Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

सोलापुरात ९ ऑगस्टपासून प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने
सोलापूर, ६ ऑगस्ट/प्रतिनिधी

 

जाई-जुई विचार मंच व सोलापूर शहर काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ९ ते १६ ऑगस्ट दरम्यान दिवस-रात्र प्रीमिअर लीगचे क्रिकेट सामने नॉर्थकोट मैदानावर भरविण्यात येत असल्याची माहिती महापौर अरुणा वाकसे व माजी महापौर अ‍ॅडव्होकेट यू. एन. बेरिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) व नॅशनल टॅलेंट सर्च यांच्या निवड समितीचे अधिकारी उपस्थित राहून सोलापुरातील उत्तम खेळाडूंचा शोध घेणार असून त्यांनी निवडलेल्या खेळाडूस पुढे आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे. या प्रीमिअर लीगमध्ये सोलापूर महापालिकेच्या वॉर्ड रचनेनुसार शहरातील ९८ वॉर्डातून ६१६ खेळाडूंचा सहभाग असलेले ५६ संघ उतरणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या संघाला ५१ हजार रुपये रोख तर उपविजेत्या संघाला २५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
उपांत्यपूर्व सामने खेळलेल्या संघांना ५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. बेरिया यांनी सांगितले. याशिवाय सामनावीरास मोबाईल संच तर लीग मालिकावीराला आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंनी सही केलेली बॅट बक्षिसाच्या स्वरुपात देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.