Leading International Marathi News Daily

शुक्रवार, ७ ऑगस्ट २००९

(सविस्तर वृत्त)

वळसंगच्या सूतगिरणीत शिवदारे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण
सोलापूर, ६ ऑगस्ट / प्रतिनिधी

 

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे श्री स्वामी समर्थ शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या आवारात दिवंगत ज्येष्ठ सहकार नेते, माजी आमदार वि. गु. शिवदारे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा येत्या ९ ऑगस्ट रोजी क्रांतिदिनी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते होत आहे.
सकाळी ९.३० वाजता होणाऱ्या या समारंभाचे अध्यक्षस्थान केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे हे भूषविणार असून या वेळी ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासह वस्त्रोद्योगमंत्री अनिस अहमद, ग्रामविकास राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, आमदार सुधाकर परिचारक, शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रतापसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे संचालक पृथ्वीराज देशमुख, राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष राजाराम पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. याबाबतची माहिती श्री स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
स्व. शिवदारे यांनी दुष्काळी दक्षिण सोलापूर तालुक्यात सहकार, शेती, उद्योग, शिक्षण आदी विविध क्षेत्रात भरीव कार्य केले होते. विधानसभेत आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविणारे शिवदारे यांनी १९७४ साली सहकारी सूतगिरणीच्या उभारणीचा संकल्प केला होता. १९८१ साली या सूतगिरणीला शासनाने मंजुरी दिली. सुरुवातीपासून नफ्यात असलेल्या या सूतगिरणीचा राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात नावलौकिक आहे. सध्या ४८ कोटी ८६ लाखांची मालमत्ता असलेली ही सूतगिरणी ३८ हजार ३०४ चात्यांची आहे. काळाची पावले ओळखून या सूतगिरणीने आधुनिकीकरणाचा अंगीकार करीत नवी वाटचाल केली. आधुनिकीकरणासाठी एनसीडीसीच्या सरळ कर्ज योजनेअंतर्गत शासकीय हमीविना कर्ज मिळविणारी ही राज्यातील पहिली सूतगिरणी होती, याचा श्री. शिवदारे यांनी अभिमानाने उल्लेख केला.
सूतगिरणीचे ५०४८ सभासद असून अधिकृत भागभांडवल ७ कोटी ५० लाखांचे आहे. सूतगिरणीच्या कार्यक्षेत्रात कापूस उत्पादनाचे प्रमाण अत्यल्प असल्याने सुरुवातीपासून कापूस विकास योजना राबविण्यात येत आहे. गिरणीच्या आवारात नवीन जिनिंग युनिटही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उल्लेखनीय कारभाराबद्दल शासनाचे अनेक पुरस्कार या सूतगिरणीने मिळविले आहेत. मात्र अलीकडे वीजदरवाढीचा फटका सूतगिरणीला बसत असून शासनाने त्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा श्री. शिवदारे यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेस सूतगिरणीचे उपाध्यक्ष उल्हास पाटील, वित्त व्यवस्थापक व्ही. बी. इंडे, गंगाधर पाटील, प्रकाश वाले आदी उपस्थित होते.