Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

इचलकरंजीत ९ व १० ऑगस्ट रोजी कापड खरेदी-विक्री प्रदर्शन
इचलकरंजी, ६ ऑगस्ट / वार्ताहर

 

येथे ९ व १० ऑगस्ट रोजी कापड खरेदी-विक्री प्रदर्शन व मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे इचलकरंजीतील यंत्रमागधारक, व्यापारी, गारमेंट
उत्पादक यांना देशभरातील खरेदीदारांशी थेट संपर्क साधून व्यापर वृध्दी करण्याचे सुसंधी प्राप्त होणार आहे अशी माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यंत्रमाग विकास व निर्यात संवर्धन परिषद (पिडीक्सेल) आणि वस्त्रोद्योग आयुक्तालय, मुंबई यांच्यावतीने तसेच इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशन व दत्ताजीराव कदम टेक्निकल एज्युकेशन सोसायटी यांच्या सहकार्याने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. पिडीक्सेल व वस्त्रोद्योग आयुक्तालय यांच्यावतीने यंत्रमागधारकांच्या उत्पादीत कापडाची विक्री होण्यासाठी व त्याचा प्रचार, प्रसार होण्यासाठी कापड खरेदी-विक्री मेळाव्याचे (बायर-सेलर मिट) आयोजन केले जात आहे. याचा भाग म्हणून येथील घोरपडे नाटय़गृहात हा मेळावा होणार आहे. याकरिता ४० स्टॉल, स्थानिक उद्योजक, व्यापाऱ्यांसाठी उपलब्ध केले जाणार आहेत. तसेच वस्त्रोद्योग या विषयावर तीन तासाचे विस्तृत चर्चासत्र होणार आहे. मेळाव्याचे उद्घाटन ९ ऑगस्ट रोजी वस्त्रोद्योग आयुक्त ए.बी.जोशी यांच्या हस्ते व आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी पिडीक्सेलचे अध्यक्ष के.मरप्पन, वस्त्र समितीचे अध्यक्ष एकनाथ गडकरी यांच्यासह मान्यवर, वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत असे पिडीक्सेलचे उपाध्यक्ष विश्वनाथ अग्रवाल व संचालक गजानन होगाडे यांनी सांगितले.या मेळाव्यासाठी मुंबई, अहमदाबाद, कलकत्ता आदी ठिकाणचे खरेदीदार, व्यापरसंघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. इचलकरंजी हे कापड उत्पादनाचे प्रमुख केंद्र असून आता ते गारमेंट केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.
त्यामुळे स्थानिक उद्योजकांना या मेळाव्याचा चांगला लाभ होणार आहे असे पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष राजगोंड पाटील यांनी सांगितले. यावेळी सतिश कोष्टी, सुनील पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.