Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

विठ्ठल इन्स्टिटय़ूटचा कोरियन विद्यापीठाबरोबर करार
पंढरपूर, ६ ऑगस्ट/वार्ताहर

 

येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटय़ूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही उच्च शिक्षणाबरोबर संशोधनासाठी अधिक मार्गदर्शन मिळावे या हेतूने ‘कोनकुक’ या कोरियन विद्यापीठाबरोबर नुकताच सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव प्रा. बी. पी. रोंगे यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटय़ूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांना उच्च शिक्षणाबरोबरच संशोधन प्रक्रियेत फायदा होण्यासाठी सेऊल येथील ‘कोणकुक’ या विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार केला आहे.‘कोनकुक’ हे कोरियामधील ३७० विद्यापीठांपैकी पहिल्या १० क्रमांकात येणारे विद्यापीठ आहे. या करारांतर्गत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी संधी, ‘कोनकुक’ विद्यापीठातील शिक्षकांकडून मार्गदर्शन, तसेच विविध आंतरराष्ट्रीय प्रबंध व तंत्रज्ञान उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नियमित चर्चा करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व संशोधनात्मक विकास होण्यासाठी सामंजस्य करार उपयुक्त ठरणार आहे.
‘कोनाकुक’ व ‘अभियांत्रिकी महाविद्यालय’ या दोन्ही मधून मिळणाऱ्या तंत्रशिक्षणाबरोबरच दोन देशातील संस्कृतीचा देवाण-घेवाणीसदेखील वाव मिळणार आहे. ‘कोनकुक’ विद्यापीठाशी सामंजस्य करार करणारे हे महाराष्ट्रातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.
सुरवातीला ‘अ’ दर्जा, गेल्या वर्षी आयएसओ ९०००:२००१ मानांकन, गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे एन.बी.ए. मानांकन आता कोरियन विद्यापीठाशी सामंजस्य करार करून अभियांत्रिकी महाविद्यालयाने आपल्या यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पवार यांच्या प्रयत्नामुळे हा सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे डॉ. पवार यांचे संस्थेचे अध्यक्ष विजय शेलार, उपाध्यक्ष एन. एस. कागदे व सर्व विश्वस्त यांनी अभिनंदन केले आहे.