनी सांगलीची सूत्रे हाती घेतली आणि जिल्ह्य़ातील पोलीस यंत्रणेत आमुलाग्र बदल झाला. अवैध धंदे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम बसल्याने सांगलीकर प्रथमच मोकळा श्वास घेऊ लागले आहेत.
सुमारे पाच- दहा वर्षांपूर्वी सांगलीत गुन्हेगारी कारवायांनी कळस गाठला होता. दरोडे, दहशत, मारहाण व खून ही नित्याची बाब बनली होती. पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार अशोक कामटे यांच्याकडे असताना गुंड राजा पुजारी एन्काऊंटर झाला आणि टप्प्याटप्प्याने गुन्हेगारी टोळीतील अंतर्गत संघर्ष कमी होत गेला. परंतु हातभट्टी, मटका, जुगार, अंमली पदार्थ, चंदन तस्कर आदी गैरव्यवहार मोठय़ाप्रमाणात सुरूच होते आणि त्याचाच फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत होता. पोलीस ठाण्यात सर्वसामान्यांच्यापेक्षा अवैध व्यवसायातील गुंडांचीच चलती होती. परंतु एक अधिकारी किती बदल घडवून आणू शकतो, याचे प्रत्यंतरच सांगलीकरांना घडत आहे.
गुन्हेगारांच्यावर वर्चस्व मिळविण्याबरोबरच त्यांचे समूळ उच्चाटन करणे, जिल्ह्य़ात अवैध व्यवसायाला थारा देणाऱ्या पोलिसांच्यावरच कारवाई करणे, गुन्ह्य़ाचा तपास जलद व्हावा, पोलिसांचेच हप्ते बंद व्हावेत, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्यांना पोलिसांचा आधार वाटणे या बाबी सांगली जिल्ह्य़ात प्रथमच घडल्या. अवैध व्यावसायिकांचे उद्योगधंदे बंद पडल्याने गुन्हेगारांनी ‘जोधा- अकबर’ चित्रपटाच्या प्रकरणावरून सांगलीत तीन दिवस दंगा- धुडगूस घातला, जाळपोळ केली. संपूर्ण शहरच वेठीला धरले. परंतु सर्वसामान्य नागरिकांच्या पाठिंब्यावरच कृष्णप्रकाश यांनी गंभीर परिस्थिती हाताळली. पोलिसांच्या कारभारात राजकारण्यांचा हस्तक्षेप टाळण्यातही त्यांना यश आले आहे. त्यामुळेच गुन्हेगारांवरील राजकारण्यांचा वरदहस्त कमी झाला.
कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारांना जेरबंद करणे, गुन्हेगारांना शिक्षेसाठी पुरावा न्यायालयाला सादर करणे एवढय़ाच मर्यादित कार्यक्षेत्रात सांगली पोलिसांनी काम न करता फासेपारधी व गोसावी समाजातील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींचे पुनर्वसन करण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. तंटामुक्ती अभियानात राज्यात प्रथम क्रमांक मिळविण्याचा मानही सांगली पोलिसांनी मिळवला आहे. सर्वसामान्यांच्या हिताचे काम करताना ‘जनमंगल दिन’, ग्रामपंचायत स्तरावर कामाचा आढावा घेणे आणि प्रत्येक मंगळवारी सर्वसामान्यांच्या तक्रारींचा आढावा घेणे आदी विकासाभिमुख कामेही केली जात आहेत. ‘ग्रामपंचायत तेथे पोलीस’ हे ब्रीदवाक्य नजरेसमोर ठेवून ग्रामीण स्तरापर्यंत पोलिसांची यंत्रणा उभी करण्यात आली आहे.
पोलिसांचा वचक गुन्हेगारांच्यावर असतोच. परंतु अन्य प्रतिष्ठीतांनाही कायद्याला सामोरे जाण्याचा नवा पायंडाच घातला गेला आहे. तत्कालीन महापौर किशोर जामदार यांनी वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी महापौरांच्या तांबडय़ा दिव्याचा गाडीलाही १०० रूपये दंड ठोठावण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत सांगलीत पडलेल्या दरोडय़ातील १०० टक्के माल हस्तगत करण्याची कामगिरीही पोलिसांनी बजावली आहे. कोल्हापूर परिक्षेत्र विभागात सर्वाधिक गुन्हे उघडकीस आणण्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली आहे. अवैध प्रवासी वाहतूकही रोखण्यात कृष्णप्रकाश यशस्वी झाल्याने परिवहन विभागाच्या सांगली विभागाला अनेक वर्षांंच्या तुटीनंतर प्रथमच फायदा झाला आहे आणि जिल्ह्य़ातील अपघाताचे प्रमाणही घटले आहे. जिल्ह्य़ात सर्वत्र वायरलेस गस्त पथक निर्माण केले असून यामुळे गुन्ह्य़ामध्ये मोठय़ाप्रमाणात घट झाली आहे, असा दावाही कृष्णप्रकाश यांनी केला.
सांगली शहरातील गुन्हेगारी टोळ्यांचा संघर्ष कमी झाला असला तरी टोळ्या मात्र संपलेल्या नाहीत. पोलिसांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी राज्य शासनानेही भरीव साहाय्य करणे गरजेचे आहे.
पोलिसांची अपुरी संख्या, पोलिसांच्या निवासस्थानाचा प्रश्न, पोलिसांच्या बदल्यातील राजकीय हस्तक्षेप, गुन्हेगारांचा राजकारणातील वावर, यासाठी प्रत्येकानेच सजग होणे गरजेचे आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रणाय’ या ब्रीदवाक्याची प्रचिती यापुढेही मिळावी, यासाठी पोलिस व नागरिकांचे समन्वय महत्त्वाचे ठरणार आहे.