Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

वर्षांत सांगली, कुपवाडचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले- बागवान
सांगली, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी

 

एक वर्षांच्या कालावधीत सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरांतील प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. वारणा उद्भव योजनेचा प्रारंभ, विश्रामबागला जोडणारी नवी पाईपलाईन व मिरज कृष्णाघाट ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतची पाईपलाईन असा महत्त्वाचा पाणीप्रश्न मार्गी लावला आहे. एकाच वर्षांत २४ कोटी ९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला, तसेच मागील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी लावली असून आरक्षण उठविणारा आराखडा रद्द केला. भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी कारभार करण्यात महाआघाडीला यश आले आहे, असा दावा महापौर मैनुद्दीन बागवान व उपमहापौर शेखर इनामदार यांनी आपला एक वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानिमित्त पत्रकार परिषदेत केला.
महापौर व उपमहापौर म्हणाले, गृहमंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडीची सत्ता महापालिकेत आल्यानंतर जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत आहोत. मागील सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराने त्यांची राजवट गाजविली होती, त्यामुळे पारदर्शी कारभार हा आमचा महत्त्वाचा मुद्दा होता, तो आम्ही जपला आहे. निविदा मॅनेज होऊ नयेत म्हणून ई-टेंडर पद्धत अमलात आणल्यामुळे महापालिकेची ४४ लाखांची बचत झाली आहे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर सर्वाधिक कारवाई झालेली आहे. प्रशासनात कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. वादग्रस्त असणारा १७४ आरक्षणे उठविणारा विकास आराखडा रद्द करण्याचा ठराव करून सन २००० ते २००६ या कालावधीतील लेखापरीक्षणाची मागणी केली. बीओटी व्यवहारांची चौकशी सुरू आहे. तरुण भारत स्टेडियम समोरच्या पेट्रोलपंपाची व १०० फुटी रोडवरील डीमार्ट या जागांच्या हस्तांतरणाची चौकशी चालू आहे. जकातीचा ठेका न देता महापलिकेमार्फतच वसुली चालू आहे. व्यापाऱ्यांनी चांगले सहकार्य केले असून उत्पादन वाढले आहे.
पाणीपट्टी व घरपट्टीत वाढ केलेली नाही. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वारणा उद्भव योजनेचे उद्घाटन कुपवाड येथे केले आहे. १४ कोटी ७८ लाखांच्या कामांना सुरूवात केली आहे. कृष्णा नदीतील जॅकवेलसह ८ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. पाणी योजनेसाठी २८ कोटी रुपयांची विशेष योजना मंजूर झाली आहे. त्यातील ३ कोटी ४० लाख रुपये मिळाले आहेत. मिरज शहरासाठी कृष्णाघाट ते जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या कामांना १ कोटी ६४ लाख रुपयांच्या कामांना प्रारंभ झाला आहे. वीजपुरवठा खंडित होऊन पाणीपुरवठा खंडित होऊ नये म्हणून १ कोटी ७० लाख खर्चून सात एक्स्प्रेस फिडर बसवले आहेत. असे सांगून महापौर म्हणाले, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आमराई व महावीर उद्यान सुशोभीकरण, छ. शिवाजी स्टेडियम सुशोभीकरण करण्यात येणार आहे. काळय़ा खणीच्या विकासासाठी १५ कोटींचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे, तर गणेश तलावाच्या विकासासाठी राज्य शासनाने २ कोटी रुपये मंजूर केले आहेत. रस्त्यांच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणाकडे २०० कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. सांगली- मिरज रस्त्याच्या चौपदरीकरणास प्रारंभ झाला आहे.

महापौर बदलाच्या हालचालीसंदर्भात विचारले असता, महापौर मैनुद्दीन बागवान व उपमहापौर शेखर इनामदार यांनी गृहमंत्री जयंत पाटील महाआघाडीचे नेते आहेत, ते जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे याबाबत आणखी काहीच बोलता येत नाही. दुसऱ्या कोणी महापौर होण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात गैर काहीच नाही. अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.