Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

बनावट नोटा बाळगणाऱ्या पुण्याच्या युवकाला सक्तमजुरी
इस्लामपूर, ६ ऑगस्ट/ वार्ताहर

 

शंभर रूपये दराच्या ४१०० रूपयांच्या बनावट नोटा जवळ बाळगणाऱ्या परशुराम बाबासाहेब वाघमारे (वय ३०, रा. ससाणेनगर, भरत चाळ, पुणे) याला येथील पहिले तदर्थ जिल्हा सत्र न्यायाधीश ई.एन. काजी यांनी सातवर्षे सक्त मजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील सतीश आनंदराव पाटील साखराळेकर यांनी काम पाहिले. शिराळा तालुक्यातील कांदे या गावी दि.१४ एप्रिल ०७ रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्थानिक वार्ताहर बाळासाहेब पाटील हे त्यांचा मित्र हरिश्चंद्र वसंत ठाकर यांच्याशी गप्पा मारत जोतिर्लिग देवालयाच्या कठडय़ावर बसले होते. याच वेळी ढाब्यावर काम करणारा केवळ जुनी ओळख असणारा परशुराम बाबासाहेब वाघमारे तेथे आला व त्याने माझ्याकडे ४१०० रूपयांच्या बनावट नोटा आहेत. त्या मी केवळ दोन हजार रूपयांना देण्यास तयार असल्याचे सांगितले. बाळासाहेब पाटील यांनी त्याच्याकडील बंडलाची खातरजमा करून त्याला बोलण्यात गुंतवून हा प्रकार दूरध्वनीवरून शिराळा पोलीस ठाण्यात कळवला. शिराळा पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणी बाळासाहेब पाटील यांची फिर्याद घेऊन परशुराम बाबासाहेब वाघमारे याला अटक केली. त्याच्याविरूध्द येथील जिल्हा सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.
या कामी तज्ज्ञ मनोहर साळवे, पोलीस हवालदार डी.के.शेळके, वसंत साळुंखे यांच्यासह बाळासाहेब पाटील व हरिश्चंद्र ठाकर यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. बाबासाहेब वाघमारे याला न्यायाधीश ई.एन. काजी यांनी सातवर्षे सक्त मजुरी, पाच हजार रूपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने जास्त सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली.