Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी काँग्रेसचा रविवारी शेटफळ येथे मेळावा
सोलापूर, ६ ऑगस्ट/ प्रतिनिधी

 

शेटफळ येथे रविवारी (दि. ९) सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोहरभाऊ डोंगरे यांनी दिली.
आष्टी व शिरापूर योजनेच्या कामाच्या उद्घाटनासाठी पवार तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यात हा शेतकरी मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या नियोजनासाठी दि. ५ रोजी बाजार समितीच्या सभागृहात कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत डोंगरे यांनी ही माहिती दिली.
या वेळी डोंगरे यांनी सांगितले, की पवार यांच्या उपस्थितीत होणारा हा मेळावा यशस्वी करण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात हिरवळ निर्माण करणाऱ्या आष्टी व शिरापूर या योजनांना निधी देण्याचा निर्णय पवार यांच्या सहकार्यामुळेच झाला आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा उमेदवार कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करूनच ठरविण्यात येणार आहे.
या बैठकीला पंचायत समिती सदस्य मानाजी बापू माने, कौशिक गायकवाड, ब्रह्मदेव भोसले, सुशांत कारे, जगन्नाथ कोल्हाळ, दीपक माळी, सज्जन पाटील, रामराव भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादासाहेब इंगोळे पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, पांडुरंग काकडे, नानासाहेब डोंगरे, पांडुरंग शेळके, एकनाथ जगताप, श्रीधर कारंडे, विशाल पाटील, विकास गौडराब, मुरलीधर कांबळे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी केले. जगन्नाथ कोल्हाळ यांनी आभार मानले.